भोळा बंड्या आणि हुशार स्विटी (गमतशीर कथा)

भोळा बंड्या आणी हुशार स्विटी (गमतीदार गोष्ट)

बॅडमिंटनची रॅकेट

पलिकडच्या गल्लीतील कामताची “स्वीटी” बंड्याच्या बहिणीची मैत्रीण बंड्याला खुप आवडायची.बाल्कणीत उभे राहीले की ती पलिकडच्या कोर्टवर बॅडमिंटन खेळताना दिसायची.खेळताना तिचा “मिनी स्कर्ट” आणि “बाॅबकट” असा हालायचा की बंड्या पुरता “घायाळ” व्हायचा. तर ही स्वीटी आज बंड्याच्या “स्वप्नात” आली होती आणि कानांत
“मोर पीस” घालून “गुदगुल्या” करीत होती. उठून बघतोय तर काना जवळ डांस “गुणगुणत” होता.स्वप्नातून स्वीटी गायब झाल्याने चरफडत बंड्या सकाळी दहा वाजता उठला… तरी तो आळसांतच होता.आळोखे,पिळोखे देत होता. तेवढ्यात आई खोलीत आली आणी तिने विचारले…

“बंड्या ही काय उठायची वेळ झाली का?”
“अगं आई! रात्रभर झोप नाही?मी काय करू?”
“झोप नाय कशानं रे? मोबाईलवर गेम खेळत बसला असशील?
“नाही गं रातभर उकडतय आणि खेळतीस कुठं?”
दोन वेळा अंघोळ केली तरी “घाम” थांबेना म्हणून शेवटी”उघडा” झोपलो….तर रात्रभर डांस चावत होते!!!

अर वेड्या! मग गुडनाईट लावायचं नाही का?आई म्हणाली.
अगं आई! गुडनाईटनी कँन्सर होतो, असं मी whatsapp वर वाचलय. म्हणून मी नाही लावलं!!!
“मग मी तुला दुसरी आयडिया सांगू!” मच्छरदानी लावायची!

अरेच्छा! माझ्या ध्यानांतच आलं नाय बग !!
आता उद्या नक्की लावतो ..बंड्या म्हणाला…

मग दुसर्‍यादिवशी बंड्यानी “मच्छरदानी” लावली आणि झोपला झोपताना आपण कुठल्यातरी “पिंजर्‍यात” झोपलाेय, असा “फील” त्याला येत होता शेवटी “वाघ” जाळीच्या भोवती हिंडतोय आणी आपण आत “अडकलोय” असं त्याला वाटायला लागते आणि बरोबर रात्री बारा वाजता एकदम “दचकून” उठतो तर सगळ्या अंगाला घाम फुटलेला असतो.इकडे तिकडे पाहतो तर कांहीच नसते. पुन्हा जोरात “पंखा” लाऊन झोपतो आणि सकाळी उशीरा उठतो आणी पाहतोय तर काय सगळे “डांस” मच्छरदानीत आणि हा बाहेर अशी “अवस्था” झालेली असते.

आयला! डासावर हा “उपचार” बरोबर नाही!! दुसरं काहीतरी शोधलं पाहीजे म्हणून जरा इंटरनेटवर जाऊन प्रयत्न करतो आणि त्याला दोन उपाय सांपडतात….. एक “लसणाची पेस्ट” करून झोपण्याच्या आधी “अंगाला” लावणे किंवा “पुदिन्याचा पाला” आणुन गादीवर टाकणे आणि “हनीमुन बेड” तयार करणे.

मग बंड्या पहिला उपचार करायचा ठरवितो.झोपायला जाताना बंड्या रात्री दहा वाजता लसनाची “पेस्ट” तयार करायला घेतो. खलबत्ता कुटताना आई झोपलेली असते ती अर्धवट जागी होते आणि विचारते काय “खटाखटा” वाजवतोयस रे! …तर बंड्या म्हणतो लसनाची पेस्ट तयार करतोय तर आई म्हणते त्यात थोडं आलं टाक म्हजी चांगली होईल.. मग बंड्यानं त्यातआलं टाकलं आणि पेस्ट तयार करून अंगाला लावली सुरवातीला “गार” वाटलं आणि नंतर “भडभडायला” लागतं आणि बंड्याचा “डान्स” खोलीभर सुरू होतो. शेवटाला त्यानी गार पाण्याच्या हौदात उडी मारली तेव्हां कुठ जरा बरं वाटायला लागलं मात्र एक चांगलं झालं वासामुळे डास जवळ आले नाहीत. पण डोळे मात्र “चुणचुणत” होते. त्यामुळे झोप नाही ती नाहीच.

पुन्हा दुसरी दिवशी पुदिण्याचा पाला सगळ्या अथरूणावर टाकला आणि बंड्या झोपला तर झोप लागलीच नाही रात्रभर पाठीला टोचत होते आणि असा पाला टाकून “हनीमून” कसा करत असतील ह्याचा विचार तो करत होता. शेवटी बाहेर येऊन कोचावर झोपला.पुन्हा सकाळपसन विचारचक्र चालू झाले आणि डासाचं काय तरी केलं पाहीजे म्हणत मोबाईलवर whatsapp मेसेज चेक करत बसला तर त्यात मामाचा good morning मेसेज होता. ते बघुन मामा डासांवर काय करत असेल? हा विचार त्याच्या डोक्यात आला आणी मग त्यानी गावाकडे मामाला फोन लावला…

हॅलो मामा तुम्ही डासासाठी काय करता?असा डायरेक्ट प्रश्र्न त्यानी मामाला विचारला. त्यावर मामा आपल्या लाडक्या भाच्याला म्हणाला आम्ही “लिंबाच्या” उदबत्य्या आणतो आणी लावतो त्या लावल्या की… डांस आजिबात थांबत नाही मग बंड्यानी चांगल्या दोन डझन उदबत्या आणुन देवाजवळ सकाळ संध्याकाळ लावायला सुरवात केली पण “देव” काय पावला नाही.बंड्या या सगळ्या प्रकाराला वैतागला होता रातभर झोप नसायची..त्यामुळे चिडल्यासारखं व्हायचं.रात्र व्हायला लागली की त्याच्या अंगावर काटा यायचा.उकाड्यामुळे उघडं व्हायला लागायचं आणी उघडं झालंकी डांस चावायचे त्यामुळे तो…

“कडकलक्ष्मीगत रात्रभर या खोलीतून त्या खोलीत नाचायचा आणि उघड्या अंगावर बसलेले डांस उडवायसाठी फटाफट चपाटे मारून घ्यायचा!!”

पुन्हा दिवसभर पेंगत बसायचा.. असाच एका सकाळी पेपर वाचताना “मुंबईला डासांचा महापुर” ही बातमी त्यानी वाचली. मग त्याला वाटलं आयला! आपलं मुबईचं दाजी डांसावर काय उपचार करीत असतील? म्हणून त्यानी दाजीना फोन लावला.

दाजीनी फोन उचलला हॅलोss जिजू! अहो मी बंड्या बोलतोय.. बोल बोल बंड्या काय म्हणतोयस? कांही नाही आज पेपरात तुमच्याकडं डांस लई झाल्यात असं वाचलं मग म्हटलं तुम्ही काय करता हे विचारावं? यवढंच होय अरे त्यासाठी एक काम कर बाजारात जा आणी एक “रॅकेट” मिळती ती आण आणी खोली बंद करून एकदा रॅकेट फिरीवलीस की एक डांस शिल्लक राहत नाही आणि छान झोप लागत्या बघ….

मग बंड्या खुष झाला आणि लगेचच नजीकच्या स्पोर्टच्या दुकानात गेला आणी म्हणाला एक रॅकेट द्या!दुकानदार म्हणाला कोनती देऊ टेनीसची,बॅडमिंटन का टेबल टेनीसची देऊ.बंड्या “कंन्फुज” झाला आणी “बॅडमिंटनची रॅकेट” घेऊन बाहेर आला..

तो रॅकेट खाली वर बघत होता आणी त्याला जाळीची भोके बघून ह्याने डांस कसे मरतील ही शंका आली होती….
तरी पण त्यानी रॅकेट खांद्यावर टाकून एक “सेल्फी” मारला आणी “फेसबुकवर” टाकला आणी खाली रिमार्क लिहीत होता की…. “सोबतची डांसाचीच रँकेट आहे का?” तोवर पायाला डांस चावला आणी तो मारे पर्यत फोटो “पोस्ट” झाला.आणि धो धो “लाईक” ,काॅमेट” सुरू झाल्या..

मैत्रिणींच्या काॅमेंट याला सुरवात झाली बंड्या काय छान दिसतोस! केव्हांपासून बँडमिंटन खेळायला लागलास?
आमच्याकडे खेळायला ये! वगैरे वगैरे बंड्या समझून चुकला की हे काय तरी वेगळं झालय? नंतर तो परत दुकानदाराकडे गेला आणि म्हणाला.. तुम्ही मला कसली रॅकेट दिलीत? अहो मला बँडमिटन रॅकेट नको “डांस मारायची रॅकेट” हवी आहे.

तो म्हणाला पावतीवर काय लिहलय बघा.. “एकदा विकलेला माल कोणत्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही!”

बंड्याला दुकानदाराचा लई म्हजी लई राग आला.पण करणार काय शेवटी दु:खी मनाने तो घराकडे येत होता तर घरा जवळ आल्यावर त्याला “स्वीटी” भेटली ती कोर्टवरून परतत होती ती म्हणाली.
“काय बंड्या! कुठं गेला होतास?”
“कांही नाही ग जरा रँकेट आनायला गेलो होतो”!
“बघू, बघू कसली रॅकेट आनली आमच्या हिरोनी!”
मग बंड्यानी रॅकेट दाखविली! रॅकेट बघून ती एकदम खुष झाली आणि म्हणाली…. “अरे ही तर माझी आवडती “योनेक्सची बॅडमिंटनची” रॅकेट आहे आणि तुला कशाला रे हवी आहे ही रॅकेट?

मग बंड्या सगळी स्टोरी सांगतो आणी आपण कसे डांसाने “त्रस्थ” आहोत हे “कथन” करतो…
पण बंड्या ही रॅकेट मला खूप आवडली रे!..ती म्हणते
मग घेऊन जा त्यात काय एवढ!.. बंड्या म्हणतो

स्विटी खुप हुशार असते.. ती बोलत बोलत तशीच त्याच्या घरी येते. दारे,खिडक्या बघते.आणि त्याला जाळ्या नसल्याने डांस येतायत हे तिच्या लक्षात येते.मग आपण एवढी “महाग” बंड्याची रॅकेट घेतलीय तर त्याबदल्यात त्याला “मोबदला” म्हणून कांही तरी दिले पाहीजे म्हणून “जाळ्या” बसवून देऊ असे मनोमन ठरविते.. आणी कुणाला तरी फोन करते.आणि निघुन जाते.
तर दुपारी एक माणुस येतो.
आणि खिडक्याना जाळ्या बसवितो.जाळ्याचे पैसे देताना घेत नाही मॅडमनी दिलेत म्हणतो.
संध्याकाळी पुन्हा स्विटी घरी येते आणी एक “स्प्रे” आणि पत्रिका घेऊन येते.पहिल्यांदा बंड्याला स्प्रे देते आणी सांगते …बघ आता “स्प्रे” आणि “जाळीमुळे” डांस आजिबात येणार नाहीत आणी “छान” झोप लागेल!
तसेच काकुना “पत्रिका” देऊन नमस्कार करते.आणि लग्नाला येण्याचा “आग्रह” करून निघुन जाते.

त्या रात्री “जाळ्या” लावल्याने आणि “स्प्रे” मारल्याने एक ही डांस घरांत येत नाही त्यामुळे बंड्याला रात्री खरोखर “शांत” झोप लागते पहाटे पहाटे तो स्वप्नामुळे जागा होतो…

तर स्वप्नांत स्टीटी एका “सजविलेल्या” गाडीत लाल रंगाची “साडी” नेसून बसलेली असते,गाडी पुढे पुढे चाललेली असते आणी सगळेजण तिला निरोप देतायेत मागे स्पिकरवर “सोडून जाते गाव” हे गाणे लागलेले असते. आणी सगळेजण “रडतायत” असे दिसते

आणी मग बंड्या जागा होतो आणि खरोखरच “रडायला” लागतो.

सी एस पाटील.

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Chandrakant Patil

मी चंद्रकांत शामराव पाटील सेवानिवृत मेकॅनिकल इंजिनिअर. माझे बालपण खेडे गावात गेल्याने ग्रामीण भाषेवर प्रभाव.प्रसिद्ध लेखक अण्णा भाऊसाठे,शंकर पाटील,व्यंकटेश माडगुळकर,आनंद यादव यांच्या साहित्याचे वाचन व प्रभाव.आतापर्यत पंन्नास लेख व कथा प्रतिलीपी व इतर मराठी माध्यमातून प्रर्दशीत.

चंद्रकांत शामराव पाटील

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Rajiv Pujari

मस्त