विच्छा माझी पुरी करा!

*मनोरूग्ण कथा*
*विच्छा माझी पुरी करा!*
बबनराव रिटायर झाले आणि नोकरीच्या कटकटीतून सुटले.पण घरी ते सुखी नव्हते.
मुलं परदेशात होती आणी घरी “सगुणा वहिनी” एकट्याच असायच्या.हल्ली त्या “अशक्त” झाल्यासारख्या दिसत होत्या त्याना बरं वाटत नव्हतं काय झालय, हे कळत नव्हतं! सगळे रिपोर्ट्स नाॅर्मल यायचे. बर्‍याच डाॅ. ना दाखविले तर “मानसीक आजार” आहे म्हणून “ट्रिटमेंट” व्हायची नाही. दुपारी जेवल्यानंतर त्या झोपायच्या नाहीत गावाकडं किंवा माहेरला फोन करायच्या आणि गप्पा मारायच्या गप्पाचा मुख्य विषय असायचा अमक्याची सुन कशी तमक्याची कशी? ही किती चांगली ती किती बेकार आणि हे सारं झोपेपर्यत चालायचं ह्या सर्व गोष्टीला बबनराव वैतागले होते.

आजही ते नेहम्हीच्या डाॅ.कडे गेले.
डाॅ.नी पेशंटला तपासले आणी नेहम्हीप्रमाणे म्हणाले “काहीही झालेल नाही”!दुर्लक्ष करा!! पण आज मात्र बबनराव जाम वैतागले होते.
शेवटी ते न राहवून डाॅ. माने ना म्हणाले….
डाॅ. साहेब अहो किती दिवस तुम्ही सांगणार आहात काय झालेलं नाही,झालेल नाही.इकडे पेशंट “विक” होतोय,बरा होईना.आणि तुम्ही म्हणताय “दुर्लक्ष” करा.
अस म्हंटल्यावर डाॅ. म्हणाले बबनराव बरोबर आहे तुमचं मी समझु शकतो तुमची सिच्युएशन!. मग जरा वेळ ते थांबले आणी म्हणाले आता आपण एक शेवटचा उपाय करून बघुया! मी एक चिट्टी देतो तुम्ही डाॅ. दानवेच्याकडे याना घेऊन उद्या जावा.आजची त्यांची वेळ संपलीय डाॅक्टर घड्याळाकडे बघत म्हणाले.
रात्री मी त्याना फोन करून सगळं सांगतो.
दुसरे दिवशी बबनराव आणि वहिनी दोघे डाॅ.
दानवेच्याकडे आले. आत गेल्यावर डाॅ म्हणाले या बबनराव मला डाॅ. मानेनी सगळी कल्पना दिली आहे मी पाहतो तुमची केस तुम्ही निश्र्चिंत रहा सुरवातीला डाॅ नी एकट्या पेंशटशी बोलणं केलं आणी मग बबनरावाना आत बोलावलं आणि सांगितलं त्यांच्या मनावर एक खोल संस्कार(समज) झालाय आणि तो घट्ट आहे
पण सुदैवाने तो चांगला आहे…
बबनराव म्हणाले मला कांही समझले नाही
हा! मी सांगतो…
त्याचा समझ असा आहे की सुनेने सासुची सेवा करायचीअसते तिला चहा जेवण नाष्टा सगळं वेळेवर रेडीमेड द्यायचं असते त्याना जराही तोशीश लागून द्यायची नसते आणि त्याप्रमाणे त्यानी त्यांच्या सासूची सेवाही केलीय.

बबनराव म्हणाले त्यात काय एवढं!
पुर्वी सगळ्याच बायका ते करीत होत्या!!

मग डाॅ म्हणाले नाही नाही तसं नाही
गोष्ट तेवढ्यावर थांबलेली नाही त्यावेळीच म्हणजे चाळिस वर्षापुर्वी त्यानी त्यांच्या मनांत ही गाठ बांधून ठेवलीय की…. ज्यावेळी मी सासू होईन त्यावेळी मला पण अशीच “ट्रिटमेंट” मिळणार म्हणजे सगळ “आयतं” मिळणार.माझी पण सुन असच करणार.
पण….. दुदैवाने ही गोष्ट झालेली नाही किंवा घडलेली नाही. त्याचा इंपॅक्ट हा आहे.तुमची मुलं तर परदेशात आहेत आणि हे घडणं शक्य नाही.तरी पण त्यांच्या मनातून ते काढणं गरजेचे आहे,महत्वाचं आहे.
तर सुरवातीला साधा उपाय करू नाही जमलं तर बघू पुढे काय करायचे ते नंतर ठरवू!
आता मी सांगतो तसं करा शिवाय मदतीला मी कांही औषधे देतो आहेच!…..तोपर्यत एक Emergency केस आत आली आणि बोलणं अर्धवट राहीले मग डाॅ नी बबनरावाच्या कानांत काही तरी सांगितले आणि बबनराव विचार करत बाहेर पडले…
बबनराव आज वाट बघत होते की सगुणा केव्हां सुनेचा विषय काढते आणी डाँक्टरनी सांगितलेला उपचार कधी सुरू करतोय मग थोड्या वेळानी नाष्ट्यानंतर चहा घेत ते दोघेजण हाॅलमधे बसले होते तर वहिणी म्हणाल्या परवा आपुन गावाकडं गेलोतो तर आमच्यापेक्षा लहानग्या असलेल्या भावजयासनी आता सुना आल्यात्या.बसल्या जाग्यावर चहा मिळतुया त्यासनी.काय नशीब असतया एकाद्यांच बघाकी!. आमची साठी उलाटली तरी आमच्या नशीबात “आयता” चहा नाय का कुणाला “बोलाय” येत नाय! बोलाय येत नाय म्हजी? तुमाला नाय कळायच!!!!
अहो तुम्ही साहेब झाल्यावर नवीन पोरासनी कसं “झापडत” होता की नाय तशी “सासुगिरी” करण्यात वेगळीच मजा असती ती माझ्या नशीबात नाय हो!…… हे म्हणतीया म्या!!
मग बबनराव म्हणाले एवढच होय. मग असू करू
आपण आज पासून मी तुझी “सुन” आणि तु माझी सासू नाहीतरी लाॅकडाॅऊन मधे सगळा स्वैयंपाक मी शिकलो आहेच!चालेल?
अग बाई! बरं झालं की वहिणी म्हणाल्या..
मी सासुगिरी पण करणार चालेल?
हो चालेल!
मग सूरू झाला सासू सुनेचा सिलसिला..

दुसर्‍यादिवशी सकाळी उठल्या उठल्या बबनरावानी चहा केला बायकोला दिला व आपण घेतला. चहा पिता पिता वहिणी म्हणाल्या काय हा चहा!!!चहा केलाय का “काकवी” साखर किती घालावी याचा काय अंदाज? बरं बाई दुसरा करू का? तुम्ही मस्त कराल हो! पण तेवढं दुध नको का?
“चला आपल आपून करून पेल्याल बरं”!.
तेवढ्यात झाडू पोच्यासाठी नेमलेली नवीन बाई आली. बबनराव पेपर वाचत होते बाई आत गेली तर वहिनी बबनरावना कांही तर खुणावत होत्या. पण बबनरावानी दुर्लक्ष केली. तेवढ्यात ती बाई ते बसले होते तिथेच झाडायला आली तर बबनरावनी तिला विचारले कुठं राहताय?मुलं काय करतात? इ. मग काम आवरून बाई निघुन गेली.त्यानंतर वहिनी सुरू झाल्या..अहो तुम्ही हाप पॅन्टवर बसला आहात लांबडी विजार घाला हे मी म्हणत होते पण तुम्ही निलाजर्‍यासारखं पेपर वाचत बसलाय.आणि दुसरं तुम्हाला काय करायच्या ह्या “चांभार चौकश्या” कुठं राहत्यास आणी कुठं जात्यास! ह्याच्यावर बबनराव काय बोलु शकले नाहीत. मग थोड्यावेळाने बबनराव स्वैयंपाक घरात गेले आणि तिथूनच त्यानी विचारले…अगं भाजी काय करायची? अहो आधी फ्रिज उघडा काय काय आहे ते सांगा!
गवारी,कोबी,फ्लाँवर,वाटाणा, दोडका आहे.
मग तिखट दोडका आणि वरण करा. नंतर बबनरावानी कुकरला डाळ आणि भात लावला आणि भाजी फोडणी टाकली! तर वहिणी बाहेरूनच ओरडल्या अहो गार तेलातच भाजी टाकली का?बबनराव नाही नाही म्हणाले. नाही कसं? अहो फोडणीचा आवाज आणी वास तर आलाच नाही. मला शिकऊ नका! भाजी करण एवढं सोप नाही! असं म्हणत त्या आतआल्या तर बबनराव कोथिंबिर हाताने चुरून टाकत होते.अहो कोथिंबिर अशी टाकतात का?
वैरण टाकल्या सारखी? अहो येळीवर निट चिरून टाकायची असते!! काय हे?

मग बबनराव कपडे धुवायला गेले बायकोचे आणी त्यांचे मिळून बरेच कपडे झाले मग त्यानी धुवायला सुरवात केली सगळ्या कपड्याना साबण लाऊन झाला तर वहिणी बाथरूमच्या दाराजवळ येऊन उभ्या होत्या आणि म्हणत होत्या साडीच्या “फाॅलला” आणि परकराच्या “काटाला” चांगला साबण लाऊन घासा काळं दिसता कामा नये!बबनरावाचे साबण लाऊन हात भेडांळले होते त्यात हिचे हे असे प्रोत्साहन मग ते फारच नाराज व्हायचे पण हसायचे घेतला वसा टाकायचा नाही या तत्वाने ते पुढे जायचे. वहिणीना मात्र आतल्याआत आनंद व्हायचा!

हळूहळू बबनरावांच्या सुनेच्या रोलला महिणा झाला आणि एक दिवस वहिणींच्या बहिणीचा फोन आला होता ती विचारत होती…
कशी हाईस गं आक्का? तर त्या म्हणाल्या आता मी चांगली हाय आता मला “सुन” आल्या बसल्या जागेवर चहा,नाष्टा,जेवण मिळतय आणिक काय पाहीजे! आता एकदम “ओके” मधी हाय बघ! अगं पण दोन्ही पोरांची लग्नं
हुन नातु झाल्याती! आणी सुन कुठली गं?
का आनिक लगीन केलस पोराचं?
अगं तस नव्हं गेल्या महिण्यात हे रिटायर
झालं नाहीत का? ती काय समझायची ती समझली आणी अस्सं हाय होय म्हणून हसायला लागली.

बाजूला उभा राहून बबनराव हे सगळं ऐकत होते आणि डाॅ नी कानांत सांगितलेला मंत्र लागू पडला म्हणून मनोमन खुष होते.

*सी. एस. पाटील.*

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Chandrakant Patil

मी चंद्रकांत शामराव पाटील सेवानिवृत मेकॅनिकल इंजिनिअर. माझे बालपण खेडे गावात गेल्याने ग्रामीण भाषेवर प्रभाव.प्रसिद्ध लेखक अण्णा भाऊसाठे,शंकर पाटील,व्यंकटेश माडगुळकर,आनंद यादव यांच्या साहित्याचे वाचन व प्रभाव.आतापर्यत पंन्नास लेख व कथा प्रतिलीपी व इतर मराठी माध्यमातून प्रर्दशीत.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
Anmol Anand Kulkarni

बोलकी , सुंदर..