आर्यनची नौका

आर्यनची नौका

किर्लोस्करवाडी ! किर्लोस्कर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी असलेली एक वसाहत. ३५०-४०० घरांची एक अतिशय टुमदार टाऊनशीप. हॉटमिक्सचे सुंदर डांबरी रस्ते. एक मुख्य रस्ता व त्यापासून निघालेले प्रत्येक गल्लीत जाणारे उपरस्ते. वसाहत तशी स्वयंपूर्ण. किराणा मालाचे दुकान, रोज सकाळी भरणारी भाजी मंडई, जवळील रामानंदनगरहून रोज येणारा दूधवाला, कर्मचारी व त्यांच्या मुलांसाठी आधुनिक व्यायामशाळा, त्याला लागूनच सेमी ऑलिंपिक मापाचा जलतरण तलाव, लहान मुलांसाठी बालोद्यान, केबल टी. व्ही., सोशल क्लब, बालवाडी ते बारावीपर्यंत शाळा, शाळेशेजारी मारुती मंदिर, त्याच्या शेजारी आखाडा, एक टुमदार विठ्ठल मंदिर, नव्याने बांधलेले गणेश मंदिर, क्रिकेटचे मैदान आणि ग्रामदैवत मायाप्पाचे मंदिर. थोडक्यात काय तर पृथ्वीवरील स्वर्गच ! अत्यंत खेळीमेळीचे वातावरण. पूर्ण गांव म्हणजे एक कुटुंबच जणू ! सर्व ग्रामस्थ सुशिक्षित. त्यामुळे शिक्षणाचे वातावरण. शाळेचा दहावीचा व बारावीचा निकाल १००% ठरलेलाच !

राजेंद्र जोशी व त्यांची पत्नी राजश्री हे येथील एक कुटुंब. राजेंद्र मेंटेनन्स विभागात इंजिनियर तर राजश्री इतिहास विषयात पोस्ट ग्रॅज्युएट. त्या कॉलनीतील शाळेतच इतिहास विषय शिकवितात. आर्यन त्यांचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासूनच अत्यंत हुशार. दहावी बारावीला बोर्डात प्रथम आल्यावर आय.आय.टी. मुंबईमधून मेकॅनिकल इंजिनीअरींगमध्ये बी. टेक. डिग्री गोल्ड मेडलसह मिळविलेला मुलगा. लहानपणापासूनच अंतराळ विज्ञानाची अतिशय आवड. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आखलेल्या सर्व कार्यशाळांमध्ये त्याने भाग घेतला होता. अंतराळयान, प्रक्षेपक, रोव्हर्स, लँडर्स यांच्या पुठ्ठे, थर्माकोल यांपासून प्रतिकृती बनविण्यात त्याचा हातखंडा. केवळ अभ्यासातच नव्हे तर विविध खेळ, वक्तृत्व यांमध्येसुद्धा तरबेज. वाचनाची व भटकंतीची अत्यंत आवड. बी. टेक. झाल्यावर अमेरिकेतील जगप्रसिद्ध कॅलटेक् विद्यापीठातून अंतराळ विज्ञान क्षेत्रात एम्.एस्. व नंतर डॉक्टरेटही तेथूनच केली. एम्.एस्.करत असतांना नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबरोटरीत अनेक प्रोजेक्टस् मध्ये नामवंत शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. डॉक्टरेट झाल्यावर नासाकडून आलेली गलेलठ्ठ पगाराची ऑफर नाकारून त्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये काम करायला सुरुवात केली.

किर्लोस्करवाडीमध्ये राजेंद्र जोशी कुटूंबाशेजारी मनोहर देशपांडे यांचे कुटूंब रहात होते. मनोहर प्रोडक्शन विभागात इंजिनिअर तर त्यांच्या पत्नी सौ. मानसी गृहिणी. दोन्ही कुटूंबांमध्ये अतिशय घरोब्याचे संबंध. मधुरा त्यांची एकुलती एक कन्या. देखणी, हुशार, अतिशय लाघवी. मधुराला लहानपणापासूनच शुद्ध विज्ञानात रस होता. दहावी बारावीला बोर्डात आल्यानंतर तिने इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, बेंगलुरू येथून पदार्थविज्ञानात एम्एस्सी व नंतर एस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेट केले. त्यानंतर तिनेही वैज्ञानिक म्हणून इस्रोमध्येच काम करायला सुरुवात केली. विकास इंजिन, जी. एस्. एल्. व्ही.- मार्क II प्रक्षेपक आदि बनविण्यात दोघांचाही सिंहाचा वाटा होता.

किर्लोस्करवाडीमध्ये शेजारी शेजारी रहात असल्याने आर्यन व मधुरा यांचे एकमेकांकडे जाणे येणे होतेच. राजश्री वहिनींनी कांही वेगळा पदार्थ केला तर त्या मधुराला आवर्जून बोलावत. मानसी वाहिनीही आर्यनच्या आवडीचे कांही केले तर मुद्दाम त्याला बोलावत. नाटकातसुद्धा अनेकदा त्यांनी एकत्र काम केले होते. शाळेच्या गॅदरिंगमध्ये दोघांना ‘मेड फॉर इच ऑदर’ ‘एक दुजे के लिये’ असे फिशपॉंड्स पडत. बेंगलोरला इस्रोत कामास लागल्यावर कामानिमित्त दोघांचे एकमेकांकडे जाणे होई. दोघांनाही एकमेकांच्या कामातील हुषारी व कामाप्रती असलेली समर्पितवृत्ती यांविषयी आदर होता. हळू हळू आदराची जागा प्रेमाने घेतली. एके दिवशी इस्रोच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान आर्यनने मधुराला रीतसर एक गुढगा टेकून गुलाबाचे फूल देऊन प्रपोज केले. घरच्यांचा कांही प्रश्नच नव्हता. एका शुभ मुहूर्तावर सांगलीतील एका नामवंत मंगलकार्यालयात दोघांचे शुभमंगल पार पडले. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात आठवडाभर राहून दोघे कामावर रुजू झाले.

एके दिवशी इस्रोचे चेअरमन बी. सिवाप्पा यांनी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली व सांगितले, “आपणा सर्वांना माहित आहेच कि, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पृथ्वीच्या ऋतूचक्रावर विपरीत परिणाम झाला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे सजीवांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. पॅरिस परिषदेसारख्या अनेक परिषदा घेऊन वा करार करूनही या परिस्थितीत फारसा बदल होत नाही आहे. तज्ञांच्या अनुमानानुसार येत्या सुमारे ७० ते ७५ वर्षांत मानवाला विश्वात दुसरीकडे कोठेतरी वसाहत करावीच लागेल. आपल्या माननीय पंतप्रधानांनी आमच्याशी विचारविमर्श करून मंगळग्रहावर वसाहत करण्याच्या दृष्टीने योग्य ती पाऊले उचलण्यास सांगितले आहे. मी या प्रकल्पासाठी श्री आर्यन जोशी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी व सौ. मधुरा जोशी यांची मुख्य वैज्ञानिक तसेच समन्वयक म्हणून निवड करत आहे. आपण सर्वांनी मिळून हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडूया. जय हिंद!”

आर्यन व मधुरा यांचे सर्वांनी अभिनंदन केले. यानंतर श्री आर्यन जोशी यांनी सर्वांची बैठक बोलावली. यावेळी आर्यन जोशी म्हणाले, “पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. आपल्या हातात वेळ अत्यंत कमी आहे. आपण सर्वजण आतापासूनच कामाला लागूया. आपल्या पुराणातील मनुच्या नौकेची गोष्ट सर्वांना माहित असेलच. तर आपण आपल्या यानातून पृथ्वीवरील सर्व सजीवांचे नमुने घेऊन जाऊ व मंगळावर प्रति पृथ्वी उभारू. आपणास माहित आहेच कि, गेली कित्येक दशके आपण संपूर्ण विश्वात ‘कोणी आहे का तिथे?’ अशी हाक देत आहोत. पण या हाकेला उत्तर येत नाही आहे. तेव्हा पुर्ण विश्वात तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले आपणच आहोत. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, कणाद, वराहमिहीर, न्यूटन, आइन्स्टाईन यांनी रचलेल्या पायावर आपण अतुलनीय अशी वैज्ञानिक प्रगती केली आहे. आपल्याला सौरमालेतील सर्व ग्रह व उपग्रह यांविषयी माहिती आहेच ; त्याशिवाय सौरमालेबाहेरील तारे, ग्रह यांचेविषयीची माहितीसुद्धा व्हॉयेजर सारखी अवकाशयाने तसेच हबल सारख्या दुर्बीणी यांचेद्वारा आपण मिळवली आहे. आपण अणूगर्भाचा शोध घेतला आहे, पुंजयांत्रिकी (क्वांटम मेकॅनिक्स ), नॅनो तंत्रज्ञान यांमध्ये आपण विलक्षण प्रगती केली आहे. हे सर्व ज्ञानभंडार आपण एका सुपरकॉम्प्युटरवर घेणार आहोत, तो सुपरकॉम्प्युटर आपण मंगळावर घेऊन जाऊ, जेणेकरून आपणास मंगळावर आदिमानव बनून चाकाचा शोध लावण्यापासून सुरुवात करायला नको. पृथ्वीवर आपण ज्या चुका केल्या आहेत कि ज्यामुळे पृथ्वीचा विनाश जवळ येऊन ठेपला आहे, त्या चुका आपण मंगळावर नक्कीच करणार नाही. चला तर मग कामाला लागूया.”

त्यानंतर श्री आर्यन जोशी यांनी सर्व वैज्ञानिक व तंत्रज्ञांचे वेगवेगळे गट करून त्यांना तीन महिन्यांत प्राथमिक अहवाल सादर करायला सांगितला. वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी जुन्या काळात मंगळाविषयी मिळालेली माहिती व मंगळाचे पुनरुज्जीवन (टेराफॉर्मिंग) करण्याच्या दृष्टीने जगभर चालू असलेले संशोधन यांची माहिती घेतली, संगणकावर विविध सिम्युलेशन्स केली, अनेक चर्चासत्रे पार पडली, विचारमंथन (ब्रेन स्टॉर्मिंग) झाले. त्यातून खालील माहिती पुढे आली :

एकेकाळी मंगळ पृथ्वीप्रमाणेच सुजलाम् सुफलाम् होता. त्याला देखील चुंबकीय क्षेत्र होते. त्यामुळे मंगळाच्या वातावरणाचे सौरवादळे व अंतरीक्ष प्रारणे यांपासून संरक्षण होत असे. मंगळाचे आकारमान पृथ्वीच्या फक्त ५३% असल्याने त्याचा गाभा लवकर घनरूप झाला, त्यामुळे त्याचे चुंबकीय क्षेत्र नाहीसे झाले. हे घडले साधारण ४.२ अब्ज वर्षांपूर्वी. हळू हळू पुढील ५० कोटी वर्षांत सौरवादळांमुळे मंगळाचे वातावरण नष्ट झाले.जरी वैज्ञानिक संशोधनाद्वारे आपण मंगळावरील वातावरणाची घनता वाढवली, तरी थोड्याच काळात सौर वादळे व अंतरीक्ष प्रारणे यांमुळे हे वातावरण नष्ट होईल. जर आपणास मंगळावरील वातावरणाची घनता वाढवून ती टिकवून ठेवायची असेल, तर प्रथम मंगळाचे चुंबकीय क्षेत्र पुनरुज्जीवीत करणे आवश्यक आहे. आता जर आपणास चुंबकीय क्षेत्र पुनःस्थापित करायचे असेल तर पूर्ण मंगळ ग्रह तप्त करून त्याचा गाभा द्रवरूप अवस्थेत आणावा लागणार. हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. यावर दुसरा उपाय म्हणजे पूर्ण मंगळाभोवती विद्युतचुंबकीय आवरण बसविणे. हे देखील व्यवहार्य नाही. त्यामुळे आपणास शास्त्रीयदृष्ट्या व्यवहारीक उपाययोजना करावी लागेल.

मंगळावरील चुंबकीयक्षेत्र पुनःस्थापित केल्यावर पुढचे काम येते ते म्हणजे मंगळावरील तापमान वाढविणे. सद्यःस्थितीत मंगळाचे सरासरी तापमान -६३°सेंटीग्रेड आहे. उन्हाळ्यात दुपारच्यावेळी विषुववृत्ताजवळ हे तापमान २०° सेंटीग्रेड एव्हढे असते तर ध्रुव प्रदेशात हेच तापमान -१५३°सेंटीग्रेड असते. मंगळाचे तापमान वाढविण्याचा एक पर्याय असा असू शकतो कि, मंगळापासून योग्य अंतरावर अणूस्फोट घडवून आणणे. यामुळे तापमान वाढेल, ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून नद्या, नाले दुथडी भरून वाहतील, ध्रुव प्रदेशातील शुष्क स्वरूपात असलेला कार्बन डाय ऑक्साईड वायूस्वरूपात रूपांतरीत होऊन हरितगृह परिणामामुळे संपूर्ण मंगळाचे तापमान वाढेल. पण यात एक धोका संभवतो, तो म्हणजे जर योग्य अंतरावर स्फोट घडवून आणता आला नाही तर,अणुस्फोटामुळे निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे मंगळाचे वातावरण कायमचे बाधित होईल. असे गृहीत धरले कि, अणूस्फोट मंगळापासून अशा अंतरावर घडविला कि, जेणेकरून किरणोत्सर्ग मंगळापर्यंत पोहोचणार नाही, तरी सुद्धा हे पाऊल सर्व देशांनी मिळून केलेल्या बाह्य अंतराळ कराराविरोधात होईल. दुसरा एक उपाय म्हणजे मंगळ भूपृष्ठापासून कांही अंतरावर दोन ते तीन सेंटीमिटर जाडीचे ऐरोजेल या पदार्थाचे आवरण कायमस्वरूपी बसविणे. ऐरोजेल हा ९९.८% हवा व ०.२% सिलिका यांपासून बनलेला उष्णतारोधक पदार्थ आहे. यामुळे देखील सूर्यापासून येणारी उष्णता वातावरणाबाहेर जाणार नाही व वातावरण उबदार होईल. नदी, नाले पुनरुज्जीवीत होतील तसेच सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासूनही मंगळाचे रक्षण होईल. पण ऐरोजेल हा नाजूक व ठिसूळ पदार्थ आहे, त्यामुळे अन्य धातूंबरोबर त्याचे मिश्रण करावे लागेल. त्यामुळे त्याच्या मूळ गुणधर्मांत बदल होणार. तसेही पूर्ण ग्रहाभोवती एकाद्या पदार्थाचे आवरण घालणे व्यवहार्य वाटत नाही. त्यामुळे आपणास दुसरा उपाय शोधावा लागेल.

वातावरणाचे पुनरुज्जीवन केल्यानंतर पुढची पायरी म्हणजे, मंगळाच्या वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढविणे, जेणेकरून मनुष्याला विना ऑक्सिजन सिलिंडर व मास्क मंगळावर वावरता येईल. यासाठी एक उपाय म्हणजे, सध्या प्रायोगिक स्वरूपात असणाऱ्या ‘मॉक्सि’ उपकरणासारखी पण त्यापेक्षा जास्त क्षमतेची उपकरणे मंगळावर वेगवेगळ्या ठिकाणी बसविणे, त्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइडचे विघटन होऊन श्वसनयोग्य असा प्राणवायू पूर्ण मंगळभर उपलब्ध होईल. पण मंगळाचे क्षेत्रफळ पाहता हा उपाय व्यवहार्य वाटत नाही. दुसरा उपाय म्हणजे सूर्यप्रकाश व पाणी यांच्या उपस्थितीत प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डाय ऑक्साइड घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडणारे सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचे कंटेनर्स मंगळावर नेऊन हेलिकॉप्टरद्वारे वेगवेगळ्या पाणथळ भागांत पसरणे. यामुळे वातावरणातील प्राणवायूची उपलब्धता वाढेल. कांही सुधारणांसह हा उपाय योग्य वाटतो.

प्राथमिक अहवाल तयार करतांना सौ. मधुरा जोशी यांनी प्रत्येक गटाला मार्गदर्शन करण्याचे व सर्व गटांमध्ये समन्वयाचे काम उत्तमरित्या केले.

सर्व गटांनी श्री आर्यन जोशी यांचेसमोर प्राथमिक अहवालाचे सादरीकरण केले. आर्यनने प्राथमिक अहवाल वेळेत सादर केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले. तद्नंतर त्यांनी तीनही गटांना मंगळाच्या चुंबकीय क्षेत्राचे पुनरुज्जीवन, मंगळावरील तापमान वाढवून मंगळाच्या वातावरणाची घनता वाढविणे आणि मंगळावरील प्रणवायूचे प्रमाण श्वसनयोग्य करणे यांसाठीचे अंतिम शास्त्रीय व व्यवहारीक उपाय आणि त्यांना येणारा खर्च यांचा अहवाल तयार करण्यास सांगितले. त्यासाठी मुदत ठरली एक वर्ष.

तिनही गट झडझडून कामाला लागले. संगणकीय सिम्युलेशन्स, वेगवेगळ्या संकल्पनांप्रमाणे प्रतिकृती (प्रोटोटाईप) तयार करून त्यांच्या चाचण्या घेणे यांत तिनही गट मग्न झाले. सौ. मधुरा जोशी यांनी तर अक्षरशः रात्रीचा दिवस केला. श्री आर्यन जोशींचे सर्व कामावर बारीक लक्ष होते. एक वर्षानंतर तिनही गटांची बैठक श्री आर्यन जोशी यांच्या उपस्थितीत झाली. तिनही गटांनी आपापली सादरीकरणे केली. सौ. मधुरा जोशी यांनी तिनही गटप्रमुखांना सादरीकरणाची संधी दिली.

पहिल्या गटातर्फे श्री अश्विन मल्होत्रा यांनी मंगळाचे चुंबकीय क्षेत्र कसे पुनःस्थापित करावे याविषयी सादरीकरण केले. ते म्हणाले, “आपण प्राथमिक अहवालाच्या चर्चेमध्ये म्हंटलेच होते कि, मंगळाचे चुंबकीय क्षेत्र पुनःस्थापित करण्यासाठी मंगळाचा गाभा वितळविणे किंवा पूर्ण मंगळाभोवती विद्युतचुंबकीय आवरण बसविणे या दोन्ही गोष्टी व्यवहारीकदृष्ट्या अशक्य आहेत. त्याऐवजी एक डायपोल चुंबक मंगळ व सूर्याच्या L1 बिंदूत स्थापित करणे शक्य आहे. हा डायपोल चुंबक असा असेल जो मंगळाभोवती एक ते दोन टेस्ला ताकतीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. याला आपण चुंबकावरण (मॅग्नेटोस्फिअर) म्हणूया. हे चुंबकावरण अंतरीक्ष प्रारणे व सौर वादळांना परतवून लावेल. [L1म्हणजे लॅगरेज बिंदू क्रमांक एक. अंतराळातील दोन मोठया गोलकांमध्ये असे कांही बिंदू असतात, जेथे त्या मोठया गोलकांचे गुरुत्वाकर्षण व केंद्रपसारक शक्ती (सेंट्रिफ्युगल फोर्स) एकमेकांना तोलून धरतात. मंगळ व सूर्य यांच्यातील L1 बिंदू हा मंगळभूपृष्ठापासून १०,००,००० कि. मी. अंतरावर आहे.] सौर वादळांना परतवून लावल्यामुळे मंगळावरील वातावरणाचा ऱ्हास होणार नाही. डायपोल चुंबक एका उपग्रहावर बसवलेला असेल. अशा प्रकारचा उपग्रह व डायपोल मॅग्नेट बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल व खर्च आठशे कोटी रुपये येईल.”

मंगळावरील तापमान कसे वाढवता येईल, याविषयी के. नागप्पा यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले, “आपण सर्वांनी प्राथमिक अहवालात पाहिलेच आहे कि, मंगळाचे तापमान वाढविण्यासाठी मंगळाजवळ अणूस्फोट घडाविणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. तसेच पुर्ण मंगळाभोवती ऐरोजेलचे आवरण बसविणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. त्याऐवजी मंगळाच्या भूस्थिर कक्षेत त्याच्या ध्रुवाजवळ १२५ कि. मी. त्रिज्येची ऍल्यूमिनिमचा पातळ थर दिलेली PET (पॉलिइथिलीन टेरेफ्थालेट) फिल्म प्रस्थापित केली तर ती आराशासारखे काम करेल व सूर्याकडून येणारी ऊर्जा मंगळाकडे परावर्तित करेल. त्यामुळे मंगळाचे तापमान वाढण्यास थेट मदत मिळेल. यामुळे ध्रुवप्रदेशातील गोठलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचे वायूत रूपांतर होईल. त्यामुळे हरितगृह परिणाम होऊन मंगळाच्या भूपृष्ठावरील तसेच वातावरणातील उष्णता अंतराळात उत्सर्जित केली जाणार नाही. तसेच ध्रुवप्रदेशातील, जमिनीखालील व खडकांच्या भेगांतील गोठलेले पाणी द्रवरूप होऊन नद्या, नाले, तलाव दुथडी भरून वाहतील. उष्णतेमुळे नद्यांतील पाण्याची वाफ होऊन ती वातावरणात उंच जाईल व थंड हवेने द्रवरूप होऊन पावसाच्या रूपाने ती खाली येईल व ऋतूचक्र सुरु होईल. सुरुवातीला ही PET फिल्म घडी केलेल्या स्थितीत एका उपग्रहावर बसवलेली असेल. मंगळाच्या भूस्थिर कक्षेत उपग्रह स्थापन झाल्यावर ती उलगडेल. ही फिल्म व उपग्रह बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल व खर्च एक हजार कोटी रुपये येईल.”

मंगळावर ऑक्सिजनचे प्रमाण कसे वाढवता येईल याचे सादरीकरण श्री अँथोनी डिसोझा यांनी केले. ते म्हणाले, ” प्राथमिक अहवालात म्हंटल्याप्रमाणे मंगळावर सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचे रोपण पाणथळ जागांवर करून हवेतील प्रणवायूचे प्रमाण वाढविण्याचे आम्ही ठरविले आहे. पण आम्ही एक गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे या जीवाणूंचा जिवनकाल जेनेटीक सायन्सच्या मदतीने आम्ही वाढविणार आहोत तसेच त्यांचा विभाजनाचा कालावधी आम्ही कमी करणार आहोत. आणखी एक गोष्ट आम्ही करणार आहोत ती म्हणजे प्रकाश संश्लेषण करून प्राणवायू उत्सर्जित करण्याची त्यांची क्षमता आम्ही अनेक पटीने वाढविणार आहोत. म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईडचे रूपांतर प्राणवायूत करण्यास लागणारा वेळ आम्ही कमी करणार आहोत. आपले यान मंगळावर उतरल्यानंतर एक वर्षाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हे जिवाणू पाणथळ जागांवर पसरण्यात येतील. डायपोल मॅग्नेट उपग्रह L1 कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर सुद्धा पूर्वीची सौर वादळे व अंतरीक्ष प्रारणांचा परिणाम कमी होण्यासाठी, तसेच मंगळाच्या भूस्थिर कक्षेत PET फिल्म वजा आरसा बसवून मंगळाचे सरासरी तापमान ५° सेंटीग्रेड होण्यासाठी व मंगळावरील गोठलेले पाणी द्रवरूप होण्यासाठीही एक वर्षाचा कालावधी लागेल असे मधुरा जोशी मॅडमच्या संगणक प्रारूपावरून सिद्ध झालं आहे. त्यामुळेच सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचा वापर आम्ही यान मंगळावर उतरल्या नंतर एक वर्षाने करणार आहोत. जिवाणूंमध्ये जनुकीय बदल करण्यासाठी दोन वर्षे लागतील व दोनशे कोटी रुपये खर्च येईल.”

तिन्ही अहवालांचा गोषवारा आणि समारोप सौ. मधुरा जोशी यांनी केला. त्या म्हणाल्या, “डायपोल मॅग्नेट L1 कक्षेत बसवल्यावर चुंबकावरण तयार होईल. त्यामुळे सौर वादळे व अंतरीक्ष प्रारणे मंगळापर्यंत पोहोचणार नाहीत. पण पूर्वीची सौर वादळे व अंतरीक्ष प्रारणांमुळे दूषित झालेले वातावरण सामान्य होण्यासाठी साधारण एक वर्ष लागेल. PET फिल्म मंगळाच्या भूस्थिर कक्षेत बसविल्यानंतर मंगळाचे सरासरी तापमान ५° सेंटीग्रेड होण्यासाठी सुद्धा तेव्हढाच कालावधी लागेल. या सर्वांत ब्रेक थ्रू असे संशोधन आपणास करायचे आहे ते म्हणजे सायनोबॅक्टेरिया जिवाणूंची प्रकाश संश्लेषण करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढविणे म्हणजेच कार्बन डाय ऑक्साइड वायू घेऊन प्राणवायू बाहेर सोडण्यास लागणारा वेळ अनेक पटीने कमी करणे, जेणेकरून मंगळावरील हवेतील प्राणवायूचे प्रमाण पुढील दहा वर्षांत २१% होईल. आम्ही त्यादृष्टीने थोडे प्रयोग सुरु केले आहेत.”

श्री आर्यन जोशी यांनी तिनही गटांचे व सौ. मधुरा जोशी यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ते म्हणाले, ” तुम्ही सर्वांनी अथक प्रयत्न करून जे अहवाल सादर केले आहेत ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर, व्यवहार्य आणि आर्थिक दृष्टीनेही अत्यंत योग्य आहेत. मी हे तिनही अहवाल एकत्र करून आपल्या माननीय चेअरमन साहेबांना सादर करीन. त्यानंतर ते सदरचा अंतिम अहवाल केंद्र सरकारच्या अंतरीक्ष विभागाकडे पाठवतील. त्यांच्याकडून निधी मंजूर झाल्यानंतर आपण कामास सुरुवात करू.”

श्री बी. सिवाप्पा यांनी अंतिम अहवाल केंद्र सरकारच्या अंतरीक्ष विभागाकडे पाठविला. पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घातल्याने आठ दिवसांतच अहवालास मंजुरी मिळून निधी मंजूर सुद्धा झाला.

श्री आर्यन जोशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. श्री जोशी म्हणाले, ” मित्रहो, आपण पाठविलेला अहवाल केंद्रीय अंतरीक्ष विभागाने मंजूर केला आहे व त्यासाठी लागणाऱ्या निधीला विशेष बाब म्हणून अर्थमंत्रालयाने मंजूरी दिली आहे. आता आपण कामाला लागले पाहिजे. या विश्वातील मानवाच्या अस्तित्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपल्या देशाला हजारो वर्षांचा वैज्ञानिक वारसा आहे. तोच आपण मंगळावरही पुढे चालवायचा आहे.”

पुढील दोन वर्षांत डायपोल मॅग्नेट व त्याला प्रस्थापित करणारा डॉ. कलाम उपग्रह, PET फिल्म व ती वाहून नेणारा डॉ. नारळीकर उपग्रह, जनुकांत बदल करून गोठविलेल्या सायनोबॅक्टेरिया जिवाणूंचे सीलबंद केलेले प्रत्येकी दहा किलोंचे चारशे डबे, विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर व पुष्पक हेलिकॉप्टर आदिंचे उत्पादन युद्धपातळीवर करण्यात आले. प्रकल्पाला ‘मंगळ पुनरुज्जीवन’ असे नांव देण्यात आले.

२६ जानेवारी २०२५, भारताचा गणतंत्र दिवस. श्रीहरीकोटा येथील लॉन्चपॅड क्रमांक दोन वरून GSLV-mk3 प्रक्षेपकाने पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटांनी अंतराळात झेप घेतली.२४ ऑगस्ट २०२६ ला डॉ. कलाम उपग्रह मंगळाच्या L1 बिंदूच्या होलो कक्षेत सोडण्यात आला. नंतर यान मंगळाच्या भूस्थिर कक्षेत आले. तेथे डॉ. नारळीकर उपग्रह प्रस्थापित करण्यात आला. त्यानंतर यानाच्या क्रूझ स्टेजपासून डिसेंट स्टेज वेगळी झाली. पॅरेशूट व डिसेंट स्टेजवरील थ्रस्टर्स यांच्या मदतीने रोव्हर मंगळावर उतरला. डिसेंट स्टेज रोव्हरपासून वेगळी झाली व पॅरेशुटच्या सहाय्याने बाजूला जाऊन उतरली. आता रोव्हर वर्षभरानंतर कार्यरत होणार होता. MMRTG(मल्टीमिशन रेडिओआयसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर ) तंत्रज्ञानाने त्याला अव्याहत वीज पुरवठा होत होता. रोव्हरच्या पोटात सायनोबॅक्टेरिया जीवाणूंचे डबे व पोटाखाली हेलिकॉप्टर बांधलेले होते.

डॉक्टर कलाम उपग्रहावरील डायपोल चुंबकाने त्याचे काम करायला सुरुवात केली. आता सौरवादळे व अंतरीक्ष प्रारणे यांपासून मंगळ सुरक्षित झाला होता. डॉक्टर नारळीकर उपग्रहाला जोडलेली PET फिल्म उलगडून हळू हळू १२५ कि. मी. त्रिज्येचा आरसा तयार झाला. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन करायला त्याने सुरुवात केली. मंगळाभोवती भ्रमण करणारे मंगळयान मंगळाच्या हवामानाचा वास्तविक (इन रिअल टाइम ) अहवाल इस्रोकडे पाठवीत होते. हळू हळू ध्रुव प्रदेशातील शुष्क कार्बन डाय ऑक्साइडचे वायूत रूपांतर होऊ लागले. सौर वादळे नसल्याने हा वायुरूपातील कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात साठू लागला. त्याच्या हरितगृह परिणामामुळे मंगळाचे तापमान वाढू लागले. जमिनीखालील व खडकांच्या भेगांतील गोठलेले पाणी द्रवरूपात भूपृष्ठावर येऊन त्याचे ओहोळ वाहू लागले. हळू हळू ओहोळांचे रूपांतर ओढे, नाले, नद्या यांमध्ये झाले. खोलगट ठिकाणे पाण्याने भरून गेली. या सर्वांची छायाचित्रे मंगळयान इस्रोकडे पाठवीत होते. इकडे मंगळावर पाण्याचे ओहोळ वहात होते, तर तिकडे इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचे ओघळ वहात होते. एक वर्षानंतर म्हणजे ऑगस्ट २०२७ च्या शेवटच्या आठवड्यात इस्रोकडून सूचना आल्यावर पुष्पक हेलिकॉप्टर प्रज्ञान रोव्हर पासून वेगळे झाले. रोव्हरच्या यांत्रिक हाताने जिवाणूंनी भरलेला दहा किलोचा डबा हेलिकॉप्टरमध्ये ठेवला. हेलिकॉप्टरने उड्डाण केले व इस्रोच्या सूचनेनुसार ठरविलेल्या पाणथळ जागेवर जाऊन डब्यातील जिवाणू त्या जागेवर पसरले. रोज दहा खेपा असे करून चाळीस दिवसांत मंगळावरील सर्व पाणथळ जागांवर जिवाणू पसरण्यात आले. दर महिन्याने हेलिकॉप्टर पूर्ण मंगळावर फेरी मारून विविध ठिकाणांचे तापमान व प्राणवायूचे प्रमाण मोजून ते रोव्हरकडे, रोव्हर मंगळयानाकडे व मंगळयान पृथ्वीकडे पाठवू लागले. असे करता करता दहा वर्षे लोटली. आता मंगळाचे सरासरी तापमान १५° सेंटीग्रेड व हवेतील प्राणवायूचे प्रमाण २१% झाले.

आता मानवाने मंगळावर जायला हरकत नव्हती. कोणाला निवडायचे हा प्रश्न भास्कराचार्य सुपरकॉंप्युटरने सोडवला. देशातील सर्व नागरिकांचा माहितीसंच त्याच्याकडे होता. त्यामध्ये माणसाचे नांव, जन्मतारीख, उंची, वजन वगैरे बरोबरच त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याविषयी माहिती, त्याचा भूतकाळ, तो कोणकोणत्या संघटनांशी संलग्न आहे, त्याची विचारधारा वगैरे सर्व माहिती त्यात होती. भास्कराचार्याने त्याच्याकडील माहितीसंच बघून देशातील पन्नास सुयोग्य व्यक्तींची निवड केली. त्यांमध्ये आर्यन व मधुरा हे देखील होते. सर्वांना इस्रोमध्ये अंतराळ प्रवासाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले.

१० डिसेंबर २०३७ रोजी ‘नौका’ अंतराळयान श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण तळावर GSLV-mk3 प्रक्षेपकावर स्थित होते. त्यात आर्यन व मधुरा यांचेसह देशातील सर्व दृष्टीने सुयोग्य असे पन्नास नागरिक होते. त्यांच्याकडे ज्ञानाच्या सर्व शाखांतील माहितीसाठा असलेला सुपरकॉम्पुटर होता, तसेच सर्व प्राणी व वनस्पती यांचे नमुने बीज स्वरूपात होते. त्यांचे फलन मंगळावर करण्यात येणार होते. काउंटडाऊन संपले. प्रक्षेपकाने अंतराळात झेप घेतली. १० जुलै २०३८ रोजी नौका अंतराळयान मंगळावर उतरले. त्यावेळी सूर्य नुकताच क्षितिजावरून वर येत होता. एका नव्या युगाची सुरुवात होत होती.

लेखक -राजीव पुजारी

भाग्यश्री अपार्टमेंट, फ्लॅट नं ३,

सावरकर मार्ग क्र १

विश्रामबाग, सांगली

मो -9527547629

मेल [email protected]

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Anmol Anand Kulkarni

खूप छान.