झिम्मा

एक नितांत सुंदर, प्रेक्षणीय सिनेमा, Amazon Prime वर पाहण्यात आला.

   प्रथमदर्शनी एखाद्याला सहज वाटेल सगळेच तर आहे (म्हणजे पैसा) त्या सातजणींकडे, मग कसले आलेय दु:ख? सुख खुपतंय दुसरं काय!!

तर तसे नसते… सुखाला आणि दु:खालाही गरीबी, श्रीमंती कळत नाही. खूप मोठ्ठा आयाम असतो प्रत्येक गोष्टीला, हे आपण सहजपणे विसरतो. दु:ख हे दु:खच असते. पोत-पदर वेगवेगळा एवढेच !!

  “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” या प्रमाणे समोरच्याच्या बुटात शिरून उभे राहून पाहता येत असेल तरच त्या प्रत्येकाच्या सुखदुःखाची तरलता जाणवू शकेल.

झिम्मा च्या सातही नायिका सामाजिक दृष्टीने सर्वार्थाने सुखवस्तू आहेत. त्या UK ला हॉलीडे ट्रिप ला जात आहेत यातच सगळे आले ! पण पैसाच सर्व काही असतो का हा मूलभूत प्रश्न हा सिनेमा पाहाताना सतत डोकावत राहतो.

क्षिती जोगच्या नवर्‍याने डिप्रेशन मध्ये आत्महत्या केली आहे, हिला भरपूर पैसा ठेवून !! पण तरीही तो डिप्रेशन ची शिकार झाला होता, आत्महत्येच्या वाटेवर चालला होता हे तिला प्रेमविवाहाने त्याच्याशी बांधलेली असूनही कळलेच नव्हते, हा सल तिला सुखाने जगू देत नाहीये, ती कॉन्फिडन्स हरवल्यामुळे सैरभैर झाली आहे.

   अर्थात सिनेमात एक सोयीस्कर टर्नींग पॉइंट येतोच, खरतर अशा भितीदायक कोषातून बाहेर पडणे इतके सोपे नक्कीच नसते पण सिनेमात छान जमून आले आहे.

  मायलेकींचे नाते छान खुलवले आहे सुचित्रा बांदेकर-सोनली कुलकर्णी ने. सोनाली चा प्रत्येक शॉट देखणा व प्रेक्षणीय!

पण लहानपणी फुलवाल्याबरोबर झालेल्या विचित्र प्रसंगाची झाकोळ कायम असणे साहजिकच दु:खद पण म्हणून दारू पिणाऱ्या मैत्रीणींवर (दारू पिणे कितीही वाईट असले तरीही) काढलेला राग उगाचच अकारणी वाटतो… कारण त्याच वेळेस आपली लग्न ठरलेली मुलगी टूर गाईड च्या (कुणीही प्रेमात पडावा असा गोड असला तरीही) रूममध्ये दारूच पित असते हे काही संयुक्तिक वाटत नाही.

   मात्र हेमंत ढोमे व सोनालीचा लग्नापर्यंतचा प्रवास खूपच समजूतदार, पटणारा!! अरेंज्ड मॅरेज, त्यातील त्रुटी छानच दाखवल्या आहेत.

   सायली संजीव चा रोल सुरुवातीला उथळ वाटतो पण हळूहळू तो छान मुरत जातो व ती प्रचंड आवडून जाते. मनात खोलवर, तसे वागणे (मोकळे तरीही संयमी) आपल्याला जमले तर, असे खचितच वाटून जाते… व ओठांवर नकळत हसू उमटते.

   लेले ची पूर्णत: शहा झालेली मृण्मयी टिपिकल गृहिणी, त्या कोषातच अडकलेली, सुखवस्तूपणाचा आनंद घेणारी !! त्यामुळेच दुसर्‍यांना काही प्रॉब्लेम असतात याची जाणीवच नसणारी. उगाचच कुणीतरी हॅट भेट म्हणून देते यातील प्रेम/भावना तिच्या लक्षातच येत नाहीत. मुळातला बिनधास्तपणा हळूहळू डोके वर काढतानाचा अभिनय केवळ उत्तम  !!!

   सुहास जोशी नेहमीप्रमाणेच ग्रेट !!!!!!

मुलांबाबतचा सल कायम डोळ्यात,  वागणुकीत डोकावत राहतो.सायली च्या काळजीने आलेली बेचैनी, बाकी सगळ्यांबद्दल वाटणारे प्रेम आणि ते दाखवू की नको या कात्रीत अडकलेली, वरवर बिनधास्तपणाचा आव आणणारी गोड आजी खूपच आवडून जाते.

   आणि… निर्मिती सावंत!!! लाजवाब! अप्रतिम!!

हसणे तर असे संसर्गजन्य की आपणही नकळत तिच्या बरोबर हसू लागतो!!!! स्वतःच्याच विचारांवर, लॉनवर झोपल्यावर हसणारी, पॅन्ट शर्ट घातल्यावर कडक नवर्‍याकडून येणाऱ्या मेसेजस वर लाजणारी, मुरडणारी निर्मिती वाह वाह !!!

  उत्तम मैत्रीण कशी असावी याचे उदाहरण सोनाली, सायली आणि सुहास जोशी सहजतेने देतात.

एकएक डायलॉग तर असा समर्पक आणि चपखल की प्रत्यक्ष अनुभुतीच घेणे आनंददायक!!!!!

दुसर्‍या भागाची निर्मिती सहजशक्य असा शेवट ही आनंददायी गोष्ट!!

वीणा कुलकर्णी  🙏

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Rajiv Pujari

थोडक्यात पण करेक्ट समीक्षा 👍