वर्ग जाणिवेतून निर्मिलेले बांधीलकीचे शाहीरी वाङ्मय !  

वर्ग जाणिवेतून निर्मिलेले

बांधीलकीचे शाहीरी वाङ्मय !

                   प्रसाद सावंत

 

वाङ्मयात मग ते ललित असो व संत वाङ्मय असो किंवा अन्य आपण नेहमी त्यात तात्विक बांधीलकीचे,व्यक्तित्वाच्या बांधीलकीचे,सामाजिक बांधीलकीचे असे आज आपण टिकात्मक म्हणा किंवा कसेही म्हणा पण फरक करतो. पण मुलत:

विचार केला तर ज्या वेळेस कुठल्याही वाङ्मयाचा उदय अथवा उगम होतो तेव्हाच तिचा प्रेरणा स्त्रोत कुठल्या बांधीलकीने प्रेरित असतो? ते कोणत्या बांधीलकीतून येत असते ?हा प्रश्नही मनात येणंही स्वाभाविकच आहे.

तर ही बांधिलकी बांधिलकी म्हणून जे आपण म्हणतो ती बांधीलकीच मुळात आली कुठून?तिच्या येण्यापाठीमागे भौतिक,सामाजिक अथवा राजकीय घडामोडींचे कारण असावे की काळ बदलांनुसार माणसाच्या मानसिक जडणघडणीची ती सामाजिक गरज असावी?नेमके काय? याबाबत निश्चितपणे नुसत्या टीकेपेक्षा सांगोपांग विचार करण्याची गरज आहे. जेव्हा एखाद्या वाङ्मय निर्मितीची प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस अनाहूतपणे संस्कृतीच्या जडणघडणीसाठीची ती एक आत्यंतिक निकड असते. निर्मिती प्रक्रियेच्यावेळी मुळातच त्या साहित्याचे शास्त्रशुद्ध रीतीने मूल्यमापन होऊ शकत नाही कारण मूल्यमापनासाठी तयार व्हावे लागणारे नियम किंवा त्याच्या चौकटी त्याच्या पौगंडावस्थेत लावून त्याचे व्यवच्छेदन करणे योग्यच नाही. बांधीलकीच्या मूल्यमापनाचा विचार करायचाच झाला तर सामाजिक जीवनातील वास्तवाचे प्रतिबिंब त्यात पडलेले आढळले तर त्याचा अर्थ असा करायचा का?की निर्मितीकाराने कृत्रिमतेने त्या वास्तवाला प्रतिबिंबीत केले आहे?असे असेल तर मग ते वाङ्मय चिरंतन ठरणारे नसते. यामुळेच त्या वेळेची त्या साहित्याची बांधिलकी ही स्थल,काल सापेक्ष अशीच असते,पर्यायाने उपजत स्वीकारलेली असते. विशेषत: शाहीरी वाङ्मयात कारण त्यात विद्रोहाला परखडपणे सादर करण्याचा आक्रमक मर्दानीपणा उपजत असतो. त्यातून त्याच्या आविष्कारी अभिव्यक्तीला वाव मिळतो.

म्हणूनच तर त्या निर्मिती प्रक्रियेनंतर तिच्या त्यावेळच्या व आजच्या तिच्या विकास काळात कोणते फरक असू शकतात?कोणत्या प्रकारच्या सामाजिक,राजकीय किंवा सांस्कृतिक वास्तव ते साहित्य जगले याचाही विचार या अनुषंगाने होणे अपरिहार्य आहे. आज तात्विक बांधीलकीच्या परिणामी सामाजिक बांधिलकी अंत:प्रेरणेने स्वीकारली जाते. परंतु आजची एकूण भांडवली व्यवस्था तिला निश्चितपणे तिच्या लढयाला विरोधक म्हणून उभी राहते. याच्या परिणाम स्वरूप आपण शाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख,शाहीर आत्माराम पाटील,कविवर्य नारायण सुर्वे, नाटककार विनायक पाटील,बळवंत कांबळे,कविवर्य शिवराम देवलकर,शाहीर भास्कर मुणगेकर,शाहीर दयाळ घाडी यांच्याही वाङ्मयीन कलाकृतींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच बांधीलकीच्या परिणामी सामाजिक बांधिलकी स्वीकारतानाही ती कुठल्या वर्गाच्या समाजाची बांधिलकी आपण स्वीकारली आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.किंबहुना कालसापेक्ष ती आजची निकड समजायला हवी. हे वाङ्मय तत्कालीन वास्तवाला सामोरे जात आपली निर्मिती करते आणि आपल्या कल्पना,आपल्या जाणिवा घेऊन पोवाडा,लावण्या आदि काव्याच्या प्रांतात भरारी घेत प्रसंगी संघर्षातही उतरते. (उदाहरणार्थ सुव्यांची ‘गिरणीची लावणी’ किंवा शाहीर अण्णा भाऊंची ‘मुंबईची लावणी’,शाहीर आत्माराम पाटील यांचा ‘बांगला देशाचा’ पोवाडा,शाहीर साबळेंचा ‘पोवाडा समाजवादाचा’,शाहीर भास्कर मुणगेकरांचे ‘दमादम मस्त कलंदर’,बळवंत कांबळेंची बाबासाहेबांवरची भीम गीते ) कारण ज्या काळात लावणी किंवा पोवाडा उदयाला आला ते उद्धिष्ट आणि केवळ त्याची शृंगारिकता तसेच केवळ व्यक्तिस्तुती,ऐतिहासिकता हयापेक्षा वेगळे परिणाम (उदा. ‘अण्णा भाऊंचा महाराष्ट्र गौरवाचा पोवाडा ‘)या वर्ग जाणिवेतूनच समाज बांधिलकीच्या या काव्याला लाभून त्याची कक्षा रुंदावते किंबहुना या लेखकांनी त्या कक्षा आपापल्या प्रतिभा संपन्नतेने त्या रुंदावत नेल्या. अर्थात एक मात्र खरे की त्यांच्या सहजतेने साममजभिमुख आविष्कारी अभिव्यक्तीचाही मोलाचा वाटा आहे. त्यात अमर शेखानंतर शाहीर चंदू भरडकर,शाहीर भास्कर मुणगेकर,ह्यांची नावे प्रामुख्याने नजरेआड करून चालणार नाही.

फार वर्षापूर्वी थोर विचारवंत गं.बा.सरदारांनीहि मुंबई उपनगर साहित्य सम्मेलांनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात ते म्हणाले होते की वाङ्मयाचा प्रमुख विषय जीवन हा आहे. अर्थात सर्वच प्रकारच्या वाङ्मयाचा वाचक हा बहुजन आणि मध्यमवर्ग हाच असतो. व तो या वाङ्मयाला तोलून पाहत असतो. कारण वाङ्मय निर्मिती ही व्यक्तिनिष्ठ तशीच ती कालनिष्ठ अथवा समजनिष्ठही असू शकते. यातच अनाहुतपणे येणार्‍या या बांधीलकीचा आवाका लक्षात येण्यासारखा आहे. कारण ती त्या वेळेची ,ते ज्या वर्गाच्या चळवळीची बांधिलकी स्वीकारून होते तिची ती आत्यंतिक निकड होती.

या प्रगत युगात राजकीय वास्तवाचा विचार करता आज दहशतवादाच्या जबरदस्त

राजकीय दबावाखाली आपल्याला कीबहुना आपल्यातल्या प्रतिभेलाही चिरडण्याचा तसेच डिवचण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा स्थितीत लेखकांच्या म्ंनोवृत्तीत कुठल्या बांधीलकीचा समावेश असावा?

बाह्य जीवनाच्या एकदम पराकोटीच्या खडतर अशा परिणामांमुळे माणसाच्या अंतरमनाची जडणघडण होत असते. आजच्या समाज व्यवस्थेत थोडक्यात चातुरवर्णावर आधारलेल्या समाज व्यवस्थेत हा पराकोटीचा खडतर परिणाम सर्वच समाजावर बिलकुल होत नसतो. तो होत असतो एका ठराविक वर्गावर किंबहुना

त्या वर्गाला त्याची झळ सर्वात जास्त पोहोचते. म्हणूनच अन्य वर्गीय साहित्यापेक्षा

दलित पीडित यांचे साहित्य हे सामाजिक बांधीलकीशी नाते जोडून आपले तत्वज्ञान पुढे नेते. आता ही बांधिलकी या वर्गाने तत्वानुसार लढ्याचा भाग म्हणून स्वीकारली हे निश्चितपणे. अर्थात या तात्विक वर्गीय जाणिवेमुळेच हे वाङ्मय प्रचारात्मक म्हणून दुर्लक्षिण्याचा धोकाही असतोच.शाहीर अमरशेख,अण्णा भाऊ यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत निर्मिलेले वाङ्मय हे त्या काली केवळ कलावादी साहित्यिकांनी प्रचारकी म्हणून हेटाळले. पण ते जरी लढ्याचा भाग म्हणून निर्माण झाले असले तरी ही लढ्याची प्रक्रिया या साहित्यात कशामुळे आली ?या समाज व्यवस्थेमुळेच ना?मग हा वर्ग ही बांधिलकी काशी झुगारेल?तीच त्याची वर्ग जागृती आहे. तिलाही वास्तवता म्हणून स्वीकारायचे नाही का? मग निर्मिलेल्या प्रत्येक अशा साहित्यकृतीला कुठल्या निकषावर तोलायचे?ते वाङ्मय ही सुद्धा समाजाची गरज असू शकत नाही का?ज्या शाहिरानी किंवा वाङ्मयाने एक प्रभावी संघर्षात्मक चळवळ उभी करून ती यशस्वी केली ते शाहीरी वाङ्मय वेगळ्या निकषावर तोलून

बाजूला सारून कसे चालेल?नव्या उन्मेषशाली,प्रागतिक समाजाची हीच तर खरी नांदी आहे. अर्थातच आजच्या या आधुनिक व प्रगत विज्ञान युगात चळवळीचेही साचेबंद नव्या परिमाणातून बदलू पाहात आहेत. पारांपरिकता विसरून नव्या परंपरा येऊ पाहात आहेत. पाश्चात्य सस्कृती त्यावर आरुढ होऊ पाहतेय. यामुळे या साहित्यालाही नव्या परिमाणांच्या कोंदणात बसवून आपली संस्कृती जपून नव्या पिढीची वाङ्मयीन अभिरुची टिकवून ठेवावी लागेल. जाता जाता कविवर्य विनायक पाटील यांच्या कवितेच्या ओळी उधृत करून थांबतो.

उदध्या फुलणार्‍या फुलांना

उदध्या जन्मणार्‍या मुलांना

दोस्तहो,कालच आपण शब्द दिलाय !

त्यांना निर्मल वातावरणी

फुलता येईल प्रतिक्षणी

असा कालच आपण विश्वास दिलाय !

मग आता मुकाट राहून

हात दोन्ही घट्ट बांधून

कसं चालेल स्वस्थ बसून आपणाला?

ही आजची बुरसट्लेली

दुनिया विदीर्ण सडलेली

दोस्तहो ,आताच नको का बदलायला ?

 

——————————————-

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments