हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यापूर्वी म्हणजे 18 जूलै 1947 मध्ये ब्रिटीश पार्लमेन्टने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला होता. या कायद्यानुसार देशी राज्ये व संस्थानिक राजे यांना आपले राज्य भारतात किंवा पाकिस्तानात विलीन करायचे किंवा स्वतंत्र राहण्याचे स्वातंत्र्य दिले होते.

भारतात 600 पेक्षा अधिक संस्थाने होती.अशा संस्थानिकांच्या सरंजामशाही राजवटीमुळेच अनेकदा आपापसात संघर्ष व्हायचे आणि यातून परकीय सत्ता कोणा एकाला मदत करत भारतात यायच्या. हळूहळू परकीयांचे वर्चस्व वाढत जायचे आणि त्यांचे राज्य स्थापन करायचे असे होऊ नये म्हणूनच भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्य व लोकशाही स्थापन व्हावी अशी भूमिका मांडलेली होती.भारत स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू तसेच तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बहुतेक सर्व संस्थाने भारतात विलीन करुन घेतली परंतु हैद्राबाद,जुनागढ व जम्मु काश्मीर ही तीन संस्थाने अजूनही भारतात विलीन होण्यास तयार नव्हती. हैद्राबाद संस्थान हे ब्रिटीश राजवटीच्या अखेरच्या काळातील भारतातील सर्वात मोठे स्वायत्त संस्थानिक राज्य होते.सध्याच्या काळातील तेलंगणा,मराठवाडा,उत्तर कर्नाटक तसेच विदर्भाचा काही भाग इथपर्यंत हे राज्य पसरलेले होते.उत्तर आणि दक्षिण भारत यांच्या मधोमध पसरलेले हे राज्य जर भारतात विलीन न होता स्वतंत्र राहिले तर भारताची एकसंघता कशी राहील ?यासाठी का होईना हे राज्य भारतात विलीन होणे गरजेचे होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी व्यक्ती तसेच या भागातील जनता ही याच हेतूने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरलेली होती.या भागात अनेक चळवळी व आंदोलने झाली त्यांचा हेतू ही निजामापासून  स्वातंत्र्य हाच होता.

हैद्राबाद संस्थानात 1724 पासून निजाम शासक होता. यापूर्वीच्या सर्व निजाम शासकांच्या काळात मराठवाड्यात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात सलोखा होता सर्व सण उत्सव एकत्रित साजरे व्हायचे.परंतु त्यानंतर मात्र हिंदू मुस्लीम सोहार्द संपुष्टात येऊ लागले.हैद्राबाद राज्याचा शेवटचा म्हणजे सातवा निजाम मीर उस्मान अली याने हे संस्थान भारतात विलीन होऊ नये यासाठी कासीम रझवी याच्या नेतृत्वाखाली एक अर्धसैनिक दल स्थापन केले होते. त्यालाच रझाकार असे नाव होते.रझाकार शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ स्वयंसेवक असा होतो. रझाकार सैन्यातील जवानाला रोहिले असे संबोधतात.रझाकार आणि रोहिले हे दोन शब्द या काळातील परवलीचे शब्द होते.त्या कालखंडातील आठवणी सांगतांना कोणाच्याही तोंडून सातत्याने या शब्दांचा उल्लेख येतो.

कासिम  रिझवी नावाच्या या सडपातळ अंगकाठीच्या व्यक्तीने जवळपास दोन लाख सैन्य तयार केले.सैन्यातील रोहिल्यांचा पोषाख म्हणजे खाकी चड्डी,खाकी शर्ट, रूमाणी टोपी  हातात हत्यार कमरेला जंब्या व खंजीर असायचा हे सैन्य जर रस्त्याने जात असेल तर हिंदू लोकांची बाहेर निघण्याची हिंमत नव्हती.घरावर दगडफेक करणे लोकांना त्रास देणे वस्तू उचलून घेऊन जाणे अशा प्रकारचे वर्तन असणारे हे सैन्य पाहून स्त्रिया तसेच कामावर जाणारे पुरुष सुध्दा रस्त्यावर येत नसत.गरीब-दलित यांना मारझोड करुन बळजबरीने मुसलमान बनवले जाई, त्यामुळेच या भागात मारुन मुसलमान करणे अशी एक म्हण आजही प्रचलित आहे.हा या काळातील घटनेचाच भाषेवरील प्रभाव आहे.गावागावात त्यावेळी गरीब हिंदूचीं  सुन्ता करणे,कलमा पढण्यास लावणे,गायीचे मांस खाऊ घालणे अशा प्रकारचे अत्याचार वाढत होते.हैद्राबाद राज्यातील मुस्लीमांची संख्या आर्धी व्हावी अशी कासीम रझवी याची महत्त्वाकांक्षा होती.सुरुवातीस फक्त 8 टक्के मुस्लीम लोकसंख्या हैद्राबाद राज्यात होती ती दिवसेंदिवस वाढत होती. कासीम रझवी याची तुलना इतिहासात हिटलरशी केली जाते.प्रचंड अत्याचाराच्या दहशतीने या भागातील जनता त्रासलेली होती. जनतेवर होणा-या अत्याचारामुळे शस्त्रे हाती घेऊ द्यावे या विनंतीस खुद्द महात्मा गांधीनी सुध्दा संमती दिली होती.रझाकाराच्या अत्याचारी कारवायाना  प्रतिबंध घालण्यासाठी हैद्राबाद स्टेट कॉग्रेसने हैद्राबाद संस्थानच्या सरहद्दीवर 104 सश्स्त्र कॅम्प उघडले होते.कॅम्पमधील सैनिकांना शस्त्रे व दारुगोळा चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.

अत्याचाराविरुध्द आवाज उठविण्यासाठी  गावागावात असे तरुण एकत्र येऊ लागले घरावर तिरंगा फडकावणे रझाकारांच्या जुलमी कारवायांचा निषेध करणे,पत्रके वाटप करुन जागृती करणे, लेव्ही वसूलीला विरोध करणे रझाकारांच्या दहशती कारवायाना विरोध करणे अशी कामे करणारे तरुण समोर येऊ लागले. स्वामी रामानंद तीर्थ ,गोविंद भाई श्रॉफ विजयेन्द्र काबरा,रविनारायण रेड्डी,दिगंबरराव बिंदू,देविसिंह चव्हाण,भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे यांनी हैद्राबाद मुक्तीसाठी लढा उभा केला.या भागातील तरुण एकत्र करुन त्यांना देशभक्तीचे धडे देणे त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले.

यातील विजयेन्द्र काबरा हे राष्ट्र सेवादलाची शाखा चालवत असत.यातून त्यांचा कॉग्रेसमधील समाजवादी गटाशी संपर्क आला 1945 मध्ये काबरा यांना अखिल भारतीय संस्थान प्रजा परिषदेसाठी उदयपूर येथे हैद्राबाद स्टेट कॉग्रेसचे प्रतिनिधी  म्हणून पाठवले होते सोबत हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे प्रमुख महादेव सिंग होते.त्यांना निजाम ‍विरुध्द कारवायामुळे त्यांच्या विरुध्द हैद्राबाद पोलिसानी वारंट काढलेले होते.पकडण्यासाठी पोलिस आले असता ते छतावरुन उडीमारुन पळून सोलापूर येथे आले.या काळात त्याच वळी जयप्रकाश नारायण,ना.ग.गोरे एस.एम. जोशी इ. काँग्रेसमध्ये समाजवादी गट संघटित झाला होता.हैद्राबाद मुक्ती व रझाकारांचा प्रतिकार करण्यासाठी काँग्रेसतर्फे संस्थानाच्या सरहद्दीवर कॅम्प प्रशिक्षण  शिबीरे आयोजित करण्याची योजना आखण्यात आली होती.या शिबीरा साठी तरूणांनी यावे यासाठी विजयेन्द्र काबरा यांनी ताडकळस ता. पुर्णा येथे आवाहन केले होते त्यानुसार या गावातील चार तरुण या कॅम्पसाठी वैजापूर येथे गेले होते. या मुक्ती सैनिकाच्या तुकडीतच ताडकळस ता. पुर्णा येथील बापूदेव देविदास जोशी यांच्यासह  विठ्ठल भाग्यवंत,पन्नालाल मुदडा व चंद्रकांत रुद्रवार हे तरुण वयाचे मुक्ती सैनिक सामील झालेले होते. जवळजवळ 13 महिण्यापेक्षा अधिक काळ जवळपास 200 तरुण मुक्तीसैनिक म्हणून तिथे राहून सरहद्दीवरची गावे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत होते.

बापूदेव देविदास जोशी त्यावेळी अगदी विशीतले तरुण होते.सळसळते रक्त, अन्यायाबद्दलची चीड देशभक्तीची प्रेरणा घेतलेले तरुण  घरची परवानगी न घेताच वैजापूर येथे प्रशिक्षण कॅम्पसाठी गेले.घरी सांगितले असते तर कदाचित परवानगी मिळाली नसती. घरचे पांडेपण आणि पौरेहित्य सोडून घरदार याचा विचार न करता हा तरुण हैद्राबाद मुक्ती संग्रामच्या लढ्यात उतरल्याची बातमी मित्राकडून घरी पोहचली. कुटूंबातील एकुलता एक मुलगा निघून गेल्या मुळे आई वडिल व मोठ्या दोन बहिणी सर्व चिंतेत पडले होते.एक मात्र बरे होते की याच गावातील तीन व बाजूच्या गावातील काही मित्र सोबत असल्याचे कळले होते.

कोण होते बरे हे बापूदेव जोशी ? कशासाठी त्यांनी घरदार सोडले ? असा कोणता अन्याय त्यांच्यावर झाला होता म्हणून ते एवढे जीवावर उदार झाले होते ? बापूदेव देविदास जोशी यांचा जन्म ताडकळस ता. पुर्णा येथील ब्राम्हण कुटूंबात झाला.त्यांचे वडील पांडेपण करायचे.देविदासराव यांना दोन मुली व ‍एकुलता एक मुलगा होता तो म्हणजेच बापूदेव. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झालेले होते.बापूंचे शिक्षण त्याकाळचे चौथी पर्यंत झालेले होते.त्यांना मराठी,उर्दू या भाषा येत होत्या.तरूण वयात त्यांना विठ्ठल भाग्यवंत,पन्नलाल मुंदडा,व सूर्यंकांत रूद्रवार असे देशप्रेमाने झपाटलेले मित्र भेटले.खरं तर त्यांचे वडिल पौरोहित्य करत शिवाय शेती आणि पांडेपण घरी असतांना ही त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.देशात तेव्हा स्वातंत्र्याचे वारे वाहत होते.गावागावात चळवळी व आंदोलने होत होती अनेक तरुण-तरुणी अशा प्रकारच्या आंदोलनाकडे आकर्षित होत होते.यातच बापूदेव व त्यांचे मित्र राजेंद्र काबरा यांच्या संपर्कात आले आणि वैजापूर येथे हैद्राबाद मुक्ती लढ्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित कॅम्प मध्ये ते सामील झाले.सोबत ताडकळस येथील तीनही मित्र होते.त्यांनी वैजापूर जवळील हैद्राबाद राज्याच्या सिमेवरील अनेक गावे तिरंगा झेंडा घरावर फडकावत रझाकारापासून मुक्त केली.प्रसंगी हे तरुण भूमिगत राहिले पण गावागावात जाऊन रझाकारा विरुध्द निझाम सरकारचे दफ्तर जाळणे,निषेध नोंदवणे हे कार्य चालूच ठेवले.

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर येथून जवळ हैद्राबाद राज्याच्या सिमेवरील गोवर्धन सराळा समाजवादी जनराज्य स्थापनेसाठी प्रयत्न करत होते.7 जून 1948 रोजी निवडक मुक्ती सैनिकांची एक तुकडी पहाटे चार वाजता गोवर्धन येथे पोहचली. या तुकडीत अमृत गडकरी,बन्सीलाल लड्डा,प्रभाकर हरदास,केशवराव कुलकर्णी,मदन सावंत, मगन सिंग राजपूत,रामलाल राजपूत जगजीवन यांच्या सह मराठवाड्तील खेड्या पाड्यातून आलेले अनेक तरुण सहभागी झालेले होते. या मुक्तीसैनिकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले होते.  वैजापूर तालुक्यातील गोवर्धन येथील करोडगीरी नाका व निजामाच्या महसुली कार्यालयावर ताबा मिळवला आणि प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली. हा नाका म्हणजे निजामाची पोलीसचौकी होती येथून प्रवेश करतांना तपासणी होत असे त्याप्रमाणे या तुकडीस नाकेदाराने आडवले गेले तिथे झालेल्या चकमकीत नाकेदाराचा मृत्यू झाला.पुढे गोदावरीच्या पैलतीरावर वांजरगाव येथे निजामाचे ठाणे होते तिथेच रझाकाराचा अड्डा होता.तिकडे हे मुक्ती सैनिक निघाले.संध्याकाळपर्यंत  सराळा ,महांकाळ, वडगाव  ही गावे ताब्यात घेतली.नऊ जून रोजी भामाठाण ताब्यात आले त्याबरोबर दोन तीन दिवसातच सैनिकांनी गोवर्धन सराळा नागमठाण चांदेगाव भामठाणा भालगाव डाक पिंपळगाव आणि गंगागीर बाबाचे बेट ही गावे मुक्त केली.

शेवटी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 ला ऑपरेशन पोलो अर्थात हैद्राबादच्या निजामा विरुध्द पोलीस कारवाई सुरु केली अखेर  निझाम शरण आला, हैद्राबाद राज्य पूर्णपणे निझामापसून मुक्त  होऊन भारतात विलीन झाले.

 

डॉ.संतोष सेलूकर,परभणी

7709515110

डॉ.संतोष सेलूकर,परभणी

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments