कामगार व आस्थापनाच्या औधोगिक संबंधावरील नाट्यमय संघर्ष कथा :पटावरच्या सोंगट्या

कामगार व आस्थापनाच्या औधोगिक संबंधावरील नाट्यमय संघर्ष कथा :पटावरच्या सोंगट्या

=================================================================

कामगार आणि त्यांचे आस्थापनातील कार्य कारण संबंध,तसेच युनियन आणि आस्थापनाचे विश्वासपूर्ण वातावरणात भरवशाचे संबंध ह्या सगळ्याचा मेळ घालून कंपनी उत्कर्षासाठी आणि कामगारांचा रोजगार उत्तम पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी,प्रसंगी कोणासही दुखावण्याची वेळ आल्यास असलेल्या तणावग्रस्त परिस्थितितही सुवर्णमदध्य काढून संबंध उत्तम राखण्याचे कसब तसेच सर्व गोष्टीची सांगड कथानकाद्वारे मांडण्याचेही कसब कथाकार विलास गावडे यांच्या नव्या ‘पटावरच्या सोगट्या’ या कथा संग्रहात अत्यंत ठाशिवपणे प्रतीत होते. या संग्रहात एकूण दहा कथांचा समावेश आहे. यातील त्यांच्या पाहिल्याच ‘धक्के’ या कथेत तोट्यात चालणार्‍या कंपनीने नव्याने डायरेक्टर पदी  नियुक्त केलेल्या आपटे नामक अधिकार्‍या समोरच्या आव्हानात्मक प्रश्नांची गुंफण आणि उकल गावडे ह्यांनी उत्तम रीतीने चितारली आहे.तर त्यांच्या ‘कसब’ या कथेत एका कामगाराच्या अक्सीडेंट झालेल्या परिस्थितीने निर्माण  केलेल्या गुंतागुंतीच्या प्रसंगी ऑफिसर सारंग साहेबांनी धीरोदात्तपपणे दाखवलेल्या कसबाचे वर्णन गावडे यांनी आपल्या शैलीतून समर्पक आणि समर्थपणे उभे केले आहे.

गावडेंची कथानक मांडण्याची पद्धत लिखाणाच्या ओघवत्या शैलीमुळे अधिक उत्सुकतेने गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे.संवादात्मक नाट्यमयता त्यात आणखीनच भर टाकते.तसेच कथा या गावडे यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीमधून साकारत गेलेल्या असल्यानेच कथांना सहजता प्राप्त झाली आहे. गावडेंच्या यापूर्वीच्या संग्रहाचा हा दूसरा भाग आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.तसेच प्रत्येक वेळी निर्णय घेताना काही प्रसंगी वकिली डावपेचातून निर्णय घेतलेले असले तरीही त्यात कामगाराचे किंवा आस्थापणाचे कमीतकमी नुकसान होऊन जास्तीत जास्त सकारात्मकतेकडे फायद्याचा तसेच दोघांचाही समतोल राखण्याकडे गावडेंचा कल दिसतो.तिथे ते कुठल्याही प्रकारच्या राजकारणाचा स्पर्श  होऊ देत नाहीत हे वैशिष्ट्य.

तसेच अनेक प्रकारच्या माणसांचे वेगवेगळे स्वभाव त्या स्वभावाला अनुसरून किंवा हेरून त्याप्रमाणे त्या व्यक्तीला देण्यात येणारी उपचाराची प्रक्रिया या सर्वांचा गावडे यांचा हातखंडा असल्याने ते प्रत्येक बाबतीत यशस्वी निर्णयाप्रत येऊ शकले आहेत.याचीच प्रचिती म्हणून त्यांच्या ‘नाठाळचे माथी’ तसेच काळ्या पाण्याची शिक्षा’ आणि ‘पर्दाफाश’ याकथांमधून आपल्याला येते. त्यांच्या ‘पर्दाफाश’ या   कथेत तर दशरथ पाटील नामक आडमुठ्या पण चाणाक्ष कर्मचार्‍याला नियोजन बद्ध आखणी करून वठणीवर आणले जाते याचे चित्रणही गावडे नाट्यपूर्ण करतात.

या सर्व कथामध्ये एक जाणवते ती ही की ह्या सर्व कथांमध्ये व्यक्तीगत पातळीवर तसेच आस्थापन आणि कामगार यांच्यातील अंतर्गत संघर्षाचे चित्रण जसे आढळते तसे ते कामगार कायदा,त्याचे कामगारांवर जाणीवपूर्वक केले जाणारे दुरुपयोग आणि त्यातून होणारा सामाजिक नुकसानीचा दुष्परिणाम हे मात्र जाणवत नाही.कदाचित या कथासंग्रहाचा तो विषयही नसावा.कारण संग्रहाच्या शीर्षकाद्वारे ते अधिक स्पष्ट होते. मुखपृष्ठावर दाखवलेला सारीपाट सदृश पट आणि त्यावरच्या मानवरूपी सोंगट्या आणि त्यांना चालवणारे किंवा खेळवणारे

पटाबाहेरचे हात यावरून प्रश्न एकच की ते हात कोणाचे ?व्यवस्थापनाचे,युनियनचे की व्यवस्थापनाबाहेरच्या कुणाचे? अर्थात हे नंतर कथांनकाद्वारे विचारांती लक्षात येतेच. तसेच या कथा माध्यमातून शिवजयंती यासारख्या उद्बोधक अशा संस्कृतिक उपक्रमावरही उत्तम भाष्य करून त्यात होणारे गैरप्रकार टाळून महापुरुषांच्या कार्याचे पावित्र्य राखण्यासाठी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे अर्थात असे सामाजिक उपक्रम करताना त्यात मनोरंजना सोबत  समाज प्रबोधंनाचेही भान राखण्याचा संदेशही  ते कथांनकातून सहजपणे देऊन जातात.व गावडे

यांच्या समाज जाणिवांच्या प्रबोधंनात्मक अस्मितेलाही समन्वयित करतात. हीच या कथासंग्रहाच्या यशस्वीतेची चाहूल आहे हे निश्चित.

प्रसाद सावंत

                                       ‘पटावरच्या सोंगट्या’

                                       (कथासंग्रह)

                                       लेखक : विलास गावडे

                                       अनघा प्रकाशन,ठाणे (पूर्व)

                                       मूल्य :रुपये ३५० /-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments