भुरा

पुस्तक का वाचावं: 

एखादा चित्रपट पाहून किंवा पुस्तक वाचून तुम्ही आनंदू शकता. कारण काही काळ का होईना ते तुमचं मनोरंजन करतात किंवा चार शहाणपणाचे शब्द शिकवतात. किती वेळ परिणाम करतील? माहीत नाही पण करतील माञ नक्कीच. पुस्तकं खरंतर मनोरंजनासाठी नसतातच. असतात ती शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी. असच एक मराठी अप्रतिम पुस्तक. अलीकडेच वाचलं. पुस्तकाचं नाव. नाव  सुद्धा गमतीदार, म्हणजे लहानपणी मुलाला नावाने काहीतरी चिडवतात अस काहीस. जस कि काळा असेल तर काळ्या किंवा गोरा असेल तर गोऱ्या किंवा भुऱ्या. म्हटलं तर ग्रामीण, म्हटलं तर शहरी धाटणीच. पण पुस्तक कधी ग्रामीण किंवा शहरी अस नसतंच. ती आपल्या सोयीची मानसिकता. पण मग हीच मानसिकता बदलायची असेल किंवा झिजून मरण्यापेक्षा थिजून मरायच नसेल तर नक्कीच वाचलं पाहिजे हे पुस्तक.आत्मचरित्र..

काय आहे या पुस्तकात?

एक परिवर्तनाचा धुळे ते भारतातील नामांकित विद्यापीठ जेनयु पर्यंतचा कष्टप्रद तरीही सुखावणारा आणि विस्मयकारी प्रवास अनुभवण्यासाठी. परिस्थितीने/गरिबीने कितीही कानफटात लगावल्या तरी त्याकडे दोन हात करून चिकित्सक पद्धतीने पाहण्यासाठी. शैक्षणिक, सामाजिक बदलाला सामोरं जाण्यासाठी. दहावीला इग्रजी विषयात नापास झालं तरी नंतरच्या काळात इग्रजीच काय अगदी फ्रेंच, इटालियन ई. आठ भाषांना कवेत कस घेता येऊ शकत यासाठी.

लेखक म्हणून आत्मचरित्र फक्त स्वतः भोवती घुटमळत न ठेवता, स्वतःची वाहवा न करता जगण्याचं आणि शिक्षणाचं तत्वज्ञान अनुभवण्यासाठी, एकाकीपणा/एकटेपणातून एकांताकडे प्रवास कसा करतो येतो यासाठी. आज शिक्षण म्हणजेच नोकरी आणि नोकरी म्हणजेच शिक्षण अस कितीही बिंबवल तरी लेखक त्याला कसं खोट पाडतो हे पडताळून पाहण्यासाठी. शिक्षण हे आयुष्याचे टप्पे, विचार, आपोपवाद कसं बदलतं हे अनुभवण्यासाठी. लेखकाने महात्मा फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची री पुढे ओढत शिक्षणाची व्याख्या अगदी सोप्या पद्धतीने कशी समजावली ते वाचण्यासाठी. शिक्षणाकडे फक्त उदरनिर्वाहचा साधन न बघता सर्वांगीण उन्नतीचा साधन म्हणून बघणारा भुरा जेव्हा म्हणतो की “शिक्षण हे स्वातंत्र्याचा समानार्थी शब्द आहे हे जाणून घेण्यासाठी. आपल्या उच्चशिक्षणाप्रति असलेल्या प्रेमाबद्दल आणि ध्यासाबद्दल भुरा म्हणतो: शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रंग देण्याचा प्रयत्न करणे आणि कॅन्व्हासचा आकार जेवढा वाढवून देता येईल तेवढा वाढवून देणे. शिक्षण म्हणजे मुलामुलींच्या हातात रेडीमेड पेंटिंग देणे नव्हे.

थोडक्यात सांगायचं तर भुरामध्ये सर्वकाही आहे. संघर्ष, प्रेरणा, समाजातील वास्तव, जातीवाद, प्रेम, राजकारण, मित्रता, संस्कृती, प्रवास वर्णन, समाजकारण, आईच प्रेम, गरिबी, शिक्षण, भेदभाव,आधुनिकीकरण आणि कमालीचं आणि तितकच महत्वाचं तत्वज्ञान आणि असं बरंच काही..

विद्यार्थ्यांनी डाव्या किंवा उजव्या तराजुचा विचार न करता हे आत्मचरित्र जरूर वाचलं पाहिजे. लेखक प्रतिगाम्यांना टक्कर देत आणि पुरोगाम्यांची चिकित्सा करत पुढे जातो. पुढे जातो ते थेट युरोपात फ्रेंच तत्वज्ञाच्या गावात. लेखक शेवट पर्यंत मात्र आपल्या अहिराणी भाषेतल आईच तत्वज्ञान झिजून मरावं पण थिजून मरू नये हे विसरत नाही. जगता येत. बदलता येत.

पुस्तकातील एक सारांश जसा आहे तसा:

मला व्यवस्था आणि स्वातंत्र्य ह्या मानवी जीवनातील एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे, तर व्यवस्थेचं कुठल्याही क्षणी निरंकुश होणं मात्र मानवी स्वातंत्र्यावरील टांगती तलवार. व्यवस्था म्हणजे फक्त समाज आणि इतिहास नसून,आपण जी भाषा बोलतो तीसुद्धा व्यवस्थेचं काम करत असते. आपलं कुंठीत आणि शीघ्र आकलनसुद्धा व्यवस्थेचं प्रतिबिंब असते. एका अर्थाने आपला जन्मच अनिवार्यपणे व्यवस्थेनं घेरलेल्या साखळदंडांमध्ये बंदी म्हणून होत असतो. त्या साखळदंडांच्या अस्तित्त्वाची जाणीव ही आपल्या सापेक्ष सुटकेची पूर्वअट.

शिक्षणाविषयी जी स्पष्टता मला २०२० मध्ये आली ती १९९७ मध्ये सुद्धा होती, असं म्हणणं तथ्यसंगत नसेल. तेव्हा एवढंच माहिती होतं की, ज्या परिस्थितीत फसलेलो होतो त्या परिस्थितीतून सुटका करून घ्यायची आणि अशा जगात शिरायचं होतं जिथं माणूस म्हणून पूर्णत्वाची ओळख पटेल. पूर्णत्व म्हणजे काय ह्या विषयीसुद्धा अस्पष्टता होती, पण ज्या परिस्थितीत होतो ती पूर्णत्वास पूरक नाही एवढं मात्र स्पष्ट होतं. शिक्षण हा एकमेव सुटकेचा मार्ग आहे, याची मात्र पूर्णपणे खात्री होती. सर्वार्थाने सुटका. केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे. २००२ नंतर जेव्हा माझ्या बरोबरीची पोरं पैसे कमवायच्या नादात मला सांगत असत की, पैसा सब कुछ होता है मेरे यार वगैरे वगैरे!, तेव्हासुद्धा मी शिक्षणाची वाट सोडली नाही. खरंतर माझी आर्थिक परिस्थिती त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट होती; पण मी मात्र शिक्षणाची वाट सोडायला तयार नव्हतो.

भुरा ग्रामीण किंवा शहरीच काय प्रत्येक स्तरातील विद्यार्थांचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून म्हणेन प्रत्येक विद्यार्थाने हा सुंदर अनुभव घेतलाच पाहिजे……

जरूर वाचा. भुरा…..

 

 

पुस्तकाचं नाव: भुरा.

लेखक: प्रा. शरद बाविस्कर (जे. न. यू, दिल्ली)

प्रकाशक: लोकवाङ्मय गृह

पृष्ठ संख्या: ३५४

अमोल सिताराम पवार

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments