गूढ अनामिक मानसिक अनुभूतीचे चित्रण :केमेस्ट्री

गूढ अनामिक मानसिक अनुभूतीचे चित्रण :केमेस्ट्री

———————————————————–

 

लेखक रामदास खरे हे तळकोकणातील वास्तव्यातील आपल्या अनुभूतीला कथेचे रूप देऊन अभिव्यक्त होऊ पाहतात. त्यांच्या ‘विहीर’ या कथेतून शिक्षकी पेशातच उभी हयात घालवलेले आणि शाळेसाठी,तिच्या भवितव्यासाठी अतोनात परिश्रम घेणारे नानासाहेब अखेरच्या क्षणी विहिरीत स्वत:ला झोकून देतात. कुटुंबाबाबत  नियतीने काही संकेत दिल्यानंतर सर्वांच्याच मनात पेटलेलं काहूर त्यातून निर्माण होणारी संशयास्पद गूढता आणि त्या संकेतनुसार काही अघटित घडणार असा मनातला विश्वास (हा अंध की प्रतिक्रियात्मक ?)या सार्‍याची सरमिसळ लेखक खरे सहजतेने करतात आणि श्रद्धेचेही एक गूढ वलय तयार करू पाहतात. ‘झूला’ या कथेत अकाली बायको गेल्यानंतर विधुर अवस्थेत असलेला शरीर सुखाच्या  आसक्तीने पोळलेला सलिल मानवी मनाच्या डिगमूढ,चंचल अवस्थेत एका क्षणात एका भयानक मानसिक संभ्रमित अवस्थेपर्यन्त येऊन ठेपतो मानवी मनाचा हा एक हळवा कोपरा हाताळताना खरेंनी त्यातले व्यक्तिचित्रण चांगले उभे केले आहे.

तर केमेस्ट्री या कथेत संपूर्ण कथानक दोन चार व्यक्तिरेखेतून उलगडते. किंवा असेही म्हटलं तरी ते वावगे ठरणार नाही की त्या सर्वांच्या मनोवैचित्र्याला एका  रसायनात घोळवण्यात आले आहे. किंबहूना त्या मनाच्या केमिस्ट्रीमध्ये एकजीव होण्याच्या आंतरिक भावनांना लेखक एकसंघ करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.हे रसायन म्हणजे शिक्षक नि विद्यार्थ्याच्या नात्यातील नाजुक बंध व त्या नात्याला असणारे भीतीचे आवरण कारण पेशाने येणारे सांस्कृतीक अनुशासन आणि त्यातील मर्यादांचे दडपण आणि अंतिमत: त्याचा गूढ पण भयावह शेवट या सर्वाचे एक रसायन लेखक आपसूक मांडून जातो आणि ते सुद्धा काल्पनिक समजाच्या प्रतिकाद्वारे.मनाच्या अशा संकीर्ण भावना ज्या चमत्कृतीपूर्ण समजाच्या अथवा रूढी यांच्या कोंदणात बसवणे कदाचित अशक्यप्राय वाटावे अशा श्रद्धा जोपासणार्‍या मनाच्या मानसिकतेला गुंफून लेखक संभ्रम निर्मितो किंवा त्यात तो जाणीवपूर्वक अडकतो तरी. किंवा त्यात गुंतत जातो . असे गुंते वारंवार खरे यांच्या कथांमधून प्रत्ययाला येतात. तर त्यांच्या नारायण भुवन या कथेत सासू सुनेचे जिव्हाळ्याचे संबंध असूनही दोन्ही व्यक्तिरेखेच्या मनातील पारंपरिक विचारांची तसेच अपरिहार्य वेदनामयी अशी  घालमेल खरेंनी छान शब्दबद्धं करीत चित्रित केली आहे. दोघींच्याही मानसिक तणावाखाली जगण्याने निर्माण होणारी तसेच नैराश्याने कुढत जगण्याची मनस्थिती खरे सहज पण प्रभावीपणे उभी करतात.एकूण काय खरे यांच्या या कथांमधून मानवी मनाचे वैचित्र्य,त्याची गुढमय अस्तित्व रेषा आणि त्यातून निर्माण होणारे संदेहमुलक वातावरण यांची गुंफण करण्यात खरे बर्‍याच प्रमाणात यशस्वी झालेले दिसतात. असे निश्चितपणे म्हणावेसे वाटते.

 

          —–प्रसाद सावंत

                                     

 

                                      केमेस्ट्री (कथासंग्रह )

                                      लेखक :रामदास खरे

                                      डिंपल पब्लिकेशन

                                      पृष्ठे:१०४

                                      किंमत :रु. १६०/-

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments