आधुनिक तंत्रज्ञांनाने प्रेरित,नव्या अनुभूतीची संवेदनक्षम कविता — ‘सी सी टीव्हीच्या गर्द छायेत’

आधुनिक तंत्रज्ञांनाने प्रेरित,नव्या अनुभूतीची

संवेदनक्षम कविता ——- ‘सी सी टीव्हीच्या गर्द छायेत’

 

आधुनिक विज्ञानवादी तंत्रज्ञानाची आजची आवश्यकता जशी कवीची प्रेरणा ठरू शकते,तशीच ती त्याच्या संवेदनेलाही आतून अस्वस्थ करून त्यायोगे आपल्या विचारधारेलाहि विज्ञानाच्या कसोटीवर घासून परखड आणि समृद्धतेकडे आपसूक घेऊन जात असते. आजूबाजूच्या वास्तवाला ती नीट पारखून घेत असते. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या  युगात आजचा सुशिक्षित कवि अन त्याची  संवेदना सुद्धा काहीशी प्रत्येक वास्तव तांत्रिक भूमिकेला जागून त्यायोगे आपली वेदनेची तीव्रता,तिची जाणीव डोळसपणे आपल्यात साठवून तिचा आपल्या आतला हुंकार प्रकट करीत व्यक्त होत असतो. त्यामुळेच कालची आणि आजची कविता ही एका पिढीच्या अंतरातील अनुभूतीचे निर्णायक पाउल ठरू शकते. नव्या संवेदनेला,नव्या प्रेरणेला आकर्षित होताना नवे संकेत घेऊन येत असताना तिचे संघर्षाचेही स्वरूप आमुलाग्र बदल घडवित असते.

‘सी सी टीव्हीच्या गर्द छायेत ‘ह्या संग्रहात याच नव्या बदलाचे पडसाद उमटताना दिसतात.जुन्या काळातील संघर्ष,त्याच्या अनुभूतीचे,वैचारिक बदलाचे कालानुरूप होत असलेले सकारात्मक वैज्ञानिक तसेच तांत्रिक बदल ही कविता सोबत घेऊन येताना दिसते. मात्र हे होत असताना ती तिच्या संघर्षाची तीव्रता किती सांभाळून व तोलून  बदल घडवते हे येणारा काळच ठरवू शकेल.अर्थात हे एका विशिष्ट वर्गाभोवतीच्या परिघातच घडू शकेल हे मात्र निश्चितपणे मला जाणवते.या दृष्टीने याच संग्रहातील ‘परीक्षण’ ही कविता फार बोलकी आहे .

केलच जर कवीचं नार्कों परीक्षण

सीटी स्कॅन ,

लाय डिटेक्टर चाचणी

तर समजतील सारी उगमस्थान कवितेतली?

तर त्यांच्या ‘पतंग’ या कवितेत पतंग हा त्या मुलाच्या महत्वाकांक्षेचे प्रतीक बनतो.पतंगाची  फिरकी द्रौपदी सारखी अंगावरचे वस्त्र फेडताना,आपसूकपणे केवळ ढील देणार्‍या ‘त्याच्या’ उंच भरारी घेऊ पाहणार्‍या महत्वाकांक्षेपोटी स्वत:च्या आयुष्यालाच गरगर फिरवून घेते .कारण ढील देणार्‍या हातात महत्वाकांक्षेच वारं संचारलेलं असतं.

माझ्या हातातली फिरकी

गरगरतेय द्रौपदीसारखी

नि सुटत चाललेला त्यातील दोर

जणू दु:शासनान ओढलेली साडी

इथे कवि स्त्रीचं एखाद्याच्या अति महत्वाकांक्षेपोटी होणारं वस्त्रहरण आणि नात्यामधला बंधनाचंही बेपर्वाईचं तेगारलेपण हेच दाखवण्याचा प्रयत्न करीत असावा.तरीही येथे महत्वाकांक्षा हा भाग महत्वाचा कारण कवि हा केवळ पतंगाच्या रूपकाद्वारे अनुभूतीला व्यक्त करतो व त्यातून येणारे तदंनुषंगिक सामाजिक संदर्भ देत संवेदनक्षम होतो. बासर्‍यांच झाड यात कवि वार्‍याला सारथ्य करणार्‍या कृष्णाच्या आविर्भावात पाहतो तर बासरीवाल्याच्या प्रतिकातून कवि आयुष्यातील संगीत आपणाकडेच असूनही आपणालाच ज्याचा थांगपत्ता माहीत नाही अशा सामान्य कलावंत बासरीवाल्याच्या प्रतिकातून आपले लक्ष्य वेधताना दिसतो .

प्रत्येकाच्याच खांद्यावर असतं

एक अदृश्य बासर्‍यांच झाड

ज्यातून निनादत असतात

षडज पंचमापासून भैरवी पर्यंतचे स्वर,

जाती धर्माच्या विवक्षित प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करणार्‍या पुस्तकांवर भाष्य करताना काही प्रश्नांबाबत कुतूहल असावे हे स्वाभाविकच पण या प्रश्नांच्या मुळाशी काही संदर्भ असतात हे सांगण्यासाठी अनुभूतिलाही राजकीय दृष्ट्या सृजनशील व्हावे लागते हे सुद्धा तितकेच अपरिहार्य असते.

    तर ‘मोहाचे सरकते जिने’ यात आजच्या मध्यमवर्गीय घरात असणारी उच्चभ्रू संस्कृतीची फसवी आस आणि तिचे ताणेबाने विशद करताना कवि एक अधोरेखित सत्य मांडून जातो.

कितीही गेलो उंचावर

तरीही मनात बाळगून

मोहाचे सरकते जिने

मिळत नाही आयुष्याला

परिपूर्णतेची लिफ्ट ,

फक्त नावावर असण्यान

कुठं घेऊन जाता येतात वर

आखीव-रेखीव स्क्वेअर फीट …

तर ‘नोटिफिकेशन’ या कवितेतून आजच्या तांत्रिक प्रगतीने अनुभवाला येणारे वास्तवाचे विदारक सत्य मांडून तांत्रिक युगात मरणाचेही होऊ घातलेले तांत्रिकीकरण दाखवून देतो.

मरणापूर्वी केलेल्या पोस्टला ,

फोनमध्ये पडतोय खच मेसेजचा

पानांचा पडावा झाडाच्या मुळांशी तसा

तसेच ‘विभक्त तर’ यातून कवि रक्ताच्या नात्यालासुद्धा तंत्र युगात कसे विभक्त केले आहे हे जाणवून आपणच जगलेल्या सुशिक्षितपणातही एक निरक्षरता डोकावून

आपल्याला डिवचते याचे प्रत्यंतर घडवून आणतो.

मी पाहतो मुलाला

अपलोड केलेल्या

फोटोतच मोठा होताना,

त्याचं प्रगतीपुस्तक

कधीच येत नाही सहीला

फक्त ते दाखवत वाकुल्या

माझ्या सुशिक्षित निरक्षरतेला

तंत्रज्ञान क्रांतीचे परिणाम म्हणूम कवितेच्या निर्मिक आशयाचा विचार जरी केला तरी तिच्या परिणामाची तीव्रता ही जनमानसा साठी तीव्रच असायला हवी तरच तिच्या द्वारे होणारे सकारात्मक बदल व परिणाम ठाशीव स्वरुपात नजरेत येतील व तेवढी परिपक्वता गीतेश यांच्या कवितेत आहे म्हणूनच ती कवितेच्या यशस्वीतेच्या व्यापकतेला अधिक उंचावर घेऊन जाइल हा विश्वास या कवितेतून मिळतो हे निश्चित .

—–प्रसाद सावंत

                              ४०२ . ओम सुमित को.ऑप. हौ.सोसायटी

                              गणेश गल्ली ,लालबाग

                              मुंबई : ४०००१२

                              फोन : ९९६९८३३१६६

                              [email protected] 

 

                               सी सी टीव्हीच्या गर्द छायेत

                               कवि गीतेश गजानन शिंदे

                               शब्दालय प्रकाशन

                               पृष्ठे १२८

                               किंमत रु. २५०/-         

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments