संत सेना महाराज

वैशाख वद्य द्वादशी रविवार संवत,१३५७ या दिवशी बांधवगड येथे देविदास व प्रेम कुंवरबाई यांना पुत्र रत्न झाले तेच आपले सेना महाराज. यांचे वडील व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील हे दोघे गुरू बंधू होते .


श्री रामानंद स्वामी हे त्यांच्या गुरूंचे नाव . घरात धार्मिक वातावरण असल्याने सेना यांना लहानपणा पासूनच परमेश्वराची आवड होती . त्यांच्या व्यवसाय नभिकाचा होता आणि त्यात ते पारंगत होते . सेना सतत पांडुरंगाचे चिंतन,कीर्तन, नामस्मरण करीत . अनेक साधू संतांचे त्यांच्या घरी येणे जाणे होते .काही दिवसांनी सेना यांनीही श्री रामानंदांचे शिष्यत्व पत्करले. सेना यांची भक्ती,आचरण,ज्ञान पाहून गुरूंनी त्यांना समाजाला भक्ती मार्गात आणण्याचे महत्वाचे काम सोपवले . गुरू आज्ञप्रमाणे सेना हजामत करताना सतत पांडुरंगाचे नामस्मरण करीत . ते त्यांच्या कामात प्रवीण होते . त्यांच्या हाताला एक प्रकारचा मृदू मुलायम स्पर्श होता. त्याने हजामती साठी आलेल्या लोकांच्या शरीराचा दाह शांत होत असे. त्यामुळे खूप लोक त्यांच्याकडेच हजमाती साठी येत. त्यांच्या भजन कीर्तनाला ही खूप गर्दी व्हायची.
सेना यांची ही कीर्ती बादशहाच्या कानावर गेली. त्याने सेना यांना बोलाऊन आपल्याकडेच नोकरीला ठेऊन घेतले. एकदा काय झालं ? सेना पांडुरंगाच्या पूजेत दंग होते . मधेच भाव विभोर होत होते . बादशहा कडून दोन तीन वेळा सेना यांना बोलावण आल. पण प्रत्येक वेळी ते घरात नाहीत असे त्यांच्या बायकोने सांगितले इकडे यांची पूजा काही उरकायच नाव घेत न्हवती. आता बादशहाला राग आला. एवढी बोलावणे पाठवली तरी आला नाही म्हणजे काय ? तेवढ्यात सेना यांचा शेजारी बादशहा कडे आला व म्हणला की ते कुठेही गेले नाहीत घरातच आहेत पांडुरंगाची पूजा करत आहेत ते तुमच्याशी खोटं बोलले झालं ! बादशहा रागाने लाल झाला त्याने सेना यांची मोट बांधून नदीच्या खळाळत्या प्रवाहात फेकण्याची आज्ञा दिली . तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाने सेना यांचं रूप घेतलं व ते बादशहा पुढे उभे राहिले. सेना यांना समोर पाहताच बादशहाचा राग शांत झाला . व तो हजामत करण्यासाठी बसला . हजामत करत असताना बादशहा जेव्हा मान खाली घाली तेव्हा रत्नजडित वाटीतील तेलात चतुर्भुज पांडुरंगाचे प्रतिबिंब त्याला दिसे पण वर पाहताच सेना हजामत करताना दिसत. वाटीतील रूप पाहून बादशहा मोहित झाला त्याचे देहभान हरपले . बादशहाने हजामत झाल्यावर सेना यांना ओंजळभर होन दिले . पांडुरंगाने ते होन धोपटीत टाकून ती धोपटी सेना यांच्या घरी गुपचूप नेऊन ठेवली . आणि आपण गुप्त झाले . पण आता बादशहाला त्या प्रतीबिंबाची ची भुरळ पडली होती. ते ईश्वराचे स्वरूप पाहण्याची ओढ लागली होती. दोन प्रहरी त्याने सेना यांना बोलावून घेतले त्यांना पाहताच सकाळची तेलाची वाटी बादशहाने आणली व म्हणाला सकाळी या वाटीत मला जे चतुर्भुज रूप दिसले ते मला पुन्हा दाखव . सेना यांना काहीच कळेना ते बादशहाचे बोलणे ऐकून चकित झाले . पण वाटीत जे सकाळी रूप दिसले ते काही आता दिसेना तेव्हा आपले रूप घेऊन स्वतः पांडुरंग आले होते हे सेना यांनी ओळखले . त्यांना आनंद झाला पण माझ्या साठी देवाला यावे लागले त्याला त्रास दिला याचे वाईट ही वाटले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी पांडुरंगाचा धावा केला .आता मात्र बादशहाला परत तेच रूप वाटीत दिसले . आता बादशहा बादशहा राहिलाच न्हवता तो विरक्त झाला पांडुरंगाचे भजन करू लागला देवाचं चतुर्भुज दर्शन झाल्यावर अजून काय होणार होत ? सेना यांनी धोपटी पहिली त्यात धन दिसले . सेना महाराजांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला होता . आता सेना महाराजांचं कशात लक्ष लागेना ते तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले .बरेच दिवस पंढरपूरला विठ्ठला जवळ राहिले .तो आनंद कसा वर्णन करणार ?

         जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
         आनंदे केशवा भेटताची
        या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी
         पहिली शोधूनी अवघी तीर्थे

नंतर ते आळंदीला श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आले. समाधीवर डोके ठेवताच त्यांना माउलींनी दर्शन दिले त्यांना पाहून सेना यांचे देहभान हरपले .नंतर निवृत्ती,सोपान,मुक्ताबाई यांच्या जिथे जिथे समाधी आहे तिथे तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेतले.

          उदार तुम्हा संत, मायबाप कृपावंत
          एव्हढा करा उपकार, काय वानु मी पामर
          जडजिवा उद्धार केला,मार्ग सुपंथ दाविला
          सेना म्हणे उतराई ,होता न दिसे काही 

आता मात्र जन्मलो त्या मातीची त्यांना ओढ लागली व ते पुन्हा बांधवगड ला आले पण आता ते विरक्त झाले होते कुणात रमत न्हवते दृष्टी शून्यात लाऊन त्या पंढरी रायचे रूप ह्रुदयात साठवत होते . एकादशीला दिवसभर असेच चिंतनात धुंद होते दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला कुणाशीही काहीही न बोलता आपली धोपटी त्यांनी खुंटीला लावली व तिथेच विठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी अवस्थेत गेले . कुडीतील आत्मतत्व अनंतात विलीन झाल . तो दिवस म्हणजे श्रावण वद्य द्वादशी .

               सेना म्हणे खूण सांगितली संती
               या परती विश्रांती न मिळे जीवा



     असे आहेत आपले एक एक संत महात्मे..

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments