जगन्नाथ पुरीत एक कर्माबाई नावाची ब्राम्हण स्री रहात होती. ती भगवत भक्त होती. देवावर तिची अपार श्रद्धा.तो जे करेल ते माझ्या हिताचंच असणार ही दृढ निष्ठा. पण ती गरोदर असतानाच तिला वैधव्य आल. तिला वाईट तर वाटलच पण काही इलाज ही न्हवता. पुढे योग्य वेळी ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला तिला आनंद झाला.आता हाच तिच्या जगण्याचा आधार होता . तिने मोठ्या हाल अपेष्टा सोसून त्याला मोठ केलं. हे सगळ होत असताना तिला देवाचा विसर मात्र पडला नाही. त्याच्या वरच्या श्रध्देला,भक्तीला अंतर पडले नाही. मुलगा मोठा होताच तिने मुलाचं लग्न ही केलं . आता त्यालाही मुलगा झाला सगळ कसं छान चाललं होत.पण मुलाचा जन्म होताच कर्माबाईचा मुलगा गेला . तिच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. आधी नवऱ्याच दुःख आणि आता मुलाचं ही . पण नातवा कडे पाहून ती कसेतरी दिवस घालवू लागली. त्याला जीवापाड जपू लागली.पण दुःख काही तिची पाठ सोडायला तयार न्हवत.काही दिवसांनी अचानक नातू ही तिला सोडून गेला.आता मात्र तिच्या जगण्याला अर्थच उरला नाही. ती अहोरात्र शोक करू लागली. असं का व्हावं हे ती आपल्या मनालाच विचारू लागली. पण काळाचे कुणापुढे चाललय का कधी. बरेच दिवस गेले आता जगन्नाथांची रथ यात्रा तोंडावर आली होती. त्या यात्रे साठी वेगवेगळ्या ठिकाणचे साधू महंत पुरीला आले होते. त्यातील काही जण कर्माबाईच्या घरी मुक्कामाला आले. ती चिंताक्रांत होतीच हे त्या साधूंच्या लक्षात आले. त्या बद्दल त्यांनी तिला विचारले तिची सर्व कर्म कथा ऐकून साधू ही दुःखी झाले तिचे सांत्वन करून त्यांनी सौसाराच सारं तिला सांगितल व त्यांच्या जवळील श्री गोपाल कृष्णाची एक सुंदर मूर्ती देऊन म्हणले की आज पासून यालाच तू मुलगा,नातू समजून याची काळजी घे. तू जे जे तुझ्या मुलासाठी, नातवा साठी करायचीस ते ते सगळ याच्या साठी कर. त्याच्या साठी वेगवेगळे पदार्थ कर त्याला काय आवडेल ते ते करून घाल.छान खेळणी आण. त्याच्याशी बोल.त्याला नातू समजून गोष्ट सांग. आपल्या मुला व नातवा प्रमाणे त्याचे कोड कौतुक कर. त्याला प्रेम दे माया दे.हे साधुंच बोलण ऐकून कर्माबई सुखावली.आता तिला एकट एकट वाटत न्हवत. तिच्या जगण्यात एक प्रकारची उभारी आली होती. आता तिला त्याचं करता करता रोजचा दिवस ही कमी पडू लागला. त्या मूर्तीला ती नातू समजून आंजरून गोंजारून मोठ्या मायेने उठवू लागली.दूध पाजू लागली, नंतर अंघोळ घालून छान छान कपडे घालू लागली,कपाळावर सुवासिक गंध लाऊ लागली.त्याला सजवण्यात नटवण्यात तिची तहान भूक हरपून जाऊ लागली. असा नटलेला कृष्ण बघून त्याची दृष्ट ही काढू लागली. न्याहारी साठी छान खाऊ करू लागली.दुपारी सुग्रास जेवण करून त्याला गोष्टी सांगत भरवू लागली. दुपारची वामकुक्षी संध्याकाळची गोष्ट. रात्रीच जेवण व नंतर पाळण्यात अंगाई म्हणत त्याला झोपवण्यात आता तिचा सगळा वेळ जायला लागला. त्याच सगळं वेळेवर व्हावं म्हणून स्वतःच्या आवरण्याला, अंघोळीला ही आता तिच्यापाशी वेळ न्हवता .त्या बाळ कृष्णाला ही आता याची सवय झाली . तो ही या सगळ्याचा आनंद घेत होता. तिच्या कडून सगळं करवून घेत होता. अचानक एके दिवशी तिच्या घरी अग्निहोत्री ब्राम्हण राहायला आले ते खूप कर्मठ होते ते हे सगळ पहात होते. पण तिला असं ओवळ्याने न अंघोळ करता देवाला दूध पाजताना व भरवताना पाहून मात्र ते संतापले ते तिला म्हणले “अहो तो देव आहे तुम्ही त्याला ओवळ्यानेच कसं काय भरवता ? हे पाप आहे, हे देवाला कधीही आवडत नाही . तो तुमच्यावर रागवेल आता .” झालं ….. कर्मा बाईला ही त्यांचं म्हणण पटलं . आता ती रोज उठून आधी अंघोळ वगैरे करून कृष्णसाठी नेवेद्य करू लागली. याने रोजची त्याची भुकेची वेळ टळू लागली त्याचा जीव भुकेने कासावीस होऊ लागला. आता काय करावे हिला कसे सांगावे ? मग तो देवळातल्या पुजाऱ्याच्या स्वप्नात गेला व त्याला निरोप द्यायला लावला की त्या कर्मठ लोकांनी तिच्या मनात विकल्प घातला आहे .हे मला बिलकुल आवडले नाही मला कर्माचे बंधन नाही.मला सोवळे ओवळे लागत नाही.मी भावाचा भुकेला आहे .तिच्या या बदललेल्या वागण्याने मला खूप भूक लागते .माझी भुकेची वेळ टळून जाते. पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं लगेचच पुजाऱ्याने देवाचा असा निरोप कर्मा बाईला देताच कर्माबाई रडू लागली. माझ्या मुळे त्याला वेळेवर जेवायला मिळाले नाही म्हणून स्वतःवरच राग काढू लागली. पण आता तिला उशीर करून चालणार न्हवत. तिने पटकन तयार होईल म्हणून खिचडी केली व बाल कृष्णाला पुढ्यात घेऊन भरवू लागली. एकीकडे खिचडी भरवतीये व दुसरीकडे डोळ्यांच्या धारा थांबता थांबत न्हवत्या. बाळकृष्ण ही तिच्या हातची खिचडी खाऊन तृप्त झाला. अस असताना तिच्या अंतकाळी तो तिला कसं सोडणार होता. धन्य ती कर्माबाई आणि धन्य तिची भक्ती . म्हणून आज ही जगन्नाथ पुरीला कर्माबाईची खिचडी आल्या शिवाय दुसरा नेवेद्य दाखवला जात नाही.


तर अशी आहे कर्माबाईची खिचडी. इतर खूप संप्रदाय आहेत त्यात सोवळ ओवळ पाळल जातं शुचिर्भूत होऊनच नेवेद्य व नामस्मरण ही केल जात . असे असेल तरी वारकरी संप्रदाय असा आहे की तिथे फक्त तुमचा भाव च बघितला जातो.देवाचं नामस्मरण करायला वेळ काळ स्थळ यांचं बंधन नसतं तरी पण आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून आपण शुचिर्भूत होऊनच देवाचं काहीही करतो.पण देवाला मात्र हे काही लागत नाही त्याला फक्त प्रेम व भक्ती च केलेली आवडते .

पुंडलिका वर दे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
जगतगुरु तुकाराम महाराज की जय
सर्व संतन की जय

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments