अनुभूतीच्या विविध स्तरावर उलगडणारे अंतरंग डार्क गडद काळ्या रंगाच्या कविता

अनुभूतीच्या विविध स्तरावर उलगडणारे अंतरंग

डार्क गडद काळ्या रंगाच्या कविता

                 —प्रसाद सावंत

—————————————-

कवी हा सभोवतालच्या वास्तवात वावरतांना आपला स्वत:चा असा एक

दृष्टीकोन मनाशी जपून वास्तव जगातल्या भाव-भावनांना मोकळी वाट

करून देत जगण्याचे अर्थ मांडीत राहतो. व त्यानुसार मतप्रणाली बनवून जगण्याचे ध्येय ठरवीत असतो . म्हणूनच कवी संजय पाटील यांच्या सारखा कवी आपल्या वैचारिक बांधीलकीला व आपल्या अनुभूतीला चार वेगवेगळ्या स्तरावर विभागून आपल्या ध्येय धोरणांना जनसामान्यांपूढे आणू इच्छीतो. सर्वप्रथम कवी ‘काळोखातून उगवणार्‍या उद्याच्या कविता’ या भागात कवी वास्तवात जगत असताना नकारात्मक उर्जेतून सकारात्मकता पाहण्याचा प्रयत्न करतो. ‘ओंजळ’ या कवितेच्या माध्यमातून तो एकतेचे प्रतीक पाहतो तर शेवटच्या ओळींमध्ये त्याच ओंजळीच्या विभक्त रूपातही तो स्वागताच्या कल्पनेतून व्यापक भावनेची अनुभूति घेऊन त्यातही सकारात्मकतेची ऊर्जा प्रकट करतो.तर ‘डार्क गडद काळ्या रंगाच्या कविता’ या भागाद्वारे वास्तवातील कवीच्या जाणिवांचे प्रश्न आणि त्याचा भवताल यांचा उद्रेकी भावरंग रंगवितो.पण हे रंगवताना त्याने सकारात्मकता संपूर्णपणे पुसण्याचा प्रयत्न केलेला नाही हे विशेष. तर तिसर्‍या भागात कवी याच उद्रेकी जाणिवाना एल्गाराचे रूपात घेऊन जाऊ पाहतो.त्यातही कवीने सकारात्मकतेची झालर भोवताली सोडलेली आहेच.पण त्यात विद्रोहाचीही भर टाकलेली दिसते.कवीचा मूळ गाभा किंवा दृष्टी ही चित्रकारितेची असल्याने या कवितांचा मांडणीबंध प्रत्यक्ष शब्द चित्र डोळ्यासमोर उभेही करतो.शेवटच्या भागात कवी सामाजिक जाणिवेच्या भावनेतूनच आलेल्या पर्यावरणाच्या भूमिकेलाही प्रोत्साहित करतो.’हिरवेपणा ठेव जपून’यातुन  कवी पर्यावरणपूरक भाष्य करताना दिसतो..तसाच त्यासोबत मानवी मनाच्या सकारात्मक भावनेला मोकळी साद घालतो व ती ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तसेच नदी आणि स्त्री ची तुलनात्मकता व दोघांच्याही नशिबी असलेले भोग यांचे तौलनिक स्पष्टीकरण देत जनमानसातील स्त्री च्या उपरोधिक भावनांचा ऊहापोह करतो. ‘निरक्षर माणुसकी’ या कवितेतून ‘माणुसकी’ ही अक्षरं शिकवून किंवा माणसात बाहेरून आणून भरवता येत नाहीत ,ती उपजत व संस्कार क्षमतेने अंगी भिनावी लागते हेच कवी सूचित करीत असावा. (काळवंडलेल्या रक्ताच्या लाल कविता)कवीची आई या कवितेतून प्रत्यक्ष जन्मजात काम सोडून परिस्थितीने अथवा जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेने ओढवलेल्या कामाच्या रगाडयात जखडून कवि स्वत:चे स्वत्व गमावून तर बसलेला असतोच पण आपल्या जन्मदात्रीचे सुद्धा पांग फेडू न शकणार्‍या कवीची व्यथा पाटील नकळत मांडून जातात.

आईवर कविता लिहिणारा कवी..

शहरात रममाण झाला आहे

आईला गावात एकटी सोडून

या शब्दातच त्याचे वंचितपण सामावले आहे त्यांच्या ‘दहशतवाद’ या कवितेत दहशतवादाचे एक वेगळेच रूप पाटील सांगू इच्छितात ते म्हणजे जी दहशत दिसते,कळते पण माणसाला स्वत:पर्यन्त आल्याशिवाय ती दहशत जोवर संवेदनेच्या कक्षा पार करून चटक्यांच्या जाणिवेने पोळत नाही तोवर कळत नाही. याचाच दूसरा अर्थ असा होतो की संवेदना ही गाफिल अवस्थेत असू शकते. व ही अवस्था जाणीवपूर्वक निर्मिलेल्या समाजव्यवस्थेचा भाग बनलेली असते. याचे उत्तर काहीसे त्यांच्याच एका कवितेतून मिळते ते म्हणजे ‘वेदनेची वाळवण’ या कवितेत कवि म्हणतो बर्‍याच दिवसापासून

मनात खोलवर

दडून बसलेल्या वेद्नांना

ओल लागली असेल

म्हणून…

हीच ती ओल्या झालेल्या संवेदनेची गफिल अवस्था असू शकते. जी कवि वाळवण रूपात एकही अश्रु न ओघळण्यासाठी दोरीवर ठेवू इच्छितो.फक्त यातली सकारात्मकता एवढीच की वेदना त्याला प्रज्वलित करायची आहे. पण ती ठराविक वेळ आल्यावर. अर्थात जगतिकीकरणाचा नुसता आभास केला जातोय इथपर्यंत कवीला सामाजिक भान जरूर आहे. आणि ही समाजव्यवस्था, हेच आभासी वातावरण कायम ठेवून भूमिपुत्रांचे तोंडचे घास पळवतेय,ओरबाडतेय. याची जाणही त्याला आहे. त्यामुळेच तो सहजगत्या म्हणतोय,

जे पेराल तेच उगवेल

ईमान राखते माती,

भला व्यवहार

विसरून माणसाने

का दिली माणुसकीला

मूठमाती?

यात कवीचा उद्रेक जाणवतोच. संजय पाटीलांची कविता माणसांच्या जाणिवा,भावना जपताना जशी  संवेदनक्षम होत जाताना दिसते तशीच ती सकारातमकतेने संस्कारक्षम उद्रेकाचीही भाषा वापरण्याची मानसिकताही  राखून आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.[1]

किती दिवस तोडलेल्या कुलूपाने अंधार कोठडीतील

अडगळीत आयुष्य कंठावे,किल्ली हरवल्यावर.

दुसर्‍या एखाद्या पर्यायी किल्लीने उघडून बघायचा

प्रयत्न केला तर… लागलीच

तुम्ही जात पंचायत बसवितात.(तुम्ही जात पंचायत बसवितात)

संजय पाटील यांची कविता व्यक्तित्वाच्या पातळीवर विचार विन्मुख होताना दिसते तशीच ती समाज मनाच्या पातळीवरही तितकीच उद्विग्न होत भाष्य करते.एखाद्या गोष्टीकडे पाहणार्‍याच्या दृष्टीचा साधा कोन  जरी बदलला तरी समोरच्या सत्याचे वैचारिक दुष्ट्या असणारे मतभेदहि वेगळ्या वाटातुन आपला प्रवाह चोखाळतात हेच गमक पाटील ‘सीमा रेषा ते क्षितिज रेषा’ या कवितेद्वारा उलगडवू पाहतात. ही कविता ‘काळोखातून उगवणार्‍या उद्याच्या कविता ‘या भागातुन कवि उद्याच्या निर्माण होणार्‍या मानसिकतेचे रंग प्रवाह बदलवू पाहण्याचे स्वप्नचित्र उराशी बाळगतो असेच म्हणावे लागते.

‘ डार्क गडद काळ्या रंगाच्या कविता ‘

                 कविता संग्रह — कवि संजय पाटील

                 पायगुण प्रकाशन,अमरावती

                 मूल्य ४८ रुपये

                 पृष्ठे ९६

 

 

 

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments