स्फुट लेखनातून विविध आशय -विषयांच्या विधायक भेटीगाठी

स्फुट लेखनातून विविध आशय -विषयांच्या विधायक भेटीगाठी

————————————————————————

                                  प्रसाद सावंत

नुकताच श्री श्याम पेंढारी ‘भेटीगाठी ‘ हा लेखसंग्रह वाचनात आला.

यात एकूण ३० लेखांचा समावेश असून ते अनुक्रमाने संबोधित करण्यात आले आहेत तर शेवटचा लेख हा ‘मी बालपण आणि कविता’या शीर्षका अंतर्गत समाविष्ट आहे. पेंढारींच्या ‘कुसुमाकर’ या मासिकामधले काही निवडक लेख त्यात अंतर्भूत करण्यात आले आहेत.त्यावेळी वेळोवेळी प्रसंगानुरूप अनेक विषयांना पेंढारी यांनी सहजस्पर्श केला आहे. यामध्ये त्यांच्या गिरगावतल्या चाळीतील बालपणापासून राजकीय,सामाजिक व काही ठिकाणी तर साहित्यिक व धार्मिकही विषयांनाही ते चर्चेत आणून त्यावरचे आपले भाष्य करतात. या लेखांचे दुसरे एक वैशिष्ट्य असे की,लेखक लेखाच्या सुरुवातीलाच एका मनीमाऊचा सातत्याने उल्लेख करतात. प्रस्ताविकात लेखकाने जरी संदर्भ दिला असला तरी ती प्रत्यक्षात मनीमाऊ एक प्राणी म्हणून न राहता ते लेखकाच्या मनाच्या अनेकविध अवस्थांमध्ये कधी मित्र, कधी जवळची खास व्यक्ती किंबहुना केव्हा केव्हा तर मनाशीच बोलत असल्याचा सातत्याने भास होत राहतो. त्यामुळे लेखक स्वत:चे विचारांनी अभिव्यक्त होत असताना त्या लेखनाला बर्‍याच ठिकाणी एक छानसे संवादात्मक स्वरूप प्राप्त होते व लेखांच्या विचारांना कथनाच्या अनुषंगाने उलगडत व्यक्त होणे जरुरीचे ठरते.व तिथेच लेखकाची लेखणी एका शैलीचा प्रत्यय देते. त्यांच्या लेख मालिकेतील पाहिल्याच लेखांकात काळानुसार बदललेल्या समाज स्थितीचे, बदललेल्या सामाजिक स्थित्यंतराचे दर्शन घडते व लेखकाला पूर्वीच्या वातावरणाची मनात कायम घर करून राहिलेली ओढ व बदलाने निर्माण केलेली खंत सतत जाणवत राहते. व त्यांच्या तिसर्‍या लेखात दस्तूर्खुद्ध लेखकाने आजकालच्या विटलेल्या राजकीय

वातावरणात सामान्य माणसाच्या अभिव्यक्तीलाही राजकीय आश्रय न मिळाल्याने प्रसारमाध्यमेही कशी केराची टोपली दाखवतात याची खंत पेंढारीना वाटत रहाणे स्वाभाविक वाटते. आजच्या काळातही हे वास्तव आपणास अनुभवास येते हे खरे. तसेच त्यामुळेच त्यांच्या लेखनाचे सच्चेपण प्रकर्षाने लक्षात येते. तर त्यांच्या एकविस क्रमांकाच्या लेखात सामान्य माणसाची अन्याय घडताना होणारी घालमेल पाहून आपण आक्रमकतेनं व्यक्त होऊ न शकल्याची तडफड ,पण मनाला वेदना देणार्‍या घटनेबाबतची प्रचंड चीड लेखकाच्या मनातली एल्गाराची भावना दर्शवते . त्या उलट त्यांच्या वीस अनुक्रमांकाच्या लेखात निसर्गाच्या बेकाबू होण्यावर ,व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने होणार्‍या नुकसानाबद्धलची हळहळ ते व्यक्त करतात. ती व्यक्त करतानाच ते क्षेपणास्त्र तज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे . अब्दुल कलाम यांची आठवण करत ‘निसर्गाला काबूत ठेवील असा कोणी किमयागार जन्मलाच तर किती छान होईल बरे’ असा आशावादही प्रकट करतात. मुळात लेखक हा कवी हृदयाचा असल्याने साहजिकच काव्य हा तर त्यांच्या जवळचा प्रांत ,मग साहित्याबद्धल तो दुर्लक्ष तरी कसं बरे करील?पेंढारी तेराव्या लेखात अशाच काही नवकवींच्या विक्षिप्तपणावर व तर्‍हेवाईकपणावर प्रकर्षाने प्रकाशही टाकतात व अप्रत्यक्ष समजहि देताना दिसतात. तर दुसरीकडे जे खरे प्रतिभावंत आहेत त्यांच्या समोर ते नतमस्तक व्हायलाही विसरत नाहीत. त्यांच्या अठ्ठावीस अनुक्रमाच्या लेखात ते सदध्याच्या राजकीय अस्थिर वातावरणाचे पडसादही उमटतात व आपल्या नागरिक म्हणून असलेल्या आपल्या निष्क्रियतेची प्रकर्षाने जाणीव असल्यामुळेही ते उदासीन झालेले दिसतात. म्हणूनच या अस्थिर व निराशाजनक वातावरणात ते आपसूकच वैफल्यग्रस्त होऊन उद्गारतात ,मने आपण सारे मुर्दाड बनून धर्म,हिंदूत्वाच्या मागे लागलो तर काही दिवसानी आपल्या देशाचं चित्र कसं असेल ग?कल्पनाच करवत नाही. तर सव्विसाव्या लेखात आपल्या एका प्रकाशक मित्राच्या त्यांनीच लेखात उल्लेखिल्याप्रमाणे ‘नव्या साहित्यिकांची ओझी,आपल्या खिशातले पैसे खर्च करून आपल्याच डोक्यावरुन वाहणार्‍या भाषेच्या प्रेमाखातर व्यवसाय करणार्‍या मित्राबद्धलची आदरयुक्त व त्याच्या अव्यवहारी व्यवसायाबद्धल सन्मानाची ,भावना व्यक्त करतात .अशा नानाविध प्रश्नांवर आपले मार्मिक ,तर केव्हा परखड भाष्य करीत चर्चा घडवून आणतात व आपले मनोगत व्यक्त करतात. आपल्या भेटीगाठी या लेख संग्रहाद्वारे मनाच्या खोलवर रुतून बसलेल्या,आतल्या अत ठसठसणार्‍या वेदनाना वाट मोकळी करून देतात . व समाजालाही त्यात समाविष्ट करीत नव्या समाजासाठी एक वैचारिक व्यासपीठ प्रामाणिकपणे उभे करण्याचा मानस उरी बाळगताना दिसतात.हीच या भेटीगाठी संग्रहाची फलश्रुती ठरेल.

 

 

भेटीगाठी (लेखसंग्रह)

लेखक :श्याम पेंढारी

प्रकाशक : जे.के. मीडिया ,सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी

पृष्ठे :११२

किंमत :१३०/-                            

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments