सश्रदध  आणि निरागस अध्यात्माचा अन  आदर्श सामाजिक जाणिवांचा हुंकार !

श्रदध  आणि निरागस अध्यात्माचा अन 

आदर्श सामाजिक जाणिवांचा हुंकार !

प्रसाद सावंत 

मानवी जीवनातील सुखदू :ख,मानसिक वेदना व त्यातही समाज जीवनात पर्यायरणाबद्दल असीम श्रद्धा तसेच मुळच्या अंगभूत शिक्षकी पेशाला अनुसरून आदर्श भावना जपलेल्या सौ. लिला जंजिरे यांचा हुंकार हा कविता संग्रह वाचनात आला.कोणतीही वैचारिक बांधिलकी जाणीवपूर्वक स्वीकारण्यापेक्षा उपजत अंगभूत आदर्श भावनांना सहजस्फूर्त मोकळी वाट करून देत या कवयित्रीने आपल्या मनाच्या संवेदनेला काव्यरूप दिले आहे.रूप देताना कवयित्रीने आपल्या अनुभवाला आलेल्या संमिश्र भावना शब्दबद्ध केल्या आहेत. त्यात कुठल्याही रचंनाबंधात स्वत:ला अडकवून न ठेवता,त्यांनीच मनोगतात आपले प्रेरणास्त्रोत मराठी पारंपारिक तसेच मौखिक वाङमयातील संस्कार मान्य करत हळुवार,तरल शब्द रचनेद्वारा व्यक्त होताना दिसतात शिवाय हे व्यक्त होताना पर्यावरणासह सामाजिक जाणिवेचेही कवयित्रीला भान आहे हे वारंवार दिसून येते.

विचारलं त्यांनी आणखी हळूच मला

निर्मल,रम्य परिसर हवा न तुला

रहायचय ना रोगमुक्त हवेत तुम्हाला ?

घाला ना आवर प्लॅस्टिकच्या घाणीला

असा पर्यावरणाचा विचार मांडत त्या लिहून जातात

शेवटचं त्यान बाजवलच मला

जाग कर अखिल जगताला

राहाल करत अस प्रदूषित मजला

थांबवू शकत नाही देवही विनाशाला

याच सामाजिक जाणीवेतून सर्वधर्म समभावाच्या,सामाजिक एकतेच्या संदेशाला कवयित्रि न चुकता प्रोत्साहित करत आज समाजात बोकाळू पाहणार्‍या संकुचित,धर्मांध भावनेलाही त्या जाणीवपूर्वक आदर्श मनाच्या धारणेच्या भावनेतून डिवचूनही जातात.

घालवून धर्मदोष ठेवू व्यक्तीगत स्वधर्मांना

सोडून निंदकता,सद्बुद्दीन अभ्यासू पराधर्मांना

हिंदू,मुस्लिम,शीख,ईसाई,जैन,बौद्ध,पारसी,यहुदी

ठेऊ हरधर्माप्रति स्वच्छ अपार आदरभाव

व आदर्श मानवी संस्कारित वृत्तीने शिक्षकाप्रमाणे बजावूनही सांगतात–

धर्मांधतेच्या कहरान फोफावलाय अति भेदभाव

समाज,राष्ट्र,विश्वासाठी हवाय सर्वधर्म  समभाव

बाळगू आकांक्षा मुक्त सामाजिक अभिसरणाची

ठेवूया मनीषा सर्व धर्मिय आदर्श समाजाची

करूया स्वप्नपूर्ती गांधीजींच्या सर्वधर्मभावाची

राहील शेष मग फक्त सर्वधर्मसम मम भाव

कवयित्रीच्या अनुभव विश्वात एका मजुराच्या मुलाच्या बालमनाच्या भावनाविश्वातला संघर्षही आवर्जून मनाचा ठाव घेतो.ते विदारक वास्तव चितारताना कवयित्रि शाळा बाजाराच्या विध्वंसक

वृत्तीचाही ऊहापोह करताना विषण्ण मनान,संवेदनक्षम होताना दिसतात. या विध्वंसकतेने निर्माण होणार्‍या वाईट वृत्ती बालमनावर घातक परिणामही घडवतात हे शल्य त्यांना आत कुठेतरी बोचताना दिसते. ‘चिंध्या बाल मनाच्या’ कवितेत व्यक्त होताना उद्वेगाने लिहितात–

झालं इनून रडून भाकून

देतू पुस्तकाच पैक भरून

बसत होते रट्ट्यावर रट्टे

निघत होते सालट्याव सालटे

पुस्तकापायी काही दमडीच्या

झाल्या चिंध्या बाल मनाच्या

झाल्या चिंध्या शाळा बाजारातील माणुसकीच्या

माणसाच्या विविध अवस्थेत दाटून किंवा ओघळणार्‍या अश्रुंचे रूपक घेऊन कवयित्रि मानवी मनाचाच त्याद्वारे नकळत शोध घेताना दिसतात. त्यात प्रत्येकाच्या मानसिकतेला अजमावताना दिसतात. संभ्रमित होताना दिसतात. पण त्यातही त्यांचा माणुसकीवरचा आत्मविश्वास अढळ असल्याने त्या संभ्रमातून एक विश्वास त्यांना खंबीरपणे ठाम भूमिकेप्रत जाण्यासाठीचे बल देतो.

कानाकोपर्‍यात रुग्णालयाच्या

घुसमटतात,स्तब्ध होतात

ओसंडतात,बांधही फोडतात

असतात केव्हा आनंदाश्रू

केव्हा दू:ख दरिद्रयाचे

कधी माणुसकीचे

कधी वेदना,ताटातुटीचे

मात्र एवढं खर की

ग्लिसरीनच्या आमंत्रणाचे

खोटे खोटे टियर्स नक्कीच नसतात.

या मानसिकतेच्या शोधातूनच त्यातल्या विकृतीने पछाडलेल्या वृत्तीचाही त्या शोध घेताना दिसतात. ‘कुठ चाललीयत माणस ?'(भाग १ व २ )यात त्यांना त्यांचा आदर्शवादहि ठेच लागून विव्हळताना दिसतो. अशा नानाविध संमिश्र भावभावनांच्या संवेदनक्षम कोलाहलाने कवयित्रीचे मन

हुंकारत राहते.शब्दबद्ध होत राहते.व अनेक रूपकांमध्ये स्वत:चे अनुभव गुंफत राहते.स्त्रीच्या

बालपणापासूनच्या यौवनावस्थेनंतरच्या उत्तरायणातही ‘पदर’ या रूपकाद्वारे स्त्रीत्वाच्या दुर्बलतेचे

(‘मातेची ठेव-पदर’)चित्रण त्या करू पाहतात.

लपविण्यास आताशा दू:ख क्रोध निराशा

बिलगतोच नेत्राना आपलेपणान

देतोस साथ सदैव सखा होऊन

जपण्यास ठेव बाजवतोस मायेन                    

कवयित्रि अशा जीवनातल्या अनुभूतिना हुंकारत आश्वासक सादेला प्रतिसाद देतात तशाच त्या अंधश्रद्धाळू भंपकतेलाही मनाच्या निर्भीडतेने फटकारतात.

म्हणायचं लाखोनं येणार्‍यांना यात्रेकरू

त्यात किती प्रामाणिक,किती माथेफिरु

मालकिणीला भोसकणारा येऊन गुन्हा धुतो

रडवत बायकोला,कुणी रखेलीसह येतो.

तर

मुखाने जोमात ओम शांती शांती म्हणत

पोसतात अहंकार आपसात झोंबया खेळत

आव जटा रूद्राक्षान सन्न्यस्तांचा आणतात

असुविधांच्या नावानं हेच हुज्जत घालतात

आला उबग या अंधश्रद्धांचा

गोंगाट,थोतांड सगळ्या कर्मकांडांचा  

तसेच त्यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर,पानसरे यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांचे वावडे नाही. काय होता तुमचा गुन्हा ? या कवितेत त्या तथाकथित सनातन्याना अप्रत्यक्षपणे विचारणा करतात–

गोळ्या घालून करण्या तुमची हत्या

असा काय होता तुमचा गुन्हा?

थोपवून लाखो मुक्या हत्याना

थांबवण निरपराधीना डाकिणी करण्याला

              हा तुमचा गुन्हा ?

करीत विरोध कर्मकांड,जादूटोण्याला

दर्शवण भूत,भानामतीच्या मिथ्याला

              हा तुमचा गुन्हा ?

उलगडवत विज्ञान दैवी चमत्कारातील

उघडा करण फोलपणा अंधश्रद्धातील

              हा तुमचा गुन्हा ?

पुरवत पिच्छा वैज्ञानिक दृष्टीकोणाचा

आग्रह धरण तार्किक धर्म चिकित्सेचा

              हा तुमचा गुन्हा ?

असे सडेतोड प्रश्न जे एका सामान्य माणसालाही अगदी सहज पडू शकतात तेच प्रश्न कवयित्रि म्हणून संवेदना म्हणून प्रकर्षाने जंजिरे बाईनाही जरूर भेडसावतात. व त्याच तडफेने संतापही व्यक्त करतात जसे—

निरर्थकता भोंदुगिरीतील दाखवत

राखणं बूज सामाजिक बदलाची

              हा तुमचा गुन्हा ?

तर

चालवत गाडगेबाबांचा थोर वारसा

अडवत राहणं धार्मिक शोषणाला

              हा तुमचा गुन्हा ?

एवढे तुमचे गुन्हे,विवेकनिष्ठ लढे

न पचणार्‍यानी दाखवलं तुम्हा आम्हा

नको त्यांना फुले,आंबेडकरांचा महाराष्ट्र

नको त्यांना दाभोळकर, पानसरेंचा महाराष्ट्र

सापडले तर कळेल ना कसं हवा महाराष्ट्र

अशा समिश्र भावनांचा हा हुंकार कवयित्रि जंजिरे बाईंनी आपल्या मनातल्या साठलेल्या बिजाला वेदनेच्या प्राथमिक अवस्थेतच शब्दबद्ध करत जनमाणसांसमोर व्यक्त केला आहे .त्यांच्या प्रतिभेचे जरूर स्वागत आहे.

                                       

                                                हुंकार

                                                कवयित्रि सौ. लीला जंजिरे

                                                श्रमश्रेम प्रकाशन,मुंबई

                                                पृष्ठे ६६

                                                स्वागत मूल्य १०० रुपये

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments