बेट नावाचं माणूस : तरल आणि आंतरिक संघर्षातून व्यापक सामाजिक भावविश्व !!

बेट नावाचं माणूस !

तरल आणि आंतरिक संघर्षातून व्यापक सामाजिक भावविश्व !!


                                                                          —— प्रसाद सावंत 

प्र.श्री. नेरूरकर यांच्या कथा बर्‍याचदा अंतर्मनाशी संवाद साधणार्‍या,भावनेचा आतल्या आत होणारा संघर्ष आणि या संघर्षातून उडालेल्या ठीणगीच स्वरूप कोणतं असेल,किंवा कसं असावं याविषयी चर्चा करताना दिसतात.मात्र ठीणगीच स्वरूप म्हणजे ते अंतिम परिणाम मानत नसावेत. कथेच्या वाचकाला कथेत सामावून घ्यायला,त्याला आपल्या विचारप्रत न्यायला प्रवृत्त करायचा तर आपणच निर्णायक मत देऊन जमणार नाही तर आपल्याला अभिप्रेत असलेल्या निर्णयाप्रत येण्यासाठी प्र.श्री. कथेमध्ये त्या पद्धतीने वेगळे वळण घेताना दिसतात किंबहुना ही वळणच वाचकाला लेखकाच्या अपेक्षित अंतिम निर्णयबिंदुलगत आणून सोडतात. कित्येकदा हे वळण कथेच्या शीर्षकापासूनच सुरू होताना दिसते आणि वाचकांची मानसिकता तयार होतानाच अशा दृष्टीकोणातून प्रवूत्तीला चालना देते.

या कथांचा दूसरा एक गुण असा की,बर्‍याच कथांमधून प्र.श्री. या मनाच्या कोंडमार्‍याला मोकळं करू पाहताना दिसतात. त्यासाठी ते विविध व्यक्तिरेखांच्या अंतर्मनाचा वेध घेतात. जसे ‘शून्याचा अंत’ मधील डॉक्टर रांगणेकर,’न हरवलेली बाई ‘मधील शिक्षिका. प्र.श्री. आपल्या ‘कहाणी एका रस्त्याची ‘ कथेत लिहिताना म्हणतात,’कहाणी कोणतीही असो,कुणाचीही असो ती माणसालाच येऊन मिळते. माणसाने माणसासाठीच लिहिलेली असते. माणसे तरी किती प्रकारची ,तशाच कहाण्या ! म्हणजे काय तर प्र. श्री. च्या लेखनाचा केंद्रबिंदु माणूस आहे. त्याचं अंतर्मन व त्याचा संवाद अर्थात,इतकाच या लेखनामागचा सीमित अर्थ आहे का ?तर तसे वाटत नाही. प्र.श्री. त्या कथांमधून प्रत्येक व्यक्तिरेखेद्वारे रेखाटलेल्या  भावनेच्या अंतर्मनातील संघर्षाला सामूहिक रूपात पाहतात. इथे प्र. श्री. ची कथा व्यापक ठरते. आणि ती एका वर्गापुरती न राहता सगळ्या समाजाची वेदना बनते. किंवा असेही म्हणता येईल की, रेखाटलेली प्रत्येक व्यक्ति या समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठीच जन्माला येते. इथे प्र. श्री. च्या कथा लेखनाचा उद्धेश सफल होतो .

प्र.श्री. यांच्या ‘न हरवलेली बाई’ मधील शिक्षिका ही सतत जागृत मन असलेली, पण कंटाळा हा प्रकार मात्र तिच्याकडे सर्वसामान्य माणसाच्यात असणार्‍या सहज प्रवृत्ती सारखाच असतो. पण ती सहज प्रवृत्ती निर्माण होण्याला कारणेही तशीच आहेत. कथेतील शिक्षिका केव्हा केव्हा वेगळेच वागत आहे असे वाटते. समाजाच्या रूढ चौकटी आणि चाकोरीबद्ध जीवन जगण्याच्या पद्धतीचा कोंडमारा त्यांना असह्य होत असलेला जाणवतो. यासाठी त्यांचा मानसिक ,वैचारिक प्रसंगी सामाजिक लढा चालू आहे. त्या लढ्याचे निर्णायक स्वरूप त्यांना हवे आहे आणि या सर्वातून आलेली उदासिनता कंटाळ्याच्या रूपाने कायम स्वरूपी जरी वाटली तरी ती एक जागृत मन असलेली,एका ध्येयाने पछाडलेली,सामाजिक बदला साठी धडपडणारी एक जागृत नागरिक आहे. म्हणूनच ती एक ‘ न हरवलेली बाई ‘ आहे.

त्यामानाने ‘ शून्याचा अंत ‘मध्ये हा संघर्ष सामाजिक पातळीवर राहत नाही. तो केवळ मानसिक पातळीवर सीमित आहे. ‘न हरवलेली बाई ‘मधील मानसिक कोंडी व ‘शून्याचा ‘त डॉक्टर रांगणेकर एकदम अलिप्त व वेगळ्याच विश्वात गुंतलेले पण समाजाशी नातं जोडू पाहणारं त्यांचं तरल मन न कळत अलिप्त राहतं

का राहतं हा त्या व्यक्तिरेखेच्या जडणघडणीतून निर्माण झालेल्या मानसिक अथवा अन्य गुंतागुंतीचा भाग झाला. नेरूरकरांच्या कथांमधून अशा गुंतागुंती वारंवार आणि जागोजागी आढळतात हेच त्यांचे वैशिष्ठ्य !!

बेट नावाचं माणूस

                             कथासंग्रह

                             पलश प्रकाशन

                             मूल्य ६० रुपये

 

 

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments