सोप्या भाषा शैलीतून सखोल आशय मांडणारी विद्रोही कविता

सोप्या भाषा शैलीतून सखोल आशय मांडणारी विद्रोही कविता

                                         —प्रसाद सावंत

———————————————————————–

नुकताच कवि विलास गावडे यांचा ‘देशाच महानिर्वाण ‘हा सहावा कविता संग्रह वाचनात आला. संग्रहाच्या नावातच कवीचा अनाहूत आक्रोश व कवीच्या वैचारिक बांधीलकीची कल्पना येते. विलास गावडे यांचा हा सहावा कविता संग्रह आहे. कवीच्या सुरवतीच्या काळापासून मी त्यांच्या कविता पाहिल्या व ऐकल्या आहेत.त्यामुळे कवीच्या पिंडप्रवृत्तीला मी जवळून  परिचित आहेच.कवितेतील त्यांची आक्रमक वृत्ती ,बेदरकारपणा व त्यातून निर्माण होणार्‍या किंवा प्रत्ययास येणार्‍या विद्रोहाशी मी जवळून परिचित आहे.कवीचा आजपर्यंतचा बेदरकार पिंड तसाच असून कवीच्या शैलीतील बदल मात्र प्रकर्षाने जाणवतो व मनाला भावतोही.

संग्रहाच्या शीर्षकाची चाहूल संग्रहाच्या पहिल्याच ‘कुणी देताय का मला?’या कवीतेतूनच येते.देशातील सद्य राजकीयदृष्ट्या गढूळ झालेल्या वास्तवाने कवि अस्वस्थ व निश्चितच विटलेला आहे.ही विटलेली अवस्था जशी कवीची तशीच ती या देशाच्या संविधांनाचीही आहे हे त्यांच्या ‘ संविधानाची पानं ‘,’उलट्या राष्ट्रध्वजाच्या नावाने’ तसेच ‘कुणीतरी काढा रे!’या सारख्या कवितेतून ठळकपणे दिसून येते. गावडेंची कविता ही सामाजिक,राजकीय भाष्य करणारी तर आहेच पण त्याहून जास्त ती माणसाला वाचत त्यांचे अंतरंग समजून घेणारी देखील आहे.तिची प्रवृत्ती ही प्रहारकाची आहे.ही प्रहारकता कवीच्या संवेदनेचा व त्याद्वारे येणार्‍या अतिसहनशीलतेच्या उद्रेकाचा पराकोट आहे.उदाहरणार्थ कवी लिहितो

माझ्या आत खोलवर

दर्या उसळतोय आगीचा

आणि विझवतोय मी

माझ्या अश्रुनी केव्हापासून

अशा गोष्टींपासून तुम्ही

लांब राहिलेलच बर

नाहीतर जळून खाक व्हाल तुम्ही

या उसळलेल्या आगीच्या दर्यात

केव्हाही

(जळून खाक व्हाल तुम्ही)

 

 

आज वास्तवात लोकशाही मारली जातेय हे पहातांना,तिचे खच्चीकरण केल जात असताना,स्वत:च्या डोळ्यादेखत तिचा राजरोस गळा दाबला जात असताना कुठले संवेदनशील मन हातावर हात ठेवून शांत बसेल?या ठिकाणी संवेदनेचा एल्गार होणे अपरिहार्यच आहे.तरीही या संवेदनेच्या आत कुठेतरी कवीमनाची मृदुलता दबलेल्या

अवस्थेत घर करून मोकळ्या श्वासाची अपेक्षा करत असते.ही मृदुलता नंतर हळव्या पातळीवर पुढे पुढे संभ्रमित अवस्थाही होऊ शकते.मग मात्र ती धोकादायक व प्रसंगी संहारक ठरू शकते.

अस किती दिवस

ठेवणार आहेस चालू

भूमिगत होत असताना सुद्धा  

बा पांडुरंगा !

(बा पांडुरंगा !)

वैचारिक अनिश्चितता जर राजकीय पातळीवर योग्यायोग्यतेच्या संभ्रमित अवस्थेत संचारू लागली तर उद्रेकालाही दिशाभूल होण्याची भीती असते. त्यामुळे काही ओळींमध्ये ही आगतीकता प्रकर्षाने जाणवते.जसे ठेवावी भिस्त कोणावर?ही कविता तर जसे–

मी उभा माझे दोन्ही तळवे जोडून

तुझ्यासमोर हे करुणाकरा

करतोय प्रार्थना तुला विनम्रपणे

थांबव रे आता हे कायमचे

(आजही)

गावडेंची कविता या अवस्थेपर्यन्त जाता जाताच स्वत:ला सावरतेही. कारण जसे व्यवस्थेला प्रश्न विचारायचे तसेच ते आत्मपरीक्षणार्थ स्वत:लाही विचारायचे असतात.

उदाहरणार्थ ‘खरच आम्ही षंढ झालोय?’ ही कविता.

माणस शेंदूर फासून

दगडाचा देव करून

त्याची पूजा करतात

…..

दगडच विचारतायत आता स्वत:ला

माणसं असं का करतात ?

 

(दगडच विचारतायत स्वत:ला)

गावडेंचे सामाजिक भान या स्थितीला सावरते भानावर येते आणि अंतर्मनातील

दबलेला आवेग आपसूक वर येऊन उद्रेकाची भाषा बोलू लागतो.विद्रोहाला गतिरूप चालना देतो. वास्तवाला भिडू पाहतो. वास्तवातील धर्म अधर्माच्या चिथावणीखोर

सत्ताधार्‍यांसोबत दोन हात करण्यासाठी सडेतोडपणे आक्रमक बनतो.काळाला ओळखतो.म्हणतो–

पण सांगतो मी तुम्हाला –

तुम्ही लावलेला फासाचा

दोरखंड तुटून जाईल

माझ्या कवितेपुढे

एवढी मजबूत आहे माझी कविता.

(एवढी मजबूत आहे माझी कविता).

तर कावळे या कवितेतून बदलत्या वास्तवा सोबतच बदलत्या प्रतिकांचे बदलते अन्वयार्थ देखील काळाप्रमाणे वास्तवात गुंफून नवे अर्थही उलगडून दाखवत प्रहाराचे साधन बनून नव्या व्यवस्थेचे वर्णन करू पाहतो.त्यासाठी ‘कावळेबाजार’,यासारख्या कवितांचाही उल्लेख करावा लागेल.

देशाच्या पातळीवर देशाच्या विसकटलेल्या समाज व्यवस्थेवर कवि खूप चिडलेला आहे. जेव्हा तो सहजपणे लिहून जातो की

स्वातंत्र्य दिन कडेकोट

बंदोबस्तात साजरा होत होता.

(कैदेतल स्वातंत्र्य)

यासाठी ‘दहशत’,’साक्ष’,’जमावाला’,’तुला गोळ्या घातल्या तेव्हा’ आदि कवितांचा उल्लेख करणे गरजेचे वाटते.

मी हसलो आणि संविधनावर

हात ठेवून त्याची शपथ घेऊन साक्ष दिली

प्रतिपक्षाच्या वकिलाने माझी

उलट तपासणी केलीच नाही

(साक्ष) तर

‘तो आता फडकण्याऐवजी’ या कवितेत गावडेंची प्रतिभा एका श्रद्धेच्या एका वेगळ्याच परिमाणाचे रूप घेत अधिकच सश्रद्ध बनते.

                       

तो आता फडकण्याऐवजी

उडत उडत शवावर जाऊन

आणि कफन होऊन बसतो

शहीद झालेल्या जवानांच्या

आणि हमसून हमसून रडतो

आम्ही त्याला मानवंदना देताना.

वरील काही ओळींमधून गावडेंची संविधांनावरची,झेंड्यावरची नितांत श्रद्धा मात्र अभिमानानं मान उंचावयाला लावते .

आज गांधीजींच्या तत्वज्ञानाची देखील अवहेलनात्मक खिल्ली उडविण्याचा सत्ताधार्‍यांनी विडाच उचलला आहे जणू !या उलट नथुराम सारख्या हत्यार्‍यांचे मंदिर उभारून व गोडवे गाऊन त्याचे उदात्तीकरण जाणीवपूर्वक करून आपली द्वेष्टी प्रतिमा लोकांसमोर सातत्याने मांडण्यात धन्यता मानत आहेत.ही या देशाची शोकांतिका आहे.

‘तुला गोळ्या घातल्या तेव्हा’,’काल बापू स्वप्नात आले’,तर ‘गांधी’ या सारख्या कवितांमधून गावडे या अवहेलनात्मक तिरस्कराचा निषेध करू पाहतात. आणि

आज आपल्या डोळ्यादेखत ‘देशाचे महानिर्वाण’ होत असताना किंबहुना त्या दिशेने व्यवस्थेची होऊ जाणारी वाटचाल पाहताना कवीमनाची घालमेल जशी हदयद्रावक विवंचनेची पण तितकीच विद्रोही,आक्रमक होऊ शकते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही हेच या संग्रहाचे वैशिष्ठ्य आहे हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो.

 

‘देशाचं महानिर्वाण’

                                  कवी विलास गावडे

                                  मैत्री पब्लिकेशन,पुणे

                                  पुष्ठे :१०४

                                  मूल्य :१६०/-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments