विद्रोही मांनोवृत्तीच्या वास्तव कविता ——सृजनशील आत्म्याचा घोडा

विद्रोही म्ंनोवृत्तीच्या वास्तव कविता

सृजनशील आत्म्याचा घोडा

————————————————————

कविवर्य विलास गावडे यांचा ‘सृजनशील आत्म्याचा घोडा ‘ हा पाचवा कविता संग्रह वाचनात आला. कविता संग्रहाचे नाव वाचताच साधारणत:यातील कविता ह्या आत्मकेंद्रित असाव्यात असा भास निर्माण होतो . परंतु कवि हा समाजाचा घटक असतो . त्याची वेदना किवा भावना समाजातीलच एक अनुभूतीचा आविष्कार असतो. वेदना ही आत्मकेंद्रित व समाज केंद्रीहि असू शकते. हे मान्य करता ह्या कविता वाचल्यानंतर गावडेंच्या काही कविता आत्मकेंद्रित जरूर आहेत पण त्यांच्या वेदनेला एक सामाजिक आशय अथवा त्या अविष्काराला सामाजिक आशयाची वीण निश्चितच दिसते. त्यांच्या सुरुवातीच्या संग्रहातील कविता वाचता कवीची वृत्ती ही बेदरकार ,निर्भीड,आक्रमक,जाणवते. पण या संग्रहातून ती बरीच अंतर्मुख होऊन समाज वास्तवाला निरीक्षणपूर्वक अतिशय संवेदनक्षम होऊन भिडताना दिसते . तर काही ठिकाणी हतबलही होते. पण ही हतबलता गंधकात दडवून ठेवलेल्या आगीसारखी असते.

रुपया येऊ हाकतो

कधी चार आण्यावर

कधी चार आण्याचा

होऊ शकतो कधीही

बंदा रुपया .

काळाचा दोर 

नाही पकडू शकत कुणीही

तो बदलत असतो

रंग क्षणाक्षणाला. (काळाचा दोर )

तसच दुसर्‍या कवितेत

त्यांना घेऊन निघालो मी

माझ्या बालपणात बघितलेल जंगल

दाखवायला शहराबाहेर

निराश मनाने मी फिरलो माघारी

निराश झालेल्या मुलांना सोबत घेऊन

आणि दाखवले गुगलवरचे

घनदाट निबीड जंगल (जंगल )

यातून पर्यावरणाच्या -हासातून निर्माण झालेली कवीच्या हृदयातील वेदना स्पष्ट जाणवते. पण ही वेदना समाज जाणिवेतून आलेली व्यक्ति केन्द्रित वेदना. तर दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांच्या जीवनावरच्या परांपरिकतेतून आजवर आपण अभ्यासिलेल्या एका रचनेच्याच आधारावर आजच्या भयाण वास्तवाचे निरीक्षण कवीला शब्दरूप घ्यायला भाग पाडते. जसे–

पहाट झाली भैरू उठला

कासरा घेतला शेतावर गेला

फासावर लटकला

भैरू आमचा अमर झाला (भैरू आमचा )

अशा अनेक व्यक्ति केन्द्रित समाज भावनांनी अभिव्यक्त होत कवीची सृजनशीलता आपसूकच प्रकटताना दिसते. या सृजनाला विद्रोहाचे कोंदण आहे. उदाहरणार्थ ‘मी प्रतीक्षा करतोय ‘,’या रे या सारे या’,’कसा साजरा करावा मी’,’प्रार्थना संपल्यानंतर’,’हताशपणे’,’तू घाबरू नकोस’,’आडोसा’,ईत्यदि. तसेच संवेदनेला जाणीव पूर्वक एखाद्या निखर्‍यावरच्या राखेला बाजूला सारून त्यातील अग्नि प्रज्वलित करण्यासाठी लागणार्‍या प्रेरणेची चाहूल देणारी कविता म्हणजे —

मग आपण

ओणवे होऊया

नागडे होऊन

सिंहासनावर बसलेल्या

माकडासमोर !(मग आपण ओणवे होऊया)

कवीच्या मूळच्या आक्रमक प्रवृत्तीला ही वेदना जाणीवपूर्वक प्रोत्साहित करणारी ठरते. कारण कवीच्याच शब्दातून ती तडफड,ती तगमग,ती अगतिकता,तो दाबलेला उद्रेक तो पुन्हा उफाळून येण्यासाठी गुदमरलेला नव निर्मितीसाठीचा आवेश याची प्रचिती म्हणजे —

सृजनशील आत्म्याचा घोडा

आता त्यांनी टांग्याला जोडलाय

मग ही वेदनाच पुढे समजाच्या वास्तवाचे मूळ स्वरूप हळू हळू प्रकट करते जसे–

ज्याच्या मुसक्याही बांधल्या गेल्यायत

ज्याने मान खाली घालून

स्वराच्या आदेशानुसार

चालण्यासाठी सतत

सृजनशील आत्म्याचा घोडा

प्रतीक्षा करतोय संधीची

बेलगाम,बेमुर्वत बेभानपणे

चौखूर पळण्यासाठी (सृजनशील आत्म्याचा घोडा )

एवढे असूनही कवीची उपजत वृत्ती कवीला काही ठिकाणी कितीही दाबायचा प्रयत्न केला तरीही डोके वर काढतेच. वास्तव समाजाच्या आणि सत्ताधुंद वातावरणातल्या

वास्तवाची वेदना आपसूकच मांडतो.

बर झाल बापू !

थांबला नाहीत तुम्ही

एकविसाव्या शतकातल्या

तुमच्या माकडांचे पराक्रम बघायला (बर झाल बापू )

अशा अनेक राजकीय,सामाजिक,आत्मकेंद्रित आशयाच्या कविता या संग्रहात आढळतात त्या कवीच्या मूळ बेदरकार वृत्तीने आपल्या आजच्या समाज परिस्थितीने किंवा वास्तवाने म्हणा अभिव्यक्त होण्यास अडसर निर्माण करणार्‍या लगामाचा पाश त्या तोडू पाहतात व विद्रोहाच्या विलापी कोंदणातून बाहेर येऊन आपली सृजनशीलता सिद्ध करून आपल्या मूळ विद्रोही वृत्तीला बाहेर आणू इच्छितात. त्यांच्या या कोलाहलात गावडे खुपशा तरल व नाजुक भावनाही जपतात.त्यांच्या ‘विखुरलेल्या पाकळ्या ‘ या कवितेत गुलाबाच्या काटेरी कुंपणाकडे सुरक्षित कवच म्हणून ते पाहतात ते गुलाबाच्या सुरक्षेसाठी. तर त्यांच्या ‘काही माणस ‘या कवितेत कोणतीही ठाम किंवा निश्चित विचारधारा नसलेल्या माणसांबद्धल ते भाष्य करू पाहतात. त्याच पठडीतून ‘तेव्हा तुम्हीच ठरवा ‘ या कवितेद्वारा ‘मुकी बिचारी कुणी हाका ,अशी मेंढरे.. ‘व अशा प्रवृत्ती बद्धल बोलताना ते त्यांना कळपातील स्वाभिमान विसरलेले म्हणून त्यांची हेटाळणीही करतात,अर्थात याचा राजकीय संदर्भ जोडला तर कळप एका राजकीय कंपूचे अथवा पक्षाचे प्रतीक ठरतो.तसेच ‘आता ते स्वातंत्र्य घेऊन’ या कवितेत स्वकष्टाने पूर्वजांनी आखून दिलेल्या रेषेतील नियमबद्ध आयुष्य,धगधगता निखारा समजून नियम बाह्य कृतीच्या एल्गाराचे भ्रामक रूप वास्तव म्हणून स्वीकारून आपल्याच आयुष्याचा मार्ग त्या भ्रामकतेत होरपळवून घेतात व विनाशाच्या मार्गावर स्वत;ला नेऊन बसवतात.अशा अनेक म्ंनोवृत्तींचा परामर्श घेऊन ते आपल्या कवितेमधून परखडपणे विचार मांडताना दिसतात. त्यांच्या ‘प्रार्थना संपल्यानंतर’..आणि ‘हताशपणे’ या कवितांमधून गावडे एक विदारक सत्य डोळ्यांसमोर उलगडून आपल्या समोर उभे करतात. त्यावेळी ते विलापाच्या कोंदणाला फोडून निर्भीडपणे आतल्या आत दाबवलेल्या संघर्षमयी प्रेरणेला जळत्या विस्तवाची आच देताना दिसतात.अशावेळी या कविता वेदनेचा आकांत किंवा ते विचार विद्रोहाच्या कोंदणात स्फोटक होऊन बसलेल्या वाटतात. आपला भारत स्वतंत्र होऊन त्याचा आता आपण अमृत महोत्सव साजरा करतोय. अशा या अमृत महोत्सवी वर्षातही आपले आजचे वास्तव आणि कालचे वास्तव यातला आपल्या गुलामीच्या आयुष्यात आजवर कुठलाही फरक झालेला नसल्याचे गावडेंच्या कवि मनाला सतत जाणवते आहे.हे सर्व पाहून त्यांच्या संवेदनक्षम कवि मनाची तगमग वाढली नाही तरच नवल!त्यातूनही या सर्वाच्या मुळाशी कोणती शासन व्यवस्था किंवा कोणता विचार ह्या व्यवस्थेचा जनक आहे हे मांडताना ते आपसूकच लिहून जातात …

कालची ठोकशाही

उघड्या-नागड्याने वावरली

आजची ठोकशाही आता

शाही वस्त्रात मिरवतेय

लोकशाही नावाचं लेबल लावून           

या अमृत महोत्सवी वर्षातही आपण बदलेले नाही.मग ते सांस्कृतिक दृष्ट्या असो की सामाजिक अथवा राजकीय.त्यामुळे ही खंत त्यांच्या मनाला सतत बोचते आहे. उद्विग्न करते आहे. सृजनशीलतेला ही व्यवस्था खिळ घालण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच ही वेदना ज्वालामुखीप्रमाणे आतल्या आत धुमसते आहे. घुसमटते आहे. उद्रेकाच्या संधीची वाट पहात दबा धरून आहे. गावडेंच्या कविता संग्रहाचे थोडक्यात मर्म त्यांच्याच एका कवितेच्या ओळी उधृत करून ठेवावेसे वाटते ते म्हणजे —

कविता कागदावर उतरण्यापूर्वी

असते खवळलेल्या समुद्रात

ज्वालामुखीच्या स्फोटात

एखाद्या जंगलाच्या वणव्यात…

गावडे यांच्या या कवितासंग्रहाचे मन:पूर्वक स्वागत !

 

—-प्रसाद सावंत

 

सृजनशील आत्म्याचा घोडा’

                                  काव्यसंग्रह

                                  कवि विलास गावडे

                                  मैत्री पब्लिकेशन,पुणे

                                  पृष्ठे ९६

                                  मूल्य १५०/- रुपये   

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments