गांधीवाद विरोधकांना उपरोधिक चपराक !!

अजूनही जिवंत आहे गांधी

अजय कांडरांची गांधीवाद विरोधकांना उपरोधिक चपराक !!

———————————————————————-

—– प्रसाद सावंत

नुकताच कवि अजय कांडर यांचा ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ हा दीर्घ कविता संग्रह वाचनात आला. अत्यंत सहज सोप्या आणि ओघवत्या शैलीतील काव्यरचना हे संग्रहाचे वैशिष्ठ्य त्यातही करून महात्मा गांधींचे हौतात्म्य हाच खरा देशव्यापी चर्चेचा,तत्वज्ञानाचा तसेच वेळ पडलीच तर तिरस्काराचाही विषय आहे. राजकारण्यांना विशेषत: आजच्या प्रस्थापित सत्ताधार्‍यांना जरी मंनापासून नसला तरी नाकारता न येण्याजोगा तसेच सर्वसाधारणपणे स्वत:च्या फायद्यासाठी गांधींना किंबहुना इच्छा नसली तरीही गांधीवादाला नाइलाजाने कुरवाळणे जरुरीचे आहे. पण ते तसे उघडपणे कबूल करणे कठीण आहे. हे कवि जाणून आहे. गांधींचे अहिंसावादी विचार आजच्या पिढीला जसे न पटणारे तसेच ते न पेलवणारेही आहेत हे नक्की . या साठ पानी दीर्घ काव्यात कांडरानी गांधींच्या तत्वज्ञानातील अनेक गोष्टींचा ऊहापोह केलेला दिसतो त्यांची सत्यावरची अपार कडवी निष्ठा असणार्‍या गांधी विचारधारेला खोट्या धार्मिक सनातन्यानी लपवलेला आपला दांभिक चेहरा खचितच मान्य नाही. त्यांची पडद्याआडची रक्तरंजित ,हिंस्त्र मनोवृत्ती गांधींच्या विचारवृत्तीला छेद देणारी आहे हे प्रकर्षाने अधोरेखित होताना दिसते.

कवि लिहितो—-

फाळणी आधीच

दोन धर्म दोन राष्ट्र संबोधणार्‍या

त्यांच्या आदर्श वीराच्या

स्वातंत्र्य प्रेमाबद्धल

मात्र त्यांनी कधीही

उपस्थित केला नाही प्रश्न

त्यांना नेमकं कोणासाठी

 

 

हवं होत स्वातंत्र्य ?

आणि तू तळागाळातील माणसांच्या बाजूने उभा

तुला मात्र सदोदितच त्यांनी उभ केलय

आरोपीच्या पिंजर्‍यात.

आज गांधीवादाचा मुळ उद्धेश असलेला दृष्टिकोनच त्यांना जमीनदोस्त करायचाय. याच मुद्द्यावर कवी भाष्य करताना लिहितो–

आता तर तुझा चष्माच

मुद्दाम गहाळ केला त्यांनी

या सगळ्याला तो

कारणीभूत ठरवून

तुझ्या विशाल दृष्टी बद्दलच

उपस्थित करतात ते प्रश्न

गांधींच्या विचारधारेतील स्त्रीच्या जीवन अस्तित्वाबद्दलचे विचार मांडताना कवि लिहितो–

तू नेहमी सांगितलेस

ज्या दिवशी स्त्री

पूर्ण सुरक्षित

राहील या भूमीत

त्या दिवसापासून खर्‍या अर्थानं

या भूमीला स्वातंत्र्य मिळालं असं समजावं

आज नेमके त्याच्या उलट परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागत आहे नाहीका?

बर्‍याच बाबतीत गांधी निष्ठा या जाणीवपूर्वक बासनात गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत आपण पाहतो. बिल्किस बानो हे प्रकरण याचेच द्योतक नाही काय?कारण गांधींच्या व्यक्तिमत्वाला तसेच त्यांच्या विचारधारेला किंबहुना त्यांच्या प्रभावाला वगळून त्यांना आपली समीकरणे पुढे रेटता येत नाहीत यासाठीच त्यांनी हा गांधीद्वेष अपरोक्ष व अन्य मार्गाने पसरवण्याचा घाट घातला आहे हे कळून येते. कवीच्या म्हणण्यानुसार

 

गांधींच्या आयुष्यात धर्मातत्वास महत्व होत शिवाय त्यांच्या राजकारणाला धर्माचा आधार होता. पण म्हणून त्यांनी कधी धर्माच राजकारण केल नाही. आजच्या घडीला पाहता राजकरणात धर्मच काय पण अध्यात्मिकताही घुसून मानवता विरोधी संकल्पनांना अध्यत्माच्या आवरणाखाली ‘तो आपला धर्म आहे’ असा बुद्धिभेद करून बिंबवण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणूनच कवीला आज गांधींच्या अस्तित्वाची प्रकर्षाने जाणीव होते आहे. तसेच त्यांनी त्यांच्या ‘आदर्श वीराच्या'(या उपहासगर्भ उपाधीतही सावरकरच अभिप्रेत असावेत अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. )कारण पुढच्या काही ओळीतच कवी लिहितो—

हिरवा र्रंग तुला अधिक प्रिय समजून

त्यांनी स्वत:च्या अप्रमाणिकपणाला

प्रमाणिकपणाचा मुलामा चढवला

आणि त्यांच्या आदर्श वीराला

सर्व भूमीची श्रद्धा ठरवताना

तुझ्या समोर उभ केल

तस उभ करताना

सोयिस्कर लक्षात आलच नाही त्यांच्या

एकीकडे तू स्त्रीला आत्मबळ दिलस

तर त्यांच्या आदर्श वीरान

स्त्री स्वातंत्र्‍यासाठी उभ्या

आयुष्यात

कसलही पाऊल न उचलता

स्त्रीला संतांनापोषक म्हणून हिणवल

अर्थात यातला हिरवा रंग हा मुस्लिम द्योतक म्हणूनच वापरला गेल्याचे स्पष्ट होते. या आणि अशा अनेक गांधी विचारधारेच्या अंगांवर कवीने भाष्य करीत गांधीवाद विरोधकांना उपरोधिक चपराक दिल्याचे जाणवते. कांडर यांनी गांधींच्या मृत्यूनंतर हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा पांडे व त्यांचे पती अशोक पांडे यांच्या गांधींच्या तसबीरीवर अत्यंत हीन वृत्तीने,आकसाने तसेच टोकाच्या विध्वंसक आक्रमक वृत्तीने

 

गोळ्या झाडण्याच्या कृतीचाही समाचार घेतला आहे. या कृतीतून आजही गांधी द्वेषाची भावना किती पराकोटीच्या हीन पातळीवर माणसाला घेऊन जाऊ शकते याचा ऊहापोह करताना कवी लिहितो—

तरीही तू उरतोस

या मायभूमीच्या कणाकणात

तुला मारूनही तू मरत नाहीस

म्हणून तर खवळत आहे त्याच पित्त

मग तुझ्या मरणा नंतरही

तुझ्या प्रतिमेवरही झाडताहेत ते

पिस्तुलातून पुन्हा पुन्हा गोळ्या

जग रक्तरंजीत होण्याची स्वप्न पाहत.

आज देशावर आर.एस.एस. प्रणीत शासनसंस्था सत्तेत आहे. त्यांचा कडवा गांधी विचारधारा विरोध सर्वश्रुत आहेच. आजही नथुराम गोडसेचे गुणगान गात त्याच्या विचारधारेला पवित्रतेचा मुलामा चढवून मंदिर उभारण्याचा डावही आखला जातोय. अशावेळी बुद्धाचा देशीवाद नाकरताना त्यांचा उग्र धार्मिक मुखवटा गळून पडण्याचीच त्यांना भीती असल्याचेही कवीला सूचित करायचे आहे. यातूनच कवीच्या ठायी असलेली गांधीनिष्ठा कवी अगदी निर्भीडपणे व्यक्त करतो. पुढच्या अनेक पिढ्यांना गांधी तत्वज्ञान कसे पुरून उरेल याचे भाकीतही तितक्याच समर्थपणे मांडतो. व हे मांडताना आपली गांधी निष्ठा कुठही जराही ढाळू देत नाही.गांधीजींच्या मौन व्रताबद्दलचे विचार मांडताना आजच्या विपर्यस्त असलेल्या घटनांचे दाखले देऊ पाहताना कवि लिहितो—

…तेव्हा तर त्यांनी

तुझ्याच अस्त्राचे

अनुकरण करून

लाखो लोकांच्या आंदोलांनातही

मौनव्रत पाळलं

 

 

आजचा लोकसेवकच मुळात दंगलीला आपल्या सोयीनुसार प्रोत्साहित करतो व आपल्या सोयीप्रमाणे शांतातेचा आव आणतो.तोच मुळात गांधीजींच्या विचारांना मारक ठरणारी,त्यांच्या विचारांना जाणीवपूर्वक मागासलेपणाचा स्टॅम्प लावून मोडीत काढणारी व्यवस्था निर्माण करू पाहतोय. यावर भाष्य करताना तो म्हणतो —

लोकशाहीचा तथाकथित प्रमुखही

दंगलीला प्रोत्साहन देऊन

तुझ्या मौनाचे

विक्रमच्या विक्रम मोडतो आहे.   

गोधरा हत्याकांड,जस्टीस लोया हत्याकांड ह्या सर्वातून कोणता संदेश ध्वनीत होतो?कारण ह्याच्या पुढच्याच ओळीत कविमन उद्विग्न होत म्हणते–

स्वत:च्या यशाच्या स्वप्नांचे

इमले रचताना

निरपराध माणसांची नाहक कत्तल

केल्याची त्याला वाटत नाहीय शरम

साहित्यिक दामोदर मावजो यांनी प्रस्तावनेत उल्लेखिल्या प्रमाणे हे खरे आहे की विकृतीला संस्कृती बनवू पाहणार्‍यांना आडवा येतोय तो ‘गांधीविचार’नव्या व्यवस्थेत त्यांना हा विचार जाणीवपुर्वक नामशेष करायचा आहे. इतिहासच पुसून टाकायचा आहे.

नव्या विचारांच्या प्रत्येक वळणावर त्यांना मनुवादी विचारसरणीचे भूत उभे करायचे आहे. धर्माची चौकट बदलून त्याच्या सभ्य बुरख्यापाठून रक्तरंजित अराजकता पसरवून शासनसंस्थेत आतापर्यंत त्यांनी पेरलेल्या बिजाला खतपाणी घालून ते वाढवीत आहेत. आणि हे सर्व करताना ते गांधीवादी विचारसरणीला विपरर्यास्त करून,त्याच्या बद्दल अफवांचे पीक आणून तर कधी मानवतेच्या धर्माला काळिमा फासून वर साळसूदपणाचा आव आणीत आहेत.

आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी हे भीक मागून मिळालेले स्वातंत्र्य आहे अशा वल्गनाही काही तथाकथित प्रस्थापित ‘पेड'(paid) उत्सव मुर्त्या करू धजत आहेत.आणि हे शासन त्याकडे बिनदिक्कतपणे डोळेझाक करीत आहे यात गांधीवादाची त्याच्या अहिंसावादी तत्वप्रेरणेची,सर्वधर्म समभावाच्या व त्याद्वारे उभ्या राहिलेल्या चळवळीची अप्रत्यक्ष अवहेलना कुणाला दिसत नाही काय? हा त्यांचा चाललेला

 

जळफळाटच गांधी विचारधारा पुन्हा पुन्हा जन्म घेऊन त्यांच्या मस्तकाच्या ठिकर्‍या उडवतेय हे सहज कळून येण्यासारखे आहे.उलट गांधींच्या पेहरावाची तसेच त्यांच्या सत्याग्रही वृत्तीची मानवतावादी विचारांची टिंगल टवाळीच जास्त प्रकर्षाने समोर आणून त्याकडे गांभीर्याने न पाहताच त्यांची हेटाळणी व अवहेलनाच करण्याकडे इथल्या समाजमनाची मनोधारणा निर्माण करण्याचा शासनकर्त्यांचा कल दिसतो हे नाकारून चालणार नाही.

आजच्या समाज स्थितीत हे काव्य लिहून कवी आजच्या प्रस्थापित व्यवस्थेला भिडू पाहतो हेच यातून दिसून येते.

‘अजूनही गांधी जिवंत आहे’

                                  कवि : अजय कांडर

                                  हर्मिस प्रकाशन

                                  किमत :१२०/-

                                  पृष्ठे ६०

 

 

 

                              

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments