शिवलंका सिंधुदुर्ग

*शिवलंका सिंधुदूर्ग*

———————————————

✍🏻 – *श्री.दत्ता केशव माने

———————————————-

सिंधुदुर्ग हा,

विजयदुर्ग हा,

हा अंजनवेल ।

शिवरायांचा पराक्रमाची

गाथा सांगेल॥

भारतीय भूमी ही संतसज्जनाची, देवीदेवतांची भूमी आहे. श्रीराम,श्रीकृष्ण,बुध्द-महावीर अशा अनेक महापुरुषांची मालिका इथे अवतरली. वेदांचे उच्चरव जिथे गगनात घुमत ,जिथे ज्ञान ,त्याग,भक्तीची परंपरा होती,त्या भूमीला परकीयांची नजर लागली. भारतावर परकीय आक्रांतानी हल्ले चढवले. मंदिरातील मुर्ती भंगल्या,माता -भगिनींचे शीलही भंगले आणि ही भूमी परकीयांच्या अत्याचाराखाली भरडून निघाली.

ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अनवरत संघर्ष केला.प्रसंगी प्राणांचेही बलिदान दिले. त्यागाची परिसीमा गाठली,अशाच आपल्या पूर्वजांपैकी एक होते – छत्रपती शिवाजीमहाराज

केवळ सह्याद्रीच्या दर्याखोर्यातच नव्हे!तर समुद्रातही शिवरायांनी स्वातंत्र्याचे वादळ आणले…कोकणवासीयांच्या मनात स्वाभिमानाची लाट निर्माण केली आणि सिंधुसागरात स्वतंत्र आरमाराची उभारणी केली.”ज्याचे आरमार,त्याचा समुद्र” या विचारांनुसार महाराजांनी मालवणमध्ये आरमाराचे केंद्र म्हणून भव्यदिव्य आणि बलाढ्य जलदूर्गाची निर्मिती केली. समुद्रात उभा असलेल्या या भक्कम जलदूर्गाने परकीय शत्रुच्या मनात धडकी भरवली.

प्राचीन काळी नौकानयनाचा उपयोग व्यापार आणि युद्धासाठी जात होता. चंद्रगुप्ताचे नौदल खाते अतिशय सुव्यवस्थित होते. त्यांचे युध्दासाठीही सुसज्ज नौदल होते.पण कालौघात समुद्रपर्यटन करणे म्हणजे पाप अशी घातक रुढी तयार झाली, पण देशाच्या सुरक्षेचा दुरदृष्टीने विचार करणार्या शिवाजीमहाराजांनी ही घातक रुढी समुद्रात बुडवून टाकली.

पंधराव्या-सोळाव्या शतकात निरनिराळ्या युरोपियन राजवटींनी व्यापाराच्या निमित्ताने कोकणात शिरकाव करून घेतला होता. व्यापारी बरोबरच सत्ता स्थापन करण्यासाठी महत्वाकांक्षा बाळगून इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांनी व्यापारासाठी आरमार बनवले होते. जंजिरेकर सिद्दी हा तर वेळोवेळी वेगवेगळ्या मुसलमानी सत्ताधा-याचा पाठिंबा घेऊन वाटेल तसा हैदोस घालत होता. आदिलशाही, सिद्दी व पोर्तुगीजांचे अत्याचार, जबरदस्तीने केले जाणारे धर्मांतरे, पाडले जाणारे मंदिरे, कोकण प्रांतातील जनतेला परदेशात गुलाम म्हणून पाठवले जाणे हा किनाऱ्यावर नेहमी होणारा प्रकार होता. प्रजावत्सल शिवाजीमहाराजांना हे सहन होणे शक्यच नव्हते.

“ज्याचे आरमार ,त्याचा समुद्र” असे म्हणत महाराजांनी प्रबळ आरमाराचा पाया घातला. देशाची सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी या कठिण परिस्थितीत महाराजांनी एक अचुक निर्णय घेतला तो म्हणजे जलदुर्गांची उभारणी होय.

*भूमीपूजन*

शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा शुभारंभ वायरी मोरेश्वरवाडी येथील समुद्र किनारी असलेल्या मोरयाचा धोंडा येथे केला होता. २५ नोव्हेंबर १६६४ या पवित्र दिनी हा मंगल सोहळा श्रीगणेश पूजनाने पार पडला होता.

बांधकाम मोठ्या हौसेने, उमेदीने केले. पायाचे दगड शिशाच्या रसात बसविले! तीन हजार कामगार अहोरात्र मेहनत घेत होते. मदतीला म्हणून काही पोर्तुगीज इंजिनीयरही मुद्दाम मागवून घेतले होते.या कामावर महाराजांचे जातीने लक्ष होते. सागरी स्वराज्याच्या या मंगलकार्यात शत्रुने विघ्न आणू नये,यासाठी किनार्यावर मराठी फौज तैनात होती.

*असा असा आहे सिंधुदुर्ग*

कुरटे बेटावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले आहेत .शिवाजीमहाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये छ.शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर १६९५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छ.राजाराममहाराज महाराज यांनी बांधले. सिंधूदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा जतन करुन ठेवला आहे. सध्या किल्ल्याची अवस्था पाहता त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

सिंधूदुर्ग हा भव्य जलदूर्ग सिंधुसागरात शिवचरित्राचे मर्म सांगत उभा आहे. सिंधुदुर्गाच्या तटांनी आणि सिंधुसागराच्या लाटांनी स्वातंत्र्याची गर्जना करत परकीय शक्तींना आव्हान दिले. या आव्हानामागची प्रेरणा होती, अर्थातच शिवछत्रपतींची!!

हीच शिवप्रेरणा आमच्या राष्ट्रजीवनाची संजीवनी आहे. छ.शिवरायांनी हिंदुच्या मुक्ततेचा यज्ञ मांडला आणि हिंदुत्वाच्या रक्षणार्थ मराठ्यांनी असेतूहिमाचल समशेर चालवली, हा इतिहास घराघरात पोहचला पाहिजे.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments