मन ही एक देवाने सर्व प्राणी मात्रांना दिलेली अशी एक अद्भुत देणगी आहे. मन अवखळ,चंचल असल्याने त्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. निर्मळ मन तयार व्हायला लहानपणी आईवडीलांकडून त्याच्यावर उत्तम सौंस्कार केले जातात.रामदास स्वामींनी तर मनाने कसं वागायला हवे, कसे विचार करायला हवे या साठी श्लोकही लिहून ठेवलेत कारण मन फार अवखळ चंचल असते त्याला आवरणे म्हणजे दिव्यचं.पण अस किती ताब्यात राहणार ना मन.लहानपणी आईवडील सांगतील तसं ऐकणारं आपलं मन आपण जसजसे मोठे होतो तसं तसं स्वतःच्या इच्छेने आपल्याला कधी त्याच्या तालावर नाचायला भाग पाडते हे कळतही नाही. वाऱ्याच्या हिंदोळ्यावर झुलणारं मन आत्ता इथे तर क्षणात दुसरीकडे फुलपाखरा प्रमाणे बागडत असतं. जे आपण प्रत्यक्षात बघू शकत नाही अशा गोष्टी मात्र आपलं मन कल्पनेने आपल्याला दाखवत असतं. निवांत क्षणी आठवणींच्या लडीच्या लडी उलगडून दाखवतं ते असतं आपलं मन, मग त्या आठवणीत किती आणि कसा वेळ गेला ते आपल्याला कळतचं नाही.कितीतरी जुन्या आठवणी,भेटलेली माणसं,आज आपल्यात नसलेली आपली जिवाभावाची माणसं यांना सांभाळून ठेवायचं,आठवणीत ठेवायचं महत्वाचं काम हे मनाचचं. आपल्याचं लोकांनी केलेला अपमान,दिलेलं दुःख,आणि त्या मुळे झालेल्या त्याच्या वरच्या जखमा भरून यायला मात्र मनालाच खूप कष्ट घ्यावे लागतात.आपलं मन जस स्वछन्दी, आनंदी होतं तसंच दुःखी ही होतंच, सुख दुःखाचे तरंग त्यावर लवकर उमटतात ते खूप संवेदनशील असल्याने त्यावर बसलेले ओरखडे लगेच पुसून जातचं नाहीत, मग त्यावर फुंकर घालायला नाना प्रकार शोधावे लागतात.म्हणूनच “फार मनाला लावून घेऊ नकोस”मनात राग धरून ठेऊ नकोस,अस जरी कुणी म्हणलं तरी ते पूर्व पदावर यायला बराच वेळ लागतो.कसं असतं ना आपलं मन ! मनात उठलेल्या भाव भावनांचे तरंग काही काही वेळा तर आपल्या चेहऱ्यावर ही उमटतात एरव्ही मन शांतचं असतं ते आपल्याला अनेक प्रकारे प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असत, ज्या गोष्टी शक्य नाहीत किंवा लवकर शक्य नाहीत अशा गोष्टीही अगदी रंगऊन ते आपल्या समोर ठेवतं आणि हे सगळ मग स्वप्नात आपल्याला अगदी खरं वाटावं एवढया छान पद्धतीने दाखवतंही. तेवढ्यानेच आपण किती सुखावतो ना ! समोर येणारा प्रत्येक जण कसा आहे याचे ज्ञान द्यावे ते मनानेचं.मनाला लागलेला एखादा क्षण,एखादा प्रसंग जो पर्यंत मन शांत होत नाही तो पर्यंत ते परत परत आपल्याला विसरू न देण्याचं काम ही मन अगदी मन लावून करते .बहिणाबाई म्हणतात ना..

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकला हाकला
फिरी येत पिकावर

अशा या मनाला येणाऱ्या संकटाची चाहूल ही आधीच होते,तेव्हा नाही नाही ते मनात येते म्हणूनच मन चिंती ते वैरी न चिंती अस म्हणलं जातं पण मन आपल्याला जास्तीत जास्त व कमीत कमी काय होऊ शकतं याची फक्त जाणीवच करून देत असतं एक प्रकारे ते आपल्याला सुखाच्या किंवा दुःखाच्या परिस्थितीची कल्पनाच देऊन ठेवत असतं.असं असलं तरी संकटाच्या वरचे समाधान ही मनालाच करावे लागते. असे हे सगळे मनाचे खेळ असतात.आपलं मन ना, कायम तरुणचं असायला हवं आणि ते तसं असतंही. प्रत्येकाने सर्वात प्रथम मनाच ऐकायला हवे मग ते आनंदी होते पर्यायाने मग आपणही, त्यात त्याच काय असतं ? आपल्याच साठी असतं हे सगळं,पण मग “मन मानेल तसं वागू नको तुम्ही काय मनाचे राजे”मनाला येईल तसं वागायला ही काय धर्मशाळा आहे” असं कोणी म्हणलं की ते खूप खट्टू होतं.

माणसाला शरीराने जरी म्हातारपण आलं ना तरी त्याने आपलं मन मात्र चिर तरुण ठेवावं, ते तसं असतं ही.अस असलं की मग दुःख नावाची गोष्टचं आपल्या आजूबाजूला ही दिसणार नाही.हे मात्र खरं. निमिषही न लावता भिरभिरणार आपलं मन आत्ता इथे तर दुसऱ्या क्षणी कुठेतरी लांब जाते .फार गमतीदार असते हे मन ,आपल्याला संपूर्ण जगाची सफर क्षणात घडवून आणत. अस असलं तरी प्रत्येकाचं मन मात्र वेगवेगळ असतं बरं का ?प्रत्येका कडे मनाच्या दोन बाजू असतात.संकटात किंवा सुखातही या दोन्ही बाजू आपापलं म्हणणं आपल्या समोर ठेवतात त्यातलं योग्य काय ते निवडायचा चॉईस मात्र आपल्यालाचं असतो.पण परत परिणाम काहीही होउदे ते भोगायला ही मग मनचं तयार होतं. इतकं मन आपल्याला नेहमी प्रत्येक गोष्टीत सांभाळून घेत असतं . मनावर तर कवींनी असंख्य गाणी लिहिली आहेत,असंख्य सुंदर वाक्यरचना ही आहेत. बहिणाबाई तर त्याला पाखरू म्हणतात, खासखाशीचा दाणा म्हणतात.तर मन हे जहरी आहे असं ही त्यांना वाटतं,मनाला कोणी उधाण वाऱ्याची उपमाही देतं. तर कोणी त्याला मोरपिसाची उपमा देतं. मन हे आत्ता इथं आहे असं वाटतं तर आत्ता आकाशात उडून गेलं अस वाटतं.म्हणूनच मनाला कुणी वेडं, कुणी अधीर ही म्हणलय. अशा या मनाकडे पहायची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असते कारण ते कोणीच पाहू शकत नाही पण समजून मात्र घेता येत.. ह! म्हणून देवाने प्रत्येकालाच मग अगदी झाडे झुडपे, प्राणी पक्षी का असेनात या सगळ्यांनाच मना सारखी अद्भुत गोष्ट बहाल केलीये. एखाद्या प्रसंगात भाव भावनांचा एवढा गुंता होतो की समजतच नाही कसं वागावं.

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा 

असं असलं तरी पण मन मात्र आपल्याला सारख असंच कर अस सांगत असतं व आपण दुसराच विचार करत असतो अशा वेळी मात्र मनावर विश्वास ठेवून ते सांगेल तेच ऐकावं आपल्याला काय हवंय हे मनाशिवाय कोणाला चांगलं कळणार ? दुसऱ्याचा विचार करून त्याच्या मनात आपण जागा मिळवणं ही साधी गोष्ट नाही. म्हणूनच मनासारखी एवढी महत्वाची,सुंदर,हळुवार गोष्ट आपल्या प्रमाणे दुसर्यांचीही जपायला हवीचं ना .

हा लेख वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments