दसरा आणि धनुष्यबाण

सर्वप्रथम आपणांस दसरा म्हणजेच विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..

अश्विन महिन्यात निसर्ग अगदी आपल्यावर मेहेरबान असतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे हिरवं गार झालेलं असतं. अंकुरलेली इवली इवली पिके, रंगीबेरंगी फुले व त्या वर उडणारी फुलपाखरे हे निसर्गाचं चित्र आपल्या डोळ्याला शांत करत असते. आपले सगळे सण निसर्गाचं प्रतिक असतात. पाण्याने भरलेले ढग हे घटाचं प्रतिक, तर काळी माती हे पृथ्वीचं व त्यावर उगवणारी रोपं म्हणजे समृद्धी, सुख, ऐश्वर्याच प्रतिक.

दसरा हा दिवस म्हणजे विजयाचे प्रतिक; म्हणूनच ह्या दिवसाला विजयादशमी म्हणून ओळखले जाते. शस्त्र पूजन आणि सोने (आपट्याची पाने) लुटण्याच्या प्रथेमुळे ह्या दिवसाला एक महत्व प्राप्त झाले.आपटयाच्या झाडाला अश्मंतक आणि वनराज देखील म्हणतात. या वृक्षाच्या पानांमध्ये औषधी सद्गुण आहे. तो म्हणजे पित्त व कफ दोषांवर हि पाने अत्यंत गुणकारी आहेत. साडे तीन मुहूर्तापैकी एक असणारा हा दसऱ्याचा दिवस. नऊ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने ने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करून महिषासुरमर्दिनी नाव धारण केले तसेच श्री रामाने रावणाचा वध केला तो हा दिवस विजयादशमीचा. पांडव ज्यावेळी अज्ञातवासात निघुन गेले त्यावेळी त्यांनी त्यांची सर्व शस्त्रं शमीच्या झाडामधे लपवीली होती आणि परत आल्यावर त्या झाडाची पूजा केली. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी शमीची देखील पुजा केली जाते. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला. पेशवाईमध्ये सुद्धा या सणाचे महत्त्व होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. यालाच सीमा उल्लंघन म्हणतात.

ह्या दिवशी विजय झाला तो अधर्मावर धर्माचा. रावणाचा वध ज्या धनुष्यबाणाने केला तो बाण चालवण्यामागे होते ते मर्यादापुरुषोत्तम, प्रजेला प्रिय असणारे श्री राम. त्याच धनुष्यबाणासाठी चालेली धडपड आज आपण पाहतोय. धनुष्यबाणाला महत्व देण्यापेक्षा तो कोण आणि कोणावर चालवीत आहे हे पाहणे फार महत्वाचे आहे असे मला वाटते. कर्माचे धनुष्य करून त्यावर धर्माचा बाण लावला आणि त्या बाणाने राक्षसी, अहंकारी, अत्याचारी वृत्तीचा, अधर्माचा सर्वनाश केला तो प्रभू श्री रामांनी.

आज सुद्धा अश्या वृत्तीचा नाश करण्यासाठी लेखणीचा धनुष्य करून त्यावर शब्दांचा बाण लावणे आवश्यक आहे. साहित्यामध्ये वाल्याला वाल्मिकी करण्याची ताकद आहे. अज्ञानावर ज्ञानाचा विजय होण्यासाठी आपट्याच्या पानांसोबत जर साहित्याची पाने आपण ह्या दिवशी वाटली आणि वाचली तर ती पाने खरोखरच सोन्याची होतील आणि वाचणाऱ्याचे आयुष्य सोन्यासारखे उजळून जाईल ह्यात शंका नाही.

पुन्हा एकदा आपणांस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..

#दसरा #मराठीसाहित्य

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments