हिंदूनृपती श्री शाहूछत्रपती

 

अखंड हिंदुस्थानचे हिंदुपदपातशाह, हिंदवी स्वराज्याचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणारे छत्रपती शाहू महाराज! छ.शंभुराजांचे सुपुत्र शाहूंचा जन्म महाराणी येसूबाई यांच्या पोटी 18 मे 1682 रोजी रायगड जिल्ह्यातील गांगवली येथे झाला. त्यांचे मूळ नाव “शिवाजी” असेच होते.
त्यांचे बालपण रायगड किल्ल्यावर फुलत होते. मुगल बादशाह औरंगजेब आपल्या प्रचंड सैन्यानिशी दक्षिणेत आला. दक्षिणेतील हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याचा त्याचा हेतू होता.हिंदुंचे स्वराज्य जिंकण्यासाठी आपल्या सर्वशक्तीनिशी औरंगजेब स्वराज्यातील किल्ले ताब्यात घेण्यासाठी धडपडत होता. औरंगजेबाशी मोठ्या आत्मविश्वासाने छत्रपती शंभुराजे संघर्ष करत होते.पण फितुरीने ते संगमेश्वर येथे मुघलांच्या हाती लागले. शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याने संगमेश्वरावर छापा घालुन शंभुराजांना कैद केले.

छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत हालहाल करुन औरंगजेबाने हत्या केली. त्यांच्या हत्येनंतर झुल्फिकारखान उर्फ इतिकादखान याने रायगडाला वेढा दिला होता.अखेर महाराणी येसूबाई यांना राजपुत्र बाल शाहू यांच्यासह कैद झाली.सुमारे 17 वर्षे मोगलांच्या नजर कैदेत राहावे लागले. माणसाची पारख, मोगलांची राजकीय मसलती त्यांना अनुभवता आल्या. याच कालावधीत धार्मिक शिक्षण, राजकारभार, आपल्या पूर्वजांचा उज्वल इतिहास,परंपरा महाराणी येसूबाईंनी छ.शाहू महाराजांना शिकवल्या.

कैदेत असताना औरंगजेबाकडून 9 वेळा धर्मांतराचा प्रयत्न केला. एकावेळी महाराणी येसूबाई यांनी जिन्नत उन्निसा बेगम या औरंगजेबाच्या मुलीच्या मध्यस्थीतून हे प्रकरण थांबवले.पण सेनापती प्रतापराव गुजर यांची दोन मुले राजबंदी म्हणून शाहू महाराजांनी समवेत होती. ते शाहूऐवजी मुस्लिम झाल्याची इतिहासात नोंद आहे .धर्मांध क्रूर आणि वडिलांची हत्या करणाऱ्या अशा शत्रूच्या छावणीत कैदी म्हणून सतरा वर्षे घालवणारे छ. शंभूपुत्र शाहू महाराज. 1707 मध्ये औरंगजेबाच्या निधनानंतर नेहमीप्रमाणे बादशहा होण्यासाठी त्यांच्या मुलात भांडणे सुरू झाली. औरंगजेबाचा मुलगा आजमशाहने छत्रपती शाहू महाराजांची 1707 साली सुटका केली. शाहूमहाराजांना सोडल्यानंतर ताराबाई आणि शाहूमध्ये सत्तासंघर्ष होईल आणि मराठ्यांच्या स्वराज्यात फूट पडेल असा त्याचा कयास होता.

अहमदनगरला येण्यापूर्वीच शाहूंनी ताराबाईंना कळविले की आम्ही निघून स्वदेशी परत येत आहोत आता राज्य आम्ही करू परंतु महाराणी ताराबाईंनी त्यांना विरोध केला 12 जानेवारी 1708 मध्ये त्यांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला आणि साताऱ्याच्या किल्ल्यावरून राज्यकारभाराची सूत्रे हलविण्यास सुरवात केली. मराठा साम्राज्य शाहू महाराजांच्या समयसूचकतेच्या धोरणामुळे मोकळा श्वास घेऊ लागले. कोणत्याही राज्याच्या सुखनैव कारभाराची जबाबदारी ही न्यायव्यवस्थेवर असते. छ.शाहूमहाराजांनी राज्याची घडी बसविण्यास सुरुवात केली.

त्यांच्याबद्दल नादिराशहानेही म्हटले ‘हिंदुस्थान चालविण्यात हिन्दुपति शाहू हेच योग्य व्यक्ती आहेत’ रघुनाथ विनायक हेरवाडकर ‘शाहू महाराजांचा उल्लेख शिवाजी महाराजांची सावली म्हणून करतात ‘शिवरायांची हीच व्यापक दूरदृष्टी पुढे सर्व छत्रपतींना मोलाची ठरली.

यथावकाश बाळाजी विश्वनाथांच्या मुत्सद्देगिरीने महाराणी येसुबाई आणि अन्य मंडळीची सुटका झाली. मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदाही मिळाल्या.
दिल्लीच्याही राजकारणात मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला.

पोर्तुगीजांवरही शाहूंचा धाक होता, याच्या काही नोंदी आहेत. नोव्हेंबर १७३० साली पोर्तुगीज व्हाईसरॉयने मोगल दरबारातील पोर्तुगीज वकिलाला पत्र लिहून काही सुचना केल्या होत्या या पत्रातील नोंदीचा सारांश असा –

“शाहूराजे इतके बलाढ्य झाले आहेत की त्यांच्यापासून बादशाहच्या साम्राज्याला धोका निर्माण झाला आहे. फक्त पोर्तुगीजांनीच तेवढा त्यांच्याशी तह केलेला नाही, कारण शाहूराजे हे बादशाहचे शत्रु आहेत हे पोर्तुगीजांना माहीत आहे. मराठे दरवर्षी पोर्तुगीजांच्या प्रदेशात आक्रमण करतात ते जर शिरजोर झाले तर अजिंक्य झाल्यावाचून राहणार नाहीत कारण त्यांच्यापाशी बरेच गड आणि किल्ले आहेत ”

वरील पत्रातील ही नोंद पाहता छ. शाहू महाराजांनी मोगलांबरोबर पोर्तुगिज सत्तेलाही वचक बसवलेली दिसते.

आपले आजोबा छत्रपति शिवराय आणि पिता छत्रपति शंभुराजे यांच्याप्रमाणे परधर्मात गेलेल्या हिंदुना पुन्हा हिंदुधर्मात घेण्याचे क्रांतीकारी कार्य शाहूमहाराजांनी केले.

अशा धीरोदात्त, कुशल प्रशासक व उत्कृष्ट सेनानाचे निधन १५ डिसेंबर १७४९ रोजी झाले.

पुण्यश्लोक शाहुमहाराजांचे जीवन समस्त भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. आजच्या दिवशी त्यांचे चरित्र आठवूया!!

शाहूचरित्र स्मरावे l
अवघ्यांशी प्रेरित करावेl
शिवशंभुमार्गी चालवावेl
सकळजन ll

◆ संदर्भ –

मराठ्यांची इतिहासाची साधने

पोर्तुगीज दप्तर – खंड तिसरा

पोर्तुगीज – मराठा संबंध

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments