कुत्र्याला देव मानणारे गाव नाईचाकूर

भारतीय संस्कृती ही भूतदया जोपासणारी संस्कृती आहे. आपल्या थोर संत, महात्म्यांनी सुध्दा वेगवेगळ्या प्रसंगातून, माध्यमातून हाच संदेश दिला आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण असोत अथवा ससिक रक्षण करणारे आदुसेने कुत्र्यास का मारले म्हणून खेद व्यक्त करणारे चक्रधर स्वामी असोत किंवा “भूता परस्परे जो मैत्र जिवांचे म्हणनारे ज्ञानेश्वर महाराज अथवा कुत्र्याचे पोट नुसती पोळी खाल्ले तर दुखेल म्हणून तुपाची वाटी घेवून कुत्र्याच्या पाठीमागे धावणारे नामदेव महाराज असोत. भुतांचे पालन करा म्हणनारे संतश्रेष्ठ तुकोबाराय हे सर्वजन प्राणीमात्राचे संगोपन करण्याची शिकवण देतात.
या संताची शिकवण जोपासणारे गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील स्वता:ची वेगळी ओळख जोपासणारे ‘नाईचाकूर’
नाईचाकूर हे गाव तसे पाहिले तर महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात व निजाम स्टेट मधील एक महत्वाचे गाव. या गावच्या नावाचा इतिहास हाच एका दंत कथेवर मोठा मनोरंजक आहे. ‘नाई’ या मुळच्या कन्नड शब्दाचा अर्थ कुत्रा असा होतो. म्हणजे कुत्राच्या नावाची ओळख जोपासणारे गाव म्हणजे नाईचाकूर. चाकूर या नावाची इतरही गावे आहेत. पण या ठिकाणच्या आख्याइकेनुसार महाभारत काळात चक्रपूर नावाची नगरी ही होती. त्या नगरीतच भीमाने बकासूर राक्षसाला ठार मारले असे येथील लोकांचे म्हणणे आहे.
या चक्रपूर अथवा चक्रवर्ती नगरीत एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला तीर्थ यात्रेला जायचे होते. पण प्रवासासाठी पैसे नव्हते. काय करावे? हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला. जवळच असलेल्या १० कि. मी. अंतरावरील हाडोळी गावातील सावकाराकडून त्याला ही रक्कम मिळण्याची शक्यता होती. पण त्याच्याकडे तारण ठेवण्यासारखी एकही मौल्यवान वस्तू या गरीब शेतकर्याकडे नव्हती. हा एक बाब त्याच्याकडे प्राणाहूनही प्रिय होती ती म्हणजे त्याच्या हुशार प्रामाणिक लाडका असणारा कुत्रा. पण कुत्रा गहाण ठेवणे ही कल्पनाच हास्यास्पद होती. तरीही त्या शेतकर्यांने सावकाराकडे कुत्र्याला गहाण ठेवले. व काही रक्कम कर्ज म्हणून घेवून तो तीर्थयात्रेला गेला.
इकडे त्याच दरम्यान त्या कर्जदात्या सावकाराच्या घरी मोठी चोरी झाली. चोरांनी भरपूर धन साठविलेल्या मोठ-मोठ्याल्या पेट्या पळविल्या आणि जवळच असलेल्या ओढ्याच्या डोहात टाकल्या. सुर्योदय होतातच सावकाराच्या लक्षात आले की आपल्या घरी वाड्यात मोठी चोरी झालेली आहे. गाव सारे सावकाराच्या वाड्यात आले. शेतकर्यांचा कुत्रा विशिष्ट दिशेकडे तोंड करून भूंकू लागला. त्याच्या भुंकण्याकडे काही जानकारी लोकांनी लक्ष दिले. कुत्रा ओढ्याच्या बाजूला जावू लागला. या कुतुहलापोटी काहीजण कुत्र्याच्या मागे मागे गेले तर चोरांनी ज्या डोहात उड्या मारून पाहिले. तर आत सावकाराच्या धनाच्या पेट्या सापडल्या. सावकाराला फार आनंदित झाले. त्याने कुत्र्याच्या गळ्यात चिठ्ठी बांधून मला माझी रक्कम मिळाली तू कर्ज देण्यासाठी येवू नको म्हणून कुत्र्याला कृतज्ञतेपोटी पाठवून दिले.
कुत्रा चक्रपूराकडे निघाला गावशिवारातील ओढ्याजवळ आला. तेवढ्यात कर्जफेड करण्यासाठी रक्कम घेवून निघालेला शेतकरी, कुत्र्याचा धनी यांची ओढ्याजवळच भेट झाली. शेतकर्याला धक्का बसला कारण त्याच्या इमानाला बट्टा लागला. हा “कुत्रा पळून आला – मी खोटा ठरलो ” असे समजून शेतकर्याने प्रामाणिक कुत्रा जवळ येताच भला मोठा दगड उचलून कुत्र्याच्या डोक्यात घातला. कुत्रा जागेवरच गतप्राण झाला.
आडवा पडलेल्या कुत्राच्या गळ्यातील चिठ्ठी पाहिले. हि चिठ्ठी घेऊन शेतकरी सावकाराच्या घरी गेला. सावकाराने सर्व हक्कीखत सांगितले. शेतकऱ्याला वाईट वाटले. सावकाराचे धन मिळवून देणार्या, मालकाची इमाने -इतबारे सेवा करणार्या इमानी निष्प्राण देवाजवळ धाय मोकलून तो रडू लागला. पण रडणे व्यर्थ. पडल्या ने तो कुत्रा काय परत येणार नव्हता. ज्या ठिकाणी कुत्रा गतप्राण झाला तेथील दगडाची अाजही पुजा केली जाते. आणि त्याचीच आठवण म्हणून शेतकर्याच्या गावात गावकऱ्यांनी कुत्र्याचे मंदिर उभारणी केली. दगडाची कोरीव मूर्ती त्यावर तांबे धातूची पत्राची प्रतिकृती रेखून (मढवून) नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाते. इतकेच नव्हे तर या गावचे “ग्राम दैवत “च कुत्रा आहे.
कुत्र्याचे मंदिर उभारणारे गाव आणि शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ वाघ्याची स्मृती जपणारे स्मारक हे अपवादात्मक सापडणारी उदाहरणे आहेत.
अशा कुत्र्याच्या (नाई) नावावरून आणि चक्रपूर चा कालौघात झालेले चाकूर होय.
नाईचाकूर बनलेले गाव ३० सप्टेंबर१९९३ च्या भूकंपात उध्वस्त झाले. मुळ गावाचे नविन ठिकाणी पुनर्वसन झाले. पुनर्वसित गावातही “कुत्रोबा मंदिर” गावकर्यांनी मोठ्या श्रध्देने उभारलेले आहे.

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
PrasadR

Chaan. Prathamach vachyaat aale..