राष्ट्रीय भावना प्रेरक – महाराजा शाहाजीराजे

अखंड हिंदूस्थानातील हिंदू समाज शेकडो वर्षे स्वाभिमान हरवून बसला होता. या समाजातील युवकांच्या मनगटातील बळ निघून गेले होते. या युवकांना ज्यांनी सारं काही पुन्हा मिळवून दिलं. महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली असे राजे म्हणजे म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज !!

शिवाजीमहाराजांच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहून राष्ट्रीय भावना पेरणारे आणि स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणजे त्यांचे पिताश्री महाराजसाहेब शाहजीराजे!!

स्वराज्य संकल्पक शाहजी महाराजांचा जीवन प्रवास म्हणजे एक धगधगते यज्ञकुंडच.15 व्या शतकामध्ये संपूर्ण भारतभूमीवर परकीयांचे राज्य होते. दिल्लीमधून राज्य करणारे मुघल हे दक्षिणेतील प्रमुख सत्ताकेंद्र होते. याच बरोबर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या मुस्लिम राजवटी राज्य करत होत्या. संपूर्ण भारतभर मुसलमानांचे राज्य असले तरीही त्यांच्यात कमालीचे वैर होतेच.त्याला शिया-सुन्नी वादाचाही किनार होती. यांच्यात सतत दुसऱ्यांचा प्रदेश घेण्याचे मनसुबे केले जात.या सत्ता संघर्षात बळी जायचा इथल्या हिंदुंचा!! या भूमीचे खरे मालक असतानाही भूमी मात्र परकीयांच्या ताब्यात होती.

वेरूळच्या भोसले घराण्यातील मालोजीराजे व उमाबाई यांच्या पोटी १६ मार्च १५९९ रोजी महापराक्रमी अशा शाहजीराजे यांचा जन्म झाला. शाहाजी राजे यांच्या धाकट्या बंधूचे नाव शरीफजी होते. सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्याकडे हिंगणी,देऊळगाव या गावाची पाटीलकी होती. शाहजीराजे अकरा वर्षाचे असताना वडिलांचे छत्र हरपले. १६१० मध्ये इंदापूर येथे झालेल्या लढाईत मालोजीराजे मारले गेले. निजामशाहाने मालोजीराजेकडे असलेल्या गावची पाटिलकी पुन्हा शहाजीराजेंना दिली. मालोजीराजांच्या पश्चात त्यांच्या बंधुनी, विठोजीराजे यांनी शहाजीराजे व शरीफजी यांचे पालनपोषण केले.
शहाजी महाराज एक महत्वकांक्षी मराठा सरदार होते त्यांनी आपल्या सहकार्‍याच्या मनात सदैव राष्ट्र अभिमानाची प्रेरणा दिली. दुसर्‍याची चाकरी करण्यापेक्षा स्वतंत्र राज्य असे, मुघल -आदिलशाही सत्ता केंद्र असताना त्यांनी निजामशाहीत राहून आपला दबदबा निर्माण केला होता. शाहजीराजांनी निजामशहा नसताना मुर्तुजा नावाच्या दहा वर्षाच्या निजाम वंशातील मुलांवर छत धरून स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न केला हा प्रयत्न मोडून काढण्यासाठी आदिलशहा मुघल यांना एकत्र होऊन शहाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी यावे लागले या दोन्ही सत्तांच्या विरोधात पेमगिरी ते माहूली चार-पाच वर्षे संघर्ष करावा लागला. या दोन्ही बलाढ्य सत्ता केंद्राच्या समोर निभाव लागणे शक्य झाले नाही ,त्यांना पत्करावा लागला. आदिलशाहीतील रणदुल्लाखान या सरदाराच्या मदतीने शाहजीराजांना आदिलशाहीत जहागिरी देण्यात आली. महाबली शाहजीमहाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले पण ते प्रयत्न थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या कारणाने अयशस्वी झाले, १६३६ साली निजामशाही संपुष्टात आल्यावर शाहजीराजे हे आदिलशाहीत दाखल झाले. आदिलशाहीत दाखल झाल्यावर शहाजी महाराजांनी रणदुल्ल्लाखान याच्या सोबत कर्नाटक स्वारी केली होती आणि यात शहाजी महाराजांनी अतुलनीय असा पराक्रम केला होता याबद्दल शिवभारतकार लिहतो की –

” बिंदुपुर ( बेदनुर ) चा राजा महातेजस्वी वीरभद्र, वृषपत्तनचा प्रसिद्ध राजा केंगनाईक, कावेरीपत्तनचा राजा महाबाहु जगदेव, श्रीरंगपट्टनचा राजा क्रूर कंठीराव, तंजावरचा राजा विजयराघव, तंजीचा (चंची) राजा प्रौढ़ वेंकटनाईक, मदुरेचा राजा गर्विष्ठ त्रिमलनाईक, पिलगुंडचा राजा उद्धट वेंकटाप्पा, विद्यानगरचा (विजयानगर) राजा धीट श्रीरंगराजा, हंसकुटचा ( होस्पेट) राजा प्रसिद्ध तम्मगौड़ा आणि इतरही राजांना शहाजीने आपल्या पराक्रमाने ताब्यात आणले ”

माहुलीच्या युध्दात शहाजीराजे यांचा पराभव झाला असला तरी एक हिंदू सरदार राज्य करू शकतो. तो राजा होऊ शकतो हे अनेक सरदारामध्ये राष्ट्र भावना, आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य झाले. हा स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्नच होता.
कर्नाटक मधील हिंदू संस्थानिकांकडून खंडणी घेवून
स्वामित्व मान्य करायला लावून हिंदू राजांचे आपापल्या मुलखातील त्यांचे अस्तित्व कायम ठेवले. शाहजीराजेंनी उदार धोरणातून राष्ट्रभावनेची ज्योत सदैव जागृत ठेवलेली दिसते. शाहजीराजे आदिलशाही राजवटीचे ताबेदार असले तरीही स्वदेश व स्वधर्म याविषयी त्यांच्या मनात प्रखर अभिमान होता. शहाजीराजांचे वाढलेले वर्चस्व पाहून त्यांना आदिलशाहीत अटक देखील करण्यात आली होती, मात्र शिवबाराजेंनी त्यांची युक्तीने सुटका करून घेतली.

शहाजीराजे अतिशय विद्वान, सुसंकृत, धाडसी, शूर, धोरणी, पराक्रमी, दूरदृष्टी व कल्पक होते. राजनीती व समाजशास्त्रात पारंगत होते. हिंदूंचे (मराठ्यांचे) राज्य असावे असे त्यांना वाटत होते. त्यांचे मित्र मलिक अंबर, रणदुल्लाखान या सरदारांशी त्यांचे चांगले संबंध होते. रणदुल्लाखान तर त्यांचा परममित्रच होता. शाहजीराजे कर्नाटकासारख्या ठिकाणी १५ ते २० हजारांची फौज बाळगून होते. तेथील जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र लढत होते. तेथील प्रजा शाहजीराजांना आपला आधारस्तंभच मानत होती.शहाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना त्यांंचा राजकीय मुत्सद्दीपणा, बुद्धीचातुर्य, धाडस, लढवय्येपणा असे अनेक पैलू त्यांनी केलेल्या पराक्रमातून आपल्या समोर येतात, याशिवाय शाहजी महाराजांचा महत्वाचा पैलू म्हणजे लोकसंग्रह!! महाबली शाहजीमहाराजांच्या लोकसंग्रह या पैलूबद्दल समकालीन कवी जयराम पिंडये आपल्या राधामाधवविलासचंपू या महत्वाच्या साधनात लिहतो –

” मनुष्यमात्र म्हटले म्हणजे त्याला काही तरी त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम व्यसन असते. तसे शहाजीला सेनेचे व्यसन होते. सर्व काही गमावील, प्रसंगी प्राणही गमावतील पण सैन्य म्हणून कधीही हातचे जाऊ देणार नाही. शहाजी आपल्या सैन्याची व सैनिकांची इतकी पराकाष्टेची काळजी घेई की संकटसमयी इतर सर्व बाबींना गौणत्व देऊन,सैन्याच्या जोपासनेला व मशागतीला तो अनन्य प्राधान्य देई. शहाजीचा जसा सैन्यावर लोभ त्या प्रमाणेच सैनिकांचा शहाजीवर लोभ असे ”

शाहजीराजे हे उत्तम संस्कृत पंडित होते.वास्तविक भोसले घराणे हे संस्कृत पंडीत घराणे आहे.रणांगणातील पराक्रमाबरोबर त्यांनी साहित्यविश्वातही मोलाची कामगिरी केली. कला,साहित्य आश्रय देऊन अनेक विद्वान,कवी,पंडीत त्यांनी पदरी बाळगलेले होते.

शाहजीमहाराजांनी अफजलखानाच्या निषेधार्थ आणि विजापुरच्या शिवरायांवर केलेल्या मोहिमेच्या विरोधात आदिलशाहीला धड़ा शिकवण्यासाठी मोहीमेची माहिती हेन्री रेव्हिंगटनच्या १० डिसेंबर १६५९ चे राजापुरहुन लंडनला पाठवलेल्या एका पत्रात मिळते , त्यात तो लिहतो -(मुळ पत्र इंग्रजी भाषेत आहे) ” एक महिन्यात ही दंगल शांत होईल असे वाटते. कारण शिवाजीचा बाप शहाजी दक्षिणेकड़े आहे तो १७००० सैन्य घेऊन आठ दिवसात येईल अशी अपेक्षा आहे आणि तो राजधानी विजापुरवर चालून जाईल आणि सैन्य अपुरे असल्याने हे राज्य बुडेल ”
शहाजीराजे व इतर सरदार बेदनूर प्रांताची मोहिम फत्ते करुन होदिगिरी गावी मुक्कामास आले होते. या ठिकाणचिया आदिवासी बांधवांनी त्यांना नरभक्षक वाघांनी माणसे मारल्याची तक्रार दिली. महाराज शिकारीसाठी बाहेर पडले असता त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला. घोडा खाली कोसळला. राजांच्या डोक्याला मार लागला. त्यांचे २३ जानेवारी १६६४ मध्ये अपघाती मृत्युमुखी पडले.

पराक्रम, युध्दप्रसंगाची बुध्दिमत्ता, उत्तम प्रशासन, स्वतंत्र राज्यकारभार या गुणांचे शिवरायांमध्ये बीजारोपण करणारे, अनंत संकटावर मात करत छत्रपती शिवाजीमहाराजांना घडविणारे स्वराज्य संकल्पक महाबली महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरू शाहजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा..
📝 दत्तू केशवराव माने, लातूर
[email protected]

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments