मला समजलेली गीता 5 वा अध्याय

5 वा अध्याय
कर्म संन्यास योग हे गीतेच्या का पाचव्या अध्यायाचे नाव असून त्यात 29 श्लोक आहेत. ह्यात अर्जुन श्रीकृष्णाला कर्मयोग आणि ज्ञान योग ह्या दोन्ही तील फरक विचारत आहे, त्यावर श्रीकृष्णांचे उत्तर असे..
अर्जुन उवाच
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्िचतम्।।5.1।।
अर्जुन उवाच – हे कृष्ण कर्मणाम्‌ संन्न्यासम् पुनः योगम्‌ च शंससि; एतयोः यत्‌ एकम्‌ श्रेयः तत्‌ मे सुनिश्चितम्‌ ब्रूहि।

अर्जुन उवाच –
हे कृष्ण
कर्मणाम्‌ कर्मन् ष. ब. व. कर्मांचे
संन्न्यासम् संन्यास
पुनः परत
योगम्‌ योग जुळून येणे
च आणि
शंससि; शंस् धातू स्तुती करणे
एतयोः एतद् ष. द्वि व. ह्या दोन्ही चे
यत्‌ ते
एकम्‌ एक
श्रेयः श्रेय
तत्‌ तद्
मे अस्मद् माझ्या साठी
सुनिश्चितम्‌ सु +निश्चितम्, नक्की
ब्रूहि। सांग
ब्रू धातू बोलणे
4 थ्या अध्याया चे नाव होते ज्ञान कर्म संन्यास योग. ह्यातील 4.41 मधे कर्म संन्यासावर विस्ताराने सांगितले आहे. तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचे विवरण दिले आहे. 4.33 मधे ज्ञानयोगाची प्रशंसा केली आहे. त्यामुळे अर्जुन संभ्रमित झाला आहे.
म्हणून तो भगवंतांना प्रश्न विचारत आहे की
हे कृष्णा
आधी तुम्ही कर्म संन्यासावर बद्दल सांगितले (स्तुती केली) नंतर कर्म योगा बददल सुद्धा सांगितले. आता मला कृपया नक्की सांगा ह्या दोन्हीमध्ये माझ्यासाठी कोणता मार्ग श्रेष्ठ आहे?
एकूण अर्जुनाने सोळा प्रश्न विचारले त्यापैकी हा पाचवा प्रश्न..
श्री भगवानुवाच

संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते।।5.2।।

श्रीभगवानुवाच – संन्न्यासः कर्म-योगः च उभौ निःश्रेयसकरौ; तयोः तु कर्म-संन्न्यासात् कर्म-योगः विशिष्यते।।
श्रीभगवानुवाच –
संन्न्यासः संन्यास
कर्म-योगः च. आणि कर्मयोग
उभौ उभ दोन्ही
निःश्रेयसकरौ; (निःश्रेयस्कर) निःसंशय पणे
तयोः तद् दोघांमधे
तु परन्तु
कर्म-संन्न्यासात् कर्म संन्यास पेक्षा
कर्म-योगः
विशिष्यते।। विशेष गुण सांगणे
शिष् धातू गुणगान करणे
श्रीभगवानकृष्ण ( पहिल्या श्लोकात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना) असे म्हणतात की
कर्म संन्यास आणि कर्म योग दोन्हीही सारखेच कल्याणकारी आहेत पण कर्म संन्यासापेक्षा कर्म योग जास्त चांगला आहे.
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते।।5.3।।

महाबाहो! यः न द्वेष्टि, न काङ्क्षति, सः नित्य- संन्न्यासी ज्ञेयः; हि निर्द्वन्द्वः सः सुखम्‌ बन्धात्‌ प्रमुच्यते।
महाबाहो! हे अर्जुना
यः जो
न द्वेष्टि, द्वेष करत नाही
द्विष् धातू
न काङ्क्षति, आकांक्षा ठेवत नाही
काङ्क्ष् धातू
सः तो
नित्य- संन्न्यासी नेहमीच संन्न्यासी
ज्ञेयः; ज्ञा धातू जाणून घे.
हि नक्की
निर्द्वन्द्वः. द्वंद्व नसलेला
सः तो
सुखम्‌
बन्धात्‌ बन्ध बन्धनातून
प्रमुच्यते। त्याग करणे, मुक्ति मिळणे
मुच् धातू मुक्ति मिळणे
आधीच्या श्लोकात कर्मयोग जास्त श्रेष्ठ आहे असे सांगितले असल्याने त्यावरील विस्तृत वर्णन आता पुढे वाचू.
दोन प्रकारचे लोक आपल्याला पहायला मिळतात.
जसे काही जण सर्वसाधारण लोकांप्रमाणे संसाराच्या बंधनात अडकत नाहीत, संन्यास घेतात आणि त्यामुळे सुख दुःख इच्छा आकांक्षा ह्यापासून लांब असतात.
दुसर्या प्रकारचे लोक संसारात राहून दुसर्‍यांसाठी कर्म करत राहतात. जणू स्वतःसाठी ते जगतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात ना कोणाबद्दल राग असतो ना चढाओढ. एक प्रकारे संन्यासच हा. (असे म्हटले पाहिजे) मनात कोणत्याही प्रकारचे द्वंद्व नसल्याने सर्व प्रकारच्या सुखाच्या (मिळवण्याच्या धडपडीपासून) बंधनापासून मुक्त असतात.
सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्।।5.4।।

साङ्ख्य-योगौ पृथक्‌ (इति) बालाः प्रवदन्ति, न पण्डिताः। एकम्‌ अपि सम्यक्‌ आस्थितः उभयोः फलम्‌ विन्दते।
साङ्ख्य-योगौ साडःख्य योग
पृथक्‌ वेगवेगळे करणे
बालाः अज्ञानी
प्रवदन्ति, घोषित करणे
प्र +वद् वद् धातू बोलणे

पण्डिताः। ज्ञानी
एकम्‌ अपि एकच
सम्यक्‌ पूर्णपणे
आस्थितः स्थिरावले आहे
आ+स्थितः आस्था असणे
उभयोः दोन्हीचे
फलम्‌ फळ
विन्दते। मिळते
विद् धातू आत्मने पदी मिळणे.

वैराग्य दोन प्रकारचे आहे असे म्हटले जाते.
फल्गु वैराग्य म्हणजे ज्यांना प्रापंचिक जबाबदारी हा त्यांच्या मार्गातील अडसर वाटतो आणि युक्त वैराग्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत लोकांना ईश्वराचा अंश दिसतो त्यामुळे आहे त्या परिस्थितीत ते निस्वार्थी पणे काम करत राहतात.
गृहीत्वापीन्द्रियैरर्थान् यो न द्वेष्टि न हृष्यति।
विष्णोर्मायामिदं पश्यन् स वै भागवतोत्तमः।।
(श्रीमद्भागवतम्-11.2.48)
संसारात राहून सुद्धा जो निःस्पृहः तेने, ईश्वराची शक्ती ओळखून काम करत राहतो तो परम भक्त असतो.
म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की केवळ बालबुद्धीचे (अज्ञानी) लोक कर्म संन्यास आणि कर्म योग वेगवेगळे मानतात. परन्तु ज्ञानी मात्र कोणत्याही एका मार्गाचा अवलंब करून दोन्हीही मार्गांची फलस्वरूप परमात्म्याला प्राप्त करुन घेतात.
यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति।।5.5।।

साङ्ख्यैः यत्‌ स्थानम्‌ प्राप्यते, तत्‌ योगैः अपि गम्यते; यः साङ्ख्यम्‌ योगम्‌ च एकम्‌ पश्यति, स पश्यति।
साङ्ख्यैः कर्म संन्यास
यत्‌ जे
स्थानम्‌ प्राप्यते, स्थान प्राप्त होते
तत्‌ ते
योगैः कर्मयोगाने
अपि गम्यते; सुदधा प्राप्त होते
यः जो
साङ्ख्यम्‌ सांख्य
योगम्‌ च आणि योग
एकम्‌ पश्यति, एकसारखेच पाहतात (समजतात)
स ते
पश्यति। पाहतात. (त्यांनाच समजते)
आधीच्या श्लोकात सांगितल्या प्रमाणे कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी परम तत्त्वाची प्राप्ती होऊ शकते., हेच परत थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितले आहे.
थोडक्यात ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही ची तत्वे आणि उद्दिष्ट सारखेच आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणजेच जे कर्म संन्यासाने प्राप्त होईल तेच कर्मयोगाने, आणि ज्याला ह्या दोन्हीकडे समान दृष्टीने पाहता येते तोच समजूतदार आहे.
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति।।5.6।।

हे महाबाहो! अयोगतः तु संन्न्यासः आप्तुम्‌, दुःखम्‌ योग-युक्तः मुनिः न चिरेण ब्रह्म अधिगच्छति।
हे महाबाहो!
अयोगतः अ+योगतः योगरहित
तु परन्तु
संन्न्यासः संन्यासी
आप्तुम्‌, प्राप्त करतो
दुःखम्‌ दुःख
योग-युक्तः कर्मयोगाने बांधलेला
मुनिः मुनी
न चिरेण लवकर
चिर म्हणजे दीर्घ
ब्रह्म ब्रह्मन् परम सत्य
अधिगच्छति प्राप्त करणे
अधि +गम्
संन्यासींचे दोन प्रकार असतात
1. मायावादी संन्यासी जे सांख्यदर्शनाचा अभ्यास करताना शंकराचार्य भाष्य चे अध्ययन आणि चिंतन करतात.
2. वैष्णव संन्यासी भागवत संप्रदायी असतात आणि प्रभूची भक्ती करतात, भक्ती करताकरता इतरही कार्य करत असतात.
सांख्ययोगींना सुद्धा सिद्धि होण्यासाठी कर्मयोगाची साधना करणे आवश्यक आहे, मात्र कर्मयोगींना सांख्ययोगाचा अभ्यास करण्याची गरज नाही. कारण सांख्ययोगाचा अभ्यासूने काय प्राप्त केले, आपल्या भावनांवर विशेषतः रागावर नियंत्रण मिळवले का हे या संसाररुपी परिक्षा केन्द्रातच सिद्ध होते

यस्त्वसंयतषड्‍वर्ग: प्रचण्डेन्द्रियसारथि: ।
ज्ञानवैराग्यरहितस्‍त्रिदण्डमुपजीवति ॥ 11.18.40 श्रीमत् भागवत
भोंदू संन्यासी चे वर्णन केले आहे जो फक्त बाह्य स्वरूपी संन्यासी च्या वेश परिधान करून लोकांना फसवत आहेत त्याला काहीच प्राप्त होत नाही.
म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की
हे महाबलशाली अर्जुना
भक्तियुक कर्म केल्याशिवाय कर्म संन्यासी होणे अवघड आहे. पण जे कर्मयोगी आहेत त्यांना परम तत्त्वाची प्राप्ती लवकर होते.
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते।।5.7।।

योग-युक्तः, विशुद्ध-आत्मा, विजित-आत्मा, जित-इन्द्रियः, सर्व-भूत-आत्म-भूत-आत्मा, कुर्वन्‌ अपि न लिप्यते।

योग-युक्तः, कर्मयोगात अधिन असलेला
विशुद्ध-आत्मा, शुद्ध
विजित-आत्मा, मनावर ताबा असलेला
जित-इन्द्रियः, इन्द्रियांवर ताबा असलेला
सर्व-भूत सर्व जीव
आत्मभूत
आत्मा,
कुर्वन्‌ अपि काम करत असताना सुद्धा
न लिप्यते। अडकून पडत नाही
लिप् धातू लेप देणे
ह्या श्लोकात आत्मा हा शब्द वेगवेगळ्या प्रकारांनी वापरला आहे जसे बुद्धी मन आणि इन्द्रिय. ह्या सर्वांवर विजय मिळवणारा आत्मा म्हणजे विशुद्ध-आत्मा, विजित-आत्मा आणि जीत-इन्द्रिय आत्मा.
जसे झाडाच्या बुंध्यावर पाणी घातले की ते मूळ, फांद्या, पाने सगळीकडे पोहोचणारच त्याचप्रमाणे कर्मयोगी, ज्याने बुद्धि मन आणि इन्द्रियांवर विजय मिळविला आहे, सर्व जीवांमधे परमात्म्याचे अस्तित्व पाहतो (आणि आपले काम निस्वार्थी पणे करत राहतो) तो त्यात अडकून पडत नाही.
नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्। पश्यन् श्रृणवन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपन् श्वसन्।।5.8।।
युक्तः तत्त्ववित्‌ पश्यन्‌, शृण्वन्‌, स्पृशन्‌, जिघ्रन्‌, अश्नन्‌, गच्छन्‌, स्वपन्‌, श्वसन्‌, न एव किञ्चित्‌ करोमि इति मन्येत।

युक्तः युक्त
तत्त्ववित्‌ सत्य जाणणारा
पश्यन्‌, बघताना
शृण्वन्‌, ऐकताना
स्पृशन्‌, स्पर्श करताना
जिघ्रन्‌, वास घेताना
अश्नन्‌, खाताना
गच्छन्‌, चालताना
स्वपन्‌, झोपताना
श्वसन्, श्वास घेताना
न एव किञ्चित्‌ करोमि मी काहीच करत नाही
इति मन्येत। अशी मान्यता, असा विचार करतो

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्।।5.9।।
प्रलपन्‌, विसृजन्‌, गृह्णन्‌, उन्मिषन्‌ निमिषन्‌ अपि, इन्द्रियाणि इन्द्रिय-अर्थेषु एव वर्तन्ते इति धारयन्‌ ।
प्रलपन्‌, बोलत असताना
प्रलपत् प्र +लप्
लप् धातू बोलणे
विसृजन्‌, वि+सृज् सोडून देणे
गृह्णन्‌, ग्रहण करतअसताना
ग्रह धातू घेणे
उन्मिषन्‌ उन् +मिष् धातू डोळे उघडणे
निमिषन्‌ अपि, डोळे बंद करणे
इन्द्रियाणि इन्द्रिय
इन्द्रिय-अर्थेषु इन्दियांविषयी
एव वर्तन्ते वृत् धातू असणे
इति धारयन्‌ ।धृ धातू धारण करणे

सामान्य माणसाला एखादे काम पूर्ण झाले कि त्याचे श्रेय हवे असते. त्याच्यामुळेच हे कार्य संपन्न झाले असे त्याला वाटत असते.
अशाच अर्थाचा आणखी एक श्लोक ज्यात तत्त्ववित्‌ शब्दाचा वापर केला आहे
विषयोत्थानि सौख्यनि दुःखानां तानि हेतवः ।
उत्पत्तिनाशयुक्तानि तत्रासक्तो न तत्त्ववित् ।।२२।। गणेशगीता

सत्य जाणणारा योगी, बघताना ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, सोडून देताना, चालताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, ग्रहण करत असताना, डोळे उघडताना, डोळे बंद करताना असाच विचार करत असतो कि ह्या सर्व गोष्टींचा कर्ता मी नाही. फक्त त्याचे इन्द्रिय त्या त्या विषयात क्रीयाशील आहेत.

कर्ता बहिरकरतान्तरलोके विहर राघव।
(योग वाशिष्ठ) हे राघव बाह्य दृष्टीने तू तुझे कर्म करत रहा पण ह्याचा खरा कर्ता ईश्वर आहे हे समजून घे.
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा।।5.10।।

यः सङ्गम्‌ त्यक्त्वा ब्रह्मणि कर्माणि, आधाय करोति, सः अम्भसा पद्म-पत्रम्‌ इव, पापेन न लिप्यते।
यः जो
सङ्गम्‌ संगत आसक्ती
त्यक्त्वा त्यज त्याग करणे
ब्रह्मणि ब्रह्म
कर्माणि, कर्म
आधाय समर्पित
धा धातू पकडून ठेवणे
करोति, करतात
सः तो
अम्भसा पाण्याने
अम्भस पाणी
पद्म-पत्रम्‌ कमळाचे पान
इव, सुध्दा
पापेन पापाने
न लिप्यते। लेपन होत नाही
लिप् धातू लेप देणे
एकूणच भारतीय तत्त्वज्ञान सांगताना कमळाची उपमा बरेचदा वाचायला मिळते जसे कमलनयन, चरणकमल, करकमल वगैरे. सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे कमळ चिखलात उगवते आणि ते अतिशय पवित्र आणि सुंदर दिसते. त्याची पाने पाण्यात असून सुद्धा पाण्याने भिजत नाहीत.
ह्याच गुणाचा भगवंतांनी ह्या श्लोकात उल्लेख केला आहे.
सर्व कर्मांचा करविता ईश्वर ब्रह्म आहे असे सांगणारे श्लोक
एतत् सर्वं हि ब्रह्म। 2 माण्डूक्योपनिषद
तस्मात् एतत् ब्रह्म नाम रुपम् अन्नं च जायते ॥मुण्डकोपनिषद् 1.2.10.
जो आपल्या कर्माची फळे ब्रह्मा ला समर्पित करतो (त्याचे श्रेय घेत नाही, निस्वार्थी पणे काम करतो) त्याच्या हातून काही चुका (पाप) झाल्याच तर त्यासाठी त्यासाठी त्याला जबाबदार धरले जात नाही, ते पाप त्याला चिकटत नाही जसे कमळाच्या पानांना पाण्याचा स्पर्श होत नाही.
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वाऽऽत्मशुद्धये।।5.11।।

योगिनः कायेन, मनसा, बुद्‌ध्या, केवलैः इन्द्रियैः अपि सङ्गम्‌ त्यक्त्वा आत्म-शुद्धये कर्म कुर्वन्ति।
योगिनः योगी
कायेन, काया (तृतिया) च्या साह्याने
मनसा, मन च्या साह्याने
बुद्‌ध्या, बुद्धि च्या साह्याने
केवलैः केवळ
इन्द्रियैः इन्द्रिय च्या साह्याने
अपि सुद्धा
सङ्गम्‌ आसक्ती
त्यक्त्वा त्यज त्याग करणे
आत्म-शुद्धये आत्म शुद्धि साठी
कर्म कर्म
कुर्वन्ति। करतात
एक खूप मोठा विचार ह्या श्लोकात मांडला आहे. जसे एखादी महत्त्वाची गोष्ट करण्याचा मान काही विशिष्ठ व्यक्तीलाच मिळतो. त्यामागे हे कार्य प्रभू आपल्याकडून करवून घेत आहेत अशी भावना असते. जसे मी हे भाषांतर करत आहे.. हे कार्य करत असताना खरे तर माझे ज्ञान वाढत आहे, ह्या श्लोकांचा माझ्या मनावर परिणाम होत आहे आणि माझी विचारशक्ती विकसित होत आहे, माझ्या आचारविचारांवर ह्याचा परिणाम होत आहे. नेमके हेच भगवान ह्या श्लोकात सांगत आहेत.
योगी निस्वार्थी पणे कोणत्याही श्रेयाची अपेक्षा न करता आपले शरीर मन बुद्धि ह्याच्या साह्याने जे काम करतात त्याचा उद्देश केवळ आत्मशुदधि हाच असतो.
अशाच अर्थाचा एक श्लोक

मम नाथ यद् अस्ति योऽस्म्यहं सकलम् तद्धी तवैव माधव ।
नियतस्वम् इति प्रबुद्धधैरथवा किं नु समर्पयामि ते।।
(श्रीस्त्रोत रत्न-50)
मी जेव्हा अज्ञानी होतो तेव्हा मला असे वाटायचे की मी तुम्हाला (श्री विष्णुंना) खूप काही अर्पण करू शकतो, पण आता मला समजले आहे की हे सर्व तुमचेच आहे (मी तुम्हाला काय देणार?)
फक्त तुम्ही हे माझ्या करवी घेत आहात.
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते॥५-१२॥

ह्या श्लोकातील
*शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्* . ह्या शब्दांनी माझे लक्ष वेधून घेतले आणि त्याचे व्याकरण काय आणि त्याचा अर्थ काय असावा ह्याचा मी विचार करत होते.
ह्यातील
शान्तिमाप्नोति =शांतिम् म्हणजे शांती आप्नोति म्हणजे मिळवणे.
आता नैष्ठिकीम् शब्दाचा विचार करु.
नैष्ठिकीम् च्या जवळचा आपल्याला माहीत असलेला शब्द म्हणजे निष्ठा.
आता निष्ठा हा शब्द कसा तयार झाला?
नी +स्था
नी म्हणजे निरंतर
स्था म्हणजे स्थिर असणे (स्थावर, स्थितप्रज्ञ)
ह्या स्था ला नी जोडला की जी स्थिरता लाभते ती निरंतर असते.
एखादी व्यक्ति निष्ठावान असते म्हणजे त्याची कायमस्वरुपी श्रद्धा असते एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या गोष्टीवर.
नैष्ठिकी हा शब्द संस्कृत भाषेतील सौंदर्य आहे.
जसे
भाव भावकी
भाऊबंदक भाऊबंदकी
तसेच निष्ठा नैष्ठिकी.
तर अशी निरंतर शांती लाभलेला योगी.
ही शांति जी तात्पुरती नसते.
हमास आणि इस्राइल मध्ये स्थापन झालेली शांती ही नैष्ठिकी नव्हे. अशी बरीच उदाहरणे देता येतील.
नैष्ठिकी शब्दाच्या व्याकरणानंतर दोन शब्द महत्वाचे आहेत.
युक्तः आणि अयुक्तः
युक्त ह्या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात.
युज +ग=योग
युज +त =युक्त
युक्त हा शब्द समजायला सोपा आहे.
युक्त म्हणजे युक्ती करणारा म्हणजेच युक्ती ने कर्म सिद्धीस नेणारा थोडक्यात eligible
(आयुक्त हा शब्द असाच निर्माण झाला आहे)
दुसरा अर्थ आहे योग, ज्याचा अर्थ आहे जोडणारा.
आता योगी स्वतः ला कशाशी जोडून घेतो तर अर्थातच ब्रह्म तत्वाला.
असा हा योगी त्याने केलेल्या कर्माच्या फला चा त्याग करतो.
इतकेच नव्हे तर कर्मफळाच्या इच्छेचा सुद्धा त्याग करतो.
ह्या नंतर चा शब्द अयुक्तः म्हणजेच जो ब्रह्म तत्त्वाला जोडलेला नाही तो…
तो सुद्धा आपले कर्म करतच असतो पण त्याला मात्र आपल्या केलेल्या कर्माच्या श्रेयाची अपेक्षा असते
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्।।5.13।।

वशी देही सर्व-कर्माणि मनसा संन्न्यास्य न कुर्वन्‌, न कारयन्‌ , एव नव-द्वारे पुरे, सुखम्‌ आस्ते।
वशी वशीन् वश करणे
देही दहीन्
सर्व-कर्माणि सर्व कर्मे
मनसा मनस् मनाने
संन्न्यास्य संन्यास घेतलेला
न कुर्वन्‌, करत नाही
न कारयन्‌ ,घडवून आणत नाही
एव फक्त
नव-द्वारे पुरे, नऊदारे असलेली नगरी
सुखम्‌ सुखी
आस्ते। अस् धातू असणे
देह धारण केलेला जीव जो संन्यस्त आहे, आत्मसंयमित आहे तो ह्या नऊ दरवाजे असलेल्या शरीरात सुखाने नांदतो आहे कारण तो (अहंकारापासून) मीच कर्ता किंवा मीच एखादी गोष्ट घडवून आणणारा असे समजतो, अशा विचारांपासून दूर आहे.

नवद्वारे पुरे देही हंसः बहिः लेलायते। सः स्थावरस्य चरस्य सर्वस्य लोकस्य वशी॥3.18 श्वेताश्वेतर उपनिषद.
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।5.14।।
ह्यातील पाहिल्या ओळी चा अर्थ बघू.
ह्या मधे कर्ता आणि क्रियापद आहे प्रभुः सृजति
मूळ धातू सृज म्हणजे निर्माण करणे.
प्रभु हा शब्द भू ह्या धातुला प्र हा उपसर्ग लावून तयार झाला आहे.
भू भवति म्हणजे होणे.
प्रभवति म्हणजे प्रभाव पडणारा. इथे प्रभू हा शब्द ह्या श्लोकाची मुद्दाम वापरला आहे जो ह्या लोकांवर प्रभाव टाकतो तो प्रभू.
(एकूण 14 लोक आहेत भूलोक स्वर्गलोक.. वगैरे)
आता हा प्रभाव नक्की कोणावर पडतो? ज्याचा प्रभु वर विश्वास आहे त्याच्यावर की जो नास्तिक आहे त्याच्यावर सुद्धा?
म्हणजे इथे आधी आस्तिक आणि नास्तिक कोणाला म्हणायचे ते स्पष्ट करणे आले.
वेदांत सांगितल्या प्रमाणे जो वेदांना मानतो तो आस्तिक आणि जो वेदांना मानत नाही तो नास्तिक. पण इथे मात्र जो प्रभू चे अस्तित्व मानतो तो आस्तिक.
प्रत्येकाच्या मनात जसा भाव आहे त्याला तसा तो दिसतो.
नका विचारू देव कसा, देव असे जो भाव तसा.
आता खरी गंमत सुरू होते.
ज्यांचा देवावर अजिबात विश्वास नसतो ते प्रत्येक कार्य त्यांना पटेल असे करत असतात. मग ते विद्यानाचा आधार घेतील, वादविवाद चर्चा करतील आणि आपले काम करतील. आणि दुसर्‍या गटातील लोक मात्र देवावर विश्वास ठेवून त्याच्यावर सर्व सोपवून मोकळे होतील, कदाचित फारसा प्रयत्न करणार सुद्धा नाहीत. जे होईल ते, जसे नशिबात असेल तसे.
इथे भगवान् श्रीकृष्ण स्पष्ट पणे सांगतात
न कर्तृत्वं न कर्माणि (लोकस्य) सृजति प्रभुः।
आता कर्तुत्व आणि कर्माणि ह्या शब्दांचा विचार करू.
कर्तुत्व हा शब्द दोन अक्षरांनी तयार झाला आहे.
कर्तृ + त्वं
कृ + तृत् = कर्तृ
कर्तृ शब्दाची पंचमी आणि षष्ठी होते कर्तृः आणि पुल्लिंगी प्रथमा होते कर्ता.
कर्ता कर्ती
कर्ता म्हणजे करणारा.
कर्तृ + त्वं चा अर्थ कर्ता ची योग्यता दर्शवतो.
ह्याच नियमानुसार
दा +तृत्=दातृ पासून झाले दाता दात्री
मातृ
पितृ
ह्यांना त्व जोडले की विशेषणे तयार होतात
कर्तुत्व, दातृत्व, मातृत्व, पितृत्व.
शब्दाला त्व जोडला की त्या व्यक्तीची योग्यता दर्शवते.
असे हे कर्तृत्व, न सृजति प्रभुः। म्हणजेच प्रभु घडवून आणत नाही. (तुम्ही आस्तिक असाल कींवा नास्तिक असाल) कर्म तर घडतच राहतात.
आता प्रश्न येतो, कर्म म्हणजे काय?
त्याबद्दल गीतेमध्ये काय सांगितले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी गीतेच्या इतर श्लोकांचा आधार घ्यावा लागेल.

आपल्याला कर्म करत रहा असे सांगितलेले माहीत आहे पण मुळात कर्म म्हणजे काय? त्याची व्याख्या कुठे सांगितली आहे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, त्यासाठी आपण इतर श्लोकात काय सांगितले आहे ते पाहूया.
3रा अध्यायात कर्मयोग सांगितला आहे पण कर्म म्हणजे नक्की काय ते काही सांगितलेले नाही. 4था अध्याय ज्ञानकर्म योग पण इथेसुद्धा कर्म म्हणजे काय ते स्पष्ट केलेले नाही. आता आपण 8व्या अध्यायातील 3रा श्लोक पाहू
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः || ३ ||”
ह्यातील पाहिल्या शब्दाची फोड
भूत भावो उद्भव करोती अशी करता येईल.
उद्भव = उद् + भू (होणे)
उद् म्हणजे वर म्हणजे थोडक्यात प्रगती होणे.
आता आधीच्या दोन शब्दाना हे जोडून घेतले तर ते असे लिहिता येईल
भूतस्य (भूतकाळ) भावः (वर्तमानकाळ) उद्भवं (भविष्यकाळ) करोति।
आपल्याला सर्वांनाच हे माहीत आहे की आपल्या भूतकाळात वर्तमानकाळ असतो आणि वर्तमानकाळात भविष्यकाळ असतो.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भूतकाळात जात असतो.
म्हणजेच (भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः) आपण एक एक क्षण सोडून देत असतो.
म्हणजे त्याचा विसर्ग करत असतो. (धरणातून पाण्याचा विसर्ग करतात)
तर असे हे एक एक क्षण (भूतकाळ विसरून) सोडून देऊन भविष्यकाळात प्रवेश करणे ह्यालाच कर्म म्हणतात.

सहजं कर्म सदोषमपि न त्यजेत्।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः।।18.48।।
श्री भगवान पुढे असेही म्हणतात की कोणतेच कर्म हे निर्दोष नसते. जरी ते सदोष असले तरी त्याचा त्याग करायचा नाही. कारण अग्नि ऊब देतो तसाच धूरही देतो. मग काय तुम्ही कर्म करण्यास सुरवातच करणार नाही का? ह्याबद्दल 3 र्या अध्यायात भगवान म्हणतात

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति।।3.4।।
म्हणजे कर्माचा आरंभ केलाच नाही म्हणून नैर्ष्कम्य प्राप्त होणार नाही, तसेच कर्माचा त्याग केला म्हणून सिद्धि प्राप्त होणार नाही.
थोडक्यात कर्म हे करावेच लागेल.
आता परत आपल्या मूळ श्लोका कडे येऊ.
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।
आपण जे कर्म करतो किंवा आपले जे काही कर्तुत्व असते त्यावर कसलाही प्रभाव नसतो.
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।5.14
आपण कर्म म्हणजे काय? त्यावर कसा प्रभु चा प्रभाव नसतो, कर्म करत राहणे कसे अपरिहार्य आहे ते बघितले आता ह्या श्लोकातील 2र्या ओळी चा विचार करू.

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।
प्रवर्तते =प्र +वृत्
प्रवृत्त करणे
स्वभावः =स्वस्य भावः
प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो.
सर्वांनाच साधु आणि विंचवाची गोष्ट माहीत असेलच. पाण्यात बुडणाऱ्या विंचवाला साधू पुन्हा पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तर विंचू पुन्हा पुन्हा साधूला दंश करत असतो. ह्याला कारण स्वभाव. दोघेही आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतात.
कर्म तर आपण करतोच पण दरवेळेस आपल्याला यश मिळतेच असे नाही. ह्यावर 18 व्या अध्यायातील 13 व्या श्लोकात सुंदर विवेचन दिले आहे.

पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे।
सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्।।18.13।
कर्म सिद्धीस नेण्यासाठी 5 कारणांची आवश्यकता असते ती कोणती?

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।18.14।।
अधिष्ठानं म्हणजे काम करणारे साधन, कर्ता म्हणजे क्रिया घडवून आणणारा.. (इच्छा करणारा)
करणं पृथकविधम् म्हणजे विविध कार्य करू शकणारी इंद्रिये
विविध पृथक्चेष्टा म्हणजे इंद्रियांची विविध काम करण्याची शक्ती (skills)
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैव.
पळण्याच्या स्पर्धेत अर्ध्या सेकंदाने पदक हुकते.
आपण बिया पेरतो पण सर्वच उगवतात असे काही नाही.
क्षत्रियाचा धर्म लढण्याचा पण त्याच्या कर्मफलसंयोगाप्रमाणेच त्याला विजय मिळेल.
थोडक्यात आपले कर्तृत्व, कर्म ह्यावर भगवंताचा प्रभाव नसतो तसेच त्यांच्या कर्मा ची फळे सुद्धा तो देत नाही.
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः।।5.15।।
न+आदत्ते
दा ददाति म्हणजे देणे
आ दा म्हणजे परत घेणे (आदानप्रदान शब्द माहीत असेल)
न कास्यचित् पापं न च ऐव सुकृतं
येथे सुकृत हा शब्द पुण्य ह्या अर्थासाठी वापरला आहे.
विभूः=विशेष भवति इति
भू म्हणजे होणे.
काही विशेष घडणे
विभूती हा शब्द माहीत आहेच.
जसे गम पासून गती
स्था पासून स्थिति
तसेच विभू पासून विभूति
आता अर्थ सोपा आहे.
विभूः न आदत्ते पापं, न सुकृतं च.
पुढच्या ओळी कडे जाण्यापूर्वी
अजून एक संदर्भ देते.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।।
जरी 5व्या अध्यायात भगवंत म्हणत असले की ते पापही घेत नाहीत आणि पुण्य सुद्धा घेत नाहीत
पण 18 व्या अध्यायात मात्र अर्जुनाला असे सांगत आहेत की तू मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्ति देईन.
ह्याचा नक्की अर्थ काय असावा?
हे समजून घेण्यासाठी आधी पाप आणि पुण्य म्हणजे काय ते जाणून घ्यायला लागेल.
पा + अप
पा म्हणजे रक्षण करणे
अप म्हणजे त्या पासून दूर
थोडक्यात जो वाईट कर्म करेल त्याचे प्रभू रक्षण करणार नाही.
आता वाईट आणि चांगले कर्म कसे ठरवायचे?

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।।2.38।।
ह्याचा थोडक्यात अर्थ असा की सुख दुःख, लाभ हानि, जय पराजय हे सर्व सारखेच असे मानून तू युद्धाला तयार हो. तू युद्ध केलेस म्हणून तुला पाप लागणार नाही.
आता पुण्य शब्द कसा तयार होतो ते बघू
पु पुनति म्हणजे शुद्ध करणे
पुण्यकर्म म्हणजे पवित्र कर्म.

पाप आणि पुण्य ह्यांच्या संकल्पना आपण बघितल्या
आता 5.15 मधील 2र्या ओळीचा अर्थ पाहू.
अज्ञानेनावृतं =अज्ञान +आवृत्त
आ+ वृत. वर्तते. वृत्त
वृत् म्हणजे सांगणे
आवृत्त म्हणजे एक प्रकारे आवरण (झाकून ठेवणे)
अज्ञानेनावृतं ज्ञानं ह्याचा अर्थ अज्ञानामुळे ज्ञान झाकून ठेवणे.
आपण जसे म्हणतो
Where there is smoke there is fire म्हणजे धुरा मागे अग्नि असणारच.
3.38 मध्ये हेच सांगितले आहे.
धूमेनाव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्।।3.38।।
धुरा मुळे अग्नि झाकला जातो, धुली मुळे आरसा स्पष्ट दिसत नाही. अर्भक त्याच्या वर च्या आवरणात असते (अर्भकची उपमा फारशी पटण्यासारखी नाही पण ते असो.) त्याच प्रमाणे अज्ञानामुळे ज्ञान झाकले जाते.
मुह्यन्ति मुह्य धातू म्हणजे चलबिचल (confusion)
आता सर्व स्पष्ट आहे
अज्ञानामुळे जर ज्ञान झाकले गेले असेल तर मनात चलबिचल होते.
Knowledge makes man perfect.

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि।।4.35।।
इथे सुद्धा भगवान् हेच सांगत आहेत.
जर तुझ्याकडे ज्ञान असेल तर तुला पुन्हा मोह होणार नाही.
Half knowledge is dangerous.
एखादी गोष्ट लहान मुलाला करू नको असे सांगितले की त्याला तेच करावेसे वाटते कारण त्यातील धोके त्याला माहीत नसतात. मग तीच गोष्ट करण्याचा त्याला मोह आवरत नाही.

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः ॥
ईशोपनिषद्. 9 मध्ये हेच सांगितले आहे.
ज्याच्या कडे ज्ञान नाही तो घोर अंधकारमय जीवन जगतो पण ज्याला आपल्या कडे खूप ज्ञान आहे असे वाटते तो त्यापेक्षा वाईट अवस्थेत असतो. (आपल्या अज्ञानाची त्याला जाणीव नसते)

विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ।।
ईशोपनिषद् 11 मध्ये सांगितलेला थोडक्यात अर्थ असा की
अविद्या चा शेवट अटळ आहे पण विद्या अमर्त्य आहे. सत्य हे चिरंतन आहे.

तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता । अप्राशस्त्यं विरोधश्च नञर्था: षट् प्रकीर्तिता: ॥
(थोडेसे विषयांतर करून सांगते
आपल्या बाराखडी मधल्या अ अक्षराचा नकारात्मक अर्थ तयार करण्यासाठी उपयोग करतात
जसे विद्या अविद्या
चल – अचल
ज्ञान अज्ञान
कर्म अकर्म
तर असे नकार 6 प्रकारचे असतात असे ह्या श्लोकात सांगितले आहे.

यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः ।
अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम् ॥ ३॥केनोपनिषद्
ह्याचा मला समजलेला अर्थ असा
ज्याला असे वाटते की त्याला सर्व काही समजले आहे खरे तर ते त्याचे अज्ञान असते. आपण कायम ज्ञान प्राप्ती करत राहिले पाहिजे.
म्हणजेच आपण आपले ज्ञान सतत तपासून घेत राहिले पाहिजे.
Alertness.
सावधानता.
धा धानम् धारण करणे
अवधान – चुकीचे धारण करणे
व्यवधान – विशेष (लक्षपूर्वक) धारण करणे
सावधान (काळजीपूर्वक) धारण करणे

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।।2.63।।
Alertness बददल बोलताना ह्या श्लोका बददल सुद्धा सांगायला हवे.
आपले लक्ष कसे विचलित होऊ शकते त्याचे विवरण इथे दिले आहे.
जर आपण रागात असू तर आपल्या मनात चलबिचल असते, त्याचा आपल्या स्मृती वर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अर्थात बुद्धिभेद होतो, आणि बुद्धिभेद झाला की विनाश अटळ आहे.
(नज़र हटी दुर्घटना घटी 😀😀)
पुन्हा आपल्या मूळ श्लोका कडे येऊ यात.
जर अज्ञानाचे आवरण ज्ञानावर नसेल तर मोह होणार नाही.
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्।।5.16।।
मागील अध्यायात आपण ज्ञानाची महती जाणून घेतली आता ह्या अध्यायात ज्ञानाचे गुणविशेष जाणून घेऊ.
ह्या श्लोकाची वाक्य रचना आधीपेक्षा थोडी निराळी आहे. येथे भगवान् म्हणतात की
येषां आत्मनः अज्ञानं ज्ञानेन नाशितम्
म्हणजे ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. ज्ञान म्हणजे सत्य.
सत्य हे एक आणि एकच असते. असत्य (गोष्टी, कारणे) कितीही असू शकतात. म्हणून 4 थ्या अध्यायात ज्ञानाला अग्नि ची उपमा दिली आहे.
यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः।।4.19।।

जे कर्म कोणताही संकल्प किंवा कामना न ठेवता केले ते कर्म ज्ञान रुपी अग्नीत जळून भस्मसात झाले म्हणजेच असे कर्म केले ज्याच्या फळाची अपेक्षाच नष्ट झाली. निष्काम कर्मः तोच खरा पंडित.
आता प्रश्न असा आहे की हे ज्ञान मिळवायचे कसे? ते खाली दिलेल्या श्लोकात स्पष्ट केले आहे.
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः।।4.34।।
याचा थोडक्यात अर्थ असा की
ज्ञानेच्छू ने गुरु कडे अतीशय नम्रपणे त्यांची सेवा करुन विनंती केल्यास गुरु ज्ञान देइल.
पण हे इतके काही साधे सोपे नाही.
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः.। ।
उपदेक्ष्यन्ति=उप +दिश ह्या धातूचा भविष्यकाळ वापरला आहे.
ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः=ज्ञानिन तत्व दर्शिनः
म्हणजे गुरु फक्त ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग दाखवेल.
तो काळच वेगळा होता. आताच्या सारखे पैसे भरून डिग्री विकत घेता येत नव्हती.
म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला आत्मज्ञान च झाले पाहिजे.
असे आत्मज्ञान कसे असावे?
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्।।
मूळ श्लोकाची दुसरी ओळ.
तेषाम् आदित्य वत् ज्ञानं, तत् परम ज्ञानं
कमालीचे सुंदर शब्द वापरले आहेत.
परम म्हणजे सर्व श्रेष्ठ
आदित्यवत्
वत् म्हणजे सारखे.
म्हणजेच सूर्यासारखे… प्रकाशमान.
ज्ञानं प्रकाशयति।
ह्या वाक्यात ज्ञान हा कर्ता समजायचे की कर्म?
ज्ञान प्रकाशित करते की ज्ञान प्रकाशित होते?
येथे सूर्याची उपमा चपखल दिली आहे.
ज्ञान हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशित असते. ते स्वयंसिद्ध असते.
(त्या काळी सूर्य स्वयंप्रकाशित आहे हे माहीत होते हे पण विशेष)
उजेडी राहिले उजेड होऊन
मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड…
(कायम मनात असणारा अभंग)

ज्याला असे आत्मज्ञान झाले त्याचे वर्णन खालील श्लोकात दिले आहे.
प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते।।2.55।।

आत्मनि आत्मनात आत्मनः ज्ञानं
अब्राहम लिंकन चे शब्द थोडे स्वतः साठी बदलून लिहीते
For the self, by the self, of the self
असे स्वतः, स्वतः साठी स्वतः च मिळवलेले ज्ञान हे परम ज्ञान असते.
आत्मन्येवात्मना तुष्टः=आत्मन् एव मना तुष्टः
ज्याच्या कडे असे ज्ञान आहे तो स्वतः मुळेच संतुष्ट झाला. तो स्थितप्रज्ञ झाला. Man of steady wisdom.
आपल्या कड़े ज्ञानी माणूस ओळखण्यासाठी काही परिक्षा आहेत.
ज्ञान मिळवण्यासाठी काही माध्यम तर हवेच.
त्याला म्हणायचे प्रस्थानत्रयी.
प्रस्थान म्हणजे जाणे, त्रयी म्हणजे तीन. श्रुती प्रस्थान (उपनिषद्) स्मृति प्रस्थान (भगवद् गीता) न्यायप्रस्थान (ब्रह्मसूत्र)
ज्याला आपण logical explanation म्हणतो ते ह्या प्रस्थानत्रयी मुळे शक्य होते.
तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः।।5.17।।
तत् बुद्धयः तत् आत्मानः तत् निष्ठाः तत् परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषाः।
परायणा =परम् +अयनम्
परम म्हणजे श्रेष्ठ
अयनम् म्हणजे जाणे
मागच्या श्लोकात आपण ज्ञानाचे गुणविशेष पाहिले. आता ज्ञान प्राप्त झाले कि काय होते त्याबद्दल सांगितले आहे.
तदबुद्धयः बुध धातू, बुध होणे, बोध होणे. म्हणजेच ज्ञान प्राप्त होणे. राजपुत्र सिद्धार्थ ला दुख अजिबात दिसणार नाही अशी तजवीज करुन ठेवली होती. आणि अचानक त्याला दुःख दिसले. माणसाला दुःख का होते ह्याच्या शोधात तो बाहेर पडला आणि बुद्ध झाला. त्याचे सारे संशय दूर झाले.
ज्याची बुद्धि केवळ ज्ञान प्राप्त करण्यासाठीच काम करते आहे, ज्याचे मन सुद्धा बुद्धिप्रमाणे काम करते आहे त्याला जे ज्ञान प्राप्त झाले आहे, त्या ज्ञानाने सर्व किल्मिष धुवुन टाकली जातात अशा आत्म्याची पुनरावृत्ती होत नाही म्हणजेच त्यांना परमगति प्राप्त होते. इथे गती हा शब्द जरी वापरला असला तरी त्याचा अर्थ निर्वाण असा आहे
(हे वाचत असताना मला परमवीर चक्र हा शब्द आठवला, चक्र म्हणजे सुद्धा गती च. पण आता ह्या पुरस्काराची ऊंची जाणवते. त्यामागची भावना किती उदात्त आहे ते जाणवते
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः।।5.18।।
ह्या श्लोका मधे ज्ञानी पुरुषाचे लक्षण सांगितले आहे.
गवि गो गाय
हस्तिनी हत्ती
शुनि कुत्रा
श्वपाके कुत्रा खाणारे
गाय कुत्रा आणि हत्ती ह्या प्राण्यांचे नाव का घेतले आहे? त्या काळात हे प्राणी जास्त दिसत होते म्हणून असे लिहिले आहे का मला कल्पना नाही.
येथे पंडित म्हणजे ज्ञानी पुरुष जो विद्यमान आहे त्याचबरोबर विनयशील आहे तो सर्वांकडे एकाच दृष्टिने पाहतो.
समदर्शिनः
मात्र
गाय- सत्वगुणी
हत्ती- रजोगुणी
कुत्रा- तमोगुणी
श्वपाके- शूद्र..विद्याविहीन
या सर्वांना समदृष्टीने पाहणारा.
एकतर सर्वांप्रती निर्लेपता…दुसरे सर्वांच्या दु:खांप्रती करुणा
अशा अर्थाने विचार केला तर ही उदाहरणे समर्पक आहेत असे वाटते.
मागच्या श्लोकात ज्ञानी पुरुषाचे वर्णन करताना तो सूर्यासारखा स्वयंप्रकाशित असावा असे म्हटले होते, त्याच सूर्याचा हा गुण आहे सर्वांकडे सारख्या दृष्टीने पाहण्याचा.
समदर्शी तू खरा..
भा. रा. तांबे यांची कविता, ह्यातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे.
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः।।6.29।।
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन।
सुखं वा यदि वा दुःखं सः योगी परमो मतः।।6.32।।
वरील दोन श्लोकात सुद्धा समदर्शी असण्याचे दाखले दिले आहेत.
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः।।5.19।।
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः।।5.20।।
वरील दोन श्लोकात सुद्धा ज्ञानी माणसाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
इथे सुद्धा सूर्या ची उपमा चपखल लागू होत आहे.

इह एव तैः जितः सर्गो येषां
सर्ग सृज म्हणजे निर्माण करणे
सर्गो तैः जितः म्हणजे निर्माण होणाऱ्या गोष्टी ला जिंकले म्हणजेच जन्म जिंकला, म्हणजेच पुनर्जन्माची आता गरज नाही. कारण
साम्ये स्थितं मनः
मन आता समदर्शी आहे, सगळ्यांना एकाच दृष्टिने पहात आहे.
आधीच्या श्लोकात सूर्य समदर्शी आहे असे सांगितले आहे, असा समदर्शी सूर्य निर्दोष आहे. त्याला कोणाचेही दोष दिसत नाहीत, त्यामुळे तो सर्वांना सारखाच प्रकाश देतो. आणि हे निर्दोषत्व ब्रह्मा सारखे आहे (ब्रह्म निर्दोष ही सम)
असा हा ज्ञानी पुरुष ज्याला कुणाचेही दोष दिसत नाहीत तो ब्रह्म तत्व होउ शकतो.
अहं ब्रहमास्मि..

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाऽहममृतस्याव्ययस्य च।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च।।14.27।।
मी कोण आहे?
स्वतः भगवान सुद्धा ब्रम्ह आहेत.
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः।।5.20।।
प्रहृष्ये =प्र +हृष हर्षित होणे.
न उद्विजेत म्हणजे सैरभर न होणे
स्थिरबुद्धिः ज्याची बुद्धि स्थिर आहे असा
असम्मूढा ज्याच्या कडे मोह शिल्लक नाही असा
ब्रह्मविद, विद विद्या ज्याला ब्रह्म तत्त्वाचे ज्ञान आहे असा
ब्रहमाणि स्थित जो ब्रहमतत्वात स्थिर झाला आहे असा
थोडक्यात ज्याला प्रिय अप्रिय सर्व सारखेच असते, ज्याला हर्ष होत नाही आणि जो उद्विग्न सुद्धा होत नाही असा तो ब्रहमतत्वात स्थिर झाला आहे.
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।

स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः।।5.20।।
हा श्लोक म्हणजे 5.19 श्लोका चाच पुढील भाग असे म्हणता येईल.
न प्रहृष्ये प्र +हृष = हर्ष होत नाही
प्रियं प्राप्य =आवडणार्‍या गोष्टी मिळाल्या म्हणून
नोद्विजेत्प्राप्य न+ उद् विज (सैरभर होत नाही)
च +अप्रियम्. न आवडणार्‍या गोष्टी मिळाल्या म्हणून.
असे कोणाचे होत नाही? तर ज्याची बुद्धि स्थिर आहे, स्थिरबुद्धिः
असम्मूढा अ सम+मूढ म्हणजे ज्याच्या कडे मोह शिल्लक नाही. म्हणजेच तो ब्रह्मविद (ज्याला ब्रह्म कळले आहे असा)
ब्रहमणि स्थितः तो त्याच ब्रहमतत्वात स्थिर झाला आहे असा.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम्।

स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते।।5.21।।
20 व्या श्लोका प्रमाणे जर ज्ञानी माणसाला (ब्रह्म तत्त्वांमध्ये स्थिर असलेल्या) कोणत्याही प्रिय अप्रिय गोष्टींमुळे आनंद किंवा दुःख होत नसेल तर त्याची मानसिक स्थिति कशी असेल बरे?
बाह्य स्पर्शेषु (ज्ञानेंद्रियाद्वारे आणि कर्मेन्द्रियांद्वारे होणाऱ्या जाणिवा) आसक्त आत्मा
विन्दयति आत्मानि
विद् वेत्ति प्राप्त करणे (विद्यमान)
यत् सुखम् विन्दयति
सः ब्रहमयोग युक्त आत्मा
सुखम् अक्षयं अश्नुते
अक्षय पात्र (द्रौपदीची थाळी)
अश् धातू अशनम् (जेवणे) उपभोग घेणे.

ज्याचा आत्मा ब्रहमतत्व युक्त असा आहे, जो बाह्य जगाबद्दल (मिळणाऱ्या सुखांबाबत) आसक्त आहे त्याला (बाहेर सुख शोधण्याची गरजच काय?) जे आत्म सुख प्राप्त होत असते ते चिरंतन असते

आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते।।2.55।।
स्वतः स्वतः मुळेच तृप्त असलेला असा स्थितप्रज्ञ
आनंदाचे डोही आनंद तरंग…
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।

आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः।।5.22।।
हा श्लोक आपल्या आजकाल चालू असलेल्या वागणूकी संबंधी उपदेश देणारा आहे.
ह्याचा एक अर्थ असा की आजकाल आपण सर्वच सुखाच्या मागे धावत असतो. आपली एक इच्छा पूर्ण झाली की आपल्याला दुसरी इच्छा निर्माण होते आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत राहतो. म्हणजे सुख दुःखाचे हे चक्र अविरत फिरत राहते.
आता हि सुखे कोणत्या प्रकारची आहेत तर जी
संस्पर्श +ज जायते
संस्पर्शे जायते इति भोगाः
स्पर्शाने मिळणारे सुख मग ते नेत्रसुख असेल, कर्णसुख असेल नाहीतर स्पर्शसुख.
(स्पर्श संपला की सुख संपले म्हणून आपण नवीन स्पर्श शोधायचा प्रयत्न करतो, stimulus)
ह्याचा अंत आहे जसा आरंभ आहे
आदि अंत वत्
म्हणजेच हे सुख नाशवंत आहे.
आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अक्षय (ज्याचा क्षय होत नाही असा) नाही.
म्हणून
बुधः तेषु न रमते
बुधः बोध होत राहतो असा
मला सर्व समजले असे जर म्हटले तर तो बुद्ध
येथे बुध शब्द वापरला आहे म्हणजेच जो सतत सावधान असतो, समजून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो तो.
असा बुध विनाशी सुखाच्या फंदात पडत नाही.
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्।

कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः।।5.23।।
शक्नोती +इह +एव
सोढुं सह् धातू सहन करणे
प्राक् पूर्वी
शरीर विमोक्षणात्
शरीरस्य विमोक्षणं
आत्मा शरीराला मोक्ष देतो
जो आपल्या मृत्यूपूर्वी सहन करु शकतो…
काय सहन करु शकतो?
कामक्रोध उद्भवं वेगं
वेगं विज् धातू चलबिचल होणे
वेगं सोढुं शक्नोती
रामरक्षेत सुद्धा वेगं हा शब्द आला आहे
मनोजवं मारुततुल्य वेगं
इथे काम आणि क्रोध ह्यातून उद्भवणारा वेग ( झळा) जो मृत्यू होण्यापूर्वी सहन करु शकतो तोच योगी आणि तोच सुखी..
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः।

स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति।।5.24।।

यः अन्तः सुखः अन्तरा रामः तथा अन्तर जोतिः एव यः, सः योगी
सः अधिगच्छति
ब्रह्मभूताः योगी ब्रह्मनिर्वाणं

आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते।।2.55।।
आत्मनि एव आत्मना तुष्टः

आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम्‌ ।
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान्‌ स न: प्रभु: ।।16।। रामरक्षा
रम् धातू पासून सुरवात करुया.
रम् रमणे रामः
जिथे रमावेसे वाटते तेथे राम असतोच.
(दशरथाच्या आयुष्यातील रामच संपला. हनुमानाचे छाती फाडून राम दाखवला)
अन्त शब्दाचे दोन अर्थ होतात
आतला (अन्तपूर)
शेवट
आता मूळ श्लोकातील शब्द
अन्तः आरामः तथा अन्तर जोतिः अन्ता सुखः
आता अर्थ खूपच सोपा झाला
ज्याच्या आतमध्येच सुख आहे, जो ते उपभोगत आहे, जो स्वतः च्या आतल्या प्रकाशाने उजळून गेला आहे असा योगी ब्रह्म तत्त्वाशी जोडला गेला आहे.
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः।।5.25।।
लभन्ते लभ् धातू लाभते
ब्रह्मनिर्वाणमृषयः = ब्रह्मनिर्वाणम् ऋषयः
निर्वाण चा अर्थ मागच्या वेळेस सांगितला
ज्याला ब्रह्मनिर्वाणाची स्थिति प्राप्त झाली आहे असा ऋषि, जो…
यतात्मानः यत् आत्मनः
यत् यम नियम (दुसर्‍या साठी नियम, स्वतः साठी यम)
यत आत्मा म्हणजे सर्व दृष्टीने नियमानुसार चालणारा
(स्वतः हून पाळण्याचे नियम जसे सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह वगैरे)
छिन्नद्वैधा =द्वैधा द्विधा द्वि दुविधा छिन्न झाल्या, छाटल्या गेल्या.
क्षीणकल्मषाः क्षी धातू क्षीण होणे, नष्ट होणे
कल्मष म्हणजे पाप
रतः रममाण होणारा (कशात)
सर्व भूत हिते म्हणजे सर्वांच्या सुखात
असा ऋषि ज्याचा आत्मा नियमबद्ध आहे, ज्याच्या मनात कोणत्याही दुविधा नाहीत, ज्याची पापे नष्ट झाली आहेत आणि ज्याला दुसर्‍यांच्या सुखात आनंद मिळतो असा त्याला मोक्ष प्राप्त होतो

5व्या अध्यायातील 24. 25. 26
ह्या श्लोकात निर्वाण हा शब्द आला आहे (तसेच तो 2.72 आणि 6.15 मध्ये पण आलेला आहे)
म्हणुन निर्वाण शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला हवा.
निर +वाण
वा वाहणे
नि म्हणजे वेगळे होणे, त्याच्याशिवाय
(निर्वात, निरिच्छ निर्दोष वगैरे )
जो वाहतो तो वायू,
सर्व वायूंचे वाहणे थांबले (श्वास थांबला)
निर्वाण हा शब्द फक्त गीतेत नाही तर बौद्ध, जैन धर्मातील साहित्यात आला आहे.
निर्वाण षटकम् तर माहित आहेच.
निर्वात म्हणजे दिव्यातील वात संपणे
निर्वात म्हणजे वारा सुद्धा नाही म्हणजे जिथे कांहीच नाही अशी पोकळी. Vacuum. Barometer मधे पाऱ्याच्या वर असते तशी. ती पोकळीच असते हा सिद्धांत Torricelli नं मांडला. म्हणून vacuum measurement साठी torr टॅार हें युनिट आहे. समुद्रसपाटीला barometer मधे पारा ७६ सें.मी. इतका असतो. जितके वर जाऊं तितकी पाऱ्याची उंची कमी म्हणजे निर्वातता अधिक.
पांडव जेव्हा स्वर्गारोहण करत असतात, तेव्हां अमुक उंचीवर गेल्यावर युधिष्ठिर सांगतो “इथून पुढे संवाद बंद, आत्मकेंद्रित रहायचं” हिमालयात जाऊन साधना करण्यामागे तें रहस्य असूं शकतं.
निर्वाण चा साधारण अर्थ मोक्ष, मुक्ति
तात्विक अर्थ आत्मा आणि ब्रहमतत्वाची सांगड
जैन तत्वज्ञानाप्रमाणे आत्म्याची मुक्ति
बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाप्रमाणे सर्व इच्छां पासून मुक्त, पुनर्जन्मापासून मुक्ति.
ग्रंथसाहिबा मध्ये निर्बाण असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुद्धा मुक्ती.
सर्वात शेवटी निर्वाण षटकम्
ज्यामध्ये 6 श्लोक आहेत. जेव्हा आदि शंकराचार्य आपल्या गुरुंना प्रथम भेटले त्यावेळी त्यांनी स्वतः ची ओळख ह्या 6 श्लोकातून सांगितली. जरुर त्याचा अर्थ समजून घ्या.
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्।

अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्।।5.26।।
अभितः चोहीकडे, सर्वबाजूने
अभि शब्दाचा योग्य वापर झालेला दिसून येतो काही शब्दात
रक्ताभिसरण
अभिराम वगैरे.
विदितात्मनाम् विदितः आत्मन् येन सः
विदित विद् विद्यते
ज्याला आत्मज्ञान झाले आहे असा
(ज्ञानेश्वरांनी आत्मानुभव लिहिले)
वर्तते वृत धातू म्हणजे असणे, to exist.
ज्याला आत्मज्ञान झाले आहे त्याच्या आजूबाजूलाच ब्रह्म निर्वाण असते जो….
काम क्रोध
वियुक्त (न युक्त)
यतचेतसाम्, यतचेतस्, यतं चेतः यस्य सः ज्याचा स्वतः वर ताबा आहे असा.
यतीनां म्हणजे ज्ञानी पुरुष.
जो राग लोभ ह्यापासून मुक्त आहे, ज्याचा स्वतः वर ताबा आहे असा ज्ञानी, त्याच्या आजूबाजूलाच मुक्ति चा मार्ग आहे.
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।

प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ।।5.27।।
योगाभ्यास आणि प्राणायाम करणार्यांना हा श्लोक चांगलाच मनाला भावेल.
5 वा अध्याय उपनिषद् ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र ह्यावर आधारित आहे.
यज्ञभोक्तामहापुरुषमहेश्वरः असे नाव आहे ह्या अध्यायाचे.
विशेषतः 27 आणि 28 व्या श्लोकात ध्यानयोगावर विवेचन केले आहे.

प्राणापानौ म्हणजे श्वास आणि उच्छ्वास
समौ कृत्वा म्हणजे समसमान करणे
नासा अभ्यंतर चारिणौ म्हणजे आपल्या नाकपुड्यातून चालणारा
स्पर्शान् कृत्वा स्पर्श करतो
स्पर्श फक्त हातानेच होतो असे नाही तर तो नाकाद्वारे गंध, (जीभेद्वारे रस आणि शब्दांचा सुद्धा) आणि अर्थात डोळ्याने रंग आणि रुप.

बहिः बाह्यान् च चक्षू एव अन्तरे भ्रुवोः
आपण जेव्हा ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा डोळे मिटून बाह्य जगाशी संपर्क थांबवण्याचा प्रयत्न करत असतो.
मी प्रयत्न करत असतो असे म्हणते आहे कारण डोळे मिटून घेतले तरी आपल्याला दिसत असतेच. त्याला कारण आपले मन. सर्व काही आपल्या मनावर अवलंबून असते. अगदी जागेपणी सुद्धा आपले लक्ष नसेल तर शेजारच्या माणसाचे बोलणे ऐकू येत नाही. अगदी सहज आपण म्हणतो, माझे लक्ष नव्हते परत सांग.
तर मनावर ताबा मिळवायचा असेल तर डोळे बंद करून आपल्या दोन भुवयांच्या मध्ये दृष्टी ठेवून आपला श्वास आणि उच्छ्वास समान ठेवून, श्वासामूळे निर्माण होणारा ध्वनी (स्पर्श) ऐकण्याचा प्रयत्न करायचा.

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।

विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः।।5.28।।
अशाप्रकारे (ध्यानयोगाचा अभ्यास करुन)
यतेन्द्रियमनोबुद्धिः
यतानि (संयतानि) इन्द्रियाणि मनः बुद्धिश्च
मुनिः मोक्षपरायणः
मन आणि बुद्धी ह्यावर ताबा मिळवलेला मुनी मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू करतो.
मोक्षपरायण मुमुक्षू
क्षू म्हणजे इच्छा करणारा
विगतेच्छाभयक्रोधो
विगता इच्छा
विगतः भयं
विगतः क्रोधः
इच्छा भिती राग हे सर्व लांब गेले. ह्या सर्वांपासून मुक्ती मिळेल.
मुक्तीचे सुद्धा 5 प्रकार सांगितले जातात.
सालोक्य, सार्ष्टि, सारूप्य, सामीप्य और सायुज्य
मुक्ती हा विचार म्रृत्यु नंतरचा असल्याने (आणि मी science student असल्याने, त्याहीपेक्षा मला मृत्यू पश्चात् आपले काय होते हे जाणून घेण्यात रस नसल्याने) इथेच थांबते.

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।

सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।5.29।।
5व्या अध्यायातील हा शेवटचा श्लोक.
शान्तिम् ऋच्छति
ऋ धातू म्हणजे मिळवणे
सुहृदं- साधू हृदयः यस्य सः
सुहृदं सर्वभूतानि म्हणजे जो सर्वांप्रती चांगले भाव ठेवून आहे असा
ज्ञात्वा मां मला जाणून घेतल्यानंतर
सर्वलोकमहेश्वरम् सर्वेः लोकाः महान ईश्वर
भोक्तारं भुज भुन्ज धातू भोग घेणारा, उपभोग घेणारा
यज्ञतपसां यज्ञ (ह्याचा अर्थ पूर्वी सांगितला होता)
तपस तपश्चर्या
आता प्रश्न असा आहे की यज्ञ आणि तप ह्याचा उपभोग घेतला म्हणजे काय?
ध्यानयोग करताना ज्ञान सुद्धा तितकेच महत्त्वाचे.
मागील श्लोका मध्ये भगवान् म्हणाले होते की मी पाप आणि पुण्य घेत नाही पण मी यज्ञ-तपांचा भोक्ता आहे

भोक्ता यज्ञ-तपांचा मी सोयरा विश्व-चालक ।
जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिला चि तो ॥ २९ गीताई
म्हणजे ह्या विश्वाची धुरा सांभाळणारा मीच आहे.
धुरा धुर्य (बैल) बुद्धिमान आणि शक्तिमान असा तो
शहाणा बैल जोडलेल्या गाडी चा गाडीवान बैलावर विश्वास ठेवून झोपून जातो तसेच
हा परमात्मा विश्वाचा बैल आहे. त्याला सर्वांबद्दल सहानुभूती आहे आणि तो आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवणार आहे.
हे सर्व जेव्हा तुला समजेल तेव्हा तुला शांती प्राप्त होईल.
🙏🙏🙏🙏

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Anagha A

आरोग्य कायदा पर्यावरण अर्थशास्त्र संस्कृत साहित्य आणि इतर बर्‍याच गोष्टींचे ज्ञान घेऊन गीतेचा अर्थ माझ्यापरीने लावण्याचा प्रयत्न केला आहे.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments