बध्दकोष्ठतेच्या व्याधीतून सोडविणारा सोपान

इचलकरंजीचा एक रुग्ण माझ्याकडे आला होता. गेले तीन दिवस शौचालाच झालेली नाही आणि शौचालयात गेले की रक्ताची धार लागते या मुख्य तक्रारीसह पोटाच्या अनेक तक्रारी त्याने सांगितल्या. गेली सहा वर्षे हा त्रास होताय असेही तो म्हणाला. त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की, दीर्घकाळ बध्दकोष्ठाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने त्याची पोटातील यंत्रणा सगळीच कोलमडून पडली आहे. शौचाला होत नाही हे लक्षात आल्यावर सुरुवातीला त्यानी रोज कसली कसली सारक चूर्ण घेण्यावर भर दिला. आता कसलही चूर्ण खाल्ल तरी त्याला शौचालाच होत नाही असं त्याच म्हणणं आहे. त्यामुळे बेचैनी, गॅसेस, त्वचेचे विकार अशा अनेक समस्यांनी मूळ धरायला सुरुवात केली होती. बरोबरच आहे, शरीरातील विषद्रव्यांचा निचरा झाला नसल्याने त्यांचा उपद्रव सुरु झाला होता.

एकंदरच त्याची समस्या गंभीर होती. विविध ठिकाणची औषधे, इंजेक्शन्स आणि असं बरच काही पचवूनही फरक पडत नाही यामुळे हवालदिल झालेला हा रुग्ण आता निसर्गोपचारात काही मिळते का, हे पाहण्यासाठी मोठ्या आशेने माझ्याकडे आल्याचे मला जाणवले. त्यामुळेच त्याला धीर दिला आणि स्पष्टपणे सांगितले की मी सांगतो ते उपाय सलग एक वर्षभर करायची तयारी असेल तर तू यातून नक्की बरा होशील. बरे होणार या विश्वासापुढे त्याला एक वर्षाचा काळ छोटा वाटला. त्यामुळे तो तयार झाला. आता चार महिने झाले त्याचं म्हणणं आहे, पूर्वीपेक्षा पन्नास टक्के स्थिती सुधारली आहे. लागलं तर आणखी वर्षभर उपचार करतो, असं तो आठवणीनं मला दरवेळेस सांगतो. त्याला या व्याधीतून मुक्त होण्यासाठी जो सोपान दिला तो सांगण्यापूर्वी या आजाराबाबत थोडं जाणून घेवू. या उपचारांना मी सोपान असं का म्हटलं, असाही प्रश्न हे वाचताना पडला असेल. त्याचा आधी खुलासा करु आणि मग पुढे जाऊ. सोपान म्हणजे शिडी. उंचावर पोहोचण्यासाठी शिडीचा उपयोग केला जातो. पण, इच्छित ठिकाणी जाण्यासाठी शिडीच्या सगळ्या पाय-यांवर पाय देवूनच पुढे जावे लागते. एखादी पायरी गाळायचा प्रयत्न केला पडण्याचा धोकाच अधिक असतो. यातही तसंच आहे. जे उपाय सुचविले आहेत ते त्या क्रमाने आणि सगळे केले तरच या आजारातून बाहेर पडता येईल. स्वतःला सोयीचे वाटते ते करायचे आणि बाकी सोडायचे असे केले तर फायद्यापेक्षा तोटाच होवू शकेल. म्हणून न कंटाळता हे करणे गरजेचे आहे.

बध्दकोष्ठता म्हणजे काय ?

माझ्याकडे आलेल्या त्या रुग्णाला विचारलं, सकाळी कधी उठता ? साडेसात, आठ वाजता असं त्यांच अपेक्षित उत्तर आलं. माझा पुढचा प्रश्न होता, शौचाला कधी जाता ? तो अडखळला. म्हणाला, तसं काही नाही. पण, दोन तीन कप चहा प्याल्या शिवाय शौचाला जायची भावनाच होत नाही.
बध्दकोष्टता म्हणजे काय ? या प्रश्नाचं उत्तर त्याच्या या विधानातच आहे. सकाळी जाग आल्यावर लगेचच शौचाला जाण्याची भावना होणे, शौचालयात गेल्यावर कसलेही प्रयत्न न करता पिवळ्या रंगाचा मल बांधिव स्वरुपात बाहेर पडला पाहिजे. हा मळ पाणी न ओतताही शौचाच्या भांड्यातून टाकीत गेला पाहिजे, भांड्याला चिकटून राहू नये. शौच झाल्यावर पोट रिकामं आणि शरीर हलकं वाटलं पाहिजे. हे ज्यांच्या बाबत घडतं त्यांचेच पोट साफ होते. पण, असे घडत नसेल तर आपण कमी अधिक प्रमाणात बध्दकोष्टतेच्या विकाराचे शिकार आहोत असे मानायला हरकत नाही. केवळ असं मानून उपयोगी नाही तर त्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाय करायला हवेत. नाहीतर भविष्यात मूळव्याधीपासून अनेक विकारांना बळी पडावे लागेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

बध्दकोष्ठता होण्याची कारणे

आपल्याला होणां-या कुठल्याही विकाराचा थेट संबंध आपल्या जीवनशैली, आहार विहार आणि विविध सवयींशी असतो. बध्दकोष्टतेचा आजारही तसाच आहे. निसर्ग नियमांचे उल्लंघन करुन केलेली मस्ती बध्दकोष्टतेच्या रुपाने आपल्यावर सूड घेत असते. त्यामुळे बध्दकोष्टतेची काही प्रमुख कारणे पाहू.
1. रात्री उशीरा झोपणे आणि सकाळी उशीरा उठणे म्हणजेच झोपण्याच्या आणि सकाळी उठण्याच्या चुकीच्या वेळा. सतत रात्रपाळी असणारा व्यवसाय किंवा नोकरी.
2. मसालेदार, चमचमीत, तळकट आणि अती तिखट आहार. यामध्ये प्रामुख्याने सतत हॉटेलमध्ये खाण्याची सवय अत्यंत घातक आहे. सततचा मांसाहारही या व्याधीला निमंत्रक आहे. सतत शिळे अन्न खाणे, प्रक्रिया केलेले पदार्थ सतत खाणे, चहा आणि कॉफीचे सतत आणि अती सेवन करणे, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांचा आहारातील अती समावेश, थंड पेय, थंड पाणी, आईस्क्रिम यांचे वारंवार सेवन करणे, पचायला जड असणारे पदार्थ आहारात असणे ही काही कारणे आहेत.
3. सगळ्यात महत्त्वाचे कारण कोणते असेल तर ते म्हणजे व्यायामाचा अभाव. बैठे किंवा सतत उभे राहून काम.
4. जेवणाच्या अस्तव्यस्त वेळा आणि अस्ताव्यस्त प्रमाण हेही याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल.
5. तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान अशा प्रकारची व्यसने करणे
याशिवाय आणखीनही काही कारणे आहेत पण, त्याचा विचार रुग्णानुसार करावा लागेल.

सामान्यपणे या व्याधीचा विचार करताना दोन प्रकारात करावा लागेल.
1. प्रारंभिक स्थितीतील बध्दकोष्ठता – यामध्ये शौचाला साफ न होणे, भूक मंदावणे, गॅसेस होणे, गॅसेसना दुर्गंध येणे, शौचाला जाण्याची भावनाच न होणे, पित्ताचा त्रास होणे, उलट्या होणे, छातीत जळजळणे आणि दुखणे, थकवा येणे, सुस्ती येणे अशी लक्षणे जाणवू लागतात.
2. बध्दकोष्टतेचे बळावलेले स्वरुप – यात मलाचे खडे होणे, वारंवार शौचाची भावना होणे पण, कुंथल्यावर खडे पडणे, रक्त पडणे, गुदद्वाराला कात्रे पडणे, गाठी येणे, पोटात जळजळणे, दुखत राहणे, मलाचा रंग काळपट होणे, एकाच वेळी शौचाला न होता वारंवार भावना होणे अशी लक्षणे दिसतात.
बध्दकोष्टतेचा आजार ओळखून त्यावर वेळीच उपाय केले नाहीत तर यातून मधुमेहासह विविध प्रकारचे गंभीर आजार होवू शकतात.

बध्दकोष्टतेवर मात करण्याचा सोपान
1. रात्री 10 वाजता झोपावे आणि पहाटे 5 वाजता उठावे. जाग्रणे अजिबात करु नयेत.
2. पहाटे उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावे. शौचाला रक्त पडण्याची तक्रार असेल तर लिंबू पाण्याऐवजी एक चमचा लिंबाच्या रसात एक चिमूट सैंधव घालून ते चाटून खावे. किंवा झुपकेदार लाल जास्वंदीचे फूल देठ काढून टाकून खडीसाखरेच्या दोन खड्यांसोबत चावून खावे.
3. यानंतर शौचाला जावे. सुरुवातीला होत नाही. पण, तरीही नित्यनियमाने जावे. हळू हळू शरीराला ती सवय लागते आणि पोट मोकळे होवू लागते.
4. मळाचे खडे पडत नसतील तर एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे आल्याचा रस टाकावा आणि दोन चमचे एरंडेल तेल टाकून हे मिश्रण प्यावे. पंधरा मिनिटाने शौचाचा आवेग येतो आणि खडे पडतात.
5. नंतर किमान चार किलोमीटर नेहमीच्या गतीने चालण्याचा व्यायाम करावा. सुरुवात दोन किलोमीटरने करावी आणि पंधरा दिवसाने एक किलोमीटर वाढवत चार किलोमीटरला पोहोचावे. किंवा चोवीस सूर्य नमस्कार घालावेत. सुरुवात बारा नमस्काराने करावी आणि आठवड्याला एक नमस्कार वाढवावा.
6. सकाळचे जेवण 11 पूर्वी आणि रात्रीचे जेवण 8 पूर्वी घ्यावे. मधल्यावेळेत भूक लागली तर उपमा, फळं असा हलका नाष्टा घ्यावा. सकाळच्या निम्मे जेवण रात्री घ्यावे. जेवणापूर्वी अर्धा तास, जेवताना आणि जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये.
7. चहा आणि कॉफी बंद करावी. दुपारी झोपू नये.
8. या याधीत घ्यावयाच्या औषधांसाठी माझ्याशी खालील नंबरवर किंवा जवळच्या वैद्यांशी संपर्क करावा.
9. पहिल्या आठवड्यात रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. दुस-या आठवड्यात एक दिवसा आड घ्यावे. तिस-या आठवड्यात दोनदा घ्यावे. चौथ्या आठवड्यात एकदाच घ्यावे.
त्यानंतर पंधरा दिवस रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यासोबत दोन चमचे त्रिफळा चूर्ण घ्यावे. नंतरच्या पंधरा दिवसात रोज एक चमचा घ्यावे.
10. हे खाऊ नये – बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळकट – मसालेदार – अती तिखट पदार्थ, दही, गहू, तूर डाळ, आंबाडीची भाजी, आईस्क्रिम, थंड पेय, थंड पाणी, थंड पदार्थ, शिळे अन्न, मांसाहार, खारवलेले पदार्थ, हवाबंद डब्यातील पदार्थ, कडधान्ये, श्रीखंड, बासुंदी, दोडका, पनीर, आंबवलेले पदार्थ, हरभ-याची डाळ आणि त्याचे पदार्थ
11. हे जरुर खावे – सगळ्या पालेभाज्या, फळे (त्यातही पेरु, केळी, संत्री, मोसंबी), लोणी काढलेले ताजे ताक, ज्वारी, कांदा, मुळा, कोबी, पडवळ, दुधी भोपळा, कोमट पाणी, कोमट अन्न, ताजे अन्न, हळद घातलेले दूध

ह्या अकरा उपायांचा सोपान चढूनही बध्दकोष्टतेची तक्रार दूर झाली नाही तर मात्र वैद्यांना अथवा निसर्गोपचार तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटून उपाय करावेत
.
– आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार, योगा, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
मोबाईल नं- 7744964550

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments