दिल्या घरी तू सुखी रहा

प्रत्येक मुलीच्या बापाच्या आयुष्यात थोडं सुख आणि थोडं दुःख घेऊन येणारा हा दिवस. काळजावर दगड ठेवून ह्या वेळेची मनापासून वाट पहायला लावणारा आणि माझ्या आयुष्यात हा दिवस आला ह्याबद्दल परमेशवराचे मनोमन आभार मानायला लावणारा हा दिवस. मुलीच्या आयुष्यात नवीन पर्वाची सुरुवात करून देणारा आणि स्वतःच्या आयुष्यातील उर्वरित भाग आपल्या मुलीच्या गोड आठवणीत रमायला लावणारा हाच तो दिवस. हा दिवस म्हणजे मुलीच्या शुभ लग्नाचा दिवस..

नुकत्याच जन्मलेल्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतल्यापासून सुरू होतो तो हा गोड प्रवास. मुलीला चालायला शिकवण्यापासून ते मुलीच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण वळणावर तिचा हात खंबीरपणे हातात घेणारा, वेळप्रसंगी हलकासा धपाटा देणारा हात ह्या दिवशी मात्र थरथर कापत असतो. मुलीच्या भविष्याची मोठ्ठी मोठ्ठी स्वप्ने पाहणाऱ्या ह्या बापाच्या डोळ्यात आज आनंदाश्रू तरळत असतात. संध्याकाळ पर्यंत घरी ये. जास्त बाहेर राहू नकोस, असे काळजीने म्हणणारा बाप निदान आज तरी आपल्या मुलीला परत घरी कधी येणार असे विचारू शकत नसतो.

हातात फुगे, बाहुली घेतलेली ही छोटीशी परी ते हातात वरमाला घेतलेली वधू हा प्रवास आठवताच बापाला हुंदका अनावर होतो. तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपलेली ही पोर दुसऱ्याच्या स्वाधीन करताना दुखा:बरोबरच मनाच्या एक कोपऱ्यात आनंद देखील असतोच. आज हा बाप आपल्या मुलीला संस्कारांची शिदोरी आणि खूप सारे आशीर्वाद देऊन जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा असेच म्हणत असतो.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments