झोप येईल कशी

आजचा दिवस निघाला, आता रात्र आली
पण डोळ्यावर मात्र झोप नाही आली
रोगराईच सावट सगळ्यांवरच आहे
कडक निर्बंधानाने आमचे हसुच हरवले आहे

झोप येईल कशी, भुकेलं लेकरू डोळ्याने बघतो आहे.
साहेब आम्हा कलाकारांनाही भूक लागते आहे ।।१।।

रंगभूमीने आम्हाला जीवनात अभिनय करायला शिकवला आहे
जीवनाच्या तीनअंकी नाटकात “स्पॉटदादा” हा रोल दिला आहे
रंगभूमीत आयुष्य आणि आयुष्यात रंगभूमी एवढाच प्रवास आहे
पडद्यामागे राबणारे मेकअप, सेट, कॉश्च्युम असे हात आहे

झोप येईल कशी, भुकेलं लेकरू डोळ्याने बघतो आहे.
साहेब आम्हा कलाकारांनाही भूक लागते आहे ।।२।।

तिसऱ्या घंटेनंतर सरकणारा मखमली पडदा आणि
रसिकांच्या टाळ्या,हाच खरा आमचा ऑक्सिजन आहे
एकपात्री, बहुपात्री करत पोटाची खळगी भरायची आहे
आम्ही सेटवर पुरेपूर काळजी घेऊ हा आमचा शब्द आहे

झोप येईल कशी, भुकेलं लेकरू डोळ्याने बघतो आहे.
साहेब आम्हा कलाकारांनाही भूक लागते आहे ।।३।।

धाव धाव धावतोय पण दिशा काही मिळत नाहीये, मला सांगा
कामगार तेवढे सजीव आणि कलाकार काय पुतळे आहेत?
कलाकारांना काम नाही हे वास्तवाचे चटकेच आहेत
मदत नको साहेब आता स्वाभिमानाने जगायचे आहे

झोप येईल कशी, भुकेलं लेकरू डोळ्याने बघतो आहे.
साहेब आम्हा कलाकारांनाही भूक लागते आहे ।।४।।
© माधव जोगळेकर

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments