नाती अशी आणि तशीही – २०

“हॅलो देशपांडे, मी वंदना जाधव बोलतेय. मागे एकदा-दोनदा अशाच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपली ओळख झाली होती. तूम्ही सावलीला भेट द्यायला आमंत्रणही दिले होते पण काहीनाकाही कारणाने ते लांबत गेले.” मी काहीसं आठवत रुकार दिला. “आत्ता मी खूप अडचणीत आहे. सहा महिन्यांपूर्वी माझा अपघात झाला आणि आता मी कायमस्वरुपी व्हीलचेअरवर आहे. माझी आई माझ्याजवळ राहते. पण महिन्यापूर्वी तिला अपेंडिक्सचा त्रास झाला. औषधाने बरा होईल म्हणेपर्यंत पोटामध्येच बर्स्ट झाला. ऑपरेशन करावे लागले. दुर्दैवाने हॉस्पीटलमध्येच तिला पॅरालेसीसचाही अ‍ॅटॅक आला. मी अशी परावलंबी. नाही म्हणायला माझा मुलगा आहे धावपळ करायला पण तो फक्त 26 वर्षांचा आहे. तसा लहानच. म्हणून आईला सावलीत दाखल करायच आहे. पण हॉस्पीटलमध्ये माझा बराच पैसा खर्च झाला आहे. त्यामूळे मी फक्त महिन्याचे पैसे देऊ शकेन. फिजिओथेेरपी वगैरे आपण नंतर बघू. मी बरं म्हणलं.

दोन दिवसात हॉस्पीटलमधूनच आई सावलीत दाखल झाली. शांत स्वभाव. कुठल्यातरी विचारात कायम मग्न. चार दिवस गेल्यानंतर मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. थोड्या प्रयत्नाने त्या बोलायला लागल्या. यजमान चांगल्या सरकारी नोकरीत होते. सधनता होती. तीन मूली. घरात पाहूणे-रावळ्यांचा राबता. आई स्वत: सुगरण असल्यामूळे त्यांना सगळ्यांना नविन नविन पदार्थ बनवून खाऊ घालण्याची हौस. एकंदरीत छान चालले होते. यथावकाश तिन्ही मुलींची लग्न झाली. दोन मुंबईला दिल्या एक कोल्हापूरमध्येच. तिन वर्षांपूर्वी यजमान आजाराने गेले. आईंनी प्रॉपर्टी विकून त्याचे तीन भाग तिन्ही मुलींमध्ये वाटून दिले. यजमानांच्या पेंशनवर त्यांना राहता येणार होते. कोल्हापूरच्या मुलीचे यजमान निवर्तल्यामूळे तिच्याकडेच त्यांनी राहायचे ठरवले. दिड वर्ष झालं आणि हे आजारपण निपजलं. या आजारपणात होती नव्हती तेवढी बचत संपून गेली. नाही म्हणायला पेंशन चालू होती.

मुलगी आजारी. घरात बाईमाणूस कोणी नाही. माझी ही अशी अवस्था म्हणून इथे आले. त्यांनी एका झटक्यात सगळी परिस्थिती सांगीतली. थोडा वेळ थांबून चिंतातूर आवाजात विचारलं “चालेन का हो मी पहिल्यासारखी?” त्यांना बरं वाटावं म्हणून मी हो तर म्हणलं पण नंतर विचार करता लक्षात आलं की, आजींच्या फिजिओथेरपीचे पैसे तर भरणार नाहीयेत. आणि फिजिओथेरपीशिवाय या चालणार कशा? रात्रभर आजींचा प्रश्न मला सतावत राहीला आणि सकाळी निर्णय घेऊन टाकला… आजींना फिजिओथेरपी द्यायची.

पंधरा दिवसात आजी वॉकरच्या सहाय्याने चालू लागल्या. पुढच्या आठवड्यात तर त्या धरुन धरुन जीनाही चढू-उतरु लागल्या. मलाच काय सावलीतल्या प्रत्येकाला खुपच आनंद झाला. आम्ही कौतूकाने त्यांचे चालतानाचे, जिना चढतानाचे व्हिडिओ काढले. आणि जाधवमॅडमना फोन केला. म्हणलं, “तुम्हाला सरप्राईज आहे. आजींना आम्ही फिजिओथेरपी द्यायला लागलो. आणि आजी आता वॉकरने चालतायत, जीनेसुद्धा चढतायत.” त्यांची खुपच थंड प्रतिक्रिया आली. “हो का. बरं झालं. पण तुम्हाला सांगते, की आई चालायला जरी लागली तरी आम्ही तीला सावलीतच ठेवणार आहोत. माझ्या मुलाचं लग्न करायचय या वर्षात. आणि घरी दोन दोन पेशंट म्हणल्यावर त्याला मुलगी कोण देणार? त्यापेक्षा तिच्या पैशात तिला राहूदे. घरी येऊन परत तिची सेवा करायला आमच्या घरात कोणी नाही.” मी निमूट फोन ठेवला.

फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये रुग्णांना आम्ही चिअर-अप करत असतो. यासाठी रुग्णांमध्ये प्रगती झाली की, त्यांच कौतूक करायचं. त्यांच्यामध्ये चालण्याच्या स्पर्धा लावायच्या. जिंकणार्‍याला कॅटबरीचं बक्षिस द्यायचं. डिपार्टमेंटमधल्या सगळ्या कर्मचार्‍यांना वडापाव नाहीतर कोल्ड्रिंक्सची पार्टी द्यायची. असं चालू असतं. अशाच एका प्रसंगात मी आजींच जाहिर कौतूक केलं. आजींनी कॅटबरी जिंकली होती. कार्यक्रम झाल्यावर आजी माझ्या केबीनमध्ये आल्या. जरा काळजीतच होत्या. म्हणाल्या, ”तुम्हाला एक विनंती करायची आहे.” “मी चालायला लागले हे माझ्या मुलीला सांगू नका.” म्हणलं, “का हो?” “तिला हे कळलं तर ती मला डिसचार्ज घेऊन घरी नेईल. मला तर आता कायमस्वरुपी इथेच रहायचय. तुम्हाला शपथ आहे पण तिला मुळीच सांगू नका. नाहीतर मी असं करते की उद्यापासून फिजिओथेरपीला जातच नाही.”

मी कुणालाच न सांगण्याचं आश्वासन दिल्यावर त्या शांत झाल्या. एक अर्थाने सावली जिंकली होती. बरं झाल्यावरही आजींना सावली सोडायची नव्हती. पण आजी मात्र सर्व नाती हरल्या होत्या. अर्थात हे आजींना आम्ही कधीच सांगणार नव्हतो.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments