नाती अशी आणि तशीही – १९

’बघ मी जिंकलो.’ अजिंक्यचे उद्गार ऐकून सगळ्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला. अजिंक्यच्या वडिलांचे – वसंतरावांचे पार्थिव समोर होते.

वसंतराव चांगल्या सरकारी नोकरीत होते. अधिकाराची पोस्ट असल्याने आर्थिकस्तर बर्‍यापैकी चांगला. साधारणपणे बदलीची नोकरी असणार्‍या सरकारी अधिकार्‍यांच्या कुटूंबाप्रमाणे ते घरच्यांना फार वेळ देऊ शकत नव्हते. पण जितके शक्य तितक्या आपलेपणाने सगळ घरच्यांसाठी करत होते. मुलांना उच्चवर्गियांच्या शाळेत शिक्षण देत होते. मुलं उच्चभ्रु वर्गाला योग्य कपडेलत्ते, हॉटेलींग, हौसमौज, टुरींग सगळ उपभोगत होते. मुलं लहान होती तोपर्यंत ठीक होतं. पण मुलांना वडिलांबद्दल सहवासाअभावी बाँडिंग असं कधी निर्माण झालं नाही. जसजशी मुलं वयात आली तसतसे हे अंतर वाढू लागलं. वडिल हे फक्त पैसे पुरवणारं साधन झालं.

मुलं अभ्यासात फार कधी चमकली नाहीत. सर्वसाधारण मार्कांनी पदवीधर होऊन नोकरी करु लागली.   प्रायव्हेट नोकरीतील पगारात आजपर्यंत लागलेल्या छानछौकी भागेनात. मग वडिलांनी बर्‍यापैकी गुंतवणूक करुन व्यवसाय सुरु करुन दिला. दरम्यानच्या काळात लव्ह कम अरेंज मॅरेज झाले. आणि एक जबाबदारी वाढली. व्यवसाय खूप जोरात नाही पण हळूहळू स्थिरावत होता. मुलीला पुण्यात चांगल स्थळ बघून लग्न करुन दिलं. ती स्थिरावली. मुलगा-सून मिळणार्‍या उत्पन्नात समाधानी नव्हते. त्यामूळे सुनेच्या वडिलांच्या ओळखीने मुलाला पुण्यामध्ये नोकरी बघीतली. मुलाने धंदा विकून नोकरी पत्करली आणि दोघही पुण्यात शिफ्ट झाले. शिफ्ट होताना  मुलाने आई-वडिलांना एका शब्दाने पुण्याला बरोबर चलण्याविषयी विचारले नाही.

असंही वसंतराव कोल्हापूर सोडून गेले नसतेच. त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक सगळे इथेच तर होते. आणि एकत्र राहून भांडण्यापेक्षा वेगळं राहून आहे ते प्रेम टिकेल असा पोक्त विचार होता. कोल्हापूरात वसंतरावांचा पुन्हा एकदा राजा-राणीचा संसार सुरू झाला. घरकामाला, स्वयंपाकाला बायका लावल्या. दिमतीला ड्रायव्हर होताच. मस्त दिनक्रम सुरु झाला. मुलं आपापल्या आणि वसंतराव आपल्या संसारात मस्त मश्गूल झाली. नाही म्हणायला वसंतरावांच्या पत्नीला मुलांची राहूनराहून आढवण यायची. पण तिनंही आता परिस्थिती स्विकारली. स्वत:ला मुलांवर लादणं तिलाही मंजूर नव्हतं.

दोन वर्षांतच अल्पशा आजाराने वसंतरावांची पत्नी गेली. वसंतराव एकटे पडले. अभिमानी असलेले वसंतराव जरा खचल्यासारखे झाले. त्यांना मुलाच्या सोबतीची आवश्यकता वाटू लागली. सगळा ईगो बाजूला ठेवून ते पुण्याला मुलाकडे रहायला गेले. होता होईल तेवढी मदत करु लागले. पण देहबोलीतून तर कधी एखाद्या कॉमेंटमधून त्यांना ते नकोसे असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागलं. मित्रांशी, समवशस्कांशी चर्चा करुन वसंतरावांनी कोल्हापूरला परत यायचा निर्णय घेतला. मेसचा डबा लावला. दिवसभर मित्रांकडे, एखाद्या स्वयंसेवी संस्थेत वेळ घालवू लागले. बागकाम, सिनेमा, नाटक, पिकनिक असा वेळ मजेत जाऊ लागला. पण तरीही कुठेतरी आत खोल पोकळी जाणवत होतीच. दिवस छान जायचा पण रात्र……

वसंतरावांना अचानक पॅरालेसीसचा झटका आला. मित्रांनी हॉस्पीटलला दाखल केले. मुलांना कळवले. मुलंही आली. पण हॉस्पीटलमध्ये किती दिवस लागतील काही सांगता येत नव्हते. आठवडाभराने डॉक्टरांशी बोलून मुलांनी हॉस्पीटलमधून डिसचार्ज घेऊन वसंतरावांना सावलीत दाखल केले. आता यापूढे ते सगळं रिमोटवर मॅनेज करु शकत होते.

सावलीत दाखल होतानाच वसंतराव फार चांगल्या अवस्थेत नव्हते. त्यांची जीवनेच्छाच फार उरली नव्हती. त्यामूळे उपचाराला, सुश्रुषेला ते फारसा प्रतिसाद देतच नव्हते. मुलांना ही कल्पना दिली. त्यांना तूमच्या सहवासाची गरज आहे हे समजावून सांगीतले. पण दोन्ही मुलांनी त्यांच्याबरोबर राहण्यास असमर्थता दर्शवली. आमच्या समुपदेशकांनी वसंतरावांना परिस्थिती समजावून सांगीतली. ती स्विकारण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा केली. पण फार उपयोग झाला नाही.

दरम्यानच्या काळात वसंतरावांच्या मुलाने पेणजवळ कुठल्याशा नामवंत ज्यांतिषाला वसंतरावांची पत्रिका दाखवली आणि पूढील उपचार सुरु ठेवायचे की नाही याबाबत विचारणा केली. त्याने म्हणे मुलाला वसंतरावांच्या मरणाची तारिखच सांगितली. आणि त्यावर पुर्ण विश्वास दाखवून मुलाने वसंतरावांचे सर्व उपचार थांबवले. उपचारासाठी पैसे वसंतरावांचेच खर्च होणार होते पण जर उरले तर ते मुलाचे होणार होते ना. वसंतरावांच्या नातेवाईकांनी त्याला असं ज्योतीषावर विसंबून उपचार बंद न करण्याविषयी परोपरीने सागीतले. पण याने म्हणे ज्योतिषी अ‍ॅक्युरेट असण्याविषयी त्यांच्याशी पैज लावली.

आणि तो पैज जिंकला……

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments