नाती अशी आणि तशीही – १०

माणसानं व्यवहारी असावं. नक्कीच असावं. पण किती? एका टोकाच्या व्यवहारीपणाचा मी साक्षीदार झालो होतो. पाटील आजोबांना तीन मुलं. ते स्वत: शेतकरी असले तरी मुलं नोकरीला होती. मोठा एका कारखान्यात सुपरवायझर. मधला गोकुळ दुध संघात आणि धाकटा एका बिल्डरकडे साईट इंजिनिअर. तसा खाऊनपिऊन सुखी संसार. पाटील आजी काही वर्षांपूर्वीच गेलेल्या. तीनही मुल विभक्त होती. आपापले संसार हाकत होती. पाटील आजोबा एकटेच शेतावर रहायचे.

काही दिवसांपूर्वी आजोबांना पॅरालेसीस झाला. आठ दिवसांच्या उपचारानंतर हॉस्पीटलमधून डिसचार्ज घेतला. आता किमान काही महिनेतरी ते अंथरुणाला खिळून राहणार होते. त्यांची सुश्रुषा करावी लागणार होती. मुलं लहान आहेत या कारणाने धाकट्याने घरी न्यायला असमर्थता दाखवली. मोठ्याच्या बायकोला ब्लडप्रेशरचा त्रास आहे या नावाखाली त्याने नकार दिला. आणि मग मीच एकटा का सांभाळू या कारणाने मधला अडला. यावर मार्ग म्हणून त्यांना सावलीत ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सावलीत जो काही खर्च येईल तो तिघांनी समसमान वाटून घ्यायचा असे ठरले.

सावलीचे तेंव्हाचे मासिक शुल्क सहा हजार होते. त्यामूळे तिघांच्या वाट्याला दोन-दोन हजार येत होते. पहिल्या महिन्यात तिघांनी आमच्या समक्षच दोन-दोन हजार रुपये काढून भरणा केले. पुढील महिन्यांपासून प्रत्येकजण वेगळा वेगळा येवून पैसे भरु लागला. म्हणजे एकाच रुग्णाच्या एका महिन्याच्या तीन पावत्या बनू लागल्या. सावलीत असं पहिल्यांदाच घडत होतं. कारण इतरही काही रुग्णांच्या बाबतीत मुलं कॉन्ट्रीब्यूट करुन पैसे भरायची. पण तो त्यांचा अंतर्गत मामला होता. कोणीतरी एक मुलगा सर्वांकडून जमा करुन एकत्र फी भरायचा. किंवा एका महिन्यात एकाने दुसर्‍यात दुसर्‍याने अशी फी भरली जायची. आम्ही तसंच काही तूम्ही करावं असं मुलांना सुचवल. पण इथे भावांचा एकमेकांवर विश्वास नव्हता. त्यामूळे असे डायरेक्ट भरणे त्यांना पसंत होते.

आजोबांच्या औषधाचं बील फार यायच नाही कधी साठ-सत्तरच्या दरम्यान यायचं. औषधांच्या बीलाच्या बाबतीत विचारणा केली तर प्रत्येक मुलगा “आत्ता महिन्याचे भरुन घ्या. औषधाचे नंतर भरतो.” असं म्हणून टाळायचा. होता होता तीन महिने झाले. पैसे भरण्याच्या निमित्ताने आणि नंतर कधीतरी अशा प्रत्येक मुलाच्या एक-दोन फेर्‍या महिन्यातून व्हायच्या. पैसे भरताना मात्र का कोण जाणे पण प्रत्येक मुलाबरोबर बायको असायची. या तीन महिन्यात एकाही मुलाने आजोबांसाठी काही खाऊ, फळे, बिस्कीटं असं काही आणल्याचे आठवत नाही.

योगायोगाने तिनही मुलं एकाचदिवशी एका वेळेला आली. आणि मी त्यांना ऑफिसमध्ये बोलावून घेतले. औषधांचे फार नाही दोनशे रुपये झाले होते. पण मला त्या मूलांची रीत पटली नव्हती. म्हणून त्यांना ते दोनशे रुपये त्याच दिवशी भरण्यास निक्षून सांगीतले. पण आता पंचाईत झाली होती. दोनशे रुपयांचे तीन समान भाग कसे करायचे? सहासष्ट प्रत्येकाने काढले. उरले दोन रुपये. तर हे दोन रुपये मीच का भरायचे यावरून त्यांच्यात वाद सुरु झाले.

दोन रुपयावरून सुरु झालेला तो वाद मागील काही गोष्टींवर गेला. कोण कोणाला एखाद्या प्रसंगात काय बोलला, कोणाच्या सासरच्या कार्यक्रमात कोणाचा मान राखला गेला नाही, एखाद्याच्या बायकोने दिराच्या मित्रांचा पाहूणचारच कसा केला नाही वगैरे सगळ्या गोष्टी निघू लागल्या. तिघांच्या बायकाही यात सामिल झाल्या. हा वाद आपण कुठे, कोणासमोर घालतो आहोत याचेही भान त्यांना राहीले नव्हते. मी डोक्याला हात लावून बसलो. दोन रुपयांसाठी इतका वाद, तोही आजच्या जमान्यात, मला पुर्णपणे नविन होता.

अर्धापाऊण तास हा तमाशा संपायचे नाव घेईना. शेवटी मी मधे पडलो. आणि म्हणलं, “माझाच हिशोब चुकला होता. बीलाची बेरीज एकशे अठ्ठ्याण्णवच आहे. तूम्ही बरोबर वाटणी काढलेली आहे. आजपर्यंतचा हिशोब मिळाला.” आणि पदरचे दोन रुपये घालून हिशोब बंद केला. असं म्हणल्यावर तिघेही भानावर आले आणि एकेकाने काढता पाय घेतला. पाटील आजोबा हताशपणे सगळा तमाशा बघत होते. ते हयात असेपर्यंत वाद घालण्यासाठी का होईना हे तिघे बोलत तरी होते. नंतर …..?

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments