नाती अशी आणि तशीही – ०८

कमामावशी दोन दिवस झाले माझ्याशी बोलत नव्हत्या. जेवणसुद्धा कमी केले होते. कामाच्या व्यापामूळे मला आधी लक्षात आले नाही. पण आज जरा निवांत असल्याने लक्षात आले, नेहमी चालणारी तोेंडाची टकळी आज शांत शांत आहे. जरा विचार केला मग लक्षात आलं दोन दिवस त्या माझ्याशी नीट बोलत नाहीयेत. मग उठून जवळ जाऊन बसलो. “काय झालं? तब्येत बरी नाहीयेका? की रागावलीयस माझ्यावर?” तिनं तोंड फिरवून घेतलं. तिचं असं लहान मुलासारखं वागणच मला खूप आवडायचं

कमामावशी तशी नशीबवानच. गोरीपानं. असुया निर्माण व्हावी इतकी देखणी. वय वर्ष 72 पण तेज होतं चेहर्‍यावर. टापटीप रहायची. स्वत:चे कपडेही ती स्वत:च धुवायची. दुसर्‍या कुणावर अवलंबून रहायला आवडायचं नाही तिला. माहेरची सधन. काही कमी नव्हती. तेंव्हाची मॅट्रीक. नवरा वकिल होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलासक्त होता. कमामावशी आणि तिच्या नवर्‍याला दोघांनाही सिनेमाची फार आवड. त्या काळात दोघही ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ चुकवायची नाहीत. हा पण कमामावशीचे यजमान हयात असेपर्यंत कधी चूकला नाही. कोल्हापूरमधील सगळ्या सिनेमा कलावंतांची वैयक्तिक ओळख होती. जितका सिनेमा प्रिय तितकेच नाटकही. विशेष करुन संगीत नाटक. त्या काळात आलेलं एकही नाटक या जोडीने सोडलं नाही. चित्रकलाही उत्तम होती. एकूणात सगळंच छान होत.

दोन मुलं झाली. शिक्षणात फार चमकली नसली तरी बापानं व्यवसाय सुरु करुन दिले होते. त्यात बर्‍यापैकी स्थिरावली होती. यथावकाश त्यांचीही लग्न झाली. नातवंडांनी घर भरलं होत. आणि अचानक मेजर हार्ट अ‍ॅटॅकनी कमामावशीचे यजमान कालवश झाले. आजपर्यंतचा आनंदाचा प्रवास खंडित झाला. तशी यजमानांनी कमामावशीच्या भविष्याची भरपूर नसली तरी पूरेशी तरतूद करुन ठेवली होती. आर्थिकदृष्ट्या व्यवस्थीत असलं तरी आयुष्यात खूप मोठा एकटेपणा आलाचं. पण मोठ्या समजूतदारपणाने कमामावशी सावरल्या.

माईल्ड पॅरालेसीसचा अ‍ॅटॅक आला आणि कमामावशीला सावलीत दाखल केलं गेलं. त्यातून ती लवकरच सावरली. हिंडूफिरु लागली. स्वत:ची सगळी कामं स्वत: करु लागली. सगळ्या रुग्णांबरोबर गप्पा मारायची. त्यांना काही हवं नको ते बघायची. त्रासलेल्या रुग्णांना हसवायचा प्रयत्न करायची. कर्मचार्‍यांशी, आलेगेल्या सगळ्यांशी तिच्या गप्पा चालू असायच्या. गप्पांना विषयाचं बंधन नसायचं. शास्त्रीय संगीतापासून रॅपपर्यंत आणि राजकारणापासून क्रिकेटपर्यंत सगळ्या विषयात तिला गती होती. आयुष्य खुप सुंदर आहेे आणि ते समरसून जगलं पाहिजे असा तिचा हट्ट होता. ‘फुल्ल ऑफ लाईफ’ हा शब्द तिच्यासाठीच होता.

एकदा बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याचे निमित्त झाले आणि तिचे खुब्याचे हाड तूटले. डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. साधारणपणे हे ऑपरेशन झाल्यानंतर रुग्ण महिनाभर तरी हिंडणे फिरणे टाळतो. पण कमामावशी ऑपरेशनला जातानाच मला म्हणाली, “आठ दिवसात उभी राहते की नाही बघ!” आणि पठठी राहिली की उभी आठव्या दिवशी. पुढील आठ दिवसांत वॉकरच्या सहाय्याने चालूही लागली. महिन्याभरात अगदी पहिल्यासारखी हिंडूफिरु लागली. तिच्या जिद्दीपूढे डॉक्टरही नतमस्तक झाले.

परवा असेच गप्पा मारता मारता तिला सहज म्हणालो, “आता तू पुर्ण बरी झालीस. लवकरच घरी जाशील. पण आम्हाला विसरु नको हो.“ त्यावर चिवचिवणारी ही परी एकदम गप्प झाली. मला कळेना मी असं काय चुकीचं बोललो होतो?

खोदूनखोदून विचारल्यावर म्हणाली, ‘’मला वचन दे. तू मला परत कधी घरी जाण्याविषयी बोलणार नाहीस.” हे काहीतरी वेगळं होत. सावलीत आलेले बरेच रुग्ण बरं होऊन घरी कधी जायला मिळत याची वाट बघत असतात. आणि हिला पुर्णपणे ठणठणीत असून घरी जायचं नव्हतं. बर्‍याच वेळा विचारल्यावर म्हणाली, “मी घरी गेले तर माझ्या मुलांची प्रगती होणार नाही.” “काहीतरीच काय?” मी म्हणालो. “तसचं सांगीतलयं ना मांत्रिकाने. म्हणून तर मला सुरवातीला ठेवल इथे. पॅरालेसीस वगैरे काही नव्हता. लचक भरली होती पायात म्हणून चालता येत नव्हतं.” “आता परत जाऊन त्यांच्या प्रगतीत अडथळा कशाला बनू?” ”इथे छान सोय आहे आता शेवटपर्यंत मी इथेच.”

आईला देवाच रुप का म्हणतात ते मी अनुभवत होतो. मुलांचा कुठलाही गुन्हा ती सहज पोटात घालू शकते.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments