नाती अशी आणि तशीही – ०७

पंजाबी आज्जी. उंची साडेपाच फूट. गोरीपान, अत्यंत देखणी. वय 92 वर्ष. मुळ लाहोरची. लग्न झालं तेंव्हा तीच्या वडिलांनी 100 तोळे सोन घातलं होत. इतक्या श्रीमंतीत वाढलेल्या हरमन कौरला 1947 सालच्या फाळणीमध्ये नेसत्या वस्त्रावर सगळं सोडून भारतात यावं लागलं होत. कुटूंब वाचवता आलं हेच नशीब. इथे आल्यावर जे सगळ्या आश्रितांच्या नशिबी होते ते सगळे भोगले. आणि सगळं कुटुंब पुण्यात स्थिरावलं. शिक्षण असल्याने तेंव्हा रेल्वेत नोकरी लागली. आयुष्य स्थिरावलं. छोटयाशा आजाराचे निमित्त होऊन हरमनचे पती देवाघरी गेले.

हरमन कौरला चार मुलं. सगळ्यांची शिक्षण छान झाली. सगळ्यांनी आपापले व्यवसाय सुरु केले. यशावकाश सगळ्यांची लग्न झाली. इवल्याशा बोलांनी गोकूळ बहरलं. हरमन निवृत्त होऊन पंचवीस वर्ष झाली होती. तीची स्वत:ची पेन्शन असल्याने आर्थिकद़ृष्ट्या ती स्वतंत्र होती. अशात तीला हॅल्युसिनेशनचा विकार झाला. यात माणसाला भास होऊ लागतात. त्यांच्या भुतकाळातील काही व्यक्ती, देव त्यांच्याशी बोलत आहेत असे भास होऊ लागतात. आणि व्यक्ती त्यांच्याशी बोलू लागते. बघणार्‍या इतर व्यक्तींना समोर कोणी दिसत नसल्याने रुग्ण एकटाच बडबड करतो आहे असे दिसते. पण रुग्ण प्रामाणिकपणे त्याला दिसणार्‍या आभासी व्यक्तीबरोबर बोलत असते. ह्या आजारावर आजतरी वैद्यकिय क्षेत्राकडे ठोस उत्तर नाही. हा विकार दिवसेंदिवस तीव्र होत जातो.

हरमन कौरच्या नातवांचा नविन व्यवसाय घरातूनच चालत होता. त्या व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे क्लाएंट घरी येत असत. अशात काहीवेळा हरमन आभासी व्यक्तीबरोबर बोलत बोलत बाहेरील हॉलमध्ये येत असे. क्लाएंटला हा प्रकार नविन असल्याने ते विक्षिप्त नजरेने नातवाकडे बघत आणि एकंदरीत सगळी परिस्थिती ऑकवर्ड होत असे. नुकतीच सुरवात असल्याने नातवाला त्याचा व्यवसाय दुसर्‍या ठिकाणी हलवणे लगेच शक्य नव्हते. यावर उपाय म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हरमनला सावलीत दाखल करण्याचा निर्णय घेतला.

एवढा मोठ्ठा परिवार असून सावलीत राहणे हरमनला मंजूरच नव्हते. मुळात तिच्या द़ृष्टीने तिची काही चुकच नव्हती. घर दुरुस्तीला काढल्यामूळे काही दिवसांसाठीची सोय आहे असं तीला समजावण्यात आलं. नाखुषीनेच तिने मान्य केलं. आणि आपण घरी परत कधी जाऊ या विचाराने दिवस काढू लागली. महिना झाला, दोन महिने झाले कोणी नेईना. एके दिवशी मुलगा भेटायला आला. तर हीने त्याच्याकडे मला घेऊनच चल म्हणून लकडा लावला. इतका की, त्याचा घट्ट धरलेला हात ती काही केल्या सोडेना. हातावर वळ उठले. कसाबसा चारजणांनी मिळून मुलाची सुटका केली आणि तो पळाला.

या प्रसंगानंतर हरमनला भेटायला कोणीच यायला तयार होईना. जवळपास तीन महिने कोणीही आलं नाही. यामूळे आमचे मासिक चार्जेसही थकले. आम्ही फोन करायचो तर आज येतो उद्या येतो अशी उत्तरे येऊ लागली. कोणतीही संस्था चालवायची झाली तर आर्थिक पाठबळ लागतेच. तीन-चार महिने पैसे थकल्यानंतर आम्हालाही त्रास होऊ लागला. हरमनचे पैसे तिच्या पेन्शनमधूनच भरले जायचे. पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बँकेच्या स्लीपवर तीचा अंगठा लागायचा. तीचा हात थरथरत असल्याने सहीऐवजी अंगठा असा बदल आधीच केलेला होता. पण आता अंगठा घेणार कोण? हा प्रश्न होता. जो कोणी येईल त्याला हरमन सोडणार नव्हती. हा चक्रव्यूह आता सोडवणे गरजेचे होते. शेवटी मी फोन केला आणि मुलाला म्हणले,“ उद्या संध्याकाळपर्यंत जर पैसे भरले नाहीत तर आम्ही हरमनला तूमच्या घरी आणून सोडणार.” ही मात्रा लागू पडली. हरमनचा मुलगा रात्री 10 वाजता सावलीत आला. ती गाढ झोपेत असताना बँकेच्या स्लीपवर तीचा अंगठा घेतला. आणि दुसर्‍या दिवशी मागिल चार महिन्यांचे आणि पुढील दोन महिन्यांचे पैसे भरले.

सावलीचा आर्थिक प्रश्न सुटला होता. पैसे वसुल करण्याचा मार्गही सापडला होता. पण त्याचा गर्भित अर्थ होता…. पैसे देतो पण आजीला, परत घरी आणू नका.

आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत?

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments