नाती अशी आणि तशीही – ०६

तिन महिन्यांपासून देसाई आजोबा सावलीत अ‍ॅडमिट होते. व्यवसायाने दुकानदार. पत्नी, मुलगा, सुन आणि नातू असा परिवार. चारेक महिन्यांपूर्वी अचानक पॅरालेसीस झाला. हॉस्पीटलच्या दोन आठवड्यांच्या ट्रीटमेंटनंतर सावलीमध्ये दाखल केले. पॅरालेसीसचा अ‍ॅटॅक जरा जोरात असल्याने आजोबांची संपुर्ण एक बाजू निकामी झाली होती. त्याचबरोबर दुसर्‍या पायातील शक्तीही बर्‍यापैकी क्षीण झाली होती. मलमुत्र विसर्जनाचा कंट्रोलही राहीला नव्हता. एकंदरीतच आजोबांना सर्व बाबतीत मदत लागत होती.

आजोबांचे सगळे आवरायला लागायचे याचा त्यांना आधीआधी खूप संकोच वाटायचा. “लहान असूनही तूम्ही किती आपलेपणाने करता हो सगळं! तूमच्या या आपलेपणामूळेच माझा संकोच कमी झालाय. तूम्हाला देव काही कमी पडू देणार नाही” आजोबा तोंड भरून आशिर्वाद द्यायचे. आजोबा छान गप्पा मारायचे. दुकानदार असल्याने त्यांना गप्पा मारायला फार आवडायचे. सावलीच्या सर्व कर्मचार्‍यांची आवर्ज़ून चौकशी करायचे. लग्न झालेल्या मुलींना सासरी वावरण्यासंबंधी टीप्स द्यायचे. नुकत्याच प्रेमात पडलेल्या सिस्टरला कुठे कुठे सावधगिरी बाळगायची याविषयी सांगायचे. कर्मचार्‍यांची मुलं कधी आली असता त्यांना गोष्टी सांगायचे. सगळ्या कर्मचार्‍यांमध्ये आजोबा पॉप्युलर होते.

का कुणास ठाऊक, पण सावलीमध्ये इतके पॉप्युलर असणार्‍या आजोबांबद्दल घरच्यांना फार ओढ असावी असे जाणवत नव्हते. त्यांना दाखल केल्यापासून मुलगा 15 दिवसातून एखादी फेरी मारायचा. सुन तर कधीच आली नाही. त्यांच्या पत्नी भेटायला यायच्या पण त्यांच्यातील संवाद तूटक असायचा. येऊन बसायच्या. काही विचारले तर उत्तर द्यायच्या. आजोबांच्या गोळ्या-औषधे तेवढी नियमित आणून द्यायच्या. या सगळ्या वर्तनाचा कदाचित आजोबांवर परिणाम होऊ लागला होता. ‘आपण घरच्यांवर ओझे झालो आहोत. अशा परिस्थितीत आपण अजून जगणे म्हणजे कोडगेपणाच होईल.’ अशी भावना त्यांच्यात वाढू लागली. एकदादोनदा बोलताना नकळत त्यांनी ही भावना विषण्णपणे बोलूनही दाखवली होती.

आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचो. ‘तूम्ही आजारी पडल्याने दुकानाचा भार सगळा मूलावर पडत असेल त्यामूळे त्याला वेळ मिळत नसेल. आपण समजून घ्यायला पाहिजे. नातू लहान असल्याने सुनबाईंना यायला जमत नसेल.’ तेही या गोष्टी समजून घेत. या गोष्टी समजूतीसाठी ठीक होत्या पण त्यातला पोकळपणा आम्ही दोघांनाही जाणवत होता. मग थोडयाच वेळात ते हसून विषय बदलत आणि वातावरणाताला ताण हलका करीत. पण त्यांच तीळतीळ खचणं दिसून येत होतं.

फिजिओथेरपीच्या व्यायामाला आता ते फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांचा आहार कमी होत होता. आवडीचा पदार्थ असला तर तोंड भरुन कौतूक करायचे पण खाताना मात्र बेतानेच खायचे. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळायला लागली. गप्पा कमी झाल्या. निपचीत पडून राहू लागले. क्वचीत कधीतरी रडवेले झाल्यासारखे वाटायचे.

आणि एक दिवस दुपारी ते क्रिटीकल वाटू लागले. डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला कल्पना दिली. ते अत्यवस्थ होत होते. श्वास मंद झाला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास पत्नी आली. त्यांच्याजवळ थोडावेळ बसली. आणि जस काही सगळं संपल आहे अशा पद्धतीने आवराआवर करु लागली. आम्ही आश्चर्याने बघत होतो. आजोबांची परिस्थिती आहे तशीच होती. श्वास मंद पण ठराविक गतीने चालू होता. आजोबा ग्लानीमध्ये होते.

साधारण 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी डॉक्टरांकडे आली आणि विचारले, “डॉक्टर, अजून किती वेळ?” डॉक्टर म्हणाले, ”असं कसं सांगणार? आम्ही काही ब्रह्मदेव नाही असं काही भाकित करायला.” आम्हाला ‘रुग्ण जाण्याची इतक्या आतूरतेने वाट पाहणारी पत्नी’ हा विरळाच अनुभव होता. डॉक्टर जरा चिडलेच. त्यावर वरकडी करुन पत्नी म्हणाली, “नाही ते ठीक आहे. पण मला आता थांबण शक्य नाही. डायबेटीस असल्याने मला वेळेवर जेवावे लागते. तूम्हाला एक विनंती करायची आहे. जर रात्री यांच काही कमीजास्त झालं तर मला सकाळीच कळवा. रात्री फोन करु नका. त्याचं काय आहे नं, माझा नातू फोनच्या आवाजाने एकदा का उठला तर परत लवकर झोपत नाही.”

मी, डॉक्टर सगळे निश:ब्द झालो होतो.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments