कोंडाणे लेणी

२०१६ च्या जून महिन्यामध्ये आमचं कॉलेज सुरु झालं. मी पुरातत्त्वशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मला लेण्या, जुनी मंदिर यांच्यात जास्त रस आहे. त्यात आम्हाला तिसऱ्या सेमिस्टर मध्ये लेण्यांचा अभ्यास करायचा होता. आता लेण्यांचा अभ्यास करायचा म्हणल्यावर, जास्तीत जास्त लेण्यांना भेट देण भाग होत. सुरुवात कोणत्या लेणी पासून करायची हा मोठा प्रश्न होता, पण त्याही पेक्षा मोठा प्रश्न म्हणजे सोबत कोणाला घ्यायचे. माझे सगळे मित्र हे वेगवेगळ्या फिल्ड मधिल असल्याने, त्यांना लेण्यांबद्दल फारशी आवड नव्हती. तरी सुद्धा काही मित्रांना विचारून बघितले, पण लेणी बघायला जायचंय म्हणल्यावर, सगळ्यांनी काहीबाही कारणे देऊन येण्यास नकारच दिला.

आता शेवटचा प्रयत्न म्हणून माझा आपटे शाळेतला मित्र, मयूर क्षीरसागर याला फोन केला. मयूर तळेगाव दाभाडे येथेच राहत असल्याने त्याला लोणावळा, कर्जत या भागाची जास्त माहिती होती आणि याच भागात जास्त लेण्याही आहेत. त्यामुळे त्याला फोन केल्यावर, लेणी बघायला येतो का अस विचारलं, त्याने लगेचच होकार दिला. आता प्रश्न होता नेमक जायचं कुठे? कारण भाजे, कार्ले, बेडसे अश्या अनेक लेण्या मी आधीच बघितल्या होत्या. बरीच चर्चा झाल्यानंतर शेवटी कोंडाणे लेणी ला जायचं ठरलं. तिथे कस जायचं, हे मयूर ने मला नीट समजावून सांगितले. दिवस ठरला, १२ ऑगस्ट २०१६. आता १२ ऑगस्ट चे वेध लागले होते.

अखेर तो दिवस उजाडला, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. १२ तारखेला मी सकाळी ५ वाजता उठून सर्व तयारी केली आणि ६ वाजता घर सोडले. मला ७ वाजता ची सह्याद्री एक्सप्रेस पकडायची होती. तळेगाव स्टेशन वरून मयूर गाडीत चढणार होता. आम्ही कर्जतलाच एकत्र भेटायचं ठरवलं होत. ठरल्याप्रमाणे साधारण ९.५० ला आम्ही कर्जत स्टेशन वर भेटलो. आता जास्त वेळ दवडून चालणार नव्हता, इथून पुढची सारी सूत्रे मयूर च्या ताब्यात होती. आम्हाला लवकरात लवकर कोंदिवडे गाव गाठायचं होत. आम्ही झपझप पावले टाकत ठरल्याप्रमाणे कर्जत स्टेशन च्या बाहेर आलो. तिथून जवळच काही सिक्स सिटर उभ्या होत्या. पूर्ण प्रवासी आल्यावर सिक्स सिटर चालू झाली, आणि आम्ही कोंदिवडे च्या दिशेने कुच केले. साधारण सव्वा तासाच्या प्रवासानंतर आम्ही कोंडीवते गावात पोहोचलो आणि तिथून कोंडाणे लेणी कडे चालत निघालो. हा रस्ता साधारण ३ किलोमीटर चा होता, वाटेत आम्ही कोंडाणे लेणी बद्दलच चर्चा करत होतो.

मी मयूर ला माहिती देत होतो – कोंडाणे लेणी ही महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या लेणींपैकी एक. राजमाची गडाच्या पायथ्याशी दाट जंगलात ही लेणी स्थित आहे, या लेणी च्या शेजारून जो रस्ता जातो, तो थेट राजमाची गडावर जातो. या लेणी मध्ये आपल्याला चैत्यगृह, विहार, स्तूप, यक्षाची मूर्ती, आणि लेख आढळतो. या लेणी चा काळ हा साधारण इसवीसनपूर्व १०० मानला जातो.

आम्ही बोलत बोलत कोंडाणे लेणी च्या पायथ्याशी पोहोचलो. समोर घनदाट जंगल होते, याच गर्द झाडीत कुठेतरी लेणी होती आणि आम्हाला ती शोधायची होती. शेवटी देवाच नाव घेऊन आम्ही त्या जंगलात शिरलो, तो महिना ऑगस्ट चा होता, पाउस भरपूर होता, त्या हिरवेगार झाडांमुळे, निसर्गामुळे आमचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. आम्ही अर्धा तास चाललो पण आम्हाला लेणी कुठेच दिसत नव्हती. इथून राजमाची किल्ल्यावर जाताना अनेक ट्रेकर मंडळी रस्ता चुकतात अस मी बऱ्याचदा ऐकल आणि वाचलंही होत. इथ तर आम्ही दोघचं होतो. वाटेत बर्याच दगडांवर किंवा झाडावर दिशा दर्शक बाण दाखवले आहेत. त्याच खुणांच्या साहाय्याने आम्ही इथ पर्यंत आलो होतो. पण अचानक ह्या खुणा अदृश्य झाल्या. समोर बघितले तर ३ पायवाटा वेगवेगळ्या दिशेने जात होत्या. आता मात्र आम्ही विचारात पडलो. ऑड डे असल्यामुळे इथ गिर्यारोहकांची गर्दी अजिबातच नव्हती. आता विचारायचं कुणाला, असा प्रश्न आम्हाला पडला. वरून भरपूर पाउस पडत होता, तसेच आम्हाला परत जाऊन एक्सप्रेसही पकडायची होती. त्यामुळे लवकरात लवकर लेणी पर्यंत पोहोचायचे होते. पण आम्हाला वाटच सापडत नव्हती. अचानक मला एका वाटेवर, एका झाडात कुणीतरी टाकून दिलेले रिकामे वेफर्स ची २-३ पाकीट दिसली. त्यामुळे हाच मार्ग असावा असा अंदाज लावून पुढे जाण्याच निश्चित केल. पुढे चालत असताना, परत येताना आपल्याला योग्य मार्ग सापडावा म्हणून आम्ही खुणा करत होतो.

काही वेळ चालल्या नंतरही लेणी दिसायला तयार नाही, म्हणून आम्ही निराश झालो. जवळच एका ठिकाणी वाहत पाणी आम्हाला दिसलं, ते पाणी जवळच्याच एका धबधब्याच होत. त्या गार पाण्यात तोंड धुवून मागे फिराव, असा विचार करून आम्ही त्या पाण्याजवळ गेलो. तिथे गेल्यावर मी सहज वर बघितलं तर मला लेणीचा काही भाग दिसला. आम्ही लेणीच्या अगदीच जवळ होतो, आम्ही लगेचच लेणीच्या दिशेने चालायला लागलो, आणि काही क्षणातच आम्ही लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ होतो. समोरच दृश्य खरोखरचं खूप विलोभनीय होत. काही दिवसांपूर्वी ठरवलेला आमचा प्लॅन यशस्वी झाला होता. लगेचच मी मोबाईल काढून लेणीचे फोटो काढायला सुरुवात केली. लेणीची अवस्था फार काही चांगली नव्हती. लेणीची बरीच पडझड झाली होती. समोरच्याच एका मोठ्या भिंतीवर यक्षाची प्रतिमा कोरली होती आणि त्या पुढेच पाली भाषेतील, ब्राह्मी लिपी मधील लेखही आम्हाला दिसला. ब्राह्मी लिपीचे थोडे फार ज्ञान असल्याने मी तो लेख वाचला. कन्हस अंतेबासिन बलकेन कतं’ या लेखाचा अर्थ असा की, ‘कन्हाचा अंतेवासी (शिष्य) बालुक याने (हे काम) केले’.

आम्ही तिथे भरपूर फोटो, सेल्फी काढले, हे सगळ करत असताना तिथे असलेल्या एका व्यक्तीशी आमचा परिचय झाला. ती व्यक्ती म्हणजे श्री. अंकुश वरे. अंकुश वरे हे पायथ्याच्या गावातील रहिवासी. ते दररोज सकाळी या लेणी मध्ये येतात आणि लेणी ची देखरेख करतात.

आता आम्हाला भरपूर भूक लागली होती. मयूरने आणलेला डबा आम्ही उघडला आणि ताव मारायला सुरुवात केली. अंकुश वरे यांना ही आमच्या बरोबर जेवण्याचा आग्रह केला. जेवण झाल्यावर मात्र आम्ही लगेच निघण्याचा निर्णय घेतला. उतरताना आम्हाला फारसा त्रास झाला नाही. ज्या वाटेने आम्ही आलो, त्याच वाटेने आम्ही कर्जतला जाणार होतो.

कर्जतला आम्ही वेळेवर आलो, तिथून काही वेळातच आम्ही एक्सप्रेस पकडली आणि पुण्याच्या दिशेने निघालो.

अश्या रीतीने आमची ही एकदिवसीय सहल अविस्मरणीय झाली.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments