ती सायंकाळ

ती: हलो
तो: हलो बोल ग
ती: मी आलीये ईथे रंगमंदिरा जवळ
तो: मग?
ती: अरे मग काय? ये तू, तुला भेटायला आलीये मी.
तो: नाही ग मला नाही जमणार आत्ता.
ती: काय?? आरे मी ईतक्या लांबून आलीये त्याच तूला काहीच कसं वाटत नाही? का बर नाही जमणार?
तो: अग भावाच्या लग्नाच्या खरेदीला आलोय.
ती: तीथे तुझ काय काम? उगाच कबाब में हड्डी का होतोयस?
तो: अग त्यानेच बोलावलय हट्टाने
ती: बर मी थांबते, वाट पाहाते तू ये
तो: किती वेळ लागेल माहिती नाही मला
ती: खरेदीच करताय ना, होईल की २ तासात
तो: सांगू शकत नाही; बरं बघतो जमतय का
ती: बघतो नाही येच तू, मी थांबतीये, बाय.
तो: बाय.
फोन बंद झाले आणि तीच्या डोक्यात एक वेगळच विचार चक्र सुरू झालं. काही दिवस झाले तो तीच्याशी थोडा वेगळा वागत होता. बोलण कमी केल होत, भेटायचंही टाळत होता. काहीशी नाराजच होती ती त्याच्यावर पण त्या नाराजीहूनही प्रेम खूप जास्त होत कदाचित त्यामुळेच प्रत्येक वेळेस त्याला माफ करत होती.
तीने आज ठरवलं होतं काहीही झालं तरीही आज त्याला भेटूनच जायचं. रंगमंदिरा शेजारच्या भल्या मोठ्या बागेत ती शिरली. त्यांच्या त्या नेहमीच्या ठरावीक बाकावर जाऊन बसली. कानात हेडफोन घालून रेडीओ ऐकणे सुरू होते. त्या रेडीओच्या सोबत ती कितीही वेळ त्याची वाट पाहू शकते याची तीला खात्री होती. पण रेडीओ वर वाजणारी प्रेमगीते तीला त्याची उणीव अधिकच प्रखरतेने जाणवून देत होती. त्यांच्या मागच्या ६ वर्षाच्या कालावधीतल्या आंबट गोड आठवणी चघळत ती सगळी बाग न्याहाळत होती.
पाऊण तास संपला, त्याचा साधा एक फोनही नाही! तीनेच पुन्हा एकदा नंबर फिरवला,
ती: अजून किती वेळ लागेल रे, मी वाट पाहातीये
तो: अग मी सांगितलं ना काही सांगू शकत नाही, नाहीतर तू जा आजचं थोड अवघडच वाटत़य.
ती: नाही मी थांबते, तू काहीतरी काम काढून नीघ ना तीथून, त्या दोघा वधू-वरांना करू देत ना शॉपिंग.
तो: बघतो मी, प्रयत्न करतो.
ती: ओके बाय.
वेळ भराभर पुढे धावत होती आणि ती मात्र वेळेची गती धरू पाहात होती. वेळ काढण सोप्प जावं म्हणून ती बागेत फेऱ्या मारत होती, बागेतली सगळी लोकं, मुलंं, तरूण-तरूणी, लहान मुलं, वृद्ध सगळे त्यांच्या विश्वात गर्क होते. एरवी त्याच्या सोबत असताना जे लोक तीला सतत न्याहाळत असत ते आज तीच्या कडे अजिबात लक्ष देत नव्हते. याउलट ती नेहमी त्याच्यासोबत असताना त्याच्यातच हरवलेली असणारी आज सगळी कडे व्यवस्थित पाहात होती.
दिड तास कसा गेला कळालही नाही, तशी तीला वाट पाहायला मुळीच आवडत नसे पण आज ती सुद्धा जिद्दीला पेटली होती. मनाशी घट्ट ठरवून टाकल होत, आज भेटायचंच. पुन्हाएकदा फोन करून पाहिला, पुन्हा तीच उत्तरं मिळाली, तेच बोलणं झाल. बागेत गर्दी वाढली होती, ती बाहेर पडली, फिरत-फिरत पुन्हा रंगमंदिरा बाहेर येऊन थांबली. तीथेच घुटमळत राहिली…

तब्बल साडे तीन तास उलटले. आता मात्र तीचा धीर सुटू लागला. खूप दुखावली गेली होती ती. शेवटचा फोन करून निघाल्याच तीने त्याला कळवलं. तरीही तो येईल या आशेवर हळूहळू बस स्टॉप कडे निघाली. शेवटी स्टॉपवर पोहोचल्या नंतर तो आला ते दोघे काही बोलण्या आधीच तीची बस आली होती, फक्त नजरेतूनच त्याला तीला झालेल्या दुःखाची कल्पना आली, तो सॉरी म्हणत राहीला पण वेळ निघून गेली होती, ती सायंकाळ तीला खूप काही सांगून गेली होती. आता ती मागे फिरणार नव्हती…..

© चैताली

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments