अवती भवतीच्या गोष्टींच्या कथा
—————————————-
प्रसाद सावंत
सुहास मळेकर यांचा ‘अवती भवति’ हा ललित कथासंग्रह वाचनात आला. दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून अनेकविध अनुभव येत असतात. याच छोट्या मोठ्या प्रसंगातून सहजस्फूर्तीने त्यातूनही अनेक कथाही आकारास येऊ शकतात ह्याचे प्रत्यंतर सुहास मळेकर यांच्या ललित कथा संग्रहाच्या वाचण्याने ध्यानात येते तसेच याच छोट्या मोठ्या प्रसंगाने साकारलेली एखादी कथाही मोठा आशय सांगणारी असू शकते याचेही प्रत्यंतर येते जसे एक ‘ढ’ मुलगा ज्याला सगळ्या मुलांनी जणू वाळीतच टाकलेले अशा एका वात्रट मुलातही एक उपजत संस्कार दडलेला असतो किंबहुना केवळ पुस्तकी ज्ञानाने माणसात संस्कार येत नसतात हयाची प्रचिती देणारी ही कथा मळेकर आपल्या ओघवत्या शैलीत सहज लिहून जातात. अशा साधारणत:एकूण ४५ कथामधून जीवनातील विविध अनुभवाचे किंवा निरीक्षणाचे पैलू कथा रूपाने उलगडताना आणि मांडताना दिसतात.या सर्व कथा तसेच घटना आपल्या अवती भवतीच्या वातावरणात कुठेही आणि कोणत्याही क्षणी घडू शकतात पण त्या निर्माण होताना लेखकाची निरीक्षण शक्ति तसेच त्याचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोण किंवा विचारधारा ही खूपच महत्वाची ठरते. त्यायोगेच त्या कथेच्या आशयातून दिला जाणारा संदेश हा सामाजिक प्रबोधन घडवणारा असू शकतो.त्यात लेखक हा चित्रकार अथवा छायाचित्राकार असेल तर त्या लेखन शैलीत कथेचे चित्ररूप अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर उभे करण्याची ताकद त्याच्यात उपजतच असावी लागते.काही कथांमधून तो सामाजिक आशयाबरोबरच समाजाला संस्कारहि जाणीवपूर्वक देऊ इच्छितो आणि तसे ते देण्याची संधीही लेखक सोडत नाही. (उदा. शुभाशीर्वाद,दृष्ठी या कथा)यातून लेखकाची संवेदनक्षम मानसिकता आणि हळव्या हृदयाची लवचिकता याची प्रचिती येते.
आपल्या जीवनात गोष्टी जशा विविधतेने नटलेल्या असू शकतात तशाच त्या वैचित्र्यपूर्ण स्वभाव दर्शनाच्याही असु शकतात.अर्थात त्याही पाठी एक
विशिष्ट दृष्टीकोण असू शकतो. तो प्रसंग किंवा त्या घटना लेखकाच्या शोधक आणि चिकित्सक तसेच कुतूहलाच्या वृत्तीने पाहता आल्या पाहिजेत हे ही तितकेच महत्वाचे. नायकाच्या व्यक्तीगत जीवनातील नातेसंबद्ध,सभोवतालच्या वातावरणातील घटना क्रमाच्या बदलाकडे राजकीय,सामाजिक तसेच सांस्कृतिक दृष्टीने ते अधिक चौकसतेने पाहत त्याला चौकटबद्ध करू पाहतात. लेखक मळेकरांकडे ही या सर्व स्तरावरची दृष्टी जरूर आहे.त्यांच्या काही कथांमधून ते प्रकर्षाने जाणवते. मळेकरांच्या लेखन शैलीत एका छायाचित्राकाराच्या दृष्टीने ,एखादी घटना अथवा प्रसंग पाहताना आपल्या नजरेच्या चौकटीतून तिला चौकटबद्ध करताना तिच्यात ते समतोलही राखण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यातील बरेचसे प्रसंग,घटना पाहताना किंवा अनुभवताना त्यातील लालित्य आणि सौंदर्य ते निश्चितपणे जपतात असे जाणवते व त्यातच या संग्रहाचे यश सामावले आहे असे म्हणावेसे वाटते.
अवती भवति सदरच्या गोष्टी
(ललित कथा संग्रह )
लेखक : सुहास मळेकर
संवेदना प्रकाशन,पुणे
पृष्ठे :१२८
किमत रुपये २५० /-
शेअर करा..