इस्रोची अंतराळातील कविता POEM

इस्रोची आंतरिक्षातील कविता POEM

सामान्यत: जेव्हा एकाद्या प्रक्षेपकाद्वारे उपग्रहाचे /उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाते त्यावेळी त्याचा शेवटचा टप्पा अंतराळात कचरा किंवा अनावश्यक वस्तू म्हणून विसर्जित केला जातो. पण भारतीय अंतरीक्ष संस्था अर्थात इस्रोने त्याचा वापर वैज्ञानिक प्रयोगांसाठी मंच म्हणून करायचे ठरवले व तसे घडवून आणले.

३० जून २०२२ रोजी इस्रोच्या PSLV-C53 या प्रक्षेपकाने सिंगापूरच्या DS-EO, NeuSAR आणि SCOOB-1 या उपग्रहांसह सतीश धवन अंतरीक्ष केंद्र, श्रीहरीकोटा येथील दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी अंतराळात झेप घेतली. सहा वाजून तेवीस मिनिटांनी सिंगापूरच्या तिनही उपग्रहांचे प्रक्षेपण योग्य त्या कक्षेत करण्यात आले.

त्यानंतर PS4 हा प्रक्षेपकाचा चौथा टप्पा PSLV orbital experimental module म्हणजेच POEM म्हणून एकाद्या अंतरीक्ष वाहकाप्रमाणे पृथ्वीभोवती परिभ्रमण करू लागला. प्रक्षेपणानंतर इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ अगदी बरोबर म्हणाले होते, “उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर PS4 अंतराळात कविता लिहेल.” PS4 टप्पा कक्षीय मंच (orbital platform) म्हणून वापरला जाण्याची इस्रोची ही दुसरी वेळ.

यापूर्वी २०१९ मध्ये PSLV- C44 च्या प्रक्षेपणानंतर प्रक्षेपकाचा चौथा टप्पा वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी वापराण्यात आला होता. त्यावेळी ऊर्जा पुरावठ्यासाठी लिथीयम आयन विजेऱ्या वापरण्यात आल्या होत्या. यावेळी लिथीयम आयन विजेऱ्यांबरोबरच सौर पटल देखील वापरण्यात आले आहेत. परिभ्रमणा दरम्यान POEM ची अभिमुखता (orientation) खास या मोहिमेसाठी डिझाईन केलेल्या NGC कार्यप्रणालीद्वारा राखली जात आहे. वैज्ञानिक प्रयोगांसाठी लागणारी ऊर्जा POEM त्याच्या भोवती बसाविलेल्या सौर पटलांद्वारे आणि लिथीयम आयन विजेऱ्यांद्वारे मिळावीत आहे. POEM चे दिक् चलन चार सौर संवेदक (sensors), चुंबकीय शक्तिमापक (magnetometer), घुर्णाक्षदर्शी (gyroscope) आणि NavIC या भारतीय बनावटीच्या स्थितीदर्शकाद्वारे केले जात आहे. POEM ची दिशा व उंची यांचे नियंत्रण करण्यासाठी हेलीयम वायूच्या साठ्यावर चालणाऱ्या खास अग्निबाणांचे नियोजन करण्यात आले आहे आणि POEM दुरसंचार प्रणालीने सज्ज आहे. POEM बरोबर सहा अभिभार (payloads) आहेत. त्यातील दोन भारतीय नवउद्योग दिगंतर व ध्रुव स्पेस यांनी डिझाईन केलेले आहेत. खरोखरच अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी POEM हा अत्यंत उपयुक्त प्रकल्प आहे.

लेखक -राजीव पुजारी

विज्ञान प्रसारक

[email protected]

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments