औट घटकेचा राजा

औट घटकेचा राजा …
————————————————————-
मनाला चैतण्य देणारा , निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला अल्हाददाई श्रावण महिना . अबाल वृद्धांना , महिलांना , तरुणाईला , भाऊ बहिणीला अत्यंत प्रिय असलेला श्रावण ! सणांचा राजा श्रावण ! महिना भर सणांची नुसती रेलचेल असते . आसमंतात चैतन्य भरुन राहिलेले असते . सुरुवात होते नागपंचमी च्या सणांने . या दिवशी सासरी नांदत असलेल्या लेकी बाळी माहेरी येतात . फेर धरुन गाणे गातात , वारुळाची पुजा करतात . झाडावर झोके बांधून मनसोक्त खेळतात .
नागपंचमी चा दुसरा दिवस म्हणजे श्रावण षष्टीचा दिवस . या षष्टीला श्रीयाळ षष्टी असे म्हणतात , कोणी शिराळ षष्टी तर कोणी सक्रोबा म्हणतात .
तेराव्या शतकात एक राजा होऊन गेला . त्याचे नाव श्रीयाळ शेठ ! चांगूणा ही त्या राजाची राणी . त्यांना एक मुलगा होता . त्याचे नाव चिलिया ! श्रीयाळशेठ राजा व चांगूणा राणी दोघेही अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते . भरपूर दानधर्म करीत असत . त्याच्या राज्यात कोणालाही तो काही कमी पडू देत नव्हता . दारी आलेला याचक कधीही विन्मुख जाऊ देत नव्हता . आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये असा त्याचा कटाक्ष होता . चांगूणा राणी ही श्रीयाळ शेठ राजाला साथ देत होती .
श्रीयाळशेठ राजा भगवान शंकराचा निस्सिम भक्त होता . राजा राणी दोघेही नित्य शंकराची आराधना करत असत . एकदा भगवान शंकराने त्यांची परीक्षा पाहाण्याचे ठरवले व ते साधूचा वेश घेऊन त्यांच्या राजवाड्यात गेले . राजाने साधूमहाराजांचे आदरातिथ्य केले व भोजनाचा आग्रह केला . साधू महाराजांनी भोजनासाठी नरमांसाची मागणी केली . श्रीयाळ शेठ राजा व चांगुणा राणी दोघेही शाकाहारी होते त्यांना मांसाहार वर्ज्य होता पण आपण नकार दिला तर साधूमहाराज उपाशी जातील व आपले सर्व हरण होईल म्हणून ते दोघेही राजाराणी साधूमहाराजाला नरमांसाचे भोजन द्यायला तयार झाले . इतक्यात राजी होतील ते साधुमहाराज कसले ? चांगुणा राणीला म्हणाले मला तुझ्या बाळाचे मांस पाहिजे व ते तू स्वत: तयार केले पाहिजे तरच मी जेवण करीन नाही तर हा मी चाललो उपाशी ! असे साधुमहाराजांचे बोलणे ऐकल्यावर चांगुणा राणी च्या पायाखालची जमीन सरकली . तीच्यावर दु:खाचे आभाळच कोसळले . पण काळजावर दगड ठेवून चांगुणा राणी हे दिव्य करायलाही तयार झाली . तिने आपल्या चिलिया बाळाचे शिर धडावेगळे केले व त्याची आठवण राहावी म्हणून फक्त धडच उखळात मधे घालून कुठले व त्यांचे माणसं शिजवून ते त्या साधुमहाराजांना वाढले . पण त्या भाषांमधे बाळाचे शिर नाही हे साधुंच्या लक्षात आले व त्यांनी पुन्हा जेवनास नकार दिला .
चांगुणा राणीने पुन्हा ते चिलिया बाळाचे शिर उखळात घालून कुठले व ते शिजवून साधुमहारांचाच्या पुढे ठेवले .
भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी आपले मूळ स्वरूप हे प्रगट केले व श्रीयाळ राजा व चांगुणा राणी ला म्हणाले मी तुमची परीक्षा पाहिली . मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे . तुम्हाला काय मागायचे ते मागा . भगवान शंकराचे हे बोलणे ऐकून चांगुणा राणीने हंबरडा फोडला व बाळ चिलियाला हाक मारु लागली . आणि काय आश्चर्य , बाळ चिलिया दुडूदुडू धावत आला आणि आपल्या आईला बिलगला .
सन १३९६ ते १४०७ या काळात या काळात सलग १२ वर्ष भयंकर दुष्काळ पडला . या दुष्काळात मधे श्रीयाळशेठ राजाने आपल्या प्रजेसाठी खूप मदत केली . भरपूर अन्नधान्य वाटले ! कोणाला काही कमी पडू दिले नाही . यावर बहामनी राजाने खुष होऊन त्याला काय मागायचे ते माग म्हणाला तेंव्हा श्रीयाळ शेठ राजाने औट घटकेचे राज्य मागून घेतले . औट घटका म्हणजे साडेतीन घटका ! बहामनी राजाने श्रीयाळशेठ राजाला औट घटकेचे राज्य बहाल केले . तेंव्हा पासून त्या राजाला औट घटकेचा राजा असे संबोधले जाऊ लागले . आज मात्र काळाच्या ओघात श्रीयाळशेठ राजांचे औदार्य , त्याचा त्याग प्रजेच्या बद्दल त्याची असलेली कणव हे सर्व मागे पडले आहे .

अरविंद रामचंद्र कुलकर्णी .
(पिंपरखेड कर)
9422613664
[email protected]

अरविंद रामचंद्र कुलकर्णी

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Rajiv Pujari

श्रीयाळ शेठ राजा होता तर बहामनी राजाकडे त्याने औट घटकेचे राज्य का मागून घेतले?