नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020(भाग आठ )

 

 

नासाची मंगळ मोहीम – मार्स 2020

(भाग आठवा )

लेखक – राजीव पुजारी

विश्रामबाग, सांगली

9527547629

मोहीम अंतराळयान > मंगळाकडे मार्गक्रमण:-

2012 मध्ये मंगळावर उतरलेल्या क्युरिऑसिटी अंतराळयानाच्या मार्गानेच पर्सीव्हिरन्सने प्रवास केला. उड्डाण प्रणालीच्या तीन महत्वाच्या भागांच्या मदतीने रोव्हर सुरक्षितपणे लाल ग्रहावर उतरला : मार्गक्रमण टप्पा (क्रूझ स्टेज ), एरोशेल व अवरोहण टप्पा (डिसेंट स्टेज )

प्रक्षेपकापासून वेगळे झाल्यानंतर, एरोशेल व त्यामधील पर्सीव्हिरन्स यांच्यासह कड्याच्या आकाराच्या मार्गक्रमण टप्प्याने (क्रूझ स्टेज ) दोन ग्रहांमधील पोकळीतून मंगळाकडे प्रवास केला. या मार्गक्रमणा दरम्यान स्थिर राहण्यासाठी हे एकत्रित अंतराळयान स्वतःभोवती मिनिटाला दोन प्रदक्षिणा घालत पुढे जात राहीले. या क्रूझ स्टेजवर आठ अचूक असे अग्निबाण होते. त्यांना कंट्रोलरूममधून आठ महिन्यांच्या प्रवासादरम्यान कोणकोणत्यावेळी प्रज्वलीत व्हायचे याच्या आज्ञा मिळत. यामुळे अंतराळयानाच्या विक्षेपमार्गात वेळोवेळी सुधारणा केली जाई. (यांना विक्षेपमार्ग सुधारणांच्या डावपेचात्मक हालचाली असे संबोधले जाते)

क्रूझ स्टेजवर सौर पंख आहेत. रोव्हरच्या मुख्य पॉवरसोर्स (मल्टी मिशन रेडिओ आयसोटोप थर्मोइलेक्ट्रिकल जनरेटर ) बरोबरच हे सुद्धा अन्तरिक्षयानाला ऊर्जा पुरावत. या स्टेजवर पृथ्वीबरोबर संभाषणासाठी प्रतवारीने लावलेले अँटिनाज होते.

एरोशेल :- अंतरिक्षयान मंगळाच्या वातावरणातून मंगळभूमीजवळ येईतोपर्यंत रोव्हर व त्याची डिसेंट स्टेज यांचे रक्षण ही कुपी करे. या एरोशेलचे दोन भाग होते. एक म्हणजे शंकूच्या आकाराचे मागील कवच आणि त्याच्या खालच्या बाजूला असणारे उष्णतारोधक कवच. दोन्हींची बांधणी डेन्वरमधील लॉकहीड मार्टिन यांनी केली आहे.

कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीस्थित एम्स रिसर्च सेंटरने संशोधित केलेल्या फिनॉलीक इम्प्रेग्नेटेड कार्बन एवलेटर या पदार्थच्या फरशा उष्णतारोधक आवरणावर बसवलेल्या होत्या. यान मंगळाच्या वातावरणामध्ये प्रवेश करतांना घर्षणामुळे 1300°सें. पर्यंत तपमानाचा सामना यानाला करावा लागेल असा इंजिनिअर्सचा कयास होता. जास्तीतजास्त उष्णता पर्सीव्हिरन्स रोव्हरपासून दूर वाहून नेणे हे या उष्णतारोधक आवरणाचे कार्य होते.

मागील कवचात अवतारणासंबंधातील अनेक महत्वाचे भाग होते. जसे कि, यान व्यवस्थित उडावे यासाठीची यानाचा गुरुत्वमध्य बदलता येणारी वजने, पॅराशूट, थेट पृथ्वी व मंगळाच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटर्स बरोबर संवाद साधण्यासाठी उपयुक्त असे अँटिनाज वगैरे. हे ऑर्बिटर्स नंतर पृथ्वीशी संपर्क साधतील. मागील कवच व उष्णतारोधक कवच यांवर MEDLI 2 हा संवेदकांचा संच बसवलेला होता. मंगळाच्या वातावरणात शिरतांना मागील कवच सुद्धा गरम होईल -पण उष्णतारोधक कवचएव्हढे नाही – म्हणून त्यावरसुद्धा SLA-561 V नावाच्या पदार्थापासून तयार केलेले आच्छादन बसवलेले होते.

पृष्ठभागापासून 11 किलोमीटर्सवर आल्यावर वातावरणाच्या घर्षणामुळे यानाचा वेग कमी होऊन तो 865 कि. मि. प्रतितास एव्हढा झाला. साधारण अवतरण क्रियेच्या या टप्प्यावर यानाने पॅराशूट उघडण्याची आज्ञा दिली. यान उतरण्याच्या ठिकाणाच्या इष्टतम अंतरावर आल्यावर ही आज्ञा दिली गेली. या तंत्राला ‘ रेंज ट्रिगर ‘ असे म्हणतात. 1970 च्या दशकातल्या व्हायकिंग मोहीमांतील पॅराशूटसच्या डिझाईन्सच्या धर्तीवर हे पॅराशूट बनवले होते पण त्याचा व्यास त्या पॅराशूटस् पेक्षा 21.5 मीटर्सनी जास्त होता, तसेच पर्सीव्हिरन्सचे वजन पेलण्याजोगे ते दणकटही केले होते. पॅराशूट उघडल्यावर पर्सीव्हिरन्सचा वेग आणखी कमी झाला.अवतरणापूर्वी

(लँडिंग ) हिटशिल्ड गळून पडले आणि रडार व टेरीन नेव्हिगेशन सिस्टीम नावाच्या नवीन विकसित केलेल्या प्रणालीने रोव्हरला जेझेरो क्रॅटरमध्ये सुरक्षित उतरण्यास मदत केली.

पृष्ठभागाला स्पर्श होण्याआधी 60 सेकंद पॅराशूटसहितचे मागील कवच पॉवर्ड डिसेंट व्हेईकल पासून वेगळे झाले.( या पॉवर्ड डिसेंट व्हेईकलमध्ये रोव्हर व डिसेंट स्टेज व अंतराळयानाला उतरण्यासाठी मदत करणारी रॉकेट -ऊर्जाधारित संरचना आहेत.)

डिसेंट स्टेज :- या घडीला, रॉकेट -ऊर्जाधारित डिसेंटस्टेजला पर्सीव्हिरन्स अजून चिकटलेलेच होते. हे साधारण आठ इंजिनवाल्या जेटपॅक सारखं होते, ज्याद्वारे यान सुरक्षित सुरक्षित जमिनीवर उतरू शकेल. उतरण्याच्या जागेवर घिरट्या घालेपर्यंत डिसेंटस्टेजचा वेग कमी होत गेला. स्काय क्रेन प्रणालीच्या दोऱ्या डिसेंट स्टेजच्या वरच्या बाजूंना बांधल्या होत्या. ह्या उलगडत गेल्या व रोव्हर हळुवारपणे जमिनीला टेकला . रोव्हर जमिनीला टेकल्यावर या दोऱ्या कापल्या गेल्या. डिसेंट स्टेज रोव्हरपासून वेगळी होऊन उडून पर्सीव्हिरन्सपासून सुरक्षित अंतरावर जाऊन उतरली.

प्रवेश, अवरोहण व अवतरण (entry, descent and landing) यांवरील वैज्ञानिक उपकरणे :-

(i) मेडलि 2 (मार्स सायन्स लॅबोरोटरी एन्ट्री, डिसेंट अँड लँडिंग इन्स्ट्रुमेंट 2) — 2012 साली नासाच्या मार्स सायन्स मिशन अंतर्गत मंगळावर गेलेल्या क्युरिओसिटीवर असणाऱ्या मेडलि 1 प्रमाणेच असणारा मेडलि 2 हा पुढच्या पिढीचा तपमान, दाब व उष्णता यांचे मोजमाप करणाऱ्या संवेदकांचा संच होता. तो प्रवेश, अवरोहण व अवतरणा दरम्यान उष्णतारोधक कवच व मागील कवच यांचे तपमान, दाब व उष्णता यांचे मोजमाप करत असे. या उपकरणांद्वारे गोळा केलेल्या माहितीच्या मदतीने इंजिनिअर्स भविष्यकालीन मोहिमांमधील प्रवेश, अवरोहण व अवतरण यांमधील प्रणाली प्रमाणित करतील. व्हर्जिनिया मधील हॅम्पटन येथील नासाचे लँगली रिसर्च सेंटर MEDLI 2 या संचाचे व्यवस्थापन करत.

(ii) प्रवेश, अवरोहण व अवतरण कॅमेरे व सूक्ष्मदूरसंवादक (मायक्रोफोन ) — मोहिमेदरम्यान यानाचे कार्य कसे चालले आहे हे समजण्यासाठी सुस्पष्ट प्रतिमा जणू मित्राचे काम करतात. मार्स 2020 वर सहा रंगीत कॅमेरे होते, ही संख्या पूर्वीच्या कोणत्याही मंगळ अवतरण मोहिमेंपेक्षा जास्त होती. हे कॅमेरे लोकांना मोहिमेशी जोडण्यासाठी तसेच प्रवेश, अवरोहण व अवतरणा दरम्यानच्या तांत्रिक घडामोडी समजाव्यात यांसाठी होते. एक कृष्ण- धवल कॅमेरा आहे तो अवतरणादरम्यान महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भूप्रदेश सांदर्भिक दिक् चलन (terrin navigation syatem) प्रणालीला वाहिलेला होता.

प्रवेश, अवरोहण व अवतरण रंगीत कॅमेऱ्यांच्या संचात बाजारात सहजी उपलब्ध असणारे सहा कॅमेरे होते.

• तीन कॅमेरे मागील घंटाकार कवचावर असून ते वरच्या बाजूस रोखलेले होते. ते पॅराशूट उघडण्याच्या क्रियेच्या प्रतिमा घेतअसत.

• डिसेंट स्टेजवर एक कॅमेरा असून तो रोव्हर व खालील पृष्ठभागाकडे रोखलेला असे.

• दोन कॅमेरे पर्सीव्हिरन्सवर आहेत. एक (वर रोखलेला) डिसेंटस्टेजच्या क्रियांच्या प्रतिमा घ्यायचा आणि दुसरा (खाली रोखलेला) मंगळाच्या भूपृष्ठाच्या प्रतिमा घेई.

पर्सीव्हिरन्सच्या मागील बाजूस पॅनेलवर एक बाजारात सहज उपलब्ध होणारा सूक्ष्मसंवादक (मायक्रोफोन ) बसवला आहे. हा मायक्रोफोन लोकांना मोहिमेशी जोडणे आणि नंतर प्रवेश, अवरोहण व अवतरण यांचे विश्लेषण करेणे यां साठी आहे. या सूक्ष्मसंभाषकने पॅराशूटचे उघडणे, डिसेंट स्टेजवरील मंगळावतरण,इंजिन्सचे फायरिंग वगैरे अवतरणाच्या क्रियाक्रमांचे आवाज टिपले आहेत.

मिशन –सायन्स (विज्ञान मोहीम )

ही मोहीम का आखली गेली?

अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वी व मंगळ यांच्यामध्ये खूप साम्य होते. दोन्हींवर द्रवरूप पाणी होते, सौर प्रारणांपासून रक्षण होण्यासाठी चुंबकीय क्षेत्र होते. जर त्यावेळी पृथ्वीवर जीवाची उत्पत्ती झाली असेल तर मंगळावरही ती झाली असेल का?

हे अंतराळजीवशास्त्रातील प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नासाने या लाल ग्रहावर रोव्हर्स, लँडर्स व ऑर्बिटर्स पाठवले. मंगळभूपृष्ठावरील खडक व गाळ यांचा अभ्यास करून द्रवरूप पाणी केंव्हा नाहीसे झाले, वातावरण विरळ व्हायला केव्हा सुरवात झाली यांची उत्तरे वैज्ञानिक शोधू शकतात. मंगळावर जीवनासाठी आदर्श परिस्थिती कधी होती हे या पुराव्यांवरून कळू शकते.

पण पर्सीव्हिरन्स थोडा वेगळा आहे. हा असा पहिलाच रोव्हर आहे, जो मंगळावरील खडकांचे नमुने गोळा करेल आणि भविष्यात ते पृथ्वीवर आणले जातील. या रोव्हरकडे खूप तांत्रिक क्षमता असून देखील, त्यापेक्षाही जास्त क्षमतेच्या प्रयोगशाळा व वैज्ञानिक उपकरणे पृथ्वीवर आहेत जी आपण भविष्यात मंगळावर पाठवू शकू. अपोलो मोहिमांद्वारा आणलेल्या चंद्रावरील नमुन्यांप्रमाणेच, मंगळावरील नमुने देखील पुढील पिढयांतील शास्त्रज्ञांना उपयुक्त ठरतील. हे वैज्ञानिक आज अस्तित्वात सुद्धा नसलेल्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारा या नमुन्यांची तपासणी करतील, आणि युगानुयुगे आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळेल, तो प्रश्न म्हणजे मंगळावर कधीकाळी जीवन अस्तित्वात होते का?

 

 

 

 

 

 

 

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments