नासाची मंगळ मोहीम -मार्स २०२०(भाग सहा )

 

 

नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020 (भाग सहा )

लेखक – राजीव पुजारी

विश्रामबाग, सांगली,

9527547629

(A) भूपृष्ठ टप्पा :-

स्थानिक सौर वेळेनुसार रोव्हर दुपारी 3.45 ला मंगळभूमीवर उतरला. लगेचच त्यावरील कॉम्प्युटर EDL मोड (एन्ट्री, डिसेंट, लँडिंग ) मधून सरफेस मोड मध्ये गेला. यामुळे पहिल्या मंगळदिवशी त्याने स्वयंचलितपणे सर्व कामे केली. याला आपण सोल 0 म्हणू.

मंगळदिनाला सोल म्हंटले जाते. तो 24 तास, 39 मिनिटे व 35.244 सेकंदांचा असतो. ( रोव्हर मंगळदिवशी काम करेल व मंगळ रात्री झोप घेईल, त्यामुळे पर्सिवीरन्सची टीम मंगळदिनानुसार काम करेल) रोव्हरचा कार्यकाळ हा एक मंगळवर्ष एव्हढा असेल. एक मंगळवर्ष म्हणजे 687 पृथ्वी दिवस किंवा 669 सोल्स.

(B) प्राथमिक तपासण्या :-

पर्सिव्हिरन्सची टीमने पहिले नव्वद सोल्स रोव्हरच्या सर्व भागांची व वैज्ञानिक उपकरणांची तपासणी केली. या तपासणीच्या कालावधीने सर्व कांही अलबेल आहे -अगदी टीम सुद्धा – याची खात्री केली. आणि तो रोव्हरच्या भूपृष्ठावरील कार्यासाठी सज्ज झाला. हे 90 दिवस ‘ऑपरेशन टीम ‘ने मंगळ वेळेनुसार काम केले, ते त्यांची घड्याळे मंगळ दिवसानुसार अड्जस्ट करीत (सोल हा पृथ्वी दिवसापेक्षा साधारण 40 मिनिटांनी मोठा असतो ). त्यामुळे रोव्हरला मंगळावरील दिवसा काहीही अडचण आलीतर ताबडतोब त्यावर कार्यवाही करणे सोपे जाई, तसेच दुसऱ्या दिवासासाठीची सुधारित आज्ञावली तयार आहे याची खात्री केली जाई.

मंगळवेळेनुसार काम करणे म्हणजे प्रत्येक दिवशी काम सुरु करायची वेळ 40 मिनिटे उशिरा असणे. सरतेशेवटी, टीम मेम्बर्सना कामाची सुरुवात करायला मध्यरात्री उठावे लागे. मंगळवेळेमुळे त्यांचे पृथ्वीवरील दैनंदिन जीवन आव्हानात्मक असे. फक्त पहिल्या 90 सोल्स दरम्यानच (तपासणीचा कालावधी ) टीमने अशा पद्धतीने काम केले.

तपासणीच्या पहिल्या टप्प्याला ‘सुरुवातीचा टप्पा ‘ म्हंटले जाई. सुरुवातीच्या टप्प्यातील पहिले सोळा सोल्स पर्सिव्हिरन्सने खालील गोष्टी केल्या :

• मास्ट व हायगेन अँटिना सुरु करणे.

• उतरलेल्या जागेच्या प्रतिमा घेण्यास सुरुवात करणे.

• रोव्हरचे फ्लाईट सॉफ्टवेअर अपग्रेड करणे.

• सर्व उपकरणांची तब्येत तपासणे.

• हात बाहेर काढून त्याची हालचाल तपासणे ; तसेच ‘ हलका व्यायाम ‘ करणे.

• शॉर्ट टेस्ट ड्राइव्ह करणे

• पोटाखालील तबकडी खाली सोडणे (या तबकडीमुळे उतरण्याच्या वेळी हेलिकॉप्टरचे संरक्षण होते )

विविध उपकरणे कशी कार्यान्वित होतात त्यानुसार पूर्ण सुरुवातीचा टप्पा उतरल्यावर 30 सोल्सचा होता.

सुरुवातीच्या टप्प्यात पर्सिव्हिरन्सला एक सपाट जागा हुडकणे आवश्यक होते, त्याचा उपयोग इंजेन्युइटी हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड म्हणून झाला. या सपाट जागेच्या मध्यावर रोव्हरने इंजेन्युइटीला सोडले व स्वतः त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर जाऊन थांबला. त्यानंतर इंजेन्युइटीच्या टीमने 30 सोल्सपर्यंत हेलिकॉप्टरच्या उड्डाणाच्या अनेक चाचण्या केल्या.

(C)भूपृष्ठावरील मोहीम :- हेलिकॉप्टरच्या प्रायोगिक उड्डाणानंतर पर्सिव्हिरन्सने त्याच्या भूपृष्ठावरील मोहिमेचा टप्पा सुरु केला. यामध्ये प्रामुख्याने प्राचीन सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा शोध घेणे, मंगळाचे वातावरण व भूशास्त्र यांचा अभ्यास करणे आणि काळजीपूर्वक निवडलेले व व्यवस्थित नोंद केलेले (दस्तऐवजीकरण केलेले ) खडकांचे नमुने गोळा करणे (हे नमुने भविष्यकालीन मोहीमेद्वारा पृथ्वीवर परीक्षणासाठी आणले जाणार आहेत ) ही कामे असणार आहेत.

रोव्हरच्या एक वर्ष कालावधीच्या मोहिमेमध्ये अशी एक वेळ आली, ज्यावेळी त्याच्या हालचालींवर बंधन आली. उदा. सप्टेंबर 2021 मधील अंदाजे 20 सोल्स. यावेळी पृथ्वी व मंगळ यांमध्ये सूर्य आला, त्यामुळे दोन ग्रहांदरम्यानच्या दूरभाषणात अडथळे आली. मिळालेल्या वेळात जास्तीत जास्त वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी मिशन टीमने करायच्या कामाची आखणी फार पूर्वीच केली आहे. वैज्ञानिक मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतील व त्याचा फीडबॅक रोव्हरला देतील, त्यानुसार रोव्हर कार्यवाही करेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments