नासाची मंगळ मोहीम (भाग चार ) – असा आहे आपला शेजारी

 

 

नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020 (भाग चार )

असा आहे आपला शेजारी

 

(A)या लेखाच्या सुरवातीला आपण मंगळा विषयी थोडक्यात माहिती घेऊया.

(अ ) आकार – पृथ्वीपेक्षा अर्धा पण पृथ्वीच्या चंद्राच्या दुप्पट. पण मंगळावर पाणी नसल्यामुळे मंगळावरील जमिनीचे क्षेत्रफळ पृथ्वीवरील जमिनीच्या क्षेत्रफळाएव्हढेच भरते.

(ब ) वस्तुमान – पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 10%.

(क ) गुरुत्वाकर्षण – पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणबलाच्या 38%.

(ड ) कक्षा – लंबगोलाकार. पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतरापेक्षा 1.5 पट दूर. ( सूर्यापासून सरासरी 227.7 दशलक्ष कि.मी.)

(इ ) वर्ष – 1 मंगळवर्ष ( सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास लागणारा वेळ ) म्हणजे पृथ्वीवरचे 687 दिवस.

(फ ) मंगळ दिवस – 1 मंगळ दिवस (स्वतःभोवती फिरण्याचा काळ ) हा पृथ्वीच्या दिवसापेक्षा 1.027 पट मोठा आहे. (म्हणजे 28 तास 39 मिनिटे 35 सेकंद)

(ग ) वातावरण – पृष्ठभागानजीक मंगळाच्या वातावरणाची घनता पृथ्वीच्या वातावरणाच्या घनतेच्या 1% आहे.

(ह ) तपमान – पृष्ठभागानजीक तपमान सरासरी -53°C, वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी ते वेगवेगळे भरते. उदा. ध्रुवाजवळ रात्री ते -128°C भरते तर विषुववृत्ताजवळ मध्यान्ही कक्षेमध्ये जेव्हा मंगळ अगदी सूर्याजवळ असतो तेव्हा ते 27°C भरते.

(B)आता आपण मोहिमेचा आढावा घेऊ :

पर्सिव्हीरन्स रोव्हरसह मार्स 2020 अंतराळयानाने 30 जुलै 2020 ला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.20 ला केप कॅनाव्हराल, फ्लोरिडा इथून मंगळाकडे झेप घेतली. आकाशीय गतीशास्त्राच्या मदतीने 7 महिन्यांनंतर 18 फेब्रुवारी 2021 ला ते मंगळावर उतरले.

या योजनेचे प्रामुख्याने उड्डाण, मार्गक्रमण आणि अवतरण ( यांना प्रवेश, अवरोह व अवतरण असेही म्हणतात ) आणि मंगळपृष्ठावरील कार्य हे टप्पे आहेत.

प्राथमिक योजनेनुसार ही मोहीम एक मंगळवर्ष चालेल.(साधारण 687 पृथ्वीदिवस ). जेझेरो क्रॅटरच्या अन्वेषणातून पर्सिव्हीरन्स उच्च प्राथमिकतेचि वैज्ञानिक ध्येये साध्य करू इच्छितो, त्यातील एक म्हणजे मंगळावर जीवनाची संभाव्यता आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधणे. रोव्हरची अंतराळजैविक मोहीम मंगळावरील प्राचीन सूक्ष्म जीवांचा शोध घेईल, मंगळावरील हवामान व भूशास्त्र यांचा अभ्यास करेल आणि भविष्यात पृथ्वीवर आणण्यासाठी खडकांचे नमुने गोळा करेल. पर्सिव्हीरन्स मानवाच्या भविष्यकालीन मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी घेईल, त्याची व्यवहार्यता तपासून बघेल आणि त्यासाठी लागणारे ज्ञान/माहिती गोळा करेल.

इंजेन्युइटी हेलिकॉप्टर हे पर्सिव्हीरन्स बरोबर मंगळावर गेले आहे व मंगळाच्या विरळ वातावरणात उडण्याचे तांत्रिक प्रात्यक्षिक त्याने यशस्वीरीत्या केले आहे.

(C)आता आपण उड्डाणाविषयीची माहिती घेऊया :-

(अ ) उड्डाणाच्या घडामोडी – पृथ्वी व मंगळ दोन्ही ग्रह सूर्याभोवती फिरतात. पृथ्वीची कक्षा मंगळाच्या कक्षेच्या आतील बाजूस आहे. 26 महिन्यांतून एकदा मंगळ व पृथ्वी एकमेकांना ओलांडून जातात. त्यामुळे मंगळाकडे केल्याजाणाऱ्या मोहिमांसुद्धा या कालावधीच्या फरकाने केल्या जातात. त्यामुळे पृथ्वीपासून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या यानाला कमीतकमी अंतर कापावे लागते, व कमीतकमी वेळ लागतो. ही वेळ चुकली तर, मंगळावर जायला अनेक महिनेसुद्धा जास्त लागू शकतात. त्यामुळे प्रक्षेपणाची तारीख ठरवतांना हे वैश्विक घड्याळ, प्रक्षेपकाची वजन वाहण्याची क्षमता, यानाचे वजन आणि मंगळावर उतरण्याची वेळ व ठिकाण यांचा विचार करावा लागतो.

पर्सिव्हीरन्सची उतरण्याची वेळ अशा प्रकारे ठरविण्यात आली होती कि, नासाचे ऑर्बिटर्स पर्सिव्हीरन्स उतरण्याच्या जागेच्या ठीक वरून भ्रमण करत असतील, त्यामुळे पर्सिव्हीरन्स वाहून नेणारे यान उतरतांना व उतरल्यावर ऑर्बिटर्सबरोबर दूरसंवाद करू शकतील. मंगळावर उतरणे नेहमीच अवघड असते, त्यामुळे नासाचे इंजिनिअर्स दूरसंवाद असण्याला नेहमीच प्राधान्य देतात, जेणेकरून प्रत्येक टप्प्यात काय घडत आहे हे त्यांना कळू शकेल.

(ब ) उड्डाणाचा कालखंड व वेळ –

उड्डाणाचा कालखंड (लॉन्च पिरियड ) ही दिवसांची अशी परिसीमा असते कि, त्या दरम्यान उड्डाण केल्यास आपणास मोहिमेचे अपेक्षित फळ मिळते. मार्स 2020 च्या बाबतीत आपले उद्धिष्ठ मंगळाच्या जेझेरो क्रॅटरवर यशस्वीपणे उतरणे हे होते. त्यासाठी उड्डाणाचा कालखंड हा जुलै 20, 2020 ते ऑगस्ट 11, 2020 असा ठरविण्यात आला होता.

उड्डाणाची वेळ (लॉन्च विंडो )- ही ठरविलेल्या दिवसांतील वेळेची अशी परिसीमा आहे, त्यावेळेस रॉकेट लॉन्च केल्यास आपणास अपेक्षित निकाल मिळू शकतात. पर्सिव्हीरन्ससाठी लॉन्च विंडो 20 जुलै रोजी सकाळचे 9.15 ते 11.15 (EDT) अशी होती. 20 जुलै हा लॉन्च पिरियडचा पहिला दिवस होता. लॉन्च पिरियडच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 11 ऑगस्टला ही लॉन्च विंडो सकाळी 8.55 ते 9.25 (EDT) अशी होती.

(क )उड्डाण – मार्स 2020 यानाचे प्रक्षेपण फ्लोरिडामधील केप कॅनाव्हाराल एअरफोर्स स्टेशनच्या लॉन्च कॉम्प्लेक्स 41 या प्रक्षेपण तळावरून 30 जुलै 2020 रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.20 ला झाले. हे प्रक्षेपण युनायटेड लॉन्च अलायन्सच्या ऍटलास व्ही 541 या दोन टप्प्याच्या अग्निबाणाच्या साहाय्याने करण्यात आले. यातील ‘541’ या नंबरची फोड खालील प्रमाणे :

5= यानाबरोबर असलेल्या अभिभाराची लांबी, 5 मिटर

4= यात चार सॉलिड रॉकेट बुस्टर्स आहेत.

1= एक इंजिन असलेली सेंटूर अप्पर स्टेज

ऍटलास रॉकेट वरूनचे हे 11वे मंगळ उड्डाण आहे ; तर ऍटलास व्ही वरचे पाचवे. यापूर्वी 2005 मध्ये मार्स रीकनायसन्स ऑर्बिटर, 2011 मध्ये क्युरिऑसिटी रोव्हर, 2013 मध्ये मावेन ऑर्बिटर व 2018 मध्ये इन्साईट लॅण्डर यांनी ऍटलास व्ही च्या मदतीने मंगळाकडे उड्डाणे भरली आहेत.

ऍटलास सेंटूर स्टेजच्या वरच्या बाजूस संरक्षक पेलोड फेअरिंगच्या आत अंतराळयान असते. प्रक्षेपणानंतर 50 ते 60 मिनिटांनी (हे खरोखर उड्डाण कोणत्या दिवशी आहे यावर अवलंबून असते ) मार्स 2020 अंतराळयान प्रक्षेपकापासून वेगळे होते आणि मंगळापर्यंतचा उरलेला प्रवास स्वतःचा स्वतः करते.

70 ते 90 मिनिटांनंतर अंतराळयान जमिनीशी संपर्क साधायला सुरुवात करते ( पुन्हा हे उड्डाण प्रत्यक्ष कधी होणार यावर अवलंबून आहे ). वेळेतील हा फरक, अंतराळयान पृथ्वीच्या सावलीत कितीवेळ असणार आहे यावर अवलंबून आहे, आणि ते कितीवेळ सावलीत असणार आहे, हे प्रक्षेपणाच्या दिवसावर आणि वेळेवर ठरते. अंतराळयानाच्या बॅटरीवर दूरभाषणाचा रेडिओ चालतो व बॅटरी सौर पंखांवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे भारित होते. त्यामुळे जर सूर्यप्रकाश नसेल तर दूरसंभाषण होऊ शकत नाही. अंतराळयान सावलीत असतांना मिशन कंट्रोल मधील इंजिनिअर्स रेडिओ ऑन करत नाहीत, कारण तसे करण्याने बॅटरी डिस्चार्ज होतील आणि त्या चार्ज करणे सूर्यप्रकाशाशिवाय शक्य नसते.

उड्डाणाचे वेळापत्रक :- उड्डाणानंतर

1) लिफ्ट ऑफ 01.1सेकंद

2) सॉलिड रॉकेट बुस्टर्स गळून पडणे – 01मि. 49.5सेकंद

3) पे लोड फेअरींग गळून पडणे – 03 मि. 27.9 सेकंद

4) ऍटलास बूस्टर इंजिन कट ऑफ – 04मि. 21.9 सेकंद

5) ऍटलास सेंटूर वेगळे होणे – 04 मि. 27.9 सेकंद

6) यानाचे मेन इंजिन चालू – 04 मि. 37.9 सेकंद

7) मेन इंजिन कट ऑफ – 11मि. 39.1 सेकंद

8) मेन इंजिन चालू – 45 मि. 21.1 सेकंद

9) मेन इंजिन कट ऑफ – 52 मि.59.1 सेकंद

10) मार्स 2020 वेगळे होणे – 57 मि. 42.1 सेकंद

11) ब्लो डाऊन सुरु – 1 तास, 24 मिनिट, 02.1 सेकंद

12) उड्डाण मिशन पूर्ण – 1 तास, 57 मिनिट, 22.1 सेकंद

 

 

 

 

 

 

 

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments