दासबोधातील विश्वाची उत्पत्ती

दासबोधातील विश्वाची उत्पत्ती

महाभारत या ग्रंथाबद्दल ज्ञानेश्वर माऊली म्हणते, “महाभारती जे नाही | ते जगी कोठेची नाही |”ज्याप्रमाणे महाभारताने मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श केला आहे, त्याचप्रमाणे श्री समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये वैश्विक, राष्ट्रीय, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक व शैक्षणिक अशा विविध अंगांना स्पर्श केला आहे. त्यापैकी विश्वाची उत्पत्ती या विषयी श्री समर्थ काय म्हणतात हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

विश्वातील एकमेव सत्य म्हणजे ब्रह्म. ते निर्गुण, निराकार, निश्र्चळ, निराभास आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी ‘एकोSहं’ अशी जी स्फूर्ती उत्पन्न झाली तीच मूळमाया. सारे जगत् मूळमायेचा विस्तार आहे. पण तीच मुळी मायिक म्हणजे मिथ्या आहे. म्हणजे संपूर्ण विश्व् दिर्घिका, तारे, ग्रह, पृथ्वीसदृश्य ग्रह, त्यावरील सजीव व निर्जीव पदार्थ (त्यात आपणही आलो ) हे सर्व भासमय आहे. विश्व् पुनःपुन्हा उत्पन्न होते व पुनःपुन्हा नाश पावते. हा सर्व मायेचा खेळ आहे. आभासी सत्य (vertual reality) आहे. इंद्रजाल किंवा गारुडी विद्या सारी खोटी ; पण मग गारुड्याचे खेळ कसे होतात? तसाच मूळमायेचा प्रकार आहे. कोणी म्हणतील ब्रह्म तर निश्र्चळ आहे, तर त्यापासून मुळमाया कशी उत्पन्न झाली? आकाश निश्र्चळ असता, त्याच्यामध्ये चंचळ वायू जसा उत्पन्न होतो, अगदी तशीच निर्गुण निराकार ब्रह्माच्या ठिकाणी सगुण, साकार व चंचल माया उत्पन्न होते. वायूला आकार आला (वायू प्रकट झाला ) म्हणून आकाश भंगले असे होत नाही, तसे मूळमायेमुळे निर्गुण ब्रह्माच्या व्यापकत्वाला बाधा येत नाही. वायू पुरातन नव्हता, तशी मूळमायाही नाही. वायू किंवा मूळमाया सत्य म्हणाल तर, वायू आकाशात व माया ब्रह्मात लीन होते. वायू भासतो पण सापडत नाही, तशी माया भासते पण आढळत नाही. तथापि पुढे मायेचा ब्रह्माण्ड (शिवाची उपाधी ) व पिंड (जीवाची उपाधी ) या उभय रूपांनी विस्तार झाला आहे. लटके असलेले अभ्र आकाशात एकदम उत्पन्न होते त्याप्रमाणे मायेच्या योगाने हे जग झाले. त्या अभ्रामुळे आकाशाचा निश्र्चळपणा गेलासा वाटतो, पण खरोखर तो गेलेला नसतो. तसेच मायेच्या योगाने ब्रह्म सगुण व चंचळ झालेसे वाटते, पण ब्रह्म निश्र्चळ व निर्गुण आहे तसेच आहे.

परब्रह्मवस्तू निरवयव निराकार आहे. माया आकार दर्शविते. मिथ्या मायेचा हा स्वभावच आहे. विचार केला तर माया मुळीच नाही, परंतु ती खऱ्यासारखी भासते. अभ्राप्रमाणे माया उत्पन्न होते व नाश पावते. ब्रह्माच्या ठिकाणी ‘एकोsहं’ अशी जी स्फूर्ती उत्पन्न झाली तीच माया. त्रिगुण पंचभूते ही सर्व मूळमायेतच बिजरूपाने आहेत. ती सूक्ष्मरूपात होती, तीच पुढे जडत्व पावली व त्यांच्यायोगे सृष्टीरचना झाली.

मूळमायेतच पंचभूते सूक्ष्म रूपाने आहेत. एका एका भुताच्या पोटात पाचही भूतांचे व्यापार होत असतात. कसे ते आपण पाहू. सूक्ष्म आकाशात पृथ्वी कशी असते ते आपण पाहू. आकाश = अवकाश (पोकळी ) शून्य, शून्य म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे जडत्व, हीच सूक्ष्म आकाशातील पृथ्वी. आकाश स्वतःच मृदू आहे. मृदुत्व हे आपाचे लक्षण असल्यामुळे आकाशात आप आहे. अज्ञानाने भास ‘भासतो ‘, तोच तेजाचा प्रकाश होय. म्हणून आकाशात तेज आहे. वायू व आकाश यांत भेद नाही. आकाशाप्रमाणेच वायूही स्तब्ध असतो ; तथापि आकाशामध्ये जो कोंडलेला तोच वायू होय. आकाशात आकाश मिसळले आहे. अशाप्रकारे आकाशात पंचमहाभूते असतात.

वायूमध्ये पंचभूते आहेत. फूल हलके असले तरी कांही प्रमाणात ते जड असते, त्याप्रमाणे वायू कितीही हलका असला तरी तो कठीण आहे. वायूच्या झपाट्याने झाडे कडाकडा मोडतात. कांही भार पडल्याशिवाय झाड मोडणार नाही. तो भार म्हणजे तोल तोच वायूतील ‘पृथ्वीचा’ जडांश. विस्तवाची ठिणगी कितीही लहान असली तरी तिच्या ठिकाणी कांहीतरी उष्णता असतेच. त्याचप्रमाणे सूक्ष्मामध्ये जडपणा असतो, तोही सूक्ष्म रूपानेच असतो. वायूतील मृदूपणा तेच ‘आप’ होय.भास हे ‘तेजा’ चे स्वरूप होय; चंचळ रूपाने वायू तेथे स्वभावताच आहे. सर्वांना मिळून ‘आकाश’ सहजच पैस जागा आहे.

तेजाचा भास होतो. हाच कठीणपणा ; तेजामध्ये हेच ‘पृथ्वी’चे रुप होय. भास भासला. तो मृदू आहेसा वाटला; तोच मृदूपणा हे तेजातील ‘आप’ होय. तेजामध्ये ‘तेज’ आहेच. तेजात चंचळपणा दिसतो तो ‘वायू’ व निश्चळता असते ते ‘आकाश’.

जो मृदूपणा तेच आपाचे लक्षण होय. जो मृदूपणा तोच कठीणपणा. (मृदूत्व म्हणजेच कांहीतरी काठीण्य ) तेच पृथ्वीचे लक्षण होय. आपात ‘आप’ असतेच. मृदूपणा भासतो ते ‘तेज’. मृदूपणामध्ये स्तब्धपणे ‘वायू’ दिसतो. आपामध्ये ‘आकाश’ असतेच, कारण ते मूळचेच सर्व व्यापक आहे.

पृथ्वी ही मूळचीच कठीण आहे. कठीणपणामध्ये जो मृदूपणा तेच ‘आप’. कठीणत्व जे भासते ते भासणे तोच ‘तेजाचा प्रकाश’. कठीणत्वामध्ये जो विरोधाचा अंश आहे तोच ‘वायू’. ‘आकाश’ सर्वांना व्यापक आहे.

पंचमहाभूतांकडे सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास खरोखर (मूळचा) वायूच आहेसे वाटते ; आणि वायूचे सूक्ष्मशोधन केल्यास त्यात पंचभूते दिसतात. तात्पर्य, (हा सूक्ष्म) पंचभूतात्मक वायू हीच मूळमाया होय, त्या मायेच्या पुढील (गुण)माया व सूक्ष्म त्रिगुण हे ही पंचभूतात्मक आहेत. पंचमहाभूते व तीन गुण मिळून अष्टघा प्रकृती झाली. ही अष्टघा प्रकृती पंचभूतात्मकच आहे. मूळमायेत पंचभूते सूक्ष्मरूपाने आहेत. तिच्यापासून गुणमाया-त्रिगुण- हे ही प्रथम सूक्ष्म व नंतर क्रमाने स्पष्ट झाले. गुणांपासून (पंच ) भूते व्यक्त स्वरूपाला आली; नंतर सगळी जड बनून त्यांची तत्वे (elements) झाली. पुढे नाना तत्वे निर्माण होऊन पिंडब्रम्हाडात्मक स्थूळ सृष्टीरचना झाली. हा जो वर संक्षेपाने सांगितला तो भूतकर्दम (पंचमहाभूतांचा चिखल ) होय; ब्रह्माण्ड गोळ्याची रचना होण्याच्या पूर्वीचा तो सूक्ष्म कर्दम होय. (अशा स्थितीतील ) मूळमाया सूक्ष्म दृष्टीने ओळखावी. सप्तकंचूक (पंचतत्वे +अहंकार +महतत्व) या सात आवरणांनी वेष्टीत अथवा सप्तसागर, सप्तरस किंवा सप्तवर्ण यांनी युक्त असे प्रचंड ब्रह्माण्ड तेव्हा झाले नव्हते; माया सप्तभूवने /ब्रह्माण्ड (शिवोपाधी ) व अविद्या (जीवोपाधी ) यांचे बंड सुद्धा अलीकडचे आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर किंवा पृथ्वी, मेरू, सप्तसागर हे सर्व (मुळमायेच्या ) अलीकडचे आहेत (हे तेव्हा निर्माण झाले नव्हते ). अनेक लोक, अनेक स्थाने, चंद्र, सूर्य, तारे, सप्तद्विपे, चौदा भूवने हे सर्व अलीकडील होय. शेष, कुर्म, सप्तपाताळ, एकवीस स्वर्ग, अष्ट दिक्पाळ,तेहतीस कोटी देव हे सर्व अलीकडचे आहेत. बारा आदित्य, अकरा रुद्र, नऊ नाग, सात सप्तर्षी तसेच अनेक देवांचे अवतार हे सर्व अलीकडचे. या सर्व विस्ताराचे मूळ म्हणजे फक्त मुळमाया होय.

देहासह सर्व चराचर जग पंचभूतात्मक असे उत्पन्न झाले असून जगाचा पसारा मायेच्या अनुरोधाने किंवा आपापल्या प्रकृतीधर्माप्रमाणे चालत असतो.

(स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण ) चार देह, (जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या )चार अवस्था, (विश्व्, तैजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा )हे चार आत्मे, (नेत्र, कंठ, हृदय व मुर्धा )चार स्थाने, (स्थूल, प्रतिविक्त, वासनारूप आनंद, आनंदाव भास )हे चार भोग, (अ, उ, म् व अर्धमात्रा ) अशा चार मात्रा, (तम्, रज, सत्व व शुद्ध सत्व )असे चार गुण, (क्रिया, द्रव्य, इच्छा व ज्ञान)या चार शक्ती अशी बत्तीस तत्वे आहेत. स्थूल देहाची 25 व सूक्ष्म देहाची 25 मिळून 50. 32+50=82 अशा एकंदर 82 तत्वांची पिंड ब्रह्माण्ड रचना आहे. अशा प्रकारे एका पिंडाची व ब्रह्माण्डाची रचना झाली आहे; हा सर्व विस्तार मूळ एका कल्पनेचा (एकोSहं बहुस्याम |) आहे.

हा देह पंचभूतात्मक असून त्यास कारणीभूत असणारा जो देहातील आत्मा त्याची ओळख करुन घ्यावी. देह शेवटी नाश पावतो म्हणून त्याला आत्मा म्हणता येत नाही. अनेक तत्वांचा समुदाय यांचा समावेश ‘देह ‘ या शब्दातच होतो. अंतःकरणपंचक, प्राणपंचक, विषयपंचक व इंद्रिय दशक (पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये) मिळून सूक्ष्म देह होय.

आता सूक्ष्म देहाचा खोल विचार केला तर, असे दिसून येईल कि, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी निरनिराळ्या अनेक तत्वांच्या उपाधीहून आत्मा वेगळा आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळमाया असे आठ देह आहेत. यांपैकी चार पिंडात व चार ब्रह्मांडात आहेत. त्यात

प्रकृती व पुरुष धरले तर सगळे मिळून दहा देह होतात. असे हे तत्वांचे स्वरूप आहे. आत्मा या तत्वांचा साक्षी असून त्या तत्वांहून तो निराळा आहे. कार्य म्हणजे जगत्,कर्ता म्हणजे पुरुष, कारण म्हणजे प्रकृती हे सर्व त्याचे दृश्य आहे; म्हणजे तो आत्मा त्याचा दृष्टा आहे. जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्माण्ड इत्यादी मायेचे बंड आहे. पण आत्मा हा सर्वांहून वेगळा आहे. हा सर्व पंचीकरणाचा विषय आहे. पाहू गेले तर आत्मे चार दिसतात. जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा (परमात्मा ) आणि चौथा निर्मळात्मा. पण हे चारी एकरूपच आहेत. पिंडामध्ये व्यापक असणारा ब्रह्माचा अंश त्याला जीवात्मा म्हणतात,ब्रम्हांडात असणारा ब्रम्हांश त्याला शिवात्मा म्हणतात, ब्रम्हांडाबाहेरच्या ब्रह्मांशाला परमात्मा म्हणतात, सर्वांहून श्रेष्ठ (परेश ) जो निर्मळात्मा तो सर्व उपाधींहून निराळा आहे.

जीवात्मा जीवपणामुळे अंशात्मक (लहान ) होऊन अहंकाराचे योगाने जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडला आहे. वास्तविक विचार केला तर प्राण्यांना जन्म कसला? (पण विवेकाने पाहिल्यास जीवात्म्याला जन्म मरण नाही ) (अशा प्रकारे विचार करून ) प्राणी जन्ममृत्यूपासून सुटला म्हणजे त्याला मोक्ष मिळाला असे समाजावे; तत्वांचा शोध घेता घेता परमात्मवस्तूची खरोखर प्राप्ती होते. (तत्वांचा शोध करून तत्वांतील जन्ममृत्यूरहित निरंजन आत्मा ओळखणे व तोच मी आहे हे जाणणे यालाच मोक्ष म्हणतात ).

पिंड व ब्रह्माण्ड दोहिंकडे पंचमहाभूतांची गर्दी असते. (ब्रह्माण्ड तसाच पिंड पंचभूतात्मक आहे व दोन्ही नाशवंत आहेत. या व्यतिरिक्त ब्रह्माण्ड व पिंड यांची तुलना करायची नाही. केल्यास संभ्रम उत्पन्न होतो.)

आकाश जसे निराकार आहे, तशीच ब्रह्माची गोष्ट आहे. आकाशात जसा वायूचा विकार तशीच ब्रह्मामध्ये मूळमाया उत्पन्न होते. मूळमायेतच पंचभूते आहेत. तसेच तीमध्ये जाणीव हा सत्वगुण, जाणीव नेणीव मिळून रजोगुण व नेणीव हा तमोगुण आहे. त्या ठिकाणी जाणीव कोठची आहे असे म्हणाल तर त्यांचा संबंध (अभिप्राय ) ऐका. पिंडातील महाकारण देहाची सर्वसाक्षीणी तुर्या अवस्था आहे. त्याप्रमाणे मूळप्रकृती म्हणजे ब्रम्हांडाचा महाकारण देह होय ; म्हणून त्या ठिकाणी जाणीवेचे अधिष्ठान आहे. मूळमायेमध्ये तीन गुण गुप्तपणे असतात ; ते व्यक्त होण्याची जी संधी ती गुणक्षोभिणी किंवा गुणमाया होय. मूळमाया ही वायुस्वरूप आहे. थोडाबहूत गुणांचा विकार झाला कि, त्याला गुणमाया – गुणक्षोभिणी – म्हणतात. ( मूळमायेचे अधिक व्यक्त स्वरूप म्हणजे गुणमाया होय ) गुणमायेपासून पुढे जाणीव (सत्वगुण ), मध्यस्थ (जाणीव नेणीव म्हणजे रजोगुण ) व नेणीव (तमोगुण) उत्पन्न होतात. या तिघांच्या मिश्रणाने सृष्टीचा एकंदर स्वभाव बनला आहे. या गुणांच्या ठिकाणी मातृका म्हणजे अक्षर यांचे मूळस्थान असा शब्द म्हणजे ध्वनी उत्पन्न झाला. ( या गुणांच्या ठायी आकार, उकार, मकार अशा अ- उ-म् व (अर्धमात्रा) म्हणजे ॐ अशा मात्रांचा शब्द -ध्वनी उत्पन्न झाला ) आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे, (तेथे ॐ असा मात्रामय शब्द निर्माण झाला ) (अर्थात आकाश उत्पन्न झाले, व त्यापासून बाकीची भूते झाली, असा यातील आशय आहे ) शब्दामुळेच वेदशास्त्रे उत्पन्न झाली (अर्थात आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्निपासून पाणी व पाण्यापासून पृथ्वी अशा क्रमाने पंचभूते निर्माण झाली )पंचभूते व तीन गूण मिळून अष्टघा प्रकृती हा सगळा वायूचा विकार होय. जाणीव नेणीव यांचा प्रकार सुद्धा वायूमुळे होतो. ( वायूच्या चलनामुळेच जाणीव सत्वगुण, व जाणीव नाही म्हणून नेणीव – तामोगुण व उभय संगतीने रजोगुण असे तीनही गुण वायूच्या चळनामुळेच दिसून येतात.)त्रिगुण व पंचभूते ही एकापासून एक उत्पन्न झाली असे वरवर पाहता दिसून येते. पण वास्तविक वायुरूपी मूळमायेचे स्वरूप मुळातच तीन गुण व पाच भूते या आठांचे बनले आहे. वर सांगितल्याप्रमाणे ती तत्वे स्पष्ट होत गेली ; म्हणून एकापासून एक झाले हे म्हणणेही खरेच आहे.

हा झाला वायूचा कर्दम. वायूपासून अग्नी उत्पन्न झाला. तोही कर्दमरुपच आहे. अग्निपासून पाणी झाले, ते ही कर्दमरुपच आहे. पाण्यापासून पृथ्वी झाली, ती ही कर्दमरुपच आहे. (पंच महाभूतांचा कर्दम मुळमायेतच असल्यामुळे पुढे जी आकाश, वायू, अग्नी, आप व पृथ्वी ही भूते झाली त्या प्रत्येक भूतात इतर चार भूतांचा अंतर्भाव असल्यामुळे पाचही भूते कर्दमरुप -मिश्रित आहेत हे ओघानेच आले )

महत्वाचे म्हणजे भूतांत जाणीव आहे. जाणीव म्हणजे जाणतेपणाचे चळण. तेच वायूचे स्वरूप आहे. वायूच्या अंगचे सर्व गुण पूर्वी सांगितले आहेत. [उदा. पंचमहाभूते व तीन गुण मिळून अष्टघा प्रकृती हा सगळा वायूचा विकार होय. जाणीव व नेणीव यांचा प्रकार सुद्धा वायूमुळे होतो. वायू नसेल तर जाणीव कोठची? व जाणीव नसेल तर नेणीव तरी कोठची? म्हणून वायूमुळेच जाणीव -नेणीवेला अस्तित्व आहे. जेथे मुळी चळण (चलन =चलणे ) नाही तेथे जाणीवेचे स्वरूप (सत्वगुण ) कोठून दिसेल? म्हणून जाणीव हा वायूचा गुण आहे हे, निश्चितपणे समाजावे ] ही जाणीव कोठे दिसते व कोठे दिसत नाही.(कोठे सूक्ष्म आहे व कोठे स्थूल आहे ) पण ती सर्व भूतांत व्यापून आहे.

ब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया उत्पन्न झाली, ती त्रिगुण व पाच भूते यांपासून बनलेली आहे. चार भूते विकारयुक्त (विकार पावणारी )आहेत ; आकाश मात्र निर्वीकार आहे. आकाश हे वास्तविक भूत आहे असे नव्हे. (ब्रह्माचा अंश ) पिंडाला व्यापून असतो म्हणून जीव व ब्रम्हांडाला व्यापून असतो म्हणून शिव असे म्हणायचे; त्याप्रमाणे आकाशाचा विस्तार आहे. उपाधीस्तव आकाश भूतांत धरले म्हणून इतर चार भूतांप्रमाणे ते ही गुणांपासून झाले असे समजणे गैर आहे. उपाधीमध्ये सापडले व सूक्ष्मपणे विचार करता भासले एव्हढ्याचसाठी आकाशाची भूतांत गणना करावयाची. आकाश =अवकाश =भकाश भासरूप म्हणजे शून्य, पोकळी किंवा काही नाही (असे त्याचे वर्णन करतात) आणि परब्रह्म हे निराभास आहे. उपाधी आहे म्हणून आकाशाला भूत म्हणायचे, नाहीतर उपाधीरहित जे आकाश तेच परब्रह्म होय.

प्रकृतीचा विस्तार झाल्यानंतर पुढे एका स्वरूपाचे भलतेच स्वरूप बनते, विकार पावणारेच ते! त्याचा नियम काय सांगावा? एका पाण्याचाच विकरांचा विचार केला असता, ते असंख्य आहेत; तसेच चौऱ्यांशी लक्ष योनींचा हा विस्तार अवघ्या पाच भूतांचाच आहे. सारी खटपट व लाटपट त्रिगुण व पंचभूते यांची होय. किती रंग, किती रूपे! हा सगळा अष्टघा प्रकृतीचा खेळ चालला आहे.

ब्रह्म अखंड असल्यामुळे खंड पावत नाही, ब्रह्माच्या ठिकाणी दुसरेपणाचे बंड नाही, तर मग ब्रह्मात ब्रह्माण्ड कसे शिरले ? उत्तर – आकाशात दिवा लावला म्हणून, दिव्याने आकाश पलीकडे ढकलले असे होत नाही, तसेच ब्रह्मात ब्रह्माण्ड भासले म्हणून ब्रह्म अभंग अखंड आहे असे म्हणण्यास कोणताच प्रत्यवाय नाही. जे जडत्वाला येते ते नष्टते, पण आकाश जसेच्या तसे अचळ, अभेद्य आहे. आकाशाहून एकच पायरी पलीकडची ब्रह्माची. वस्तूपासून वेगळे राहून पहिले कि, ते आकाश, वस्तूशी अभिन्न झाले कि, ते आकाशच ब्रह्म होय. कल्पनेला भासते ते आकाश व निराभास निर्विकल्प आहे ते परब्रह्म. वायूपासून पृथ्वीपर्यंतची चार भूते उत्पन्न होतात व लय पावतात. पृथ्वी विराघळते व पाणी राहते, पाणी आटून अग्नी राहतो, अग्नी विझून वायू उरतो व तो ही शेवटी नाश पावतो. पण आकाश होत जात नाही हे तर प्रत्यक्ष दिसते, म्हणून आकाश अचळ आहे. तसे ब्रह्मी ब्रह्माण्ड भासले तरी ब्रह्म भेदत नाही, ते अखंडच आहे. समुद्रात खसखशीचा दाणा तसे परब्रह्मामध्ये दृश्य आहे. बुद्धी जर विशाल केली तर ती आकाशाचे आकलन करू लागते. मग तिला हा ब्रह्माण्डगोल कवठाप्रमाणे दिसू लागतो. त्यापेक्षा बुद्धी वाढविल्यास ब्रह्माण्ड बोराएव्हढे दिसते, आणि शुद्ध ब्रम्हाकार झाल्यावर काहीच नाही असे दिसून येईल. भ्रमाने आपण लहान झालो, केवळ देहाधारी बनलो, तर मग आपल्या बुद्धीला ब्रह्मांडाचे आकलन कसे होईल? वृत्ती अशी वाढवावी कि,पसरता पसरता ती नाहीशी होईल ; परब्रह्माला तीने चोहोकडून व्यापून टाकावे (इतकी ती विशाल करावी ). एक गुंजभर सोने घेऊन त्याने सर्व ब्रह्माण्ड मढवू म्हंटले तर ते कसे शक्य आहे? (वृत्ती परमात्मवस्तूचे आकलन करू गेल्यास ) वृत्तीला ब्रह्माचे आकलन होत नाही, त्यामुळे वृत्ती फाटून लीन होऊन जाते, आणि मग निर्गुण आत्माच जशाचा तसा उरतो.

अंतःकरण म्हणजे जाणीव व जाणीव म्हणजे जाणता (समजणारा ) स्वभाव; या जाणतेपणाच्या कलेच्या योगानेच देहाचे संरक्षण करता येते. साप समजून उमजून चावायला येतो व प्राणी पळतो ते ही समजूनच. दोन्हीकडे जाणीव असते. जेव्हढे जीव जगात निर्माण झाले आहेत, त्या सर्वांना मिळून जाणीवकळा एकच आहे. आवडनिवड निर्माण झाली ती देहास्वभावामुळे झाली. जाणीव म्हणजे अंतःकरण (म्हणजे सत्वगुण ) व अंतःकरण विष्णुचा अंश आहे. या अंतःकरणाच्या योगानेच विष्णू सर्व जगाचे पालन करतो. न जाणल्यामुळे प्राण्याचा नाश होतो. या नेणीवेला तामोगुण म्हणतात. अशाप्रकारे रुद्र हा तामोगुणाच्या योगाने संहार करतो. जाणीवनेणीव मिश्रित असा रजोगुणाचा स्वभाव होय. या रजोगुणामुळे प्राणी जन्मास येतो. (म्हणून ब्रह्मा निर्माण करतो असे म्हणतात ).

मूळमायेपासून गुणक्षोभीणी झाली ; त्या गुणक्षोभीणीपासून ब्रह्मा-विष्णू -महेश्वर या त्रिगुणात्मक देवांचा जन्म झाला.

उपाधीरहित जे आकाश ते निराभास ब्रह्म होय; त्या निराभासामध्ये मुळमायेचा जन्म झाला. त्या मुळमायेचे स्वरूपही वायूरूपच आहे, त्या वायूमध्ये पंचभूते व तीन गुण (अतिसुक्ष्मपणाने) असतात. आकाशापासून वायू उत्पन्न झाला, वायूपासून अग्नी उत्पन्न झाला, अग्निपासून आप झाले, आपापासून पृथ्वी झाली ती बीजरूप आहे.

आकाशापासून वायू उत्पन्न झाला ; त्याचे दोन भाग झाले. एक भाग (प्रकार ) सर्वत्र वाहणारा वायू ; दुसरा प्रकार वायूमधील जगज्ज्योती हा होय. वायूचे विकार पुष्कळ आहेत; पण मुख्य प्रकार वरीलप्रमाणे दोन. वायूपासून तेज झाले. ते उष्ण व शीत या दोन प्रकारांनी प्रकट झाले. उष्ण तेजापासून दैदिप्यमान सूर्य, सर्वभक्षक अग्नी व वीज हे तीन उत्पन्न झाले. शीतल तेजापासून आप (पाणी ), अमृत, चंद्र, तारा व बर्फ उत्पन्न झाले. तेजाचे प्रकार पुष्कळ असले तरी मुख्य प्रकार दोनच. अपाचेही पाणी आणि अमृत असे दोन प्रकार सांगितले आहेत. पृथ्वीचा विचार केला तर पाषाण -माती हा एक प्रकार आणि सोने, परिस, रत्ने हा दुसरा प्रकार होय.

ब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया झाली.तिलाच (सूक्ष्म ) अष्टघा प्रकृती म्हणतात. कारण ती पंचभुते व त्रिगुण यांनी मिश्रित झाली आहे. ही मूळमाया वायुरूप असून वायूमध्ये जाणीवेचे रुप आहे. ही जाणीवच इच्छा किंवा संकल्प होय. पण ब्रह्माच्या ‘इच्छेने’ मुळमाया झाली असे मात्र म्हणता येत नाही. कारण ते निर्वीकार आहे. त्याला नामरूप विकार लावता येत नाहीत. तसेच त्याला उपाधीही लावता येत नाही. ज्याला ज्याला म्हणून नांव देता येते तो सारा भ्रम आहे. ब्राह्मच्या ठिकाणी मायारूपी जो वायू त्यात जाणीवकळा आहे. तीच ईश्वर होय. तोच ईश्वर गुणरूप होऊन त्याचेच तीन भेद झाले; व ब्रह्मा, विष्णू, महेश उत्पन्न झाले. जाणता भगवान विष्णू (सत्वगुणी ), जाणता नेणता ब्रह्मदेव (रजोगुणी ) आणि नेणता महादेव (तमोगुणि ) आहे. वायुरूप मुळमायेत हे तिन्ही देव वायुरूपच होते, पुढे त्यांनी देह धारण केले. ते इच्छेप्रमाणे देह धारण करतात व इच्छेप्रमाणे गुप्त होतात.

प्रत्येक भुतात दुसऱ्या भुताचा थोडा अंश असतो तसेच प्रत्येक गुणात दुसऱ्या गुणाचा अंश असतो.

प्रथमत: वायुस्वरूपानेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी देह धारण केले, व पुढे त्यांचे मुलगे नातू असा विस्तार झाला. त्यांनी अंतःकरणात स्त्रिया असाव्यात अशी कल्पना केली, तेव्हा त्यांच्या संकल्प सामर्थ्याने त्या निर्माण झाल्या, पण त्यांच्यापासून त्यांनी प्राणी, संतती केव्हाही निर्माण केली नाही. तसेच इच्छामात्रेकरून त्यांनी पुत्र उत्पन्न केले. ही झाली हरिहरांची गोष्ट. पुढे ब्रह्मदेवाने सृष्टीची कल्पना केली. इच्छा करण्याबरोबर सृष्टी निर्माण झाली. जारज- अंडजादी अनंत जीवजंतू इच्छामात्रे निर्माण केले. अंडज-जारजादिकांच्या जोड्याच उत्पन्न केल्या. एक पाण्यापासून (घामापासून ) झाले त्यांना ‘स्वेदज’ असे म्हणतात. एक वायूपासून झाले त्यांना ‘उद्भीज’ म्हणतात. ब्रह्मदेवाच्या या विद्येला ‘सृष्टी निर्माण विद्या’ म्हणतात. जाणते नेणते प्राणी ब्राह्मदेवाने निर्माण केले आणि वेद सांगून त्यांना मार्गाला लावले. नंतर शरीरापासून शरीरे निर्माण झाली, व विकारे म्हणजे एकापासून एक होऊन सृष्टी वाढली. ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केल्यावर तिचा प्रतिपाळ विष्णूने केला. सगळे प्राणी जे उत्पन्न झाले ते विष्णूने जाणीवच्या मूळ स्वरूपाने (जाणीवरूप अंतःकरणाने ) पाळले; आणि वेळोवेळी स्थूळ शरीर धारण करून (अवतार घेऊन ) अनेक प्रकारच्या दैत्यांचा संहार केला. आता, प्राणी जे जन्माला येतात, त्यांचा नेणतेपणाने संहार होतो ; अशा प्रकारे मूळरुपच (नेणीव, तमोगुण ) त्यांचा नाश करते. (रुद्रही जन्मलेले प्राणी मूळरूपे -नेणीवेने संहारितात ). रुद्ररूप शरीराने जेव्हा नेणीव खवळेल तेव्हा सगळ्या जीवसृष्टीचा संहार होईल ; त्यावेळी सगळे ब्रह्माण्ड जळून जाईल.

प्रळय एकंदर पाच प्रकारचे आहेत. पिंडामध्ये दोन – एक निद्रा व दुसरा मरण. देह धारण करणाऱ्या ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांच्या मूर्ती जेव्हा निद्रेला वश होतात, तो ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय होय. तिन्ही मूर्तिंचा जेव्हा अंत होईल, तेव्हा ब्रम्हांडाचा नाश होईल. त्यावेळेला ब्रह्मप्रळय

होतो. त्यावेळी मूळमाया आपले अधिष्ठान जे निर्विकल्प परब्रह्म त्यात लीन होते. त्या ठिकाणी स्वस्वरूपच म्हणजे जाणीव राहते व जगज्ज्योती नाहीशी होते. सारांश शुद्ध स्वरूपस्थिती असते. पाचवा प्रळय विवेकाचा होय. आजच्या अवस्थेमध्ये प्रकृती आहे ती खरी वाटते व विश्व् खरे वाटते. सर्व दृश्याचा निरास करण्यासाठी आत्मानात्म विवेक करावा. अशा विवेकाने दृश्य खरे नाही म्हणून बाजूला सारणे, याला विवेक प्रलय म्हणतात.

जे होते, राहते व लय पावते त्याचा संबंध ब्रह्माशी नाही.

आकाशामध्ये वायू उत्पन्न झाला, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मूळमाया झाली असे समजावे, त्या ‘वायूमध्ये’ तीन गुण व पंचभुते बिजरूपाने असतात. या बीजभूत मुळमायेपासूनच ही सृष्टीरचना झाली. या ठिकाणी – मुळमायेत – दोन भेद दिसतात. निश्र्चळ परब्रह्मामध्ये जी चंचळरूपाची स्थिती तोच वायू. त्याच्यामध्ये जगज्ज्योतीचा झरा किंवा उगम अशी जाणीवकळाअसते. ही जाणीव व वायू मिळून जो मिलाफ त्यास मूळमाया म्हणतात. मूळमाया हा शब्द स्त्रीलिंगी आहे, म्हणजे मूळमाया स्त्री आहे असे नव्हे. मुळमायेचेच नांव प्रकृती-पुरुष आहे. वायूला प्रकृती म्हणतात व जगज्ज्योतीला पुरुष म्हणतात. पुरुषप्रकृती, शिवशक्ती ही यांचीच नांवे आहेत. वायू ही शक्ती व जाणीव हा शिव या अर्थाने ही उभायता एकरूप असल्याने – मुळमायेला अर्धनारी नटेश्वर म्हणतात. वायूमध्ये जो जाणीवेचा गुण आहे, तेच ईश्वराचे स्वरूप होय. त्यापासून पुढे तीन गुण झाले. त्या त्रिगुणात सत्वगुण म्हणजे शुद्ध जाणीव याचा देहधारी विष्णू झाला. त्याच्या अंशाने जग चालते. जाणीवेमुळे देह पळतात व त्यामुळे वाचतात. जाणीव सगळ्या जगाला वाचविते. म्हणून तिला जगज्ज्योती असे नांव आहे. उदकाचे तुषार उडून जसे असंख्य रेणू पसरतात, त्याप्रमाणे मुळमायेतील जणीवेला विकार होऊन तिचा पुढे अपार विस्तार वाढला. तशीच देव, देवता, दैवते, भूते ही जाणीवेची झाली. त्यांना खोटे म्हणू नये.

ब्रह्म हे आकाशासारखे पोकळ, व्यापक, उंच, निर्गुण, निर्मळ व निश्र्चल आहे. त्याला परमात्मा म्हणतात. ते सर्वव्यापी, निराभास, पाताळी, अंतराळी व कल्पांतीही सर्वत्र संचलेले आहे. अचंचल म्हणजे निश्चल असे हे स्वरूप आहे. त्या निश्चळामध्ये चंचळाचा भास होतो. त्या निश्चळी चंचळ भासलेल्या चंचळालाही पुष्कळ नांवे आहेत. मूळमाया, मूळप्रकृती, मूळपुरुष, शिवशक्ती अशी अनेक प्रकारची नांवे आहेत. निश्र्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ मायारूप भ्रम उभा राहिला, तथापि ब्रह्म व भ्रम यांत फरक आहे. जसा आकाशात वायू उत्पन्न होतो, त्याप्रमाणे निश्र्चळ ब्रह्माच्या ठिकाणी चलन, तीच आदिस्फूर्ती किंवा स्फूरणरूप इच्छा होय. (एक: अहं बहुस्याम् | मी एक आहे ते बहू व्हावे ही इच्छा, आदिस्फूर्ती ). अहंरूपाने जी जाणीव उत्पन्न झाली तिलाच मूळप्रकृती म्हणतात. ब्रम्हांडाचा महाकारण देह तो हिचाच बनलेला आहे. महाकारण, कारण, सूक्ष्म व स्थूळ हे पिंडातील चार देह आहेत. तर मूळप्रकृती, अव्याकृत, हिरण्यगर्भ व विराट असे ब्रह्मांडाचे चार देह आहेत. यांना ईश्वरतनु चतुष्टय किंवा ईश्वराचे चार देह म्हणतात. पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार अशा आठ देहांचा विचार व त्यांचा निरसनाचा प्रकार पंचीकरणात सांगितलेला असतो. या अष्टदेहांपैकी मूळमाया तीच वर सांगितलेली अहंस्फूरण जाणीव होय. मुळमायच गुणमाया होऊन सत्वरजतमरुप हरिहरब्रह्मादि उत्पन्न करून सकळ ब्रह्माण्डरचनेला कारण होते, म्हणून ‘गुणमाया पाल्हाळली’ असे म्हटले आहे.

या मुळमायेच्या पलीकडे निश्र्चळ परब्रह्म आहे.

मुळात ही सृष्टी कल्पनेची आहे, जिच्या पासून तिन्ही देवांची शरीरे निर्माण झाली, त्या मूळमायेतच कल्पना आहे. (मूळमायेच्या ठिकाणची कल्पनाच सृष्टीरूप झाली आहे ) निश्चळामध्ये (परब्रह्मामध्ये ) चंचळपणा उत्पन्न झाला हिच कल्पना होय. अष्ट प्रकारच्या प्रकृतीचे मूळ कल्पनारूपच आहे. (ती पहिली कल्पना – आदिसंकल्प – म्हणजे मुळमाया, तिच्यापासून त्रिगुणात्मक गुणमाया झाली. निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणची ही मुळमाया म्हणजे चंचळ कल्पना हीच त्रिगुण -पंचभूतात्मक अष्टघा प्रकृतीचे मूळ होय.) (अष्टघा ) प्रकृती ही मुळमायेत कल्पनारूप होती. त्याच बिजाची वाढ होत होत सूक्ष्म्यातून स्थूळात येत येत ती जडसृष्टीत परिणाम पावली आहे. प्रथम (कल्पना – संकल्परूप ) उत्पन्न झाली ती मुळमाया, त्रिगुणरूप झाली ती गुणमाया व ती सृष्टीरूपाने जडपणाला आली ती अविद्यामाया होय. तिच्याच पुढे (जारज, अंडज, स्वेदज व उद्भीज ) अशा चार खाणी झाल्या, व (परा, पश्चन्ति, मध्यमा व वैखिरी या ) चार वाणी विस्तार पावल्या, आणि अनेक योनी प्रकट होऊन अनेक व्यक्ती (प्राणी ) निर्माण झाल्या. संहरानंतर मायेचा निरास होऊन स्वस्वरूपस्थिती उरते. हा प्रळय विवेकाने सांगता येतो म्हणून यास विवेक प्रळय म्हणतात. साऱ्या सृष्टीचा शोध घेतला तर, एक चंचळ (माया ) व एक निश्र्चळ (ब्रह्म ) असे तोंड प्रकार दिसून येतात. चंचळ सृष्टीचा कर्ता चंचळरुपी, म्हणजे मुळमाया – अंतरात्मा (जाणीव )- हाच होय. जो (हा कर्ता ) सगळ्या शरीरात वागतो, सर्व कर्मास प्रवृत्त होतो (इंद्रियांच्या द्वारा हा अनंत देह चालवतो ) पण ‘सर्व करून आकर्ता’ हा शब्दप्रयोग ज्याला लावतात त्यास परमात्मा म्हणतात. पण तो देखील नाश पावतो. परब्रह्म तेव्हढे निश्र्चळ व सत्य आहे. निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी अनन्य म्हणजे एकरूप होणे यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात.

ब्रह्म म्हणजे निराकार, त्याचे स्वरूप आकाशासारखे आहे. मात्र त्याला विकार नाही. असे जे निर्वीकार तेच ब्रह्म होय. ब्रह्म हे निश्र्चळ असून अंतरात्मा चंचळ आहे; त्या अंतरात्म्यालाच निव्वळ दृष्टा किंवा साक्षी म्हणतात. तो अंतरात्माच देव होय; त्याचा स्वभाव चंचळ आहे. सगळ्या जीवांच्या अंत:करणात राहून तो त्यांचे पालन करतो. तो नसेल तर सगळे पदार्थ जड होत ; त्याच्यावाचून देह व्यर्थ होय ; त्याच्याच योगाने परमार्थ कळून येतो. या चंचळाशिवाय निश्र्चळ (ब्रह्म ) कळत नाही ; आणि चंचळ तर स्थिर (निश्र्चळ ) होत नाही. चंचळ जेथे संपते व निश्र्चळ जेथे सुरु होते अशा संधीच्या ठिकाणी बुद्धी भांबावते. कर्ममार्गाचे विधी हे सर्व अलीकडचे म्हणजे चंचळातले – मायेतले – आहेत. जो एकटाच या सर्व दृश्यरूपाने विस्तारलेला आहे त्याला अंतरात्मा म्हणतात. पंचिकरण व महावाक्य यांचे विवरण करणे हेच सगळ्या परमर्थाचे मूळ होय.

तुर्या अवस्थेचे मूळ जी जाणीव (स्फूरण ) हीच चंचळ नदी होय, ती सरस्वती नदीप्रमाणे गुप्त आहे ; पण तिचे स्मरण केले असता, ती सर्व जगाला पावन करते. तिच्या प्रवाहात सामान्य लोक वाहवत जातात. पण पुण्यवान लोक प्रवाहात वरवर पोहत जाऊन उगमाला (ब्रह्माला ) जाऊन पोहोचतात. त्या उगमच्या दर्शनाने ते ब्रह्मरूप होतात. मुळमायेच्या उगमापाशी सगळे देवदेवता आपल्या मूळ स्वरूपात आहेत. त्या उगमाचे जळ -चैतन्य – अत्यंत शुद्ध व चंचळ आहे. त्या पाण्याला आपोनारायण म्हणतात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांत पसरलेली ही महानदी आहे. पण तिचे मूळ अंतराळात आहे. मायेने त्रैलोक्य व्यापले आहे पण तिचे मूळ अत्यंत सूक्ष्म आहे. जे मूळ उगमच्या पलीकडे गेले म्हणजे मायानदी उलट पोहत जाऊन व मायापार होऊन ब्राह्मस्वरूप झाले ते मागेवळून पाहूलागले तेव्हा मायानदीच नाही, आपण आजवार व्यर्थ भ्रमात होतो, माया मुळी मिथ्या आहे असे त्यांना कळून आले.

सर्व देवांचे पोषण करणारा व सकळ सृष्टीचा जो कर्ता त्याला प्रथम नमन करू. अवघ्या त्रैलोक्याचा चालक तो आहे. देव, दानव, मानव या सर्वांचा तो अंतरात्मा आहे. चार खाणी, चार वाणी यांचा प्रवर्तक (उत्पादक ) तोच होत. तो एकटाच सगळ्या घरांत राहून भिन्न भिन्न व्यवहार करतो. असा जो गुप्तेश्वर त्यालाच ईश्वर म्हणावे. असा परमेश्वर ज्याने ओळखला तो स्वतःच ईश्वर झाला; मग समाधीला व सहज स्थितीला विचारतो कोण? विश्वाची उभारणी व संहारणी पहावी तेव्हाच हे माहित होते. पण हा अंतरात्मा चंचळ आहे. त्याच्या योगाने परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. ज्या तत्वांचा आपला पिंड बनला आहे, ती तत्वे मूळ तत्वात विवेकाने उडवली कि, देहावरचे ‘मी’ पण नाहीसे होते, व ‘मी’ पण जिरल्यावर चहुंकडे निर्मळ, निश्र्चळ, निरंतर परब्रह्मच भरले आहे असा प्रत्यय येतो.

ब्रह्म हे आकाशासारखेच निर्मळ, निश्र्चळ, शाश्वत, घनदाट व पोकळ आहे. त्याला धरणे, करणे, जन्मणे, मरणे काहीएक नाही. ते शून्याच्या पलीकडचे असून त्याच्या ठिकाणी जाणणे व नेणने ही दोन्ही नाहीत. ते रचत नाही, खचत नाही, ते होत नाही, जात नाही. ते मायातीत असे निरंजन असून त्याला पार नाही. त्याच्या ठिकाणी पुढे (मी बहू व्हावे असा ) संकल्प उठला. आदि संकल्प तीच मुळमाया. तिलाच षड्गुणेश्वर भगवान म्हणतात. किंवा वायू व जाणीव या उभयरूपाने संपन्न असल्यामुळे तिला अर्धनारीनटेश्वर म्हणतात. सर्वेश्वर, परमात्मा, जगज्जीवन, मुळपुरुष ही सर्व त्या संकल्पनेचीच (मुळमायेचीच ) नांवे आहेत. ती मुळमायच (संकल्प ) बहुगुणी असून अधोमुख झाली (परब्रह्मापासून मुरडली ) कि गुणक्षोभीणी होते, व त्या गुणक्षोभीणीपासून तीन गुण उत्पन्न होतात. पुढे त्रैलोक्याचे पालन करणारा असा जाणीव सत्वगुणरूप विष्णू उत्पन्न झाला. पुढे जाणीव व नेणीव मिळून ब्रह्मदेव झाला, त्याच्यापासून तिन्ही लोकांची उत्पत्ती झाली. त्यानंतर सगळ्या संहराचे कारण असा तमोगुणात्मक रुद्र झाला. हे सर्व कर्तृत्व तेथेच म्हणजे त्या मुळमायेतच आहे. तेथून म्हणजे तमोगुणापासून पुढे पंचमहाभूते व्यक्त रुपाला येतात. या अष्टघा प्रकृतीचे स्वरूप मुळी म्हणजे मुळमायेतच अति सूक्ष्म रूपाने आहे. (तीच पुढे व्यक्त रुपाला येते ). ब्रहमांडाच्या उभारणी – संहारणीच्या विचारास सारासार विचार म्हणतात.

मूळमाया हीच जगदीश्वर होय. तिच्यापासून पुढे अष्टघाप्रकृतीचा विस्तार होऊन सृष्टीक्रमाप्रमाणे दृष्याकार आकाराला आला. हे सगळेच नसेल तर, जसे आकाश असते तसे निर्मल ब्रह्म असते. त्या निराकाराच्या ठिकाणी काळवेळ काहीच नाही. ब्रह्मांडाच्या उपाधीचा विस्तार जेव्हा झाला, तेव्हा त्या ठिकाणी काळ दिसायला लागला. पूर्वी काळाला ठिकाणाच नव्हता. एक (माया, अंतरात्मा ) चंचळ व दुसरे परब्रह्म निश्र्चळ या दोहोवाचून काळाला ठिकाण कोणते? चंचळ माया आहे तोपर्यंत काळ असे म्हणता येईल. आकाश म्हणजे अवकाश, आणि विलंबालाही अवकाश असे म्हणतात. त्या विलंबरूपी काळाची माहिती करून घ्यावी. सूर्य असल्यामुळे विलंब -कालावधी – समजतो. सर्व कालगणना करता येते. पळापासून युगापर्यंत सर्व कालगणना स्पष्ट होते. देवांची आयुष्ये मोठी असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचे उत्पत्यादी उद्योग सूक्ष्मरूपाने एकत्र आहेत. मिश्र असलेले तीन गुण वेगळे करता येत नाहीत. आरंभापासून अखेरपर्यंतची सर्व सृष्टीरचना या त्रिगुणांच्या मिश्रणाची झाली आहे. त्यात लहान मोठा कोणी नाही. उत्पत्तीकाळ, सृष्टीकाळ, स्थितीकाळ, संहरकाळ असा हा आरंभापासून शेवटपर्यंत सगळा विलंब (अवधी ) रुप काळच होय. जे जे ज्या प्रसंगाला घडते, तेथे त्या काळाचे नांव पडते. उदा. पर्जन्यकाळ, शीतकाळ, उन्हाळा वगैरे.

ब्रह्म हे घनदाट व पोकळ, आकाशापेक्षा विस्तीर्ण, निर्मळ, निर्वीकार असे आहे. कित्येक काळापर्यंत ते तसेच होते. त्यानंतर भूगोल (सृष्टीरचना ) उत्पन्न होण्यास प्रारंभ झाला. परब्रह्म निश्र्चळ असता, त्याच्या ठिकाणी निश्र्चळ असा संकल्प (बहुस्याम् प्रजायेय | किंवा एकोहं बहुस्याम् l) उत्पन्न झाला, त्याला आदिनारायण असे नांव आहे. तो चंचळ आदिनारायण त्यालाच मुळमाया, जगदीश्वर, षड्गुणेश्वर असेही म्हणतात. मुळमायेच्या अलीकडे गुणक्षोभीणी (गुणमाया ) असून तिच्यापासून तीन गुण (त्रिगुण ) उत्पन्न झाले. येथून मूळ (ॐ ) ओंकाराची मांडणी (रचना ) झाली. अ, उ, म् या तीन मात्रा मिळून ॐ (ओम ) कार होतो. पुढे पंचमहाभूतांचा विस्तार झाला. (त्यापैकी ) अंतरात्म्याला आकाश म्हणतात, त्यापासून वायू झाला व वायूपासून तेज झाले. (दोन दिशांकडून येणाऱ्या ) वायूच्या (कातरा ) कातऱ्याचे -घसटाण्याने – घर्षण होऊन त्यापासून अग्नी उत्पन्न होतो व तेथे सूर्यबिंब प्रकट होते. तो वारा थंड वाहू लागला म्हणजे तेथे पाणी उत्पन्न झाले व ते पाणी आटून भूगोल उत्पन्न झाला.

विश्वाच्या अंतानंतर (प्रलायकाळानंतर ) चंचळ नाहीसे होऊन परब्रह्म शिल्लक राहील.

निर्मळ, निश्र्चळ व निराकार असे जे ब्रह्म त्याला आकाशाचा दृष्टांत आहे. आकाश म्हणजे पोकळी. आधी पोकळी आणि तिच्यात पदार्थ हे प्रत्ययाने पाहावे. ब्रह्म हे निश्र्चळ व आत्मा हा चंचळ आहे. त्या आत्म्याला वायूचा दृष्टांत देता येईल. ब्रह्माला घटातील आकाशाचा दृष्टांत दिला तर आत्म्याला घटामध्ये प्रतिबिंबित झालेल्या प्रतिबिंबाचा दृष्टांत देता येईल. दोघांचा अर्थ वेगळा आहे. अविद्या ही जड व आत्मा हा चंचळ आहे. जड हे कापरासारखे व आत्मा अग्निसारखा असल्यामुळे दोन्हींचा संयोग झाला कि, दोन्ही जळून तत्काळ विझून जातात. आत्मा अनात्म्यास जाळतो व आपणही तत्काळ विझून जातो. ब्रह्म व आकाश निश्र्चळ असून आत्मा व वायू हे चंचळ आहेत. जड अनेक असून आत्मा एक आहे, हे जाणणे हा आत्मानात्म विवेक होय. आत्मा जगाचे व्यवहार चालवितो म्हणून त्यास जगन्नाथ म्हणावे, सर्वांमध्ये वागतो तो सर्वात्मा होय. आत्मा व सर्वात्मा मिळून चंचळात्मा होय. तो निश्र्चळ होणार नाही. आधी आत्मानात्म विचार महत्वाचा, त्याहून सारासार (सार = ब्रह्म, असार = जड व चंचळ ) विचार श्रेष्ठ. सारासार विचाराने प्रकृतीचा संहार होऊन दृश्य असतानाच ते नाहीसे होते आणि अध्यात्म श्रवणाच्या योगाने अंतरात्मा निर्गुणामध्ये प्रवेश करतो.

कर्त्याने जे कांही केले असेल, ते त्या कर्त्याच्या मागाहून उत्पन्न व्हावयाला पाहिजे, कर्त्याच्या पूर्वी आढळता कामा नये. जे (दृश्य ) उत्पन्न केले ते पंचभूतात्मक आहे आणि ब्रह्मदेवादिक सकल देव पंचभूतात्मकच आहेत; अर्थात भूतांचे अंश असे जे ब्रह्मदेवादिक देव त्यांनी हे पंचभूतात्मक विश्व् निर्माण केले असे होणार नाही. तेव्हा पंचभुते बाजूला काढून मग कर्त्याला शोधून काढावे ; ब्रह्मदेवादिकांना कर्ता म्हणावे तर पंचभुते त्यांच्यामध्ये आहेतच. निर्गुण हे पंचभूतांहून वेगळे असून त्याच्या ठिकाणी कार्तेपणा नाही; आणि सगुण झालेल्यात (कार्यात ) मोडते. सृष्टी लटकी म्हणजे माया मिथ्या हा जर सिद्धांत आहे तर मिथ्या सृष्टीचा कर्ता कोण म्हणून काय विचारावे? लटक्याचा कर्ता कोण हे विचारणेच असंबद्ध आहे, म्हणून हे पांचभौतिक स्वभाविक झाले असे मानणे हेच खरे होय.

                  ||श्रीराम ||

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments