नासाची मंगळ मोहीम -मार्स २०२० (भाग पहिला )

 

 

नासाची मंगळ मोहीम -मार्स 2020 पर्सिव्हिरन्स (भाग पहिला )

नासाची मंगळाकडील मोहीम -मार्स 2020पर्सिव्हिरन्स – 30 जुलै 2020 ला अमेरिकन हवाईदळाच्या केप कॅनाव्हरल प्रक्षेपण केंद्राच्या 41 नंबरच्या तळावरुन सुरु झाली.18 फेब्रुवारी 2021 रोजी हे अंतराळयान मंगळावरील जेझेरो क्रॅटर मध्ये उतरले. पर्सिव्हिरन्स म्हणजे चिकाटी. आणि खरोखरच नासाच्या आव्हान स्वीकारणे व ते चिकाटीने तडीस नेणे, या गुणांचे हे यान म्हणजे एकप्रकारे मूर्त स्वरूपाच आहे. आजपर्यंत मंगळावर उतरलेल्या नासाच्या सर्व रोव्हर्सपेक्षा पर्सिव्हिरन्स रोव्हर हा सर्वात अत्याधुनिक आहे. हा रोव्हर मंगळावरील प्राचीन सूक्ष्म जीवांच्या अस्तित्वाचा शोध घेईल, या ग्रहाचे भूशास्त्र आणि हवामानाचा अभ्यास करेल, काळजीपूर्वक निवडलेले खडक व गाळ यांचे नमुने गोळा करेल (भविष्यात हे नमुने पृथ्वीवर आणले जाऊन त्यांचा अभ्यास केला जाईल ), आणि भविष्यातील चंद्रापलीकडील समानव मोहीमांसाठी मार्गदर्शक ठरेल.

पर्सिव्हिरन्सने मंगळावर एक वेगळा तांत्रिक प्रयोग पण केला, तो म्हणजे, त्याच्या बरोबर मंगळावर गेलेल्या इंजेन्युइटी नावाच्या हेलिकॉप्टरने परग्रहावर मानव इतिहासात पहिल्यांदाच नियंत्रित उड्डाण केले.

मार्स 2020 पर्सिव्हिरन्स मोहिमेविषयीच्या सात महत्वाच्या बाबी :-

1) नासा व एकंदरीतच अमेरिकन लोकांच्या आव्हान स्वीकारून ते यशस्वीपणे पेलण्याच्या गुणाचे पर्सिव्हिरन्स रोव्हर हे मूर्त स्वरूप आहे.

30 जुलै 2020 ला पर्सिव्हिरन्स रोव्हरने युनायटेड लाँच अलायन्सच्या (ULA) ऍटलास व्ही 541 या लाँच व्हेईकलच्या मदतीने यशस्वी उड्डाण केले. या मोहिमेसाठी सातत्यपूर्ण मेहनतीची आवश्यकता होती. संकल्पनेचा अभ्यास व सुरुवातीच्या तांत्रिक बाबींची सुरुवात एक दशकापूर्वीच झाली होती – खरे तर डिसेंबर 2012ला या मोहिमेची घोषणा झाली त्याच्या कितीतरी वर्षे आधी. दुसऱ्या ग्रहावर उतरणे, प्राचीन जीवांच्या अस्तित्वाच्या खुणांचा शोध घेणे, नमुने गोळा करणे आणि नवीन तंत्रज्ञान सिद्ध करणे हे खरोखरच अवघड काम आहे. पर्सिव्हिरन्स हे नांव ‘ रोव्हरला नांव सुचवा ‘ या स्पर्धेसाठी आलेल्या 2000 निबंधांमधून निवडणे हेच मुळी नासाने स्वीकारलेल्या आव्हानाचे प्रतीक आहे. खासकरून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उड्डाणापूर्वीचे अनेक महिने सर्जनशीलपणे प्रश्नांची उकल करणे व संघभावना या गुणांची जणू परीक्षाच घेतली गेली.

व्हर्जिनियाच्या लेक ब्रेडॉक माध्यमिक शाळेच्या अॅलेक्स मॅथरने त्याच्या प्रथम क्रमांकाने निवडल्या गेलेल्या निबंधामध्ये म्हंटल्याप्रमाणे,

“आम्ही अन्वेषकांच्या प्रजाती आहोत, मंगळाकडे जातांना कदाचित आपणास अनेकवेळा पीछेहाट करावी लागेल. तरीसुद्धा आम्ही चिकाटी दाखवू. एक देश म्हणून नव्हे तर मानव म्हणून आम्ही आमच्या ध्येयापासून विचलित होणार नाही.”

2)पूर्वी मंगळावर पाठविलेल्या रोव्हर्सकडून मिळालेल्या माहितीवरूनच पर्सिव्हिरन्सची बांधणी करण्यात आली आहे.

मंगळावर पाठवलेला पहिला रोव्हर सोजोर्नर अगदी साधा व मायक्रोवेव्ह ओव्हनच्या आकाराचा होता. 1997 मध्ये त्याने दाखवून दिले कि, लाल ग्रहावर रोव्हर भ्रमण करू शकतो. नासाने नंतर पाठवलेले दोन रोव्हर्स स्पिरिट व अपॉर्च्युनिटी गोल्फच्या दोन चाकी गाडी एव्हढे होते. 2004 मध्ये मंगळावर उतरल्यावर त्यांनी दाखवून दिले कि, गोठलेले रण होण्यापूर्वी मंगळावर वाहते पाणी होते. 2012 मध्ये कारच्या आकाराचा क्युरिऑसिटी रोव्हर मंगळावर उताराला. त्याने दाखवून दिले कि, अब्जावधी वर्षांपूर्वी, तो उतरलेल्या गोल विवरामध्ये एक तळे होते आणि त्याकाळी तेथील वातावरण सूक्ष्म जीवांच्या वाढीस अनुकूल होते. त्याचे पुढचे पाऊल पर्सिव्हिरन्स उचलणार आहे व ते त्याचे प्राथमिक उद्दिष्ठही आहे; आणि ते म्हणजे, अंतराळजीवशास्त्रातील कळीच्या प्रश्नाचे उत्तर देणे आणि तो प्रश्न आहे,’ मंगळावर खरोखरच प्राचीन सूक्ष्म जीवांच्या खुणा म्हणजेच जैव स्वाक्षरी आहेत का?

या आव्हानात्मक विज्ञान ध्येयासाठी या प्रश्नाची विविध कोनांतून हाताळणी करणारी अत्याधुनिक उपकरणांच्या संचाची आवश्यकता होती. स्कॅनिंग हॅबिटेबल इन्व्हायरोनमेंपस् विथ रमण अँड लुमिनिसन्स फॉर ऑर्गोनिक्स अँड केमिकल्स (SHERLOC) उपकरण, हे सेंद्रिय पदार्थाचा मागोवा घेऊ शकते. प्लॅनेटरी इन्स्टुमेंट फॉर एक्स-रे लिथोकेमिस्ट्री (PIXEL) हे उपकरण खडकांमधील सेंद्रिय पदार्थ, रासायनिक संरचना आणि खडकांचा पोत यांचा एकत्रित अभ्यास पूर्वीच्या कोणत्याही रोव्हर मधील उपकरणापेक्षा अधिक तपशीलवार आणि अधिक अचूकपणे करू शकते. रोव्हरवरील एकूण सात उपकरणांपैकी ही दोन उपकरणे पर्सिव्हिरन्सच्या सूक्ष्म जीवांच्या संभाव्य खुणांच्या शोधामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

3) रोव्हर अशा ठिकाणी उतरले आहे, जेथे प्राचीन सूक्ष्मजीवांच्या खुणा सापडण्याची दाट शक्यता आहे.

मंगळाच्या विषुववृत्ताच्या जरा उत्तरेकडे असलेल्या ईसीडीस या महाकाय अघातीय खोऱ्याच्या पश्चिम कड्यावर असलेल्या जेझेरो विवराची लांबी 45 किलोमीटर आहे. बऱ्याच पूर्वी हे विवर म्हणजे वाळवंटातील हिरवळीचा प्रदेश असण्याची शक्यता आहे. तीन ते चार अब्ज वर्षांपूर्वी या विवरामधून साधारण तेहो सरोवराच्या आकाराच्या एका सरोवरामध्ये वहात होती. त्यामुळे या विवरामध्ये कार्बोनेट क्षार व माती यांनी संपृक्त असा गाळ जमा झाला असण्याची शक्यता आहे. पर्सिव्हिरन्सचे वैज्ञानिक असे मानतात कि, या प्राचीन नदीच्या त्रिभुज प्रदेशाने सेंद्रिय अणू व सूक्ष्म जीवांच्या संभाव्य खुणा जपून ठेवल्या असाव्यात.

4) मंगळाचे भूशास्त्र व वातावरण याविषयीची महत्वाची माहितीसुद्धा पर्सिव्हिरन्स गोळा करेल.

गेल्या अनेक वर्षांपासून मंगळाभोवती फिरणारे ऑर्बिटर्स जेझेरो क्रेटरची छायाचित्रे व आकडेवारी 322 किलोमीटर उंचीवरून गोळा करत आहेत. पण भूपृष्ठावरील प्राचीन जीवांच्या खुणा शोधण्यासाठी फार जवळून निरीक्षण करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पर्सिव्हिरन्स सारखा रोव्हरच हवा. मंगळाचे प्राचीन हवामान समजून घेणे आणि खडकांमध्ये दडलेल्या भूशास्त्राच्या इतिहासाचे वाचन करणे, याद्वारे वैज्ञानिकांना अतिप्राचीनकाळी हा ग्रह कसा होता, याची व्यवस्थित माहिती मिळेल ; जेणेकरून मंगळ व पृथ्वी हे दोन्ही ग्रह एकाच आदिम पदार्थांपासून बनलेले असूनसुद्धा त्यांची परिणीती एव्हढी वेगळी कशी झाली हे समजेल.

5) मानव मंगळावर जाऊन येणे या मोहिमेचा पर्सिव्हिरन्स हा पहिला टप्पा आहे.

मंगळावर आदिमकाळी जीव होता, याच्या स्पष्टीकरणासाठी भरपूर पुराव्यांची आवश्यकता आहे. खडक व गाळ यांचे नमुने गोळा करणारी उपकरणे मंगळावर नेणारा पर्सिव्हिरन्स हा पहिलाच रोव्हर आहे. तो अपेक्षित नमुने नीट सुरक्षित ठेवेल ; जेणेकरून भविष्यातील मोहीमेद्वारा ते पृथ्वीवर आणता येतील. क्युरियॉसिटीचे ड्रिल मशीन खडकांचा चुरा करायचे, याच्या उलट पर्सिव्हिरन्स वरचे ट्रिपॅनिंग मशीन खडकाच्या आजूबाजूचा भाग पोखरून खडूच्या आकाराचा तुकडा काढेल व असे तुकडे ते नमुने गोळा करायच्या नळ्यांमध्ये ठेवेल, व या नळ्या मंगळावरच एका सुरक्षित ठिकाणी ठेवल्या जातील.

नासा व युरोपिअन स्पेस एजन्सी (ESA) नमुने परत आणण्याची मोहीम आखत आहेत. कारण पृथ्वीवर असणारी नमुने तपासण्याची खूप मोठी व गुंतागुंतीची उपकरणे मंगळावर पाठवणे अशक्य आहे. पृथ्वीवर हे नमुने तपासून मिळालेली माहिती ही मंगळावर अतिप्रगत रोव्हर पाठवून मिळवलेल्या माहितीपेक्षा खूप जास्त असणार आहे.

6) पर्सिव्हिरन्स अशी उपकरणे व तंत्रज्ञान घेऊन गेले आहे कि जेणेकरून मानवाला भविष्यातील चंद्र व मंगळ यांच्या समानव मोहिमांना मार्गदर्शन मिळेल.

‘भूप्रदेशाच्या संदर्भाने दिक् चालन’ ही प्रणाली मार्स 2020 पर्सिव्हिरन्स मोहिमेतील भविष्यकालीन तंत्रज्ञानांपैकी एक आहे. ही प्रणाली मंगळावर यान उतरविण्याच्या प्रणालीचा एक भाग आहे. या प्रणालीमुळेच उतरण्यापूर्वी जेझेरो क्रेटर सारख्या भागाचे अन्वेषण पर्सिव्हिरन्स करू शकला. या प्रणालीमुळे मंगळाच्या भूप्रदेशावर आपण कोठे आहोत, याचे आकलन रोव्हरला चट्कन व स्वायत्तपणे होऊ शकले व तो उतरतांना आपल्या विक्षेपमार्गात योग्य तो बदल करू शकला. चंद्रावर उतरण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या यंत्रमानवी व मानवी मोहिमांमध्ये याची मोलाची मदत होऊ शकेल आणि मंगळावर उतरण्यासाठीच्या भविष्यकालीन यंत्रमानवी व मानवी मोहिमांसाठीतर ही प्रणाली अत्यावश्यक आहे.

पर्सिव्हिरन्सच्या इंजिनिअर्सनी त्याला इतर कोणत्याही रोव्हरपेक्षा जास्त स्वयंचलितता बहाल केली आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील इंजिनिअर्सच्या सूचनांशिवायही तो एका दिवसात जास्त अंतर पार करू शकतो; आणि रोव्हरचा कार्यकाळ विचारात घेतला तर, जास्त अंतर म्हणजे मंगळावरील माहितीचे जास्त आकलन. ही माहिती आणि सुधारित श्रेणीचे संवेदक, संगणक व गणनविधी यांमुळे प्राप्त झालेल्या वेगवान गतिशीलतेमुळे चंद्र, मंगळ व इतर आकाशस्थ पिंडांवरील अन्वेषण पुढील अंतराळयानांसाठी जास्त कार्यक्षमतेने करता येऊ शकेल.

पर्सिव्हिरन्स आणखी एक तांत्रिक प्रात्यक्षिक बरोबर घेऊन गेला आहे, ते म्हणजे MOXIE- मार्स ऑक्सिजन इन सिटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट. हे उपकरण मंगळाच्या कार्बनडायऑक्साईडच्या वातावरणातून ऑक्सिजन अलग करेल. या प्रात्यक्षिकामुळे भविष्यातील अन्वेषक अग्निबाणासाठी प्रणोदक तयार करतील. तसेच हा प्राणवायू श्वासोच्छ्वासासाठी देखील वापरता येईल.

मार्स इन्व्हायरॉनमेंटल डायनॅमिक्स ऍनालायझर (MEDA) या उपकरणांचा संच भविष्यकालीन मानवी अन्वेषणांसाठी कळीचा आहे. हे उपकरण मंगळावरील सध्य:कालीन हवामान व वातावरण तसेच भूपृष्ठावरील धुळीचा प्रकार यांविषयीची माहिती देईल. मार्स सायन्स लॅबोरोटरी एन्ट्री, डिसेंट व लँडिंग इन्स्टुमेंटेशन (MEDLI-2) या संचामुळे अंतराळयानाने मंगळाच्या वातावरणात प्रवेश केल्यापासून ते मंगळावर उतारण्यापर्यंतची सर्व माहिती मिळेल. हा संच क्युरिऑसिटी रोव्हरबरोबर असलेल्या संचाची सुधारित आवृत्ती आहे.

7) तुम्ही पर्सिव्हिरन्स बरोबर सफर करू शकता.

इतिहासकालीन इतर कोणत्याही मोहिमांपेक्षा मार्स 2020 पर्सिव्हिरन्सवर जास्त कॅमेरे आहेत. फक्त रोव्हरवरच 19 कॅमेरे आहेत, ज्यामुळे मंगळाच्या भूपृष्ठाची अत्यंत तपशीलवार छायाचित्रे आपणास मिळणार आहेत. अंतराळयानाचे इतर भाग जे प्रवेश, अवरोह व अवतरण यांत सहभागी होते, त्यांच्यावर चार अतिरिक्त कॅमेरे बसवलेले होते, यामुळे इंजिनिअर्सना यान उतरण्याच्या प्रक्रियेचे तपशीलवार चित्रण दिसू शकले. पूर्वीच्या मंगळमोहिमांप्रमाणेच याही मोहिमेच्या कच्या व प्रक्रिया केलेल्या प्रतिमा मिशनच्या वेबसाईटवर मिळणार आहेत.

जगभरातील आकाशप्रेमींना या मोहिमेत सहभागी करूनघेण्यासाठी पर्सिव्हिरन्स बरोबर ‘एकोप्याने अन्वेषण ‘ असे मोर्सकोडमध्ये लिहिलेली एनोडायझिंग केलेली एक पाटी आहे. नासाने या मोहिमेपूर्वी ‘पर्सिव्हिरन्सबरोबर मंगळावर चला ‘ ही योजना राबवली होती. त्यात भाग घेतलेल्या 10.9 दशलक्ष लोकांची नांवे सिलिकॉनच्या तीन चकत्यांवर कोरली आहेत व त्या चकत्या पर्सिव्हिरन्स आपल्याबरोबर घेऊन गेला आहे.

 

 

 

 

 

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments