DART -डबल अस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट

DART
जर तुम्हाला हॉलिवूड सिनेमांची आवड असेल तर तुम्हाला नक्कीच अर्मागेडन हा ब्लॉकबस्टर सिनेमा आठवत असेल. या सिनेमात ब्रुस विलीस आणि बेन ऐक्लेफ एका लघुग्रहपासून पृथ्वीला वाचविण्याच्या मोहिमेवर निघतात. या सिनेमाच्या कहाणीला अमेरिकन अंतरीक्ष संस्था अर्थात नासा (NASA)मूर्त स्वरूप देत आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी स्पेस एक्स(Space-X)च्या फाल्कन-९(Falcan-9) या प्रक्षेपकाद्वारे नासाने DART (Double asteroid redirection test)या अंतरीक्षयानाचे प्रक्षेपण केले. हे अंतरीक्षयान डायमॉर्फस या लघुग्रहाला धडक देऊन त्याची कक्षा बदलणार आहे. या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही, पण भविष्यात एकाद्या लघुग्रहापासून पृथ्वीचे रक्षण करण्याची वेळ आलीच तर त्याची रंगीत तालीम म्हणून या मोहिमेकडे पाहता येईल.
सर्व कांही सुरळीत पार पडले तर पुढील वर्षी २६ सप्टेंबर ते १ऑक्टोबर या दरम्यान हे आंतरीक्षयान एक कोटी सहालाख किलोमीटर दूर असलेल्या डायमॉर्फस या लघुग्रहाला ताशी २४००० किलोमीटर या वेगाने धडक देईल. नासाने या मोहिमेला ग्रहीय संरक्षण मोहीम (planetary defence mission) असे नांव दिले आहे.
संपूर्ण मोहिमेसाठी २५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नासाचे ग्रहीय संरक्षण अधिकारी लिंडले जॉन्सन म्हणतात,” सध्याचा विचार केला तर, असा कोणताही लघुग्रह नाही, ज्याच्यापासून पृथ्वीला नजिकच्या भविष्यात धोका संभवू शकेल. परंतु अंतराळात पृथ्वीच्या जवळपास मोठ्या संख्येने लघुग्रह आहेत. नासाचा प्रयत्न असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा आहे, कि ज्यामुळे भविष्यात प्रत्यक्षात जर एकाद्या लघुग्रहापासून पृथ्वीला धोका वाटला, तर वेळेअगोदर त्यावर उपाय करता येईल. आम्ही अशी वेळ येऊ देणार नाही कि, एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येईल व त्यावेळी आम्ही आमच्या क्षमतेचे परीक्षण करू.”
डायमॉर्फस हा १६० मिटर व्यासाचा लघुग्रह असून तो डिडीमॉस या ७६० मिटर व्यासाच्या दुसऱ्या लघुग्रहाभोवती फिरतो. डायमॉर्फस व डिडीमॉस ही जोडगोळी सूर्याभोवती ज्या वेगाने परिभ्रमण करते, त्यापेक्षा खूप कमी गतीने डायमॉर्फस डिडीमॉसभोवती फिरतो. त्यामुळे DART ने दिलेल्या धडकेचा परिणाम आपणास सहज मोजता येईल. या धडकेमुळे डायमॉर्फसच्या डिडीमॉसभोवती फिरण्याच्या कक्षेत १% पेक्षा कमी फरक पडेल पण पृथ्वीवरून दुर्बीणीच्या सहाय्याने तो मोजता येण्याजोगा असेल.
DART अंतराळयान लिसीयाक्यूब (LICIACube) नावाचा लहान उपग्रह सोबत नेत आहे. हा उपग्रह इटालियन स्पेस एजन्सीने बनवला आहे. DART च्या धडाकेअगोदर तो DART पासून अलग केला जाईल व तो डायमॉर्फसवरील DART च्या धडकेचे तसेच त्यावेळी निर्माण झालेल्या धुळीच्या ढगाचे फोटो घेऊन नासाकडे पाठवेल.

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
SandhyaP

Mastch. Uttam lekh. mala ashya prakarche vachayla aavadte tyamule mi aaple sarv lekh vachle. khup changli mahiti milat aahe ti suddha marathit..