IXPE- इमेजिंग एक्स रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर

IXPE- इमेजिंग एक्स रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर

दिनांक ०९ डिसेंबर ०२१रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून नासाने फाल्कन-९ प्रक्षेपकाद्वारे IXPE (उच्चार : इक्स-पी ) ही क्ष किरण अंतरीक्ष वेधशाळा अवकाशात सोडली. ही वेधशाळा ताऱ्यांच्या स्फोटानंतर शिल्लक राहिलेले अवशेष, कृष्ण विवरे आणि ब्रम्हांडातील इतर अनेक घडामोडी यांचा अभ्यास करणार आहे. हा अभ्यास ही वेधशाळा प्रकाशाच्या ‘ध्रुवीकरण’ या गुणधर्माचा वापर करून करणार आहे.

इक्स-पी ही क्ष किरण वेधशाळा नासाने यापूर्वी अंतराळात प्रस्थापित केलेल्या चंद्रा क्ष किरण वेधशाळे एव्हढी मोठी नाही, तरी पण इतिहासात प्रथमच ती ब्रम्हांडातील क्ष किरणांच्या उगमांचे ‘ध्रुवीकरण’ या गुणधर्माचा वापर करून संशोधन करणार आहे.

इक्स-पी मोहिमेचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. मार्टिन वेस्कोफ म्हणतात,” क्ष किरण खगोल शास्त्रात इक्स -पी मोहीम हे एक मोठे व एकमेवद्वितीय पाऊल आहे. ब्रम्हांडातील क्ष किरणांच्या उगमांविषयी तेजस्वीपणा व रंगीत वर्णपट यांपेक्षा जास्त अचूक माहिती इक्स-पी मोहिमेमुळे मिळणार आहे.”

क्ष किरणे ही शक्तिशाली प्रकाशकिरणे असतात. ती अशा ठिकाणांहून बाहेर टाकली जातात, जेथे भौतिक वस्तू किंवा भौतिक गोष्टी अतिशय टोकाच्या अवस्थेत असतात/घडतात.

उदाहरणार्थ : खगोलीय पिंडांच्या जोरदार टकरी (ग्रहावर एखादा लघुग्रह आदळणे, दोन आकाशगंगांच्या टकरी, दोन कृष्णविवरांच्या टकरी वगैरे ), अंतराळातील जोरदार स्फोट (ताऱ्यांचे आयुष्य संपल्यावर तो आकुंचन पावतांना एका ठराविक परिस्थितीत होणारा स्फोट, ताऱ्यांच्या अंतरंगात किंवा पृष्ठभागावर होणारे स्फोट वगैरे ), एक कोटी डिग्री फॅरनहिट तपमान, खगोलीय पिंडांचे स्वतःभोवती अतिवेगाने फिरणे, शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र वगैरे. या अपूर्व गोष्टींमधून बाहेर पडणारी क्ष किरणे या घटनांविषयीची विस्तृत माहिती देतात. पृथ्वीचे वातावरण ही क्ष किरणे अडवतात त्यामुळे ही माहिती मिळवण्यासाठी अंतराळ वेधशाळा हे एकमेव उत्तर आहे.

कोणत्याही प्रकाशलहरी अनेक दिशांनी कंपन पावत असतात. पण ध्रुवीकरण केल्यामुळे कंपने एकदिशीय होतात.

ध्रुवीकरण केलेल्या क्ष किरणांच्या अभ्यासामुळे वैज्ञानिकांना खगोलीय पिंडांची रचना व वर्तणूक, त्यांच्या आजूबाजूचे वातावरण आणि क्ष किरणे का उत्पन्न होतात याविषयी माहिती मिळेल. तसेच वैज्ञानिकांना अनेक वर्षे पडलेले प्रश्न जसे कि, पल्सर्स एव्हढे तेजस्वी का दिसतात? आपले भौतिक शास्त्राचे ज्ञान संपूर्ण विश्वाला लागू पडते का? वगैरेंची उत्तरे मिळायला मदत होणार आहे.

तसेच या मोहिमेमुळे विश्व् कसे काम करते याविषयींचे आपले सिद्धांत तपासणे व आवश्यक वाटल्यास त्यात बदल करणे शक्य होईल.

 

 

 

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments