लेसर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन -LCRD

LCRD- लेसर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन

दिनांक ०७ डिसेंबर २०२१ भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने LCRD हा उपग्रह युनायटेड लॉन्च अलायन्स (ULA) च्या ऍटलास व्ही ५५१ या प्रक्षेपकाद्वारे पृथ्वीच्या भू – तुल्यकालीन कक्षेत ( geosynchronous orbit) प्रस्थापित केला.

हा उपग्रह अंतराळातून पृथ्वीवर माहितीचे प्रक्षेपण करण्यासाठी लेसरचा वापर करेल. या प्रयोगामुळे आतापर्यंत नासा पृथ्वीवरून अंतराळात व अंतराळातून पृथ्वीवर ज्या पद्धतीने माहितीची देवाण घेवाण करीत होती, त्यात अमूलाग्र बदल घडून येईल.

अंतराळ युगाच्या सुरवातीपासून अंतराळवीर व अंतराळयानांबरोबर माहितीचे अदान प्रदान करण्यासाठी रेडिओ वारंवारीता प्रणाली (radio frequency system) चा वापर नासा करत आलेली आहे. परंतु आता अंतराळ मोहिमा ज्या प्रचंड प्रमाणात विदा (data) गोळा करत आहेत व निर्माण करत आहेत, त्या हाताळण्यासाठी चकोरी बाहेरील दूर संवाद प्रणालीची आवश्यकता भासू लागली. LCRD मोहिमेद्वारा लेसर दूरसंवाद प्रणालीच्या प्रचंड क्षमतेचा अंतराळ मोहिमांसाठी उपयोग करण्याचा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये नेहमीच्या रेडिओ लहरींऐवजी आवरक्त (infrared) किरणांचा उपयोग मिळालेल्या माहितीचे सांकेतिक भाषेत रूपांतर करून ती माहिती पृथ्वीवर पाठवण्यासाठी करण्यात येणार आहे.

रेडिओ लहरी व आवरक्त लेसर किरणे ही दोन्हीही विद्युत चुंबकीय प्रारणांचाच प्रकार आहेत. पण वर्णपटलातील दोन्हींची तरंगलांबी वेगवेगळी असते.अंतराळमोहिमांमध्ये मिळालेली वैज्ञानिक माहिती विद्युतचुंबकीय प्रारणांमध्ये सांकेतिक स्वरूपात साठवून ती पृथ्वीकडे पाठवली जाते.

आवरक्त लेसर किरणांची वारंवारीता रेडिओ लहरींपेक्षा पुष्कळच जास्त असते. त्यामुळे इंजिनिअर्सना माहितीच्या प्रत्येक प्रक्षेपणाच्यावेळी जास्त विदा त्यात भरता येते. जास्त विदा म्हणजे जास्त माहिती व जास्त माहिती म्हणजे अंतराळाविषयी जास्त ज्ञान. LCRD उपग्रह आवरक्त लेसरचा वापर करून भू -तुल्यकालीन कक्षेतून पृथ्वीकडे प्रतिसेकंद १.२ गिगाबाईट्स इतकी विदा पाठवू शकेल. या तुलनेने आपण तीन तासांचा सिनेमा एका मिनिटात डाउनलोड करू शकू!! आवरक्त लेसर किराणांद्वारे माहिती पाठविण्याचा उपयोग नासा चांद्र मोहिमा किंवा चंद्रापेक्षा दूरच्या मोहिमांमध्ये करणार आहे.

 

 

 

 

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Rajiv Pujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments