भेदले शून्य मंडळा

भेदिले शून्य मंडळा
तिन्ही सांजची वेळ. मुले शुभं करोति म्हणत होती. त्यानंतर त्यांनी मारुती स्तोत्र म्हणायला सुरवात केली.
‘ भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती —‘ त्यातील एका ओळीने माझे लक्ष वेधून घेतले.
‘ अणूपासूनी ब्रह्मांडा एव्हढा होत जातसे ‘ एकदम मला जाणवले ‘ अरे! ही तर बिग बँग थिअरी आहे ‘ पुढे ऐकत गेलो. आणखी एका ओळीने लक्ष वेधून घेतले. ‘वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा ‘
शून्य मंडळ!! जेथे अवकाश व काळ एकरूप होतात. अरे, हे तर कृष्ण विवर!! कृष्ण विवराचा गाभा!! कृष्ण विवर भेदणे शक्य आहे? असा विचार करत मी झोपी गेलो.
आणि अगा नवल वर्तले!! मी चक्क कृष्ण विवरात जाऊन त्यातून बाहेर सुद्धा पडलो. त्याचे असे झाले..
३०जुलै २०२०, भारतीय वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजून वीस मिनिटे.
दहा.. नऊ.. आठ.. सात.. सहा.. पाच.. चार..
तीन.. दोन.. एक.. शून्य.. गो!!! आणि धूर व आगीचा प्रचंड लोळ सोडत नासाचे मार्स २०२० यान अवकाशात झेपावले.
भारतीय वेळेनुसार १९ फेब्रुवारी २०२१ च्या पहाटेची एक वाजून पंचवीस मिनिटे. नासा टि.व्ही. वर स्वाती मोहनचा उल्हसित स्वर निनादला ‘ अँड टचडाऊन कन्फर्मड ‘ आणि झोपेत सुद्धा माझ्या अंगावर शहारे आले. पर्सिव्हिरन्स रोव्हर मंगळावर उतरला होता. काही कालावधीनंतर त्याच्या यांत्रिक हातांनी मंगळावरील जेझेरो क्रेटर येथील जमीन पोखरून खडूच्या आकाराचे खडकांचे नमुने घेऊन ते सीलबंद कुप्यांमध्ये ठेवायला सुरवात केली. वेगवेगळ्या ठिकाणांहून नमुने घेऊन चाळीस सीलबंद कुप्या रोव्हरने एका विशिष्ठ ठिकाणी ठेवल्या.
२८ जुलै २०२६- मंगळावरून या कुप्या आणण्यासाठी नासा व युरोपीयन स्पेस एजन्सीने आखलेल्या ‘ मार्स सॅम्पल रिटर्न ‘ मोहिमेअंतर्गत ‘मार्स एक्सेन्ट रॉकेट ‘ अंतराळात झेपावले.
१ऑक्टोबर २०२६- युरोपीयन स्पेस एजन्सीने तयार केलेल्या अर्थ रिटर्न ऑर्बिटरने एरियन-६ बूस्टरच्या मदतीने अंतराळात झेप घेतली.
१६ फेब्रुवारी २०२७- दोन टप्प्यांचे घन इंधन असलेले ‘ मार्स एक्सेन्ट रॉकेट ‘(मंगळ आरोहण अग्निबाण ) रोव्हरसह मंगळावर जेथे कुप्या होत्या तेथे उतरले. रोव्हरने कुप्या गोळाकरून आरोहण अग्निबाणाच्या कॅप्सूलमध्ये एका हवाबंद डब्यात ठेवल्या. एकदा कुप्या ठेवल्यानंतर आरोहण अग्निबाणाने मंगळावरून उड्डाण करून सर्वात आतील कक्षेत प्रवेश केला.
१०मार्च २०२७- आयन प्रॉपल्शन पद्धतीचा वापर करून अर्थ रिटर्न ऑर्बिटर हळू हळू मंगळाच्या सर्वात आतील कक्षेत प्रवेश करते झाले. मंगळ आरोहण अग्निबाण व अर्थ रिटर्न ऑर्बिटर मंगळाच्या कक्षेत एकमेकांशी जोडले गेले व मंगळ आरोहण अग्निबाणाच्या कॅप्सूल मधील कुप्या असलेला डबा अर्थ रिटर्न ऑर्बिटरमध्ये आणण्यात आला. आयन प्रॉपल्शनच्या मदतीने हळू हळू कक्षा वाढवत ऑर्बिटर मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाबाहेर पडले व पृथ्वीच्या दिशेने झेपावले व नऊ ऑक्टोबर २०२७ ला अर्थ रिटर्न ऑर्बिटरची मंगळावरील खडकांचे नमुने असलेली कॅप्सूल पॅसीफिक महासागरात सुखरूप उतरली.
नासाने कुप्या ताब्यात घेतल्या व कॅलिफोर्निया येथील जेट प्रॉपल्शन लॅबरोटरीत आणल्या. अमेरिका व सहकारी देश यांच्यात झालेल्या करारानुसार सदस्य राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन केंद्राना एक एक कुपी देण्यात आली. भारताच्या इस्रोला पण एक कुपी मिळाली. इस्रोच्या खडकाचे विश्लेषण करणाऱ्या विभागाने सील उघडून खडूच्या आकाराचा तो तुकडा तपासला असता तो गाळाचा खडक आहे असे आढळून आले. तसेच त्यामध्ये जीवाश्म देखील आढळून आले. आणि आश्चर्य म्हणजे त्यात एक केस आढळून आला. केसाचा तुकडा घेऊन त्याचे DNA परीक्षण केले असता तो केस एका पृष्ठवंशीय सस्तन प्राण्याचा आहे असे आढळले. DNA वरून बुध्यांक मोजला असता तो ३०० आहे असे आढळले. याचाच अर्थ त्या प्राण्याची बुद्धिमत्ता अत्यंत उच्चकोटीची असणार. येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे कि, आइन्स्टाईनचा बुध्यांक १६० ते १९० होता. इस्रोने ही माहिती सर्व अंतराळ संशोधन केंद्रांना कळवली. इतर देशांच्या संशोधन केंद्रांकडे पाठविलेल्या नमुन्यांचे निकाल पण हाती आले होते. काही नमुन्यांमध्ये सिमेंटचे तुकडे आढळून आले होते. आणि सिमेंट हा कांही नैसर्गिक पदार्थ नाही. कांही नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळले होते. त्यानंतर सगळ्यादेशांतील अंतराळसंशोधकांची एक बैठक झाली व प्रत्येकाने आपल्या खडकाच्या नमुन्यात काय आढळले व त्याचा निष्कर्ष काय हे बैठकीसमोर मांडले. या सर्व विचारमंथनातून एकच अनुमान निघाले, ते म्हणजे, मंगळावर कधीकाळी नद्या वहात होत्या व अत्यंत उच्च बुद्धिमत्तेचे प्राणी वास्तव्य करून होते. बैठकीत असेही ठरविण्यात आले कि, मंगळावर यंत्रमानव पाठवून उत्खनन करण्यात यावे. कोणता देश कोणत्या बाबतीत तज्ञ आहे याचा आढावा घेऊन पुढील बैठकीची तारीख ठरविण्यात आली. पंधरा दिवसांनी बैठक झाली. अमेरिकेने प्रक्षेपक बनवायचे ठरवले, युरोपीयन स्पेस एजन्सीने अंतराळयान बनवायचे ठरविले, जपानने कृत्रिम बुद्धिमत्तेनेयुक्त यंत्रमानव बनवायचे ठरवले, रशियाने खुदाईची यंत्रणा देण्याचे ठरले आणि लागणारे सर्व सॉफ्टवेअर भारताने पुरावयाचे ठरवले. मोहिमेला ‘मंगळ खुदाई मोहिम ‘ असे नांव देण्यात आले. मोहिमेचा एकंदर खर्च १० बिलियन डॉलर्स येणार होता. तो कोणी कसा करायचा हे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे त्या त्या सरकारांकडून मंजुरी मिळवण्याची जबाबदारी त्या त्या अंतराळ संशोधन केंद्रांवर सोपविण्यात आली आणि सर्व सरकारांनी या खर्चाला मंजुरी दिली.
१ जानेवारी २०३०- जपानने खास खुदाई करणारे चार यंत्रमानव बनवले. त्यांना मोहेंजोदडो व हडाप्पा येथील उत्खननाची फिल्म दाखवण्यात आली. उत्खननास सुरुवात कशी करायची, निघालेली दगड माती कोठे टाकायची, नगराचे अवशेष सापडायला सुरवात झाल्यावर सांभाळून खुदाई कशी करायची, सापडलेले सांगाडे, हाडे, विविध भांडी, वस्तू यांवरील माती ब्रश व इतर उपकरणे यांच्या सहाय्याने नाजुकपणे कशी काढायची यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. त्याचवेळी भारतीय पुरातत्व विभागाचे पुण्याजवळ लोणीकाळभोर येथे उत्खनन चालू होते. जपान सरकारने विनंती केल्यावरून हे उत्खननाचे काम या चार यंत्रमानवांना on job training म्हणून देण्याचे ठरले. त्यांनी हे काम अत्यंत सराईतपणे केले व तेथील जमिनीखाली एक अत्यंत योजनाबद्ध नगर होते हे शोधून काढले. उत्खननाच्या वेळी सापडलेली भांडी, फणी, आरसा, भिंतीवरील चित्रे वगैरे सर्व त्यांनी वर आणून अत्यंत सफाईदारपणे त्यावरील माती, चिखल वगैरे काढून स्वच्छ केले. या निमित्ताने भारताच्या यासंबंधीच्या सॉफ्टवेअरची पण चाचणी झाली.
३० जुलै २०३१- अमेरिकेच्या केप कॅनावरल येथील प्रक्षेपक केंद्रावरून चार यंत्रमानव, खुदाईची सामग्री यांसह SN ३० या अग्निबाणावरून मार्स २०३१ यानाने उड्डाण केले.
१८ फेब्रुवारी २०३२- विक्रम लँडर मंगळभूमीवर सुखरूप उतरला. उतरल्यावर यंत्रमानवांनी स्वतःचे तसेच सर्व उपकरणांचे विविध हालचाली करून परीक्षण केले व १ एप्रिल २०३२ रोजी प्रत्यक्ष खुदाईस आरंभ झाला. २ कि.मी. × २ कि. मी. परिसरात खुदाई करायचे अगोदरच ठराविण्यात आले होते.
साधारण २०० फूट खुदाई केल्यावर एक एक गोष्ट उजेडात येऊ लागली. ती एक अत्यंत योजनाबद्ध रितीने वसवलेली शिक्षण नगरी होती. एक विश्वविद्यालय, त्याला लागून विद्यार्थ्यांसाठी छात्रावास,सुसज्ज ग्रंथालय, आखीव रेखीव रस्ते, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध वस्तूंची दुकाने, प्राध्यापकांसाठी आवास असे सर्व तिथे होते. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असावा असे दिसत होते. वर्गांवर पाट्या लावलेल्या होत्या. त्या देवनागरीत होत्या. प्रवेश, परिचय, शिक्षा व कोविद अशा क्रमाने अभ्यासक्रम असावा व कोविद उत्तीर्ण झाल्यावर पदवी मिळत असावी असे दिसले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणितशास्त्र, इतिहास, भूगोल अंतराळविज्ञानशास्त्र वगैरे असंख्य विषय तेथे शिकविण्यात येत असावेत. ग्रंथालयातील पुस्तकांवरची धूळ व चिखल काढल्यावर पुस्तके वाचता येऊ लागली. सर्व पुस्तके संस्कृतमध्ये होती. पुस्तकांची पाने प्लास्टिकची व अक्षरेसुद्धा प्लास्टिकयुक्त शाईने लिहिलेली असल्याने वाचता येत होती. अंतराळविज्ञानावरील पुस्तके पाहता असे लक्षात आले कि, त्यांनी अंतरिक्ष विज्ञानात कमालीची प्रगती केली होती. निव्वळ सूर्यमालेतील ग्रहांनाच नव्हे तर सूर्यमालेबाहेरील ग्रहांनासुद्धा त्यांनी भेटी दिल्या होत्या. आपल्या पृथ्वीलासुद्धा त्यांनी भेट दिली होती. येथे पृथ्वीचा उल्लेख अवनी असा केला होता. त्यांनी पृथ्वीला निव्वळ भेटच दिली नव्हती तर तेथील प्राण्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख पण करून दिली होती. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात एका विशिष्ठ कालावधीत ऍप माकडापासून माणसाची उत्क्रांती इतक्या वेगाने कशी झाली हा एक न सांधलेला दुवा होता तो आता या नवीन माहितीमुळे सांधला जाईल.
कृष्णविवरांसंबंधी एक पुस्तक होते. त्यातील उल्लेख पुढीलप्रमाणे होता:
कृष्णविवर ही कांही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ठ वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवट
स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावत कृष्णविवरात रूपांतरित होतात. यावेळी तारा अमर्याद लहान व कमालीचा घन बनतो. या एका अदृष्यरुपी बिंदूला एकत्व (singularity) असे म्हणतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते कि, प्रकाश देखील त्यापासून सुटू शकत नाही. या बिंदूरूप अवस्थे भोवती अदृश्य कुंपण निर्माण होते त्याला घटना क्षितिज म्हणजेच event horizon म्हणतात. घटना क्षितिज हे कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाची सीमाच असते. एक अशी सीमा जिच्या पलीकडून परतणे शक्य नाही. घटना क्षितिजापाशी मुक्तीवेग हा प्रकाशाच्या वेगा एव्हढाच असतो, तर त्याच्या आतील कृष्णविवरापासून निसटण्याचा मुक्तीवेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. हा मुक्तीवेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असल्याने, प्रकाश देखील इथून बाहेर पडू शकत नाही. समजा त्यातून कोणी आत शिरलंच तर प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे ती व्यक्ती जिवंत राहू शकणार नाही. समजा एक माणूस डोक्याकडून आत घुसला तर डोक्याकडे जास्त गुरुत्वाकर्षण व पायाकडे कमी, यामुळे तो माणूस ताणला जाईल व त्याचे रूपांतर शेवई सदृश्य पदार्थात होईल (spaghettisation). याच पुस्तकात कृष्णविवरात शिरून बाहेर कसे पडायचे याचे विवेचन पण होते. दोन पद्धती सांगितल्या होत्या. एकात सांगितले होते कि, आपल्या शरीरातील सर्व पेशींचे प्लाझमा मध्ये रूपांतर करायचे व कृष्णविवरात प्रवेश करायचा, कृष्णविवरतील गुरुत्वाकर्षणामुळे प्लाझमा ताणत जाईल ( एका दिशेने लांबत जाईल /वाढत जाईल) त्यानंतर तो धवल विवरात प्रवेश करेल व त्यातून तो बाहेर उत्प्रेरित केला जाईल. नंतर shape memory alloy प्रमाणे मूळ रूप धारण करायचे. दुसऱ्या प्रकारात शरीरातील सर्व वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर करायचे व मनाच्या वेगाने कृष्णविवरातून बाहेर पडायचे. जर पलीकडे काय आहे हे माहित असेल तर मनाचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असू शकतो असे गृहीत धरले होते. आणि पलीकडे काय असू शकेल हे गणिताने अचूक काढले होते.( मला मारुती स्तोत्रातील आणखी एका ओळीची आठवण झाली – ‘ मनासी टाकीले मागे, गतिसी तुळणा नसे ‘) यंत्रमानव जे काही पाहत होते वा वाचत होते, ते सर्व पृथ्वीवरील सर्व अंतराळ संशोधन केंद्रांमध्ये दिसत होते.
काही वर्षांपूर्वी इव्हेंट होरायझन टेलिस्कोपने (EHT) M87 या कृष्णविवराचे फोटो काढले होते. आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञ कृष्णविवरात कसे जाता येईल याचा विचार करत होते. त्यांना अनायसे माहिती मिळाली. बरीच भवती नभवती होऊन पहिली पद्धत (प्लाझमाची ) अवलंबवयाचे ठरले. दोन्ही पद्धतीत परत येण्याची शक्यता शून्य. नावेतून जात असता अचानक धबधबा लागल्यावर कितीही वल्ही मारली तरी आपण धबधब्यातून पडतोच पडतो तसेच एकदा घटना क्षितिजातून आत गेल्यावर आपल्याला आपली इच्छा असो वा नसो कृष्णविवरात जावेच लागते आणि परतीचे दोर कापले जातात.
सर्वानुमते अंतराळवीर (कि कृष्णविवर वीर) म्हणून माझी निवड झाली. मला अत्यंत आनंद झाला. पण मी परत भेटणार नाही म्हणून पत्नी व मुलांचे रडणे काही थांबेना. त्यांची समजूत काढता काढता नाकी नऊ आले. शेवटी परत एकदा रामदास स्वामीच माझ्या मदतीस आले. त्यांचे ‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे ‘ हे वचन मी तिला सांगितले. कशीबशी तिची समजूत पटली. मी मनात म्हंटले ‘ एका षटकात सहा षटकार मारल्याने सोबर्स बरोबरच ज्याच्या षटकात सहा सिक्स मारले तो नॅश पण प्रसिद्ध झाला, तसेच कृष्णविवर वीराची बायको म्हणून तिला पण प्रसिद्धी मिळणार. (कधीकधी नको त्यावेळी मला जोक सुचतात. हेच मी बायकोला सांगितले असते तर ती म्हणाली असती,’ अहो, प्रसंग काय, जरा स्थळ काळाचे तरी बंधन ठेवा. पण तिला कुठं माहित कि, जिथे मी चाललो होतो, तिथं खरंच स्थळ काळाचे बंधन नसतं. कारण ती दोन्ही एकात्म झालेली असतात ) असो, जरा थोडं विषयाला सोडून झालं आणि विषयाला धरून पण!
१ जानेवारी २०३५- मॅग्नेटोस्फेरिक मल्टीस्केल स्पेसक्राफ्ट वापरून ( हे अंतराळयान जवळ जवळ प्रकाशाच्या वेगाने प्रवास करते ) वर्महोलमधून प्रवास करून आमचे अंतराळयान २५००० प्रकाशवर्षे दूर असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या SgrA* या कृष्णविवराजवळ एका वर्षात पोचले. या यानात मी प्लाझमा स्वरूपात होतो. यान घटना क्षितिजाजवळ आल्यावर कृष्णविवराभोवती फिरू लागले व त्याची कक्षा कमी कमी होऊ लागली. पुरेसे जवळ आल्यावर मला (प्लाझमा रूपात ) यानातून बाहेर सोडण्यात आले. मी घटना क्षितिजाच्या आत आलो व कृष्णविवरात प्रवेश करता झालो. मी बाहेर पहिले असता एका विशिष्ठ व्यासाच्या वर्तुळातील विश्व् मला दिसू लागले. जसजसा मी आत जाऊ लागलो, तसतसा त्या वर्तुळाचा व्यास कमी कमी होऊ लागला. नंतर मला दिसायचे बंद झाले. मला कृष्णविवराचे तीव्र गुरुत्वाकर्षण जाणवू लागले. मी रबर ताणतात तसा एका दिशेने ताणला जाऊ लागलो, ताणण्याचा वेग प्रकाशच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे २.२ कोटी कि.मी. लांबीच्या कृष्णविवरातून माझे एक टोक सव्वा दोन मिनिटात बाहेर आले. ते गेले धवल विवराच्या घटना क्षितिजात व तेथून धवल विवरात. अशा तऱ्हेने एकंदर चार मिनिटांत मी पूर्णपणे कृष्णविवरातून धवल विवरात प्रवेश करता झालो. धवल विवरातून बाहेर फेकले जायला मला आणखी दोन मिनिटे लागली. अशा तऱ्हेने सहा मिनिटांत मी समांतर विश्वात प्रवेश केला आणि थेट पोचलो इंग्लंडमध्ये. तेथे न्युझिलंड भारत विश्वचषक कसोटी क्रिकेटचा अंतिम सामना सुरु होता. दुसऱ्या डावात न्युझिलंडच्या सर्व बाद १७० धावा झाल्या होत्या व भारताला जिंकायला १३० धावा आवश्यक होत्या. रोहित शर्मा व शुभमन् गिल यांनी न्युझिलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ते लक्ष गाठले. जिंकायला चार धावा कमी असतांना रोहितने काईल जेमिसनला षटकार मारला आणि मी आनंदाने ओरडलो,’ हे ssss ‘ माझे ओरडणे ऐकून बायकोने मला हलवून जागे केले व विचारले,’ काय हो, कसले स्वप्न बघत होता?’ मी उत्तरलो,’ अशा स्वप्नांमधूनच विज्ञानाची प्रगती होते.’

लेखक – राजीव गजानन पुजारी
फ्लॅट नं 3, भाग्यश्री अपार्टमेंट, सावरकर मार्ग क्रमांक १,विश्रामबाग, सांगली (416415)
E mail id- [email protected]
व्हाट्स ऍप मोबाईल -9527547629

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: rgpujari

नांव - राजीव पुजारी
गांव -विश्रामबाग, सांगली
शिक्षण -बी. ई. (मेकॅनिकल)
व्यवसाय - निवृत्त अभियंता
छंद - वाचन, प्रवास, लेखन
प्रसिद्ध झालेले लिखाण - १)कालिफोर्निया डायरी (प्रवास वर्णनात्मक पुस्तक )
२)लेखमाला - नासाची मंगळ मोहीम (१० लेखांची मालिका दैनिक केसरी मध्ये प्रकाशित )
३) जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
४) एल सी आर डी -अंतराळ संदेशवहनातील नवा अध्याय- हा लेख मराठी विज्ञान परिषदेच्या एप्रिल २०२२ च्या अंकात प्रसिद्ध.
५) आमची मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन व भेदीले शून्य मंडळा ही विज्ञान कथा अक्षर विश्व् २०२१ दिवाळी अंकात प्रकाशित

राजीव पुजारी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments