आज माझ्याकडे एक अजब केस आली. आम्ही लैंगिक समस्यांबाबतचा NGO चालवतो, इथे पुरुष-स्त्रिया, स्त्रिया-स्त्रिया, पुरुष-पुरुष, कधी कधी तर तिघे पार्टनर्स पण येतात. तसंच आज एक जोडपं माझ्याकडे आलं. ३०-३५ चा तरुण आणि त्याचा ६५-७० वयाचा पार्टनर. त्यांची समस्या ऐकून घेताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की इतर जोडप्यांप्रमाणे ह्यांच्यामध्ये जिव्हाळा नव्हता, त्या तरुणामध्ये एक कर्तव्यभावना होती. त्यांची शारीरिक समस्या ऐकून त्यावरचं समाधान दिल्यानंतरही  माझ्यातला समुपदेशक मला गप्प बसू देत नव्हता. ते काका फ्रेश होण्यासाठी गेले असता मी त्या तरुणाला म्हटलं. “मला तुझी गोष्ट जाणून घ्यायचीये”.

“कोणती गोष्ट?” तो म्हणाला.

“मला तुझी अपॉइंटमेंट मिळेल का? भेटलो की मग बोलू. तुझा नंबर मी रिसेप्शनवरून घेईन, मला फक्त वेळ सांग. आपल्या सेंटर समोरच एक कॉफी शॉप आहे, तिकडं भेटू शकतो”

माझ्या मते त्यालाही मोकळं व्हायचं असावं, जास्त वेळ नं दवडता त्यानं वेळ दिला. म्हणाला, “मी कॉल करतो, तुम्ही नका करू प्लीज”

मी समजलो. “बरं ठीक आहे” असं बोलेस्तोवर काका फ्रेश होऊन आले, आणि दोघे आभार मानून निघून गेले.

भेटायची वेळ दुसऱ्या दिवशीची होती. मनात अनेक विचार येत होते, हे असेल का, असं झालं असेल का, तेंव्हाची परिस्थिती काय असेल, आपल्याला कळल्यास आपण काही करू शकू का, असे एक ना अनेक.

त्याचा ठरल्याप्रमाणे एक तास आधी कॉल आला.

सेंटर समोरच असल्यानं मी आधीच जाऊन एक निवांत सीट रिझर्व्ह करून तिकडे बसून राहिलो. तो वेळेत आला.

मी म्हटलं, “काय घेणार”

तो म्हणाला, “काहीही चालेल, जे तुम्ही घेणार तेच”

मी ऑर्डर केलं. मी जितका अस्वस्थ, तितकाच तो शांत आणि गंभीर.

“बोला, काय विचारायचं होतं?” त्यानं वातावरणातला उसना तणाव संपवला.

इतक्या थेट विचारलेल्या प्रश्नानं खरंतर माझी विकेट उडाली होती. पण वेळेचं भान ठेऊन मी उत्तर दिलं.

“मी एक कौन्सिलर आहे, त्यानिमित्तानं मी वेगवेगळ्या लोकांना भेटतो, त्यांच्या बाजू ऐकतो, आणि एकुणातच मला नातेसंबंधाबद्दल थोडंफार कळायला लागलंय असं मी मानतो. माझ्याकडे जे बोलाल ते सुरक्षित असेल, ह्याची मी खात्री देतो”

माझ्या बोलण्यावरती त्याचा विश्वास आहे असं मला एकंदरीत त्याच्या डोळ्यात पाहून कळलं. मग मी विषयाला हात घातला.

“जेंव्हा तुम्ही दोघे माझ्याकडे आलात, सुरवातीला मी तुमच्याकडं एक केस म्हणून पाहिलं, पण पुढं मला असं जाणवलं की तुम्ही प्रेमानं नाही तर एक प्रकारच्या कर्तव्य किंवा जबाबदारीनं एकमेकांबरोबर आहात. आणि म्हणूनच ते जाणून घेण्यासाठी मी तुला इथे बोलावलंय”

त्याच्या चेहऱ्यावर अस्पष्टसं आश्चर्य दिसलं.

“तुम्ही जे बोललात ते खरोखरंच आमच्या वागण्या बोलण्यातून तुम्हाला जाणवलं? हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं, कारण आम्हीही ह्या नात्याची अशी चिकित्सा कधी केली नव्हती. पण हो, तुम्ही जे बोललात त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे.”

ते माझे गुरुजी, शेळके गुरुजी. शाळेतले विषय शिकवणारे शिक्षक, पण लौकिकार्थानं आज मी जो काही आहे तो त्यांच्याचमुळं. जर ते माझ्या आयुष्यात आले नसते, तर कदाचित हा मयूर पण त्याच्या वयाच्या मुलांप्रमाणे मित्र, हास्य विनोद, मुलींबरोबरची लिंक-अप्स, पार्ट्या ह्यामध्ये रमलेला तुम्हाला दिसला असता.”

मयूर चे डोळे पाणावले होते, आणि मन आठवणीत गेलं होतं.

***************************************************************

“अरे मयूर तू शिकवणीला नाही गेलास? चल जा पाहू आधी”. आईचे बोल कानावर पडताच मयूर थरथर कापायला लागला. “अरे काय झालं, असं का करतोयस? शिकवणीला नं जायचे बहाणे करू नकोस. अरे ते गुरुजी किती छान शिकवतात, गावात नवा आहे त्यांचं, आणि ते तुला शिकवायला तयार झालेयत, तर तू ही संधी वाया घालवू नको. जा बघू. तू जाऊन येईपर्यंत मी तुझ्या आवडीचं काहीतरी बनवून ठेवते.” आई बोलत होती, पण मयूरच्या कानापर्यंत तिचे शब्द काही पोचत नव्हते. तेवढ्यात बाबा खोलीत आले, आणि त्यांनी मयूरच्या कानशिलात ओढली. मयूर एकही शब्द बोलला नाही, पिशवी घेतली आणि घराबाहेर पडला.

पाय चालत चालत गुरुजींच्या घरासमोर पोचले, दारात शेळके गुरुजी वाटच पाहत होते. मयूर ला पाहताच त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली, “अरे किती उशीर केलास? मी आता बघायलाच येत होतो घरी, कि अजून कसा आलं नाहीस ते”. मयूर काहीच बोलला नाही, मूकपणे चप्पल दारात काढून, बैठकीच्या खोलीत पिशवी ठेऊन बेडरूम मध्ये जाऊन बसला. गुरुजींनी दारातून एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे पहिले, कोणी अजून विद्यार्थी येत नसल्याची खात्री करून, दाराची कडी लावून घेतली.

“मयूर, अरे मयूर कुठेयस? आज कोणता विषय शिकायचा? चल पुस्तकं काढ बघू” दारातूनच त्यांनी मयूर ला सूचना दिल्या.

मयूर मोरे, एक सामान्य बुद्धीचा मुलगा, पण वडलांना वाटे त्याने ९० – ९५ टक्के मार्क्स मिळवावेत. मयूरच्या शाळेतले शेळके गुरुजी मयूरच्याच गल्लीत ८-१० घरं सोडून राहायचे, आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांचं नाव होतं, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, थोडक्यात एक आदरणीय व्यक्तिमत्व. मयूरच्या वडलांनी एकदा शेळके गुरुजींना मयूरबद्दल सांगितलं आणि म्हणाले “तुम्ही जर मार्गदर्शन केलंत पोराला तर भलं होईल त्याचं. जरा कच्चा आहे हो तो अभ्यासात”. सुरवातीला शेळके गुरुजींनी थोडे आढेवेढे घेतले, मग म्हणाले, “चालेल, पाठवा. पण दुपारच्याला, संध्याकाळच्याला मला देवळात कीर्तनाला जायचं असतं.” मयूरचे वडील म्हणाले, “खूप उपकार झाले सर, शाळेतून आलं की जेऊन लगेच येईल तो तुमच्याकडं, चांगला अभ्यास करून घ्या.”

अशा तऱ्हेनं मयूरची ७ वी ची शिकवणी सुरु झाली. सुरवातीला काही दिवस ठीक होतं, मयूर शाळेतून यायचा, जेऊन लगेच शिकवणीला जायचा. मास्तर आणि त्यांची बायको दोघे मयूर ची आस्थेनं चौकशी करायचे, घरात काही नवीन पदार्थ बनत असेल तर तो त्याला द्यायचे, आणि मग शिकवणी सुरु.

शिकवणी सुरु असताना मयूर ला एक गोष्ट खटकायची, की गुरुजी त्याचे थोडे जास्तच लाड करायचे. त्याला कुरवाळायचे, बराच वेळ हात हातात घेऊन  बसायचे, खाऊन झाल्यानंतर आपल्या हाताने त्याचं तोंड पुसायचे, आणि असं बरच. हे तो आईशी बोलला होता, तेंव्हा आईचं उत्तर होतं, “अरे गुरुजींना मुलबाळ नाहीये ना, बरीच वर्ष झालीयेत त्यांच्या लग्नाला, तुझ्यात ते आपला मुलगा पाहत असतील. भाग्यवान आहेस तू. तू पण त्यांची सेवा करत जा, कधीतरी त्यांना पाणी विचारावं, पाय चेपू का म्हणून विचारावं.” मयूरने त्यावरती विश्वास ठेवला होता, पण त्या स्पर्शाने त्याला कससंच व्हायचं हे मात्र नक्की. पण आईने आधीच पूर्ण स्पष्टीकरण दिलं असल्याने त्यानं हा विषय तिकडंच संपवला.

सातवीचे वर्ष संपलं, मयूरला फार काही चांगले मार्क्स मिळाले नाहीत, गुरुजींचं त्यावर असं म्हणणं होतं, की “२-३ वर्षं तरी सलग शिकवणीला बसावं लागेल, दहावीत फरक दिसेल.”

झालं, ८ वीत पण मयूरची रवानगी शेळके सरांकडे झाली.

जशी ८ वी सुरु झाली, गुरुजींच्या बायकोला दिवस गेले. वय जास्त असल्यानं गुरुजींच्या सासुरवाडीकडील लोकांनी गुरुजींच्या बायकोला दुसऱ्या महिन्यातच आपल्याकडे न्यायचं ठरवलं, काळजी घेण्यासाठी. जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी गुरुजींची बायको माहेरी गेली, आणि गुरुजींची मयूरशी शारीरिक जवळीक अजूनच वाढली.

“आई आज मी नाही जात शिकवणीला, बघ ना तास काही फार उपयोग नाही झालं ७ वीत. आणि आता मला कळलंय कसा अभ्यास केला पाहिजे. करीन मी आपापला” मयूर ने एक प्रयत्न केला. आईचं उत्तर ठरलेलं होतं, “अरे गुरुजी म्हणालेयत ना ३ वर्ष सलग गेलास तर बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळतील. थोडक्यासाठी असं नको करू. तुझ्या वडलांना पण नाही आवडायचं”.

त्या दिवशी सकाळपासून संततधार कोसळत होती, वातावरणात एक उदासी, आणि निरुत्साह पसरला होता. मयूर ला जराही इच्छा नव्हती असल्या वातावरणात अभ्यास करायची. सगळे मित्र शेजारच्या तळ्यावरती कागदाच्या बोटी करून शर्यती लावत होते. मयूर ला मात्र त्या वेळात अभ्यासाला जायला लागायचं. तो गेला. शेळके काकू नव्हतीच घरात, दरवाजा हलकाच पुढं लोटला होता, तो ढकलून मयूर आत गेला. गुरुजी दिसत नव्हते, त्याला वाटलं असतील न्हाणीघरात. त्यानं पुस्तक काढलं आणि वाचायला सुरवात केली. १०-१५ मिनिटं गेली असतील नसतील तितक्यात गुरुजींच्या हाताचा स्पर्श त्याच्या गालांशी झाला, हात काहीसे थंड आणि थरथरते वाटले त्याला. त्यानं झटकन मन मागे फिरवून पाहिलं, गुरुजी वेगळेच भासले, भीती वाटली त्याला, पण गुरुजींनी अवधी दिलं नाही, त्याचं चिमुकलं तोंड आपल्या मजबूत हातानी बंद केलं, आणि पाठीच्या मागे हात घालून त्यांनी मयूरला उचललं. काय होतंय कळायच्या आतच मयूर त्यांच्या बिछान्यात होता.

खूप प्रतिकार केलं, रडला, पण त्याची धडपड निष्फळ ठरली. पलंगावरची चादर रक्ताच्या लाल रंगानं माखली होती, मयूरला बिछान्यातून उठायचंही त्राण नव्हतं. कसाबसा तो उठला, कपडे चढवले, पण त्याला चालता येईना. इतक्यात गुरुजी त्याच्या पुढ्यात आले. “हे बघ मयूर, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती, आणि तुझं पण. हो किनई? मग आता जे झालं तेच प्रेम, आणि कुणाला सांगायचं नाही. समजलं का? हे आपल्या दोघांचं सिक्रेट” आणि त्यांनी त्याला गोंजारायला सुरुवात केली, बाहेर पाऊस धो धो पडत होता.

गुरुजींचं आवेग ओसरला, पावसानंही थोडी उसंत घेतली होती.

“जातो मी” मयूर म्हणाला.

“उद्या नेहमीच्या वेळेला ये बरं का, नायतर मी घरी येऊन सांगेन तुझ्या बापाला” गुरुजींनी धमकी वजा सूचना केली.

मयूर कसाबसा घरी आलं, आणि तडक बाथरूम मध्ये शिरला, आपले कपडे आपणच धुवून टाकले, बराच वेळ कोरड्या अंगानं बादलीतल्या पाण्याकडे पाहत राहिला

“अरे आवर की रे मयूर, किती वेळ झाला, काय करतोयस आतमध्ये?” आईची हाक आली

अख्खी बदली अंगावर ओतून घेऊन मयूरनं अंघोळ आवरली.

आईनं भजी केली होती, जी मयूर ला खूप आवडायची.

“मला खायला नकोय, मी झोपतो, डोकं दुखतंय” असं म्हणून मयूर त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. डोळ्यामध्ये झोप नव्हती, वेदना मी म्हणत होत्या, झालेल्या कृत्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता. मध्येच झोप लागायची अन गुरुजींचे डोळे आठवायचे, त्याची झोप खाडकन उडून जात होती, ओठांवरती अजून त्या राकट हातांचा दाब त्याला जाणवत होता. पहाटेवर कधीतरी त्याला झोप लागली.

***********************************

“सर, दो फ्रॅपे और फ्रेंच फ़्राईज”

वेटरच्या बोलण्यानं आम्ही दोघे ही भानावर आलो.

“हा रख दो” मी म्हटलं.

वेटर निघून गेला.

“मयूर, हे सगळं भयानक आहे, माझा मुलगा बरोबर त्याच वयातला आहे, ज्या वयाचा तू होतास हे सगळं अनुभवताना, त्याला थोडंसं खरचटलं तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं, कसं रे सहन केलंस सगळं?”

” घरचे समजून घेत नव्हते हे मान्य. पण ९ वी १० वीत आल्यानंतर तुझ्या अंगात प्रतिकाराची ताकद आली असेल ना, मग का नाही तू प्रतिकार केलंस तेंव्हा?”

तो गूढ हसला, एका उसासा टाकून म्हणाला, “ते माझ्या हातात राहिलं नव्हतं सर, आधी मी खूप रडायचो, गयावया करायचो. माझी ताकद पुरायची नाही. त्यातून ते माझ्या वडिलांकडे माझी तक्रार करतो म्हणायचे, माझे वडील खूप कडक होते, त्याना पटलंच नसतं ह्यातला काही, उलट मलाच मारलं असतं गुरुजींबद्दल भलतं सलतं बोलतोय म्हणून मला खूप वेदना व्हायच्या, पण सहन करायचो, हळूहळू शाळेतले मित्रही कमी होतं गेले.

गुरुजीना हवं ते मिळालं की मग ते मला जवळ घ्यायचे, जणू कोणी दुसराच माणूस. मला अंजारायचे गोंजारायचे, प्रेमानं बोलायचे, खाऊ पिऊ घालायचे. आयुष्यात माझं असं कोणी राहिलंच नव्हतं. गुरुजींचं घरं हेच माझं सर्वस्व झालं होतं. घरच्यांना मी त्यांच्याकडे जास्त वेळ घालवण्यात काहीच गैर वाटत नव्हतं. उलट ते निर्धास्त होते.

ह्या सगळ्याची सवय झाली किंवा आता सवय लागली म्हणा हवं तर. नंतर नंतर तर मी आपणहूनच पुढाकार घयायला लागलो. आता तर झाल्या गोष्टीबद्दल मी त्यानं दोषीही धरत नाही. सगळ्या भावना बोथट झाल्यात. शारीरिक प्रेमाची माझी कल्पना तीच आहे, जी मी पहिल्यांदा उपभोगली.

ज्या बाळंतपणासाठी काकू गेल्या होत्या ते मूल गेलं, पुढं त्यानं मूल झालं नाही, त्याही अल्पशा आजारानं २-४ वर्षातच वारल्या. मग गुरुजी माझ्यात आधार शोधायला लागले. मीही मग पूर्णवेळ त्यांच्या सोबत राहू लागलो, कधीतरी गेलो तर घरी जायचो. कारण माझ्याही आयुष्याची तीच गत झाली होती जी गुरुजींच्या. आईवडिलांपासून दूर झालो होतो, मुलींबद्दल आकर्षण निर्माण झालंच नव्हतं. मित्र बनवले नव्हते, शिक्षण पूर्ण करून एका कशीबशी नोकरी मिळवली, आणि गुरुजींच्या घरचं आणि त्यांचं औषध पाणी पाहायला लागलो

कायम काहीतरी अपूर्ण वाटायचं, चुकल्याचुकल्या सारखं वाटायचं. आज पहिल्यांदा तुम्ही मला ती जाणीव करून दिलीत. जे तुम्ही बोललात ते खरंय. मला त्यांच्याबद्दल प्रेम नाही वाटत. मी त्याना फक्त माणुसकीच्या नात्यानं आधार देतो …… त्यांचं काय ते मला माहित नाही.

मला तर वाटतं आम्ही दोघेही एकप्रकारे जिवंत प्रेते आहोत. एकमेकांना ओरबाडून संपलंय, जगात इतर कोणाशी संपर्क राहिला नाहीये, ना हसायला ना रडायला…. बस्स श्वास सुरुये म्हणून जगतोय.

बराच काळ शांततेत गेला. नकळत मयूरनं माझं हात घट्ट पकडला होता. असा, जसं काही तो सांगत होता, मला पण जगायचंय, मला बाहेर पडायचंय, मला वाचवा.

एकमेकांशी नं बोलता आम्ही बाहेर पडलो, तो त्याच्या जगात आणि मी माझ्या.

अशाही काही परिस्थिती जगात असतात, ज्यात कोणीच कोणाची मदत नाही करू शकत त्यातलीच एका मी आज अनुभवली होती.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments